मुस्लिम जगताचा चमकता तारा निखळला
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे महासचिव मौलाना वली रहेमानी यांचे 3 एप्रिल रोजी निधन झाले. ते मागच्या काही काळापासून आजारी होते. पाटण्याच्या पारस रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने मुस्लिम जगतामध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले.
मौलानांचा जन्म 5 जून 1943 साली मुंगेर बिहार येथे झाला होता. ते पाटण्याच्या गर्दनीबागमध्ये राहत होते. 2015 ते अंतिम श्वास घेईपर्यंत ते इमारते शरियाचे प्रमुख होते. त्यांनी शेकडो खाजगी संस्था, मदरसे सुरू केले होते. ते 1974 ते 1996 या कालावधीमध्ये बिहार विधान परिषदेचे सदस्यही होते. 1972 मध्ये ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या स्थापनेमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका वठविली होती. ते ऑल इंडिया मजलिसे मुशावरातचे उपाध्यक्षही होते. त्यांचे सर्वात उल्लेखनिय कार्य म्हणजे रहेमानी फाऊंडेशनची स्थापना होय. 2009 साली त्यांनी याची स्थापना केली. यात ते दरवर्षी होतकरू 30 मुस्लिम विद्यार्थ्यांची निवड करून त्यांची आयआयटी, जेईई आणि नीटची मोफत तयारी करून घेत. त्यासाठी त्यांनी मुलभूत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या होत्या. याशिवाय, ते अनेक शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांशी संबंधित होते. उर्दू दैनिक ’इसर’चे प्रकाशन आणि सा. नकीब ची स्थापना करून आपल्यातील पत्रकारितेची चुनूकही देशाला दाखवून दिली होती. 1976 मध्ये त्यांनी औकाफच्या संपत्तीच्या संरक्षणासाठी राज्य व्नफ कायद्यामध्ये 21 वे संशोधन पास करून घेतले होते. बिहारमध्ये उर्दू भाषेला दुसऱ्या शासकीय भाषेचा दर्जाही त्यांनी मिळवून दिला होता. शिक्षण क्षेत्र हे त्यांचे आवडते क्षेत्र होते. मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार आणि प्रसार व्हावा यासाठी त्यांनी भरपूर मेहनत घेतली. मुस्लिम महिलांच्या शिक्षणाचे ते समर्थक होते. म्हणूनच त्यांनी रहमानी बी.एड. कॉलेजची स्थापना केली. जेथून शिक्षण घेवून शेकडो महिला देशाच्या वेगवेगळ्या शाळा आणि महाविद्यालयामध्ये शिक्षणाचे कार्य करू शकल्या. ते धार्मिक शिक्षणाबरोबरच समकालीन शिक्षणावरही भर देत होते. त्यांनी भारत सरकारच्या मदरसा आधुनिकीकरण समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम केले.
सार्वजनिक आरोग्यामध्येही त्यांना रस होता. रहेमानी फाऊंडेशनने जाती, धर्म, रंग, लिंग याकडे न पाहता दरवर्षी तीन हजार पेक्षा जास्त लोकांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करण्याचा उपक्रम राबविला. त्यांनी कब्रस्तानमध्ये शिसम आणि सागवानची लागवड करण्याची अभिनव कल्पना राबविली. त्यामुळे कब्रस्तानशी संबंधित अनेक संस्थांना आर्थिकरित्या आत्मनिर्भर होता आले. सांप्रदायिक सद्भाव राखण्यासाठी ते खूपच आग्रही होते. त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त होती. कोलम्बो विश्वविद्यालयाने त्यांना मानद डॉ्नटरेटची पदवी दिली होती. त्यांना उत्कृष्ट सेवेसाठी राजीवगांधी पुरस्कार, शिक्षारत्न पुरस्कार, आयएसएएनए (अमेरिका)कडून सर सय्यद अहमद पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले होते. त्यांच्या जाण्याने भारतीय मुस्लिमांचे मोठे नुकसान झालेले आहे. मुस्लिम समाज त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक क्षेत्रातील योगदानाला विसरू शकत नाही. त्यांच्या या अचानक जाण्याने हजारो विद्यार्थी एका गुरूपासून आणि समाज एका मार्गदर्शकापासून मुकला आहे. अल्लाह त्यांना जन्नतुल फिरदौसमध्ये जागा देओ. आमीन.
Post a Comment