Halloween Costume ideas 2015

गझलेतील रमजान ईद

ramzan eid

भारत हा गीतांचा, गझलांचा देश आहे. असं म्हटल्यास ते वावगं नाही ठरणार. कारण इथं प्रत्येक घटनेवर, प्रसंगावर गीत, गझला आहेत. मानवी जीवनातील सुख-दुःख लग्न-विघ्न, जन्म-मरण यासारखा कोणताही प्रसंग असो अथवा दिवाळी असो वा होळी. रमजान असो वा श्रावण. प्रत्येक सणावारावर देखील गाणीच गाणी, गझलाच गझला वाचायला, ऐकायला मिळतात ज्या विषयावर काव्यरचना नाही असा विषय शोधूनही नाही सापडणार. इतक्या विपुल प्रमाणात इथं काव्यरचना आढळून येतात. हे खरोखरच आपल्या देशाचं सुरेल वैशिष्ट्य आहे.

रमजान ईद हा मुस्लीम बांधवांचा पवित्र सण आहे. या सणावर मुस्लीम गझलकारांबरोबरच अन्य धर्मीय गझलकारांनीदेखील गझला लिहून आपल्या चतु:रस्त्र प्रतिभेचा अनोखा अविष्कार घडविलाय्. ही बाब राष्ट्रीय एकात्मता अन् सामाजिक सलोखा वाढीस लागण्याच्या दृष्टीनं नितांत निकडीची आहे.

रमजान महिन्याचं वैशिष्ट्य असं की याच महिन्यात प्रेषित मुहम्मद (स.) यांना त्यांच्या खडतर तपश्चर्येचं फळ मिळालं. इस्लामचा पवित्र धर्मग्रंथ त्यांच्यावर 'वही' द्वारा उतरून पूर्ण झाला. कुरआन मधील सारे आदेश, आज्ञा अवतीर्ण झाल्या. या महिन्याला पावित्र्य प्राप्त झालं. तीस दिवस निरंक उपवास करून जगन्नियंत्याचं स्मरण, चिंतन, मनन अन् नियमित कुरआनाचं पठण करायचं असतं. रोजच्या धकाधकीच्या जीवनात रमजान हा मन:शांतीचा दिलासा घेऊन येणारा महिना आहे. हा संदेशही प्रेषितांमार्फत देण्यात आला. म्हणूनही रमजानचं महत्त्व अधिक ठळक होतं. मुहम्मद पैगंबरांवर सुरेश भट यांनी गझलेच्या आकृतिबंधात न-आत शरीफ लिहिलीय्.

उजाड वैराण वाळवंटी

खळाळणारा झरा मुहम्मद

जगातल्या दीनदु:खितांचा

अखेरचा आसरा मुहम्मद

रमजान ईद सर्वार्थानं मनोमीलनाचा सण आहे. मित्र असो वा शत्रू असो, जातीचा असो वा परजातीचा असो, ईदच्या आनंदात सर्वांना सामील करून घ्यायचं असतं. सगळ्यांच्या सहभागानंच ईदचा आनंद द्विगुणीत होत असतो. क्रोध अन् द्वेषाला फाटा देऊन गोडीगुलाबीनं प्रत्येकाची गळाभेट घेतल्यानंतर शीरखुर्मा पाजायचा असतो. बंधुप्रेमाची, निखळ स्नेहाची साक्ष देणारी रमजान ईद आपापसात भाईचारा निर्माण करण्याचं काम करते. मानवतेचा दिव्य संदेश देणारी अशी ईद म्हणजे हृदयाहृदयांना जोडणारी जणू दोरी आहे. शुभ अन् कल्याणकारी विचारांना विकसित करणं हाच ईदचा नितळ उद्देश असतो. नेमका हाच भाव प्रकट करणारा शेर एजाज शेख असा लिहितात.

हिंदु, मुस्लीम बौद्ध किंवा शीख, इसाई

जो मला भेटेल त्याची ईद होते

रमजान ईद माणसांच्या अंतरंगाबरोबरच आचार-विचारांचं शुद्धीकरण करून त्यांच्या ठायी चांगुलपणाची, प्रामाणिकपणाची रुजवण करत असते. वाईट कृत्यापासून, वाममार्गापासून, वासनेपासून माणसाला शेकडो मैल दूर ठेवणारा हा महिना आहे. बंद्यांच्या प्रत्येक कृत्यांवर अल्लाहची करडी नजर असते. अल्लाह बंद्यांच्या कोणत्याही कृतीपासून अनभिज्ञ नाही राहू शकत. तो प्रत्येक गोष्ट जाणून असतो त्यामुळेच तर बंदे अल्लाहची भीती मनात बाळगून सत्याची, भल्यापणाची कास धरतात. यातूनच आयुष्याला विधायक वळण लागतं. समाजात वावरताना दुसऱ्यांविषयी मनात सद्भावना ठेवून सद्व्यवहार करणं, आपल्याकडून न कळतही कोणाची फसगत नाही होणार. आपल्या बेजबाबदार वागणुकीमुळं कुणाचं मन  नाही दुखावणार. याची काळजी बंदे घेतात. अशुभ विचारांना दूर ठेवणं म्हणजेच सद्गुणांची जीत असते. दुर्गुणांचा नाश करणं हीच रमजान ईदची शिकवण असते. अशा आशयाची मांडणी संदीप वाकोडे त्यांच्या शेरातून करतात.

अंतरीच्या दुर्गुणांचा नाश करते

सद्गुणांची जीत म्हणजे ईद आहे

रमजानमध्ये मनातील विषविकृती झटकून प्रत्येकांशी माणुसकीनं, सौजन्यानं वागत माणसा-माणसांच्या मनात बंधुत्वाची भावना जागवायची असते. सौजन्यातूनच चैतन्य निर्माण होत असते. प्रेमाची, बंधुत्वाची भावनाच तर सामुदायिक जगण्याचा आधार असतो. भांडण तंटे, बखेडे यातून वैरत्व वाढीस लागते. प्रेमाच्या प्रदेशातूनच शांतीचा मार्ग जात असतो. जिथं संयम दृढ असतो तिथचं शांतता प्रस्थापित होते. अशा ठिकाणीच समृद्धी नांदते. जिव्हाळ्यातून उत्पन्न झालेल्या आनंदाला सीमा नसते. या सगळ्या मूलभूत अन् सामाजिक जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींचा अंगीकार करूनच रमजान ईदची तयारी करायची असते. शिवाजी जवरे यांचा शेरही या गोष्टीचं स्मरण करून देतो.

बंधुत्व जागवाया सौजन्य वाढवाया

सारे करू तयारी रमजान ईद आली

युक्तीपेक्षा कृतीवर भर असायला हवा, कथणी अन् करणी यामध्ये तफावत असता उपयोगाचं नाही. आपलं बोलणं माणसाला तोलताही आलू पाहिजे. नुसत्या वरपांगी ईदच्या शुभेच्छा देऊन, बोलबच्चन करून भागत नसते. आधी मनाची मस्जिद स्वच्छ करायला हवी. त्यात कुविचारांचा केरकचरा साचता कामा नये. माणसाच्या मनाची मस्जिद तर स्वच्छ असली पाहिजे. त्याचबरोबर ती आबादही ठेवायला हवी. त्यात दुसऱ्यांविषयी दया, करुणा, कणव, परोपकार, माया, प्रेम या उदात्त मूल्यांची गर्दी असायला हवी. दिखावा, दांभिकता, ढोंग या समाजाला पोखरणाऱ्या दुर्गुणांपासून, दूर्वर्तनापासून अलिप्त राहणं गरजेचं आहे. आबादीआबाद हवी असेल तर मनाची पाकिजगी अपरिहार्य ठरते. याकडं अजीज खान पठाण यांचा शेर इशारा करतो.

तू मनाच्या मस्जिदीला पाक कर आबाद कर ना

हो मुबारक ईद इतके बोलण्याने भागते का?

आपल्या प्रियतमेचं आपल्याजवळ असणं, तिचं दिसणं, तिच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्यांना नेहमीच या गोष्टीचं मोठं अप्रूप वाटत आलंय्. ती काही क्षण जरी नजरेआड राहिली तर मनाची अवस्था अगदीच सैरभैर होऊन जाते. एखाद्याविषयी अंत:करणात जिव्हाळा निर्माण झाला की असंच घडत राहतं. मनाची दुनिया अंधाराच्या गर्तेत बुडून जाते. डोळ्यांना काहीच दिसेनासं होतं. मग कशातच रस वाटेनासा होतो. त्याच्यासाठी सगळे क्षण गुमसुम होऊन जातात. तिचं भेटणं तर वेगळीच गोष्ट असते. ती नुसती दिसली तरी ईद  भासते. ईद असल्यासारखाच आनंद होतो. ईद आनंदाचे प्रतीक आहे. तिला पाहणे हाच ईदचा आनंद उत्सव होऊन जातो. अशीच मंदार खरे यांची मनोधारणा आहे. त्या धारणेचा शेर पाहा.

अंधारते तू नसल्यावर

ईद भासते तू दिसल्यावर

जीवनातला स्वार्थीपणा, कद्रूपणा सोडून मनाला विशाल बनविण्याचे महान पर्व म्हणजेच रमजान मास होय. सामाजिक नात्यालाही महत्त्व आहेच. याचा अव्हेर करुन नाही चालत. सामाजिक नातं कोणत्याही परिस्थितीत जपावं लागतं. समाजरूपी नावेला छिद्रं पाडून कसं बरं चालेल. सार्‍या समाजाला त्याचा धोका पोहोचू शकतो. हे नातं सदैव अबाधित ठेवण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करणं यावरूनच खरा कस लागतो. या मासात नमाज, रोजांनी अल्लाहला तर भजायचं तर असतंच. शिवाय फितरा, जकात, सदका आदी दानधर्म करून हक्कही अदा करायचे असतात. त्याचप्रमाणं ईदच्या दिवशी 'इदगाह' मध्ये जाऊन सामुदायिकरित्या नमाज पठण करायचे असते. धर्मगुरूंचे रमजानची थोरवी विशद करणारे प्रवचन होते. प्रार्थना अन् प्रवचनातून जगाच्या कल्याणासाठी दुवा मागण्यात येते. तसेच अपराध्यांच्या पापमुक्तीसाठी, त्यांच्या मन:शांतीसाठी भावनाविवश होऊन अल्लाहला स्मरून प्रार्थना करण्यात येते. हे देखील ईदचे विशेष लक्षणीय आहे. रज्जाक शेख यांच्या शेतातून याच प्रार्थनेचा निश्चय व्यक्त होतोय.

दे पापमुक्ती, शांती अल्ला या अपराध्यांना

हीच एक प्रार्थना करुया आज ईद आहे

ईदचा आनंददायी सोहळा वर्णनातीत आहे. रमजान ईद सगळ्यांची आहे. यात भेदभावाला मुळीच थारा नाही. भाईचारा हेच तिचं अधिष्ठान आहे. ईदमीलनासारखे उपक्रम याचीच साक्ष देतात. रमजान महिना ईश्वर भक्तीबरोबरच सहिष्णुतेचीही शिकवण देतो. रमजान ईदचं हे महात्म्य त्याचं महत्त्व गझलकारांनी त्यांच्या शेरांतून सांगितलंय्.

- बदीऊज्जमा बिराजदार (साबिर सोलापुरी)

भ्रमणध्वनी: ९८९०१७१७०३


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget