Halloween Costume ideas 2015

रमजानचे रोजे आणि सामाजिक योगदान

पवित्र कुरआनात असे म्हटले आहे की पूर्वीच्या लोकांसाठी जसे रोजा (उपवास) करणे अनिवार्य केले होते, तसेच तुमच्यावरही अनिवार्य केले. पवित्र कुरआनच्या अवतरणासाठीही अल्लाहनं रमजान महिन्याचीच निवड केली होती. कुरआन म्हणजेच लोकांसाठी मार्गदर्शनपर ग्रंथ आहे. रोजाचा प्रमुख उद्देश कुरआनमध्ये जो सांगितला आहे, अल्लाहने मानवाला जे मार्गदर्शन दिले आहे त्याचे त्याने आभार मानावे.

मानवाचे अस्तित्व म्हणजे शरीर आणि आत्मा. माणूस आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यात सदैव व्यस्त असतो. जगण्यासाठी लागणाऱ्या गरजा जरी क्षुल्लक असल्या तरी त्या कधीही संपत होत नसतात. एकानंतर दुसरी गरज. त्या गरजा पुढे जाऊन आशा-आकांक्षांचे रूप घेतात. माणसाच्या या सुख-सुविधा कधीही संपत नाहीत. एकानंतर दुसऱ्याची इच्छा होत असते.

रमजानचे रोजे महिनाभर एक प्रकारचा प्रशिक्षणकाळ आहे. महिनाभर सारे मुस्लिम श्रीमंत असोत की गरीब राजा असो की प्रजा सर्वचे सर्व रोजाचे पालन करतात. सगळ्यांसाठी एकच नियम. जे सक्षम नसतील, शारीरिकदृष्ट्या दुर्बल असून त्यांना १२ तास जेवण-पाण्याविना राहणे शक्य नाही त्यांना सवलत दिली गेली, पण ती सवलत अशी की त्यांना रमजान महिनाभर एखाद्या वंचित गरीब व्यक्तीला दोन वेळचे जेवण पुरवावे.

रोजा म्हणजे आध्यात्मिक समृद्धी प्राप्त करण्याचे साधन आहे. शारीरिक इच्छापूर्तींना महिनाभर (दिवसा) वर्ज्य करून आत्मिक समाधानासाठी स्वतःला वाहून घ्यावे. अरबी भाषेत रोजाचा अर्थ स्वतःला रोखून ठेवणे, असा होतो. संयम बाळगणे आणि ठामपणे उभे राहण्यासाठीही अरबी भाषेत ‘सौम’ या शब्दाचा वापर केला जातो. ज्याला उर्दू भाषेत रोजा म्हटले जाते. रोजा किंवा उपवास प्रत्येक जनसमूह आणि धर्मात कोणत्या ना कोणत्या प्रकारे आढळतो. म्हणजे मानवजातीसाठी ईश्वराने रोजा (उपवास) करणे अनिवार्य केले आहे.

पवित्र कुरआनविषयी अल्लाहनं असे सांगितले आहे की हे साऱ्या मानवजातीसाठी मार्गदर्शन आहे. केवळ मुस्लिमांसाठीच किंवा मुस्लिमांचा हा ग्रंथ नाही. साऱ्या मानवांचा हा ग्रंथ आहे. यातील मार्गदर्शनदेखील साऱ्या मानवांसाठी आहे. या कुरआनच्या दुसऱ्या अध्यायातील सुरुवातीला असे सांगितले आहे की हे त्यांच्यासाठी मार्गदर्शन आहे जे लोक परोक्षावर श्रद्धा ठेवतात, उपासना करतात (नमाज अदा करतात) आणि एवढ्यावरच न थांबता त्यांना जी काही साधने अल्लाहने बहाल केली आहेत त्यातून ते साऱ्या गरजवंतांना पुरवितात. त्यांच्या जगण्यासाठी लागणाऱ्या साधनांची पूर्तता करतात, असे लोक सदाचारी आहेत. म्हणजे सदाचारी असण्यासाठी फक्त श्रद्धा पुरेशी नाही तर आपल्या अवतीभवती असलेल्या मानसांची, त्यांच्या गरजांची, त्यांच्या अडीअडचणींची जाणीव ठेवणेदेखील आवश्यक आहे. मग हे लोक कोणत्या का जातीधर्माचे असोत, फक्त मुस्लिमांची काळजी घेणे असे म्हटले नाही. पुढे जाऊन असे म्हटले आहे की असे लोक तुमच्यावर जे अवतरले आहे आणि तुमच्या पूर्वीच्यांवर जे काही पाठवले गेले होते यावर श्रद्धा ठेवतात तर मग हे लोकया जगात आणि परलोकातदेखील यशस्वी ठरतील.

अनाथांना झिडकारणे, त्यांना हाकलून देणे म्हणजे धर्म नाकारणे आहे. जे लोक अनाथांना, गरजूंना जवळ करत नाहीत, त्यांची विचारपूस करत नाहीत, त्यांच्या देखभालीसाठी एकमेकांना प्रोत्साहित करत नाहीत अशा लोकांविषयी पवित्र कुरआनात असे म्हटले आहे की ते धर्माचरणाचा देखावा करतात. हे लोकतर आपसातील छोट्यामोठ्या गरजांचीसुद्धा पूर्तता करत नाहीत. हे नमूद करण्याची गरजच नाही की कुरआन साऱ्या मानवजातीसाठी असल्याने त्यातील शिकवणी सगळ्या मानवजातीसाठी आहेत, मग ते कोणत्याही जातीधर्माचे का असेनात.

- सय्यद इफ्तिखार अहमद


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget