Halloween Costume ideas 2015

आजची परिस्थती अन जकात व्यवस्थेची गरज

zakat

ईश्वराने मानवीय समुहाच्या भल्यासाठी सर्व नियमावली आखून दिलेली आहे. तिचे जर तंतोतंत पालन केले गेले तर मानवी समूहाचे जगणे सुसह्य होईल. मात्र असे होताना दिसत नाही. ईश्वराला मानणारा वर्ग मोठा आहे परंतु ईश्वराची न मानणारा वर्ग कितीतरी मोठा आहे. प्रत्येकाला ईश्वरासमोर नतमस्तक व्हायला आवडते परंतु ईश्वराने जी व्यवस्था मानवी समुहाच्या भल्यासाठी आखून दिलेली आहे तिचा अंगीकार करायला लोक तयार नाहीत. त्यामुळे आपल्याला आपत्तीच्या वेळेस ईश्वराची अधिक आठवण येते आणि आपल्याला मदत मिळेनाशी झाली की आपण हताश होतो आणि ईश्वर कुठे आहे, काय करायला आहे, त्याला दिसत नाही एवढे सगळी महामारी आहे, अशे नानातऱ्हेचे प्रश्न विचारून स्वतःच्या बुद्धीचे अविचारी तारे तोडत असतो.

आज कोविड-19 महामारीने आक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे. प्रत्येकजण मरणाची धास्ती घेऊन जगत आहे. थोडाफार खोकला, सर्दी, ताप आला की बेंबीच्या देठापासून दवाखान्याची दारे ठोठावत आहे. येथेही त्याचे समाधान होईनासे झाले आहे. ऑक्सीजन, व्हेंटीलेटर, औषधी सगळेच तोकडे पडत आहे. सामान्यांची बिकट अवस्था तर श्रीमंतांची पैसे असूनही हतबलता पहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत आम्ही आपल्या जगण्याकडे आणि ईश्वराने घालून दिलेल्या व्यवस्थेबद्दल चिंतन करण्याची गरज आहे. ही अवस्था आपल्या चुकीमुळे येवून ठेपली आहे का? की ईश्वराने आपल्यावर लादली आहे? मी जेव्हा याबद्दल विचार करतो तेव्हा मला तर मानवी चूकच दिसून येते. तरीपण ईश्वर आपल्या चुकांना माफ करून आपल्याला सुधारण्याची संधी देत आहे. तेव्हा या संधीचा आपल्याला लाभ उठविता आला पाहिजे. जर आपण यातूनही बोध घेतला नाही तर आपला ऱ्हास अटळ आहे आणि त्याची जबाबदारी स्वतः आपल्यावर आहे. 

मित्रानों! आज आम्ही ’वाईटाचा तिरस्कार आणि चांगल्याचा स्विकार’ करणे विसरलो आहोत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मग ते शासन, प्रशासन असो की आमचं स्वतःच जगणं असो. नैसर्गिक साधन संपत्ती, निसर्गाचे संवर्धन या सर्वांबद्दल आमचं नातं नितीमान पद्धतीने, न्याय भावनाने निभावतो का ते बघावे लागेल. आम्ही आपल्या शासनाची निवड काय बघून करतो, आपले प्रशासन कोणत्या दिशेने जात आहे आणि आम्ही त्याच्याशी कसे नाते जोडत आहोत, आपलं जगणं कसं असलं पाहिजे आणि आपण कसं जगत आहोत. या सर्व बाबींचा विचार केला तर आपल्याला निश्चितच स्वतःची चूक दिसून येईल. ईश्वराने आपली पकड करायचं ठरवलं तर वर्षभरात मानवजात या पृथ्वीवर शिल्लक राहील का नाही, हे सांगणे कठीण आहे. 

तर मित्रानों ! आजच्या लेखात मी आपल्याला ईश्वरीय जकात व्यवस्थेबद्दल माहिती देत आहे. ज्याचे सविस्तर वर्णन कुरआनच्या सुरे तौबा आयत नं. 60 मध्ये केलेले आहे. प्रत्येक ऐपतदार व्यक्तीने जकात काढली तर समाजातील गरीबी दूर तर हटू शकते. शिवाय, आमची सामाजिक, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक प्रगती करू शकतो. आम्हाला कसल्याही आपत्तीत कोणासमोर हात पसरवायची गरज भासणार नाही. या व्यवस्थेतून आम्ही एक शुद्ध समाजाची आणि शुद्ध मनाची निर्मिती करू शकतो एवढं मात्र खरे. 

इस्लामच्या पाच अनिवार्य कार्यांपैकी एक जकात आहे. जकात आपल्या मालाचे शुद्धीकरण करते. जर आम्ही जकात सामुहिकपणे काढली तर त्याचे अनेक सकारात्मक परिणाम पहायला मिळतात. जकातचा अगदी थोडा भाग आपल्या गरीब नातेवाईकांसाठी राखीव ठेवता येतो. बाकी सर्व जकात हा सामुहिकरित्या बैतुलमाल (सार्वजनिक निधी) मध्ये  द्यावा लागतो. मग एकत्रित झालेली जकातच्या राशीचा हिशोब करून त्या राशीचा कुरआनच्या सुरे तौबामधील आयत नं. 60 प्रमाणे 8 भागात विभागणी केली जाते व गरजवंतापर्यंत पोहोचविली जाते.

जकात कोणाला देते येते?

सुरे तौबाच्या आयत क्र. 60 मध्ये म्हटलेले आहे की, ’’ हे दान तर खऱ्या अर्थाने फकीर आणि गोरगरीबांसाठी आहे आणि त्या लोकांसाठी जे दान वसुलीच्या कामावर नेमले आहेत आणि त्या लोकांकरिता ज्यांची दिलजमाई अपेक्षित आहे. तसेच हे गुलामांच्या मुक्ततेसाठी व कर्जदारांना मदत करण्यासाठी व ईश्वरी मार्गात आणि वाटसरूंच्या सेवेसाठी उपयोगात आणण्याकरिता  आहे, एक कर्तव्य आहे अल्लाहकडून आणि अल्लाह सर्वकारी जाणणारा दृष्टा व बुद्धीमान आहे.’’

1. फकीर 2. मिस्कीन म्हणजे सफेद पोश म्हणजे असे लोक जे वरकरणी सुस्थितीत वाटतात मात्र प्रत्यक्षात गरीब असतात. ते स्वतःच्या इज्जतीला भिऊन कोणासमोर हात पसरत नाहीत मात्र त्यांच्याकडे पाहून अंदाज येतो असे लोक. विशेषतः लॉकडाउनच्या काळात अशा लोकांची संख्या वाढलेली आहे. त्यांच्याकडे लक्ष देउन या निधीतून त्यांची मदत केली जाउ शकते. 3. जकात वसूल करण्यासाठी नियुक्त केलेले लोक 4. तालीफे कुलूब (दिलजमाई) म्हणजे असे लोक ज्यांच्या मनात इस्लाम मध्ये येण्याची तीव्र इच्छा आहे, मात्र त्यांच्या काही आर्थिक अडचणी आहेत. इस्लाममध्ये आल्यामुळे त्यांचे काही आर्थिक स्त्रोत बंद पडण्याची शक्यता आहे. असे लोक. 5. प्रवासी - यात श्रीमंत आणि मध्यमवर्गीय सुद्धा सामील आहेत. प्रवास करत असतांना अचानक कोणाला काही घातपात झाला, अपघात झाला, चोरी झाली किंवा आणखीन काही अभद्र घटना घडली आणि ते सधन असून सुद्धा द्रव्यहीन झाले तर अशा लोकांची सुद्धा जकात मधून मदत करता येते. 6. मान सोडविण्यासाठी - साधारणतः याच्यात निर्दोष मुस्लिम ज्यांच्या माना काही कारणाने तुरूंगामध्ये अडकलेल्या आहेत, अशांना मुक्त करण्यासाठी 7. फी सबीलिल्लाह म्हणजे ईश्वरीय मार्ग सुलभ करण्यासाठी जकातचा उपयोग करता येतो. 8. कर्जदारांना मदत करण्यासाठी. वरील प्रमाणे आठ विभागामध्ये जकातीतून खर्च केला जाऊ शकतो. याशिवाय, जकातीचा उपयोग अन्य कारणासाठी करता येऊ शकत नाही.

सध्याचं वर्ष पाहिलं तर कोविड-19 च्या साथीने अनेक लोक रस्त्यावर आले आहेत. गोरगरीबांचा जगण्याचा प्रश्न बिकट बनलेला आहे. अशा परिस्थितीत लोकांना शासकीय मदत मिळणे तर दूर जे नियमानं शासनाने वैद्यकीय सुविधा पुरविल्या पाहिजेत त्यातही शासन कमी पडत आहे.  अशा वेळेस जकातीचा काही निधी राखीव ठेवला जावा व त्यातून या गरजूंना वैद्यकीय मदतीसाठी खर्च करण्यात यावा. 

जकात एक ईश्वरीय कर आहे. त्यामुळे त्याचे वैशिष्ट्यही वेगळे आहे. जगातील जेवढ्या काही कर व्यवस्था आहेत, त्या एकतर कमाईवर (इन्कम) किंवा विक्रीवर (सेल) कर लावतात. या दोन्ही प्रकारच्या कर व्यवस्थेमध्ये कराची चोरी करता येते. मात्र इस्लाममध्ये कमाईवरही टॅक्स लावला जात नाही आणि विक्रीवरही नाही. तुम्ही एका वर्षात एक कोटी कमाविले आणि एक कोटी खर्च केले तुमच्यावर कर शुन्य. इस्लाममध्ये कर बचतीवर लावण्यात आलेला आहे आणि बचत लपविता येत नाही. साधारणपणे बचतीवर एक वर्षे पूर्ण झाल्यावर 2.5 टक्के एवढी जकात देणे प्रत्येक साहेबे निसाब (सधन) व्यक्तीवर बंधनकारक आहे. भारतात सर्व प्रकारचे उदा. आयकर, विक्रीकर, जीएसटी, सेस इत्यादी कर देऊन सुद्धा अनेक सधन मुस्लिम स्वेच्छेने आपल्या बचतीवर 2.5 टक्के जकात अदा करतात आणि गरीबांची मदत करतात, ही आपल्यासाठी मान उंचावणारी आणि संतोषजनक बाब आहे. मात्र या व्यवस्थेला लागू करण्यासाठी सर्व समाजघटकातील लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे. ही व्यवस्था इस्लामी आहे म्हणून तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्यापेक्षा या व्यवस्थेचा किती मोठा फायदा समाजाला होतो, याचा विचार झाला पाहिजे. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की, आपल्या या देशाला समृद्ध करण्यासाठी ईश्वरीय व्यवस्थेचा प्रत्येकाने अंगीकार करून आपलं जगणं सुसह्य करून ऐहिक आणि पारलौकिक जीवन समृद्ध करावं. ईश्वर आम्हा सर्वांना जकात काढून गरजूंच्या सेवेची सद्बुद्धी दे. आमीन.

- बशीर शेख

उपसंपादक


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget