’’अल्लाह कोणत्याही जनसमुहाच्या स्थितीत परिवर्तन करत नाही जोपर्यंत तो (जनसमूह) स्वतः आपल्या गुणांना बदलत नाही.’’ (सुरे अलरात आयत क्र. 11).
केवळ भौतिक प्रगतीने कोणताही जनसमूह महान बणून राहू शकत नाही हे कोविडने अमेरिकेमध्ये सिद्ध केलेले आहे. भारतामध्येही कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये आरोग्य व्यवस्थेची जी दानादान उडालेली आहे त्यावरून एक गोष्ट सिद्ध झालेली आहे की, आपणही संतुलित आणि समग्र प्रगती साध्य करू शकलेलो नाही.
अनितीमान राजकारणी आणि त्यांच्या भ्रष्टाचाराने देशाच्या सरकारी वैद्यकीय व्यवस्थेला जर्जर करून टाकलेले आहे. आज सरकारी रूग्णालयांमध्ये ऑक्सीजन आणि व्हेंटिलेटरची अभूतपूर्व अशी टंचाई निर्माण झाली आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाला हे शोभणारे नाही. भारतीय राजकारण कायम जातीवर टिकून राहिल्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे. प्रत्येक क्षेत्रात चांगले लोक मग ते कोणत्याही जातीचे असो योग्य ठिकाणी नियुक्त न केले गेल्यामुळे देश आज या स्थितीला येऊन पोहोचलेला आहे. शासनाच्या नीति निर्धारणांमध्ये जरी अल्पसंख्यांकांचा फारसा वाटा नसला तरी अशा परिस्थितीत सर्वात मोठा अल्पसंख्यांक जनसमूह म्हणून आपण आपले आत्मपरीक्षण करावे, यासाठी हा लेखन प्रपंच.
भारतीय मुस्लिम
इस राज को एक मर्दे फिरंगी ने किया फाश
हर चंद के दाना इसे खोला नहीं करते
जम्हूरियत एक तर्जे हुकूमत है के जिसमें
सरों को गिना करते हैं तोला नहीं करते
भारतात मुस्लिम जनसमुहा एवढा धर्मनिरपेक्ष जनसमुह दुसरा नाही, कारण गेल्या 73 वर्षांपासून मुस्लिमांनी आपल्या नेतृत्वाचा बळी देऊन आपले नेतृत्व बहुसंख्य बांधवांच्या सुपूर्द केलेले आहे. पण एवढे करून पुरेसे नाही, हे आता सिद्ध झालेले आहे. म्हणून मुस्लिमांना आपल्या राजकीय धोरणामध्ये थोडासा बदल करावा लागणार आहे. देशातील सर्वच संस्था वाईट आहे. राजकारणी भ्रष्ट आहेत, प्रशासन अनितीमान लोकांच्या हातात गेलेले आहे, एकटा मी चांगले वागून काय साध्य होणार आहे? आता असा विचार करून जमणार नाही. आता सकारात्मक विचार करावा लागेल. स्वतःचे लहान-लहान राजकीय पक्ष काढण्यापेक्षा मोठ्या राष्ट्रीय पक्षात प्रवेश करून इस्लामी मुल्याधारित प्रामाणिक राजकारण करावे लागेल. राष्ट्रनिष्ठा जोपासत आपल्या नितीमान आचरणाने पक्षाला प्रभावित करावे लागेल. भ्रष्टाचारापासून जाणीवपूर्वक दूर रहावे लागेल. तेव्हा पक्ष नेतृत्व आपोआप आपण सांगितलेल्या गोष्टी करण्यासाठी विवश होईल. आपण अल्पसंख्यांक आहोत आपल्याला पक्षात कोणी विचारणार नाही, हा विचार चुकीचा आहे. कारण एका दिव्याने हजारो दिवे पेटविता येतात, हे लक्षात ठेवावे लागेल. जरी पक्ष भ्रष्ट असतील, पक्षातील नेते भ्रष्ट असतील तरी त्यांच्यासमोर भ्रष्टाचारमुक्त चारित्र्याचा नमुना ठेवल्यास त्याची दखल पक्षाला घ्यावीच लागेल. कारण ही नैसर्गिक बाब आहे. लक्षात ठेवा मित्रानों ! स्पेनमध्ये भ्रष्ट राजकारण्यांच्या कारभाराला कंटाळून तेथील जनतेने जेव्हा इस्लामी खिलाफतीकडे हस्तक्षेप करण्याची विनंती केली तेव्हा खलीफाच्या आदेशावरून ह. तारीक बिन जियाद हे फारसे मोठे लष्कर न घेता स्पेनमध्ये दाखल झाले आणि स्थानिक लोकांच्या सहकार्याने इस्लामी चारित्र्याच्या बळावर स्पेनची सत्ता हस्तगत केली व मुल्याधिष्ठीत सरकार स्थापन करून तेथील नागरिकांची मने जिंकली. न्याय सर्वांना सहज मिळेल अशी व्यवस्था केली. परिणामी स्पेनमध्ये 800 वर्षापर्यंत मुस्लिमांनी शासन केले. त्या दरम्यान त्या काळी स्पेनने जगात सर्वात जास्त भौतिक प्रगती केली होती. मात्र ती भौतिक प्रगती त्यांच्या कामी आली नाही. जेव्हा त्यांच्यामध्ये इस्लामी चारित्र्याचा सामुहिक ऱ्हास झाला तेव्हा त्यांना रडत- रडत स्पेन सोडावा लागला.
इतिहासाच्या या दाखल्यावरून एक गोष्ट सहज लक्षात येते की, शासन हे भौतिक प्रगती किंवा शक्तीच्या बळावर नव्हे तर नैतिक नेतृत्वाच्या बळावर केले जाऊ शकते. भौतिक प्रगतीच्या बळावर सत्ता ताब्यात ठेवता आली असती तर डोनाल्ड ट्रम्पला सत्तेतून बेदखल व्हावे लागले नसते, कारण त्यांच्या कालावधीत अमेरिकेने बऱ्यापैकी भौतिक प्रगती साध्य केली होती. परंतु नैतिकतेच्या बाबतीत ट्रम्प हे कोणत्याही निकषावर खरे उतरू शकले नाहीत. परिणामी दंडी-मुडपी करून सुद्धा त्यांना सत्तेत राहता आले नाही. जो जनसमूह भूतकाळाकडून बोध घेत नाही वर्तमानकाळ त्याला शिक्षा देतो.
अडचणी आणि मुस्लिम
तू मर्द-ए-मोमीन है पैगाम अमल दे
उठ और जमाने के मुकद्दर को बदल दे
मुस्लिमांचाचा जेव्हा-जेव्हा बिगर मुस्लिम शक्तींशी सामना झालेला आहे तो त्यांच्यापेक्षा मोठ्या शक्तींंशीच झालेला आहे. अडचणी मुस्लिमांच्या पाचवीला पुंजलेल्या आहेत. आपल्यासमोर भारतीय राज्यघटनेच्या रूपाने किमान एक सुरक्षित कवच तरी उपलब्ध आहे. सातव्या शतकात जेव्हा प्रेषित मुहम्मद सल्ल. हे अरबस्थानाच्या भ्रष्ट आणि रानटी जनसमुहासमोर उभे राहिले त्यावेळेस तर कुठलीच घटना अस्तित्वात नव्हती. परंतु आपल्या नैतिक बळाच्या जोरावर त्यांनी अशक्यप्राय असे बदल अरबी जनसमुहामध्ये घडवून आणले. एरवी एखाद्या देशात क्रांती झाली म्हणजे सत्ता बदलते मात्र अरबस्थानामध्ये जेव्हा प्रेषित सल्ल. यांनी क्रांती घडवून आणली तेव्हा केवळ सत्ताच बदलली नाही तर जनसमूह ही बदलले व रानटी अरब सभ्यतेचे आंतरराष्ट्रीय इमाम झाले.
हा इतिहास बहुसंख्य मुस्लिम विसरलेले आहेत. किंबहुना अनेकांना या तेजस्वी इतिहासाची जाणच नाही. पाश्चात्यमूल्यांचा अंगीकार करतांना ज्याप्रमाणे बहुसंख्य बंधूंनी आपल्या धर्माची नाळ तोडून टाकलेली आहे अगदी त्याचप्रमाणे बहुसंख्य मुस्लिमांनीही धर्मद्रोह करून पाश्चात्य मुल्यांचा स्वीकार केलेला आहे. मुळात या मुल्यांचा अंगीकार करतांना इस्लामी मुल्यांची मुळे तुटणार नाहीत याची काळजी त्यांना घ्यायला हवी होती. ती न घेतली गेल्यामुळे आज 20 कोटी असूनसुद्धा समुद्राच्या बुडबुड्यांसारखी आपली अवस्था झालेली आहे. आकाराने मोठे पण आतून पोकळ.
सबबी सांगणे हा पुरूषार्थ नाही
आदमी नहीं सुनता आदमी की बातों को
पैकरे अमल बनकर गैब की सदा बन जा
सबबी सांगणे हा पुरूषार्थ नाही. उलपब्ध संसाधनांचा योग्य उपयोग करून प्राप्त परिस्थितीशी मेळ घालून इस्लामी मूल्यांवर आधारित प्रयत्न जोपर्यंत केले जाणार नाहीत तोपर्यंत परिस्थितीत कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. लक्षात ठेवा मित्रानों ! नैतिक मुल्यांच्या न्यायालयात तटस्थता एक अपराध आहे. तुम्हाला कोणाचा तरी पक्ष घ्यावाच लागणार आहे. एक तर तुम्हाला प्राप्त भ्रष्ट व्यवस्थेमध्ये सामील व्हावे लागेल जसे की आज बहुतेक मुस्लिम सामील झालेले आहेत. किंवा तुम्हाला स्वतःचे मुल्याधारित चारित्र्य दाखवून द्यावे लागेल. तुम्ही प्रेमाची निवड केली नाही तर आपोआप घृणा तुमची निवड करते. जर तुम्हाला स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि प्रेमाच्या बाजूने उभे राहता आले नाही तर सर्व मृतप्राय तर्क देऊनसुद्धा तुम्ही या मुल्यांच्या विरोधी समुहामध्ये सामील व्हाल एवढे नक्की.
व.पु. काळे म्हणतात, केवळ स्वादिष्ट भोजनाची कल्पना केल्याने पोट भरत नाही. गाडी समोर नारळ फोडल्याने गाडी चालत नाही. क्रोसीन क्रोसीन म्हटल्याने ताप जात नाही. अंधारावर टिका केल्याने अंधार जात नाही. कोणीतरी उठून दिवा लावावा लागतो आणि अंधःकार क्षणार्धात पळून जातो. हा दिवा लावण्याची जबाबदारी भारताचा एक जबाबदार नागरिक समूह म्हणून बहुसंख्यांकांसोबत अल्पसंख्यांकांचीही आहे, हे लक्षात ठेवावे लागेल.
मुस्लिमांची प्रत्यक्ष भूमिका?
मेरी जिंदगी का मक्सद के मैं सबके काम आऊं
मै चरागे रहेगुजर हूं मुझे शौक से जलाओ
जमाअते इस्लामीचे उपाध्यक्ष एस. अमिनुल हसन यांच्या मते ईश्वराने मुस्लिमांचे नशीब या देशाशी जोडले आहे. तुम्हाला उठावे लागेल. जेव्हा तुम्ही उठाल तेव्हाच या देशाचे नशीब सुधरू शकेल. तुम्हाला उठावे लागेल. तुम्हाला स्वतःला उत्कृष्ट बनवावे लागेल, मिस्टर एक्सलंट व्हावे लागेल. तुम्हाला या गोष्टींची काळजी करण्याची बिल्कुल आवश्यकता नाही की मीडिया तुमची प्रतीमा कशी तयार करतोय? तुम्हाला इतकं चांगलं वर्तन ठेवावं लागेल की तुम्हाला पाहून लोकांनी म्हणायला पाहिजे की मीडिया खोटं बोलतोय. मुस्लिम तर तसेच नाहीत. तुमचे चारित्र्य, तुमचे वागणे, तुमचे बोलणे, तुमचा व्यवहार, देशबांधवांप्रती तुमची बांधिलकी, प्रेम, दया, करूणा या गोष्टी तुमच्यात आहेत या इतर लोकसमुहांना जाणवायला हव्यात. एका प्ल्युरल सोसायटी (संयुक्त समाज) मध्ये राहण्याचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे.’’
या संदर्भात कुरआनचे मार्गदर्शन
हमने सीखा है अजाने सहर से ये उसूल
लोग ख्वाबीदा सही हमने सदा देनी है.
एस. अमिनुल हसन यांच्या अपेक्षेला सार्थ करण्यासाठी मुस्लिमांना सर्वप्रथम जे काम करावे लागेल ते म्हणजे कुरआनच्या मार्गदर्शनाला समजून घ्यावे लागेल. कुरआन म्हणतो की, ’’अल्लाह कोणत्याही जनसमुहाच्या स्थितीत परिवर्तन करत नाही जोपर्यंत तो (जनसमूह) स्वतः आपल्या गुणांना बदलत नाही.’’ (सुरे अलरात आयत क्र. 11).
कुरआनच्या या आयातीवरून एक बोध हा मिळतो की, सर्व प्रथम आपल्याला आपल्यामध्ये सकारात्मक परिवर्तन करण्याचा निश्चय करावा लागेल. आपल्याशी होणाऱ्या भेदभावपूर्ण व्यवहाराला विसरून न्यायपूर्ण व्यवहार करावा लागेल. तसे करतांना जी हानी सोसावी लागणार आहे ती सोसावी लागेल. आपल्याला सर्वोत्तम व्यवहार करावा लागेल. प्रसिद्ध तुर्की सुफी संत ताब्दुक अॅम्रे म्हणतात की, ’’ईश्वराने आपल्याला प्रयत्नांच्या हवाली केलेले आहे.’’ याचा अर्थ प्रयत्न चांगले असतील तर परिणाम चांगले येतील प्रयत्न वाईट असतील तर परिणाम वाईट येतील. आज जाणून बुजून चांगले प्रयत्न करण्याची गरज निर्माण झालेली आहे. हे आता आपल्याला ओळखावे लागेल.
कुरआनमध्ये एका ठिकाणी म्हटलेले आहे की, ’’हे पैगंबर सल्ल.! भलाई आणि दुष्टता एकसमान नाहीत. तुम्ही दुष्टतेचे त्या भलाईद्वारे निरसन करा जी अत्युत्तम असेल. (मग) तुम्ही पहाल की तुमच्याशी ज्याचे शत्रुत्व होते तो तुमचा जीवलग मित्र बनलेला आहे.’’ (सुरे हामीम सज्दा आयत नं. 34)
या आयातीतून मुस्लिमांना एका गोष्टीची स्पष्ट जाणीव करून देण्यात आलेली आहे की, आपल्याशी इतरांचे व्यवहार कसेही असो, आपल्याला सर्वोत्तम असेच व्यवहार करावे लागतील.
अलिकडच्या काळात मुस्लिमांनी कोरोना काळात सर्व भेद विसरून बहुसंख्य समाजाची जी मदत केली विशेषतः मृत हिंदू बांधवांच्या पार्थिवावर ज्या धाडसाने मुस्लिम तरूणांनी त्यांच्या धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करून एक अत्यंत चांगले उदाहरण देशासमोर ठेवले आहे. अशीच अनेक उदाहरणे आपल्याला आपल्या बहुसंख्य बांधवांच्या पुढे ठेवावे लागतील. तेव्हा कुठे जातीयतेचे विष हळूहळू उतरेल. स्वातंत्र्यानंतर नवखालीमध्ये लगेच सुरू झालेल्या हिंदू-मुस्लिम दंग्यांच्या दरम्यान एक हिंदू व्यक्ती महात्मा गांधीकडे आली आणि तिने सांगितले की, तिचा एक लहान मुलगा मुस्लिमांच्या हिंसक जमावाने मारून टाकलेला आहे. तेव्हा मला एका मुस्लिम मुलाला मारण्याची परवानगी द्या. तेव्हा महात्मा गांधींनी सांगितले की, ’’असा बदला घेतल्याने तुला समाधान मिळणार नाही. तू एक काम कर अशा मुस्लिम मुलाला दत्तक घे ज्याच्या पित्याला प्रक्षोभक हिंदू समुहाने मारून टाकले आहे’’
एवढा उदात्त विचार जोपर्यंत समाजामध्ये रूजणार नाही देश महासत्ता होणार नाही कारण पुन्हा सांगतो केवळ भौतिक प्रगतीने कोणताही देश महान होत नाही. नैतिक आणि भौतिक दोन्ही प्रगतीची सांगड घालून जो जनसमूह प्रगती करतो शेवटी तोच यशस्वी होतो. त्यालाच खरी प्रगती म्हणतात आणि तोच जनसमूह महासत्ता होण्याच्या लायकीचा असतो. शेवटी ईश्वराकडे प्रार्थना करतो की, ’’हे अल्लाह! भारतीय संयुक्त समाजात राहण्याचे इस्लामी शिष्टाचार जोपासण्याची आम्हाला जाणीव आणि शक्ती दे.’’ आमीन.
- एम.आय.शेख
Post a Comment