Halloween Costume ideas 2015

कोरोनाचा उद्रेक : लॉकडाऊन!


जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनाने सर्वत्र उच्छाद मांडला आहे. चीन, ब्राझील, फ्रांस, इटली आदी देशांत कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट धडकली असून दुसऱ्या लाटेचे विक्राळ रुप आता पाहावयास मिळत आहे. रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. शिवाय मृतांच्या आकड्यात वाढ होत आहे. जर आपण या जीवघेण्या विषाणूकडे डोळेझाक केली तर कधी आपण या कोरोनाचा बळी होऊ हे समजणारही नाही. मागील आठ दिवसांच्या रुग्णसंख्येच्या आकडेवारीवर नजर टाकली तर राज्यभरात चिंताजनक परिस्थिती असल्याचे निदर्शनास येत आहे. आठ नऊ महिने राज्यभर हैदोस घालणारा कोरोना डिसेंबर 2020 मध्ये हद्दपार होईल, अशी आशा निर्माण झाली होती, परंतु फेब्रुवारीपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली. कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक पाहता अखेर महाराष्ट्रात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली.

कोरोनाला हरवण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही हे सगळेच जाणतात. कोरोनाच्या महासंक्रमणात दुसऱ्या लाटेला आळा घालण्यासाठी गेल्या वर्षीसारखा सरसकट लॉकडाऊन न करता दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदी असे निर्बंध लागू करावयास हवे होते. सरकारचा हा निर्णय हातावर पोट असलेली लाखो गरीब कुटुंबे, नोकऱ्या जाण्याच्या भीतीने चिंतेत पडलेले मध्यमवर्गीय, तसेच उद्योग-व्यवसाय ठप्प होण्याची भीती बाळगणाऱ्यांना त्रासदायक आहे. मध्यमवर्गीयांसह बहुतांश कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजुक झाली आहे. जेवणाचा खर्च, घरभाडे, ऑनलाइन शिक्षण खर्च, वाहतूक खर्च, वीज बील, वैद्यकीय खर्च, कर्जाचे हफ्ते आदी अत्यावश्यक खर्चाचा बोजा असह्य  झाला आहे. अशा वेळी आणखी रोजगार बुडाला तर उपासमार, आत्महत्या, ताणतणाव, कौटुंबिक हिेंसा आदींनी लोकांचे समस्या वाढतील. त्यामुळे ज्या प्रमाणात लोकांना जगण्यासाठी मदत मिळायला हवी, सामान्यवर्गासाठी मोफत रेशन, वरखर्चासाठी सरकारकडून बॅकेत थेट रोख रक्कम जमा होणे, दरमहा किमान 50 युनिटपर्यंत वीजबील माफी अशा उपाययोजना शासनाकडून होणे अभिप्रेत आहे. 

संसर्गाची साखळी तोडणे व लोकांचे जीव वाचविणे ही आपली सर्वांचीच पहिली गरज आहे. सोबतच वाचविलेले जीव भूक व उपासमारीने जाणार नाही याची काळजी घेण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये सांगितले. लॉकडाऊनच्या भीतीने अगोदरच परप्रांतीय मजूर मोठ्या संख्येने पुन्हा आपल्या गावी निघून जातानाचे चित्र दिसत आहे. नाशवंत मालाचे उत्पादन करणारे शेतकरी काळजीत आहेत. सरकार आणि जनता दोन्हींच्या दृष्टीने खडतर काळ आहे. सरकारने घ्यावयाचा तो निर्णय घेतला आहे, आता कोरोनाचा फैलाव आटोक्यात आणण्याची जबाबदारी जनतेवर येऊन पडली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे हे आपल्या सर्वांच्या हातात आहे. पुढील काही दिवस जनतेने स्वयंशिस्त पाळून शासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले तर परिस्थिती आटोक्यात येऊ शकते.  कोरोनाला हरवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगसह तोंडावर मास्क लावणे, गर्दी टाळणे व हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्री नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात घराघरात कोरोनाचा रुग्ण असेल हे कटू सत्य नाकारता येत नाही. कोरोना हा श्रीमंत गरीब असा भेदभाव करीत नाही.  कोरोनारुपी आलेल्या संकटाला हरविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सरकारला साथ देणे गरजेचे आहे. कोरोनाच्या धोक्याकडे दुर्लक्ष केले तर पुढील काही दिवसांत कोरोनाचा उद्रेक होईल आणि त्याला आपणच जबाबदार असू. भविष्यात आपल्याला कुटुंबासोबत जगायचे असेल तर कोरोना विरोधातील लढा सुरुच ठेवणे गरजेचे असेल. शासनाने आखून दिलेले नियम त्या नियमांचं आपण किती पालन करावे हे काही नव्याने सांगायची गरज नाही. काही नागरिक संचारबंदी, कोरोना प्रतिबंधक आचारसंहितेची कशी ऐशीतैशी करत आहेत, हे समाजाने सामूहिक शहाणपणापासून फारकत घेतली असल्याचेच निदर्शक आहे. ज्या कुटुंबांनी कोरोना अनुभवला ती शहाणी झाली आहेत, पण इतरांना शहाणपण कधी येणार? तसेच काही बेजजाबदार नागरिकांच्या बेफिकीर वृत्तीचा फटका कोरोना प्रतिबंधक आचारसंहिता पाळणाऱ्या नागरिकांच्या कुटुंबियांना बसतो. मात्र जर शासनाने आखलेले नियमांचे काटेकोरपणे पालन न केल्यास आपल्याच जीवावर बेतू शकते, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आपला बेजबाबदारपणा कोरोना वाढीस आणखी कारणीभूत ठरेल. 

या संसर्गाला तोंड देण्यासाठी सरकारने लसीकरणाला सुरुवात केली आहे. परंतु सरकार अजूनही आपल्या उद्दिष्टांपासून बराच मागे आहे. 45 वर्षांपेक्षा जास्त वयासाठीच्या लोकांसाठीचं उद्दिष्ट सरकारने पूर्ण केलं नाही. जर सर्वांसाठी लसीकरण खुलं केल्यास अडचणी वाढू शकतात. सगळे ताकदवान लोक लस आधी घेतील आणि गरजवंत मागे राहतील. ज्या वयेगटाला अधिक धोका आहे त्यांनाच आधी लस द्यावी. म्हणूनच वयोगटानुसार उद्दिष्ट ठेवणं जास्त योग्य राहील. लसीकरणाची संख्या वाढवून टप्प्याटप्प्याने वयाची असलेली मर्यादा काढून टाकावी जेणेकरुन आबालवृद्धांना ती मिळावी. प्रत्येक नागरिकाने शासनाने दिलेले निर्बंध पाळावे व शासनाने व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम आखावी जेणेकरुन कोरोनाची सुरु असलेली दुसरी इनिंग आटोक्यात येईल व कोरोना हद्दपार होईल अशी आशा करु या...

- अफसर खान

महाराष्ट्र मीडिया नेटवर्क

भ्रमणध्वनी :९८६०५४३४६०


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget