Halloween Costume ideas 2015

कुरआनचे पहिले आणि अंतिम उद्दिष्ट मानवकल्याण आहे


लोकहो, आम्ही तुम्हाला एका पुरुष व एका स्त्रीपासून निर्माण केले आणि मग तुमची राष्ट्रे आणि वंश बनविले जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावे. वास्तविकतः अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त ईशपरायण आहे. निश्चितच अल्लाह सर्वकाही जाणणारा आणि खबर राखणारा आहे.’’  (सुरे अलहजरात आयत नं. 13)

आजच्या धावपळीच्या जगामध्ये जीवनाचा गांभीर्याने विचार करायला लोकांकडे वेळच नाही. उपजिविकेची काळजी लोकांना जीवनासंबंधी आणि विशेषतः मरणोत्तर जीवनासंबंधी विचार करण्याची संधीच देत नाही. जीवन काय आहे? शाप आहे की वरदान? ठरवून केलेली खेळी आहे की निव्वळ योगायोग? परिपूर्ण आहे का अपूर्ण ? आपल्याला कोणी जन्माला घातले की आपण आपोआप जन्माला आलो? जन्म देण्यामध्ये आई-वडिलांव्यतिरिक्त तिसरी कोणती शक्ती कार्यरत होती काय? होती तर मग ती शक्ती कोणती? ती कशी आहे? का तिने आपल्याला जन्माला घातले? या सर्व प्रश्नांची उत्तरे कोठे सापडतील? ही सारी प्रश्नावली केवळ काल्पनिक नसून या मागे निश्चित असा कार्यकारणभाव आहे व तो कुरआनने मोठ्या सुंदर पद्धतीने उलगडून दाखविलेला आहे. 

मुळात कुरआन एक नसून दोन आहेत. एक पुस्तक स्वरूपात तर दुसरा प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या स्वरूपात. जर फक्त पुस्तकाचे अवतरण झाले असते तर त्याचा परिणाम तेवढा झाला नसता जेवढा आज आहे. आज जवळ-जवळ 200 कोटी लोक मुस्लिम आहेत व ते गर्वाने स्वतःला मोहमेडन अर्थात प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे पाईक असल्याचा उल्लेख करतात. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे वारस म्हणून कुरआनचे प्रात्यक्षिक दाखविण्याचे काम मुस्लिमांचे आहे. फक्त कुरआन वाटप करून जमणार नाही तर स्वतः कुरआनचे प्रात्यक्षिक दाखविल्याशिवाय इतरांना कुरआन काय आहे समजणार नाही. 

ज्याप्रमाणे गुलाबासोबत काटे असतात तसेच सामाजिक स्वातंत्र्यासोबत वाईट गोष्टी असतात. इस्लाम स्वतंत्र समाजामधून ’इव्हील’ म्हणजे वाईट गोष्टी समाप्त करू इच्छितो. दुसऱ्या जीवन व्यवस्थेमध्ये वाईट गोष्टींना उत्तेजन दिले जाते. 

प्रसिद्ध समाजशास्त्री अनिल उपाध्याय यांच्या मते इस्लाममध्ये कट्टरता आहे, हे सत्य आहे. पण ती कट्टरता सत्यासाठीची आहे, न्यायासाठीची आहे, मानव कल्याणाविषयी आहे. हीच कट्टरता लोकांना नकोय. या कट्टरतेमुळेच ते नाराज आहेत. त्यांना लवचिक व्यवस्था पाहिजे. इस्लाम त्याच्यासाठी तयार नाही. 

कुरआनचे मानवीय स्वरूप

कश्ती-ए-हक का जमाने में सहारा तू है

असरे नौरात है धुंदलासा सितारा तू है

मागच्या आठवड्यात आपण ’त्या 24’ आयातीचे विश्लेषण केले होते ज्या संंबंधी धिक्कारपात्र वसीम रिझवीने  सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. या आठवड्यात कुरआनच्या त्या आयातींचा उहापोह करण्याचा विचार आहे. ज्यांच्याकडे सहसा कोणाचे लक्ष जात नाही. 

1. ’’पृथ्वीवर उपद्रव माजवू नका’’ (सुरे बकरा आयत नं.11)

2. ’’ईश्वर न्याय करणाऱ्यांना पसंत करतो’’ (सुरे अलमायदा आयत नं. 42)

3. ’’ निवाडा न्यायपूर्ण पद्धतीने करा’’ (सुरे अलमायदा आयत नं.42)

4. ’’हे श्रद्धावंतांनो, अल्लाहसाठी सत्यावर अढळ राहणारे व न्यायाची ग्वाही देणारे बना. एखाद्या गटाच्या शत्रुत्वाने तुम्हाला इतके प्रक्षोभित करू नये की तुम्ही न्यायापासून विमुख व्हाल. न्याय करा, हे ईशपरायणतेशी अधिक निकटवर्ती आहे. अल्लाहचे भय बाळगून कार्य करीत राहा. जे काही तुम्ही करता, अल्लाह त्याची पुरेपूर खबर ठेवणारा आहे.’’(सुरे अलमायदा आयत नं. 8)

जगाला न्यायाशिवाय दुसऱ्याच कुठल्याच गोष्टीची गरज नाही. - ताब्दुक ऍम्रे (प्रसिद्ध तुर्की सुफी संत) 

वरील सर्व आयातींमध्ये पृथ्वीमध्ये राहणाऱ्यांचे सर्वोच्च कल्याण करण्यासाठी त्या मुलभूत गोष्टींचा उल्लेख केलेला आहे ज्यांची गरज एका आदर्श समाजाच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे. पहिल्या आयातीमध्ये म्हटलेले आहे की, पृथ्वीवर उपद्रव माजवू नका. म्हणजेच सभ्यतेने रहा. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या आयातीमध्ये न्यायाचे महत्त्व विशद केलेले आहे. न्याय निष्पक्षपणे करण्याचे निर्देश दिलेले आहेत. न्याय करतांना तुम्हाला अशा लोकांचाही विचार करावा लागेल जे तुम्हाला आवडत नाहीत किंवा ज्यांच्याशी तुमचे वैर आहे. त्या वैराचा परिणाम तुमच्या न्यायबुद्धीवर होवू नये याची काळजी घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. न्यायाशिवाय सामाजिक शांतता प्रस्थापित होवू शकत नाही. राजकीय शक्तीने, लष्करी बळाने जरी लोकांची मुस्कटदाबी करता येत असली तरी तो एक ’सप्रेस्ड वॉर’ असतो. म्हणून इस्लाममध्ये न्याय करण्यास फार महत्त्व दिलेले आहे. न्याय करण्यासाठी न्यायबुद्धी अत्यंत जरूरी असते. न्यायबुद्धी निर्माण करण्यासाठी जागतिक दृष्टीकोण आवश्यक असतो आणि तो दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी कुरआन म्हणतो की, ’’लोकहो! आम्ही तुम्हाला एका पुरुष व एका स्त्रीपासून निर्माण केले आणि मग तुमची राष्ट्रे आणि वंश बनविले जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावे. वास्तविक पाहता अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त ईशपरायण आहे. निश्चितच अल्लाह सर्वकाही जाणणारा आणि खबर राखणारा आहे.’’  (सुरे अलहजरात आयत नं. 13)

जेव्हा जगातील सर्व लोक एका आई-वडिलांची संतती आहे एवढा व्यापक दृष्टीकोण माणसाच्या विचारांचा ताबा घेतो तेव्हाच तो न्याय करू शकतो. संकुचित दृष्टीकोणाने न्याय कधीही होवू शकत नाही, ही सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ गोष्ट आहे. धर्माच्या बाबतीत कुरआनचे म्हणणे स्पष्ट आहे की, 

1.’’ धर्माच्या बाबतीत जबरदस्ती नाही.’’ (सुरे बकरा आयत नं. 256).

2. ’’ जर तुझ्या पालनकर्त्याची अशी इच्छा असती की, पृथ्वीतलावर सर्व (लोक) श्रद्धावंत / आज्ञाधारक अर्थात मुस्लिमच असावेत.’’ तर सर्व भूतलवासियांनी (तशी) श्रद्धा ठेवली असती. मग तू (काय) लोकांना भाग पाडशील. की ते श्रद्धावंत बनावेत?’’ (सुरे युनूस आयत नं.99)

इस्लामच्या बाबतीत असा एक व्यापक गैरसमज लोकांमध्ये पसरलेला आहे की, इस्लाम हा तलवारीच्या बळावर पसरलेला धर्म आहे. ही धारणा अतिशय चुकीची आहे. भारताच्या पूर्वेकडील मलेशिया, इंडोनेशिया, ब्रुनोई या मुस्लिम व 8 कोटी उइगर मुस्लिम असलेल्या चीन सारख्या देशांचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट लक्षात येईल की, मुस्लिमांनी कधीच या देशावर आक्रमण केलेले नव्हते. तरी सुद्धा ही राष्ट्रे मुस्लिम आहेत. इंडोनेशिया तर जगातील सर्वात मोठे मुस्लिम राष्ट्र आहे. स्पष्ट आहे, येथे इस्लाम आपल्या वैचारिक क्षमतेच्या आणि मुस्लिमांच्या चारित्र्याच्या बळावर विस्तारपावला. भारतासारख्या देशात जरी मुस्लिम आक्रमणकर्ते आले आणि इथे शेकडो वर्ष त्यांनी राज्य केले, तरी त्यांची आक्रमणे ही राजकीय स्वरूपाची होती, संयोगाने ते मुस्लिम होते. अपवाद वगळता इस्लामचा प्रचार आणि प्रसार हे त्यांचे कधीच धोरण नव्हते. मुळात ताकदीच्या बळावर श्रद्धा बदलता येते, हेच गृहितक चुकीचे आहे. 

वरील पहिल्या आयातीमध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की, धर्माच्या बाबतीत जबरदस्ती नाही. इस्लामच्या बाबतीत कोणावर जबरदस्ती करताच येत नाही. साधे अतिक्रमण करून मस्जिद बांधता येत नाही तर लोकांच्या श्रद्धेवर अतिक्रमण कसे करता येईल? दुसऱ्या आयातीमध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की, ईश्वराची ही इच्छाच नाही की, पृथ्वीवरील सर्व लोकांना बळजबरीने मुस्लिम बनविण्यात यावे. स्पष्ट आहे त्याची जर तशी इच्छा असती तर पृथ्वीवर एकही माणूस बिगर मुस्लिम राहिला नसता. म्हणूनच मुस्लिमेत्तरांबरोबर विनाकारण युद्ध करण्याची परवानगी इस्लाम देत नाही. कुरआनमध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की, 

1. ’’ आणि तुम्ही अल्लाहच्या मार्गात त्या लोकांशी लढा जे तुमच्याशी लढतात परंतु अतिरेक करू नका. अल्लाहला अतिरेक करणारे आवडत नाहीत.’’ (सुरे अलबकरा आयत नं. 190)

पहा! यात स्पष्ट म्हटलेले आहे की, ईश्वराच्या मार्गात त्या लोकांशी लढा जे तुमच्याशी लढतात. यात मुस्लिम आणि मुस्लिमेत्तर असा फरक नाही. जे तुमच्याशी लढतील त्यांच्याशी लढण्याची परवानगी दिलेली आहे. ही किती न्यायसंगत बाब आहे, हे वाचकांनी स्वतःच ठरवावे. उलट यात असे म्हटलेले आहे की, लढतांना अन्याय करू नका. म्हणजे या ठिकाणी शत्रुंशी लढतांना सुद्धा अतिरेक करण्यापासून रोखण्यात आलेले आहे. म्हणूनच माझे स्पष्ट मत आहे की, कुरआन म्हणजे तीन गोष्टींचा समुच्चय आहे. कृपा, कृपा आणि कृपा.

2.  ’’जर अल्लाह अशा प्रकारे मानवाच्या एका समुदायाला (दंगलखोर आणि अत्याचारी) दुसऱ्या समुदायाच्या हस्ते हटवत नसता तर पृथ्वीची व्यवस्था बिघडली असती.  परंतु जगातील लोकांवर अल्लाहची मोठी कृपा आहे की (तो अशा तर्हेने हिंसाचाराच्या विनाशाची व्यवस्था करीत असतो.)’’  (सुरे अलबकरा आयत नं.:251)

या आयातीमध्ये अल्लाहच्या त्या वैशिष्ट्याचे वर्णन केलेले आहे ज्यात ईश्वराने अत्याचारी गटांचा बिमोड दुसऱ्या न्याय गटांच्या माध्यमातून करण्याची व्यवस्था ठेवली नसती तर पृथ्वीवरची सर्व व्यवस्थाच बिगडून गेली असती. हे असे सत्य आहे जे की, कोणत्याही सामान्य बुद्धिच्या माणसाच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. 

3. ’’मग काय कारण आहे की तुम्ही अल्लाहच्या मार्गात त्या असहाय पुरुष-स्त्रियां आणि मुलांकरिता लढत नाही जे दुर्बल असल्यामुळे त्यांचे दमन केले गेले आहे आणि (असे लोक) धावा करीत आहेत की, हे पालनकर्त्या! आम्हाला या वस्तीतून बाहेर काढ ज्याचे रहिवाशी अत्याचारी आहेत, आणि तुझ्याकडून आमचा एखादा वाली व सहायक निर्माण कर.’’  (सुरे अन्निसा आयत नं.:75). 

आयीन-ए-नौ से डरना तर्ज़े कुहन पे अड़ना

मंज़िल यही कठीण है कौमों की ज़िंदगी में 

या आयातीमध्ये एका अशा मुद्याकडे सभ्य आणि सक्षम लोकांना ईश्वराने आवाहन केलेले आहे की, तुम्ही सक्षम असून, त्या स्त्री- पुरूष आणि मुलांकरिता का लढू इच्छित नाही, ज्यांच्यावर अत्याचार होत आहेत. साधारणपणे दुर्बलांचे रक्षण करणे हे सबलांचे नैतिक कर्तव्य आहे आणि याच कर्तव्याकडे या आयातींमध्ये न्यायप्रिय लोकांचे लक्ष वेधण्यात आलेले आहे. आणि त्या अत्याचारग्रस्त लोकांच्याकडून अत्याचार कणाऱ्या लोकांविरूद्ध लढताना जी हिंसा होणार आहे त्या हिंसेला ईश्वराने ’न्याय हिंसा’ ठरवलेले आहे आणि हे सत्य समजण्यासारखे आहे. 

सरसकट बिगर मुस्लिमांच्याविरूद्ध कुठलेही कारण नसतांना ’लढा’ असे निर्देश देणारी एकही आयत कुरआनमध्ये नाही. उलट कुरआन म्हणतो की, 

1. ’’अल्लाह तुम्हाला या गोष्टीची मनाई करीत नाही की तुम्ही त्या लोकांशी सद्व्यवहार आणि न्यायाचे वर्तन करावे, ज्यांनी धर्माच्या बाबतीत तुमच्याशी युद्ध केले नाही आणि तुम्हाला तुमच्या घरातून बाहेर काढले नाही. अल्लाह न्याय करणाऱ्यांना पसंत करतो.’’  (सुरे अलमुम्तहना आयत नं. 8).

ही आयत स्वयंस्पष्ट आहे. त्याच लोकाशी लढण्याची परवानगी आहे ज्यांनी तुमच्यावर अत्याचार केलेले असतील. धर्माच्या कारणावरून तुम्हाला घरातून बाहेर काढले असतील. बाकी कोणत्याही धर्माचे लोक असो त्यांच्याशी न्यायपद्धतीने वागा. कारण असे लोकच ईश्वराला प्रिय आहेत. एवढे स्पष्ट उदाहरण दिलेले असतांना असे म्हणायला कुठे जागा राहते की, इस्लाम हा इतर धर्मियांचा द्वेष शिकवितो. त्यांच्याविरूद्ध हिंसा करायला प्रेरित करतो. 

या काही मोजक्या आयाती आहेत ज्या मी वाचकांच्या सेवेमध्ये सादर केलेल्या आहेत. अशा अनेक आयातींनी कुरआन भरलेले आहे. प्रश्न फक्त त्या आयातींचा मतीतार्थ समजून घेण्याचा आहे व याची प्राथमिक जबाबदारी मुस्लिमांची आहे. मुस्लिमेत्तरांना त्यांच्या भाषेत कळेल अशा पद्धतीने कुरआनचा उपदेश पोहोचविणे हे त्यांच्या जीवनाचे उद्देश आहे. मुळात मुस्लिम समाजातील एक मोठा वर्ग कुरआनपासून व्यवहार्यरित्या तुटलेला असल्यामुळे कुरआनमधील निर्देशांचा परिणाम त्यांच्या जीवनात दिसून येत नाहीत. म्हणून अशा लोकांचे जीवनसुद्धा तणावग्रस्त आहे आणि भौतिकवादी लोकांच्या जीवनापेक्षा वेगळे नाही. 

वस्तुस्थिती अशी आहे, इस्लाम तीन प्रकारच्या लोकांना पसंत नाही. एक- ज्यांच्या पर्यंत त्यांच्या मातृभाषेत इस्लामबद्दल पुरेशी माहिती पोहोचलेली नाही. दोन - ते लोक जे मीडियाच्या अपप्रचाराला बळी पडलेले आहेत. तीन - ते लोक   ज्यांना जगामध्ये मनमानी करावयाची आहे. अनैतिक जीवन जगायचे आहे. अनैतिक कृत्य करायची आहेत. अनैतिक पद्धतीने व्यवहार करायचे आहे. अनैतिक पद्धतीने साधन सामुग्री गोळा करायची आहे. अनैतिक व्यवसाय करायचे आहेत. जे लोक नैतिकतेचे पाईक आहेत, नैतिकतेला पसंत करतात. त्यांच्यासाठी गरज आहे ती या गोष्टीची की कुरआनचा परिचय प्रत्येक मुस्लिमाने आपल्या सद्वर्तनातून करून द्यावा. तेव्हाच कुरआन विषयी असलेले गैरसमज बहुसंख्य बांधवांच्या मनातून दूर होतील.


- एम. आय. शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget