Halloween Costume ideas 2015

आलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(११०) आता जगात तो सर्वोत्तम जनसमुदाय तुम्ही आहात ज्याला अखिल मानवजातीच्या मार्गदर्शनासाठी व सुधार करण्यासाठी (कल्याणासाठी) अस्तित्वात आणले गेले आहे.८८ तुम्ही  सदाचाराचा आदेश देता व दुराचारापासून प्रतिबंध करता आणि अल्लाहवर श्रद्धा बाळगता. या ग्रंथधारकांनी८९ श्रद्धा ठेवली असती तर ते त्यांच्याकरिता उत्तम होते. यांच्यात जरी काही  लोक ईमानधारकदेखील आढळतात तरी यांचे बहुतेक लोक अवज्ञा करणारे आहेत.
(१११) हे तुमचे काही वाईट करू शकत नाहीत. जास्तीतजास्त फक्त थोडा त्रास देऊ शकतात. जर तुमच्याशी हे लढले तर लढाईत पाठ दाखवतील. मग असे लाचार होतील की यांना  कोठूनही साहाय्य मिळणार नाही.
(११२) यांच्या वाट्यास चहूकडे अपमान व तिरस्कारच आला. कोठे अल्लाहच्या हमीने अथवा मानवांच्या हमीने आश्रय मिळाला तर ही गोष्ट वेगळी आहे.९० हे अल्लाहच्या प्रकोपात  वेढले गेले आहेत, यांच्यावर लाचारी व पराधीनता लादली गेली आहे. हे सर्व काही केवळ या कारणास्तव घडले आहे की हे अल्लाहच्या संकेत वचनांना नाकारीत राहिले आणि यांनी  पैगंबरांची नाहक हत्या केली. हा त्यांच्या अवज्ञा व मर्यादाभंगाचा परिणाम आहे.
(११३) परंतु सर्वच ग्रंथधारकसारखे नाहीत. यांच्यामध्ये काही लोक असेदेखील आहेत जे सरळमार्गावर कायम आहेत, रात्री अल्लाहच्या वचनांचे पठण करतात व त्याच्यापुढे नतमस्तक  होत असतात.
(११४) अल्लाह आणि परलोकवर श्रद्धा बाळगतात, सदाचाराचा आदेश देतात व दुराचारापासून प्रतिबंध करतात आणि पुण्य कार्यात क्रियाशील असतात, हे सदाचारी लोक आहेत.
(११५) आणि जे पुण्य कार्य हे करतील त्याची अवहेलना केली जाणार नाही अल्लाहचे भय बाळगून लोकांना चांगलेच ओळखतो.
(११६) उरले ते लोक ज्यांनी अधर्माचे वर्तन अंगीकारले तर अल्लाहच्या विरोधात त्यांना त्यांची संपत्तीही काहीच उपयोगी पडणार नाही की त्यांची संतती. ते तर नरकात जाणारे लोक  आहेत व नरकातच सदैव राहतील.
(११७) जे काही ते आपल्या या ऐहिक जीवनात खर्च करीत आहेत त्याचे उदाहरण त्या वाऱ्यासारखे आहे ज्याच्यात गारठा असावा आणि तो त्या लोकांच्या शेतीवरून वहावा ज्यांनी  स्वत:वर जुलूम केला आहे, आणि तिचा नाश करून टाकावा.९१ अल्लाहने यांच्यावर अत्याचार केला नाही, खरे म्हणजे हे स्वत:च आपल्यावर अत्याचार करीत आहेत.


८८) हा तोच विषय आहे जो सूरह नं. २ (अल्बकरा) आयत १४२-१४७ मध्ये वर्णन केला आहे. अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांचे अनुकरण करणाऱ्यांना सांगितले जात आहे की जगाचे  नेतृत्व आणि मार्गदर्शन करण्याच्या पदावरून बनीइस्राईल आपल्या अयोग्यतेमुळे दूर केले गेले. त्या पदावर आता तुम्हाला आसनस्थ करण्यात आले आहे कारण चारित्र्य आणि  आचरणाच्या दृष्टीने जगात आज सर्वात उत्तम मानव समुदाय तुम्ही बनला आहात आणि तुम्हामध्ये ते गुण आले आहेत जे न्यायोचित नेतृत्वासाठी आवश्यक आहेत. म्हणजेच  सदाचाराला स्थापित करणे आणि दुराचाराला नष्ट करण्याची भावना आणि प्रयत्न. तसेच एक अल्लाहला सैध्दान्तिक व व्यावहारिक दृष्टीने आपला इलाह (पूज्य) आणि रब  (निर्माणकर्ता, पालनकर्ता, शासनकर्ता व स्वामी) मानणे आहे. म्हणून हे महान कार्य आता तुमच्या सुपूर्द करण्यात आले आहे आणि तुमच्यासाठी आवश्यक आहे की आपल्या  जबाबदारीला ओळखावे, तसेच त्या चूकांपासून आणि अपराधांपासून स्वत:ला वाचवा ज्यांना तुमच्या पूर्वीच्या लोकांनी केले आहे.(पाहा, सूरह - २ टीप १२३ व १४४)
८९) येथे ग्रंथधारकांशी तात्पर्य यहुदी (ज्यू) लोक आहेत.
९०) म्हणजे जगात त्यांना थोडीसी चैन, मौजमजा करता आली तर त्यांनी ते स्वत: कमविलेले नाही तर दुसऱ्याचे समर्थन आणि कृपेचा परिणाम आहे. एखाद्या मुस्लिम राज्याने कोठे  त्यांना अल्लाहच्या नावाने शरण दिले आहे तर कुठे मुस्लिमेतर राज्यांनी त्यांना आपल्या पद्धतीने आश्रय दिला आहे. अशाच प्रकारे कधीकधी जगात त्यांना सामर्थ्य प्राप्त् झाले तरी ते  स्वत:च्या हिमंतीवर नव्हे तर केवळ त्यांच्या शेजारी राष्ट्राच्या मदतीनेच. हीच स्थिती त्या यहुदी (ज्यू) राज्याची आहे जे इस्राईलच्या नावाने केवळ अमेरिका, ब्रिटेन आणि रशियाच्या  पांठिब्यामुळे अस्तित्वात आले आहे.
९१) या उदाहरणात शेती म्हणजे जीवनाची ती शेती आहे ज्याचे पीक माणसाला परलोकात कापावे लागणार आहे. हवा म्हणजे सदाचाराची ती वरवरची भावना ज्यामुळे सत्याचा इन्कार  करणारे जनहित कार्यात, दानधर्मात संपत्ती खर्च करतात. गारठा म्हणजे खरी श्रद्धा आणि अल्लाहच्या आदेशपालनाचा अभाव आहे, ज्यामुळे त्यांचे पूर्ण जीवनच चुकीच्या मार्गावर गेले  आहे. अल्लाह या उदाहरणावरून सिद्ध करू इच्छिता की ज्याप्रकारे वारा शेती मशागतसाठी लाभप्रद आहे परंतु त्याच हवेत गारठा असेल तर तो वारा (गारपीट) शेतीला पोषक न ठरता,  शेती बरबाद करतो. तसेच दानधर्मसुद्धा मनुष्याच्या परलोकाच्या शेतीला पोषक आहे, परंतु अधर्माचे विष जर त्या दानधर्मात कालवलेले असेल तर ते दान लाभप्रद ठरण्याऐवजी  विनाशकारी सिद्ध होते. हे अगदी स्पष्ट आहे की मानवांचा स्वामी अल्लाह आहे आणि त्या संपत्तीचा मालकसुद्धा अल्लाहच आहे ज्याचा उपभोग मनुष्य घेत आहे. हे राज्यसुद्धा  अल्लाहचेच आहे ज्याच्यात राहून मनुष्य काम करत आहे. आता जर अल्लाहचा दास आपल्या स्वामीच्या सम्प्रभुत्वाला स्वीकार करीत नाही किंवा अल्लाहच्या बंदगीमध्ये इतर  दुसऱ्याच्या अवैध बंदगीचा समावेश करतो, तसेच अल्लाहची संपत्ती आणि साम्राज्याचा उपभोग घेत असतांना अल्लाहने घालून दिलेल्या कायद्याचे व नियमांचे पालन करीत नाही तर  अशा स्थितीत त्याचे हे सर्व उपभोग सर्वांगाने अपराध बनतात. बक्षीस मिळणार कोठून? मनुष्य तर या गोष्टींस पात्र बनून जातो की या सर्व अपराधांपायी त्याच्यावर फौजदारीचा दावा  ठोकला जावा. त्याच्या दानधर्म करण्याचे उदाहरण असे आहे की एक नौकर आपल्या मालकाच्या परवानगीशिवाय त्याची तिजोरी उघडतो आणि त्याला जिथे जिथे योग्य वाटते संपत्ती  (तिजोरी) खर्च करतो.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget