- नवी दिल्ली
जमाअते इस्लामी हिंदच्या केंद्रीय नेतृत्वातील निवडक व्यक्तींचे एक शिष्टमंडळ 22 आणि 23 ऑगस्टला केरळच्या दौऱ्यावर होते. यात जमाअतचे उपाध्यक्ष नुसरत अली, टी.आरीफ अली सामील होते. जमाअतर्फे केरळमध्ये सुरू असलेल्या मदत कार्याची त्यांनी पाहणी केली. दिल्लीला परत आल्यावर त्यांनी सांगितले की, केरळच्या 13 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. तुफानी पावसामुळे मोठ्या प्रमाणात चित्त आणि वित्तहानी झालेली आहे. 500 पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हजारो घरांचे नुकसान झालेले आहे. लाखो लोक विस्थापित झालेले आहेत. या दौऱ्यामध्ये जमाअतच्या दोन्ही उपाध्यक्षांसोबत केरळ राज्याचे प्रदेशाध्यक्ष अब्दुल अजीज आणि त्यांचे ईतर सहकारीही सामिल होते. या शिष्टमंडळाने पूरग्रस्त भागांना भेटी देऊन लोकांशी संवाद साधला. वायनाड जिल्हा सर्वाधिक प्रभावित आहे. धरणाचे पाणी अचानक सोडल्यामुळे या जिल्ह्यातील नदी, नाल्यांना प्रचंड पूर आला. त्यामुळे या जिल्ह्याचा 98 टक्के भूभाग पाण्याखाली आला. अनेक ठिकाणी पाण्याची पातळी धोकादायकरित्या वाढली. हे एक अभूतपूर्व संकट होते. शिष्टमंडळाने वायनाडशिवाय इतर ठिकाणांचाही दौरा केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की शेकडो घरे पाण्याखाली गेलेली आहेत. पन्नामारम आणि याथेरी या गावातील घरे पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहेत. त्यामुळे घरातील सर्व सामान, दागिने, महत्वाची कागदपत्रे सर्व नष्ट झालेले आहेत. शिष्टमंडळाने या ठिकाणी सुरू असलेल्या रिलीफ कॅम्पचाही दौरा केला. नंबुरी पोट्टी आणि निलंबूर तसेच मल्लापुरम येथील जमाअतच्या लोकांनीसुद्धा या भागाचा दौरा केला. येथेही तीच परिस्थिती आढळून आली. घरांची मोडतोड आणि विस्थापितांचे भकास चेहरे दिसून आले. संपत्तीची फार मोठी हानी या भागात झालेली आहे. या भागातील उद्योग आणि व्यापारी प्रतिष्ठानांना सर्वाधिक जास्त फटका बसला आहे. अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये लोकांनी आश्रय घेतलेला आहे. येरनाकुल्लम आणि मन्नम येथील दुकाने आणि रूग्णालयेसुद्धा पाण्याखाली गेलेली आहेत. मन्नम येथील हजारो घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे तेथे मोठी हानी झालेली आहे. घरामध्ये कित्येक फुट चिखल भरलेला आहे. या शिष्टमंडळाने जमाअते इस्लामीच्या त्या ठिकाणी काम करत असलेल्या स्वयंसेवकांची भेट घेऊन त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. याशिवाय, येरनाकुलम, पन्याईकुलम, पल्लकड, अलापुझ्झा, चेंगानूर, पंथालम, पंत्थनामट्टीटा या पूरग्रस्त भागालाही भेटी दिल्या. या ठिकाणी सुरू असलेल्या मदत कार्याचा आढावा घेतला.
शिष्टमंडळाने जमाअत तर्फे सुरू असलेल्या कामांची माहिती देताना सांगितले की, जमाअतचे अनेक विभाग आणि विविध प्रदेशातील स्वयंसेवक विशेषत: जमाअतचे सदस्य मोठ्या प्रमाणात मदतकार्य करीत आहेत. याशिवाय, आयआरडब्यू आणि जमाअतचे लोक ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल झालेल्या आहे अशा आदिवासी भागापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. मात्र अशा ठिकाणी शासकीय संस्थांनी मोलाची भूमिका बजावलेली आहे. मल्लापुरम येथे जमाअते इस्लामी तर्फे चालविल्या जाणाऱ्या कॅम्पमध्ये अनेक लोक आश्रयाला आहेत. त्यांना स्वच्छ पाणी आणि जेवन पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 24 तास मदतकार्य सुरू आहे. त्यासाठी डिस्ट्रेस रिलीफ कॉल सेंटर सुरू करण्यात आलेले आहे. आयआरडब्ल्यू आणि एचडब्ल्यूएफ तात्काळ लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा सातत्याने पुरवठा करत आहे. भविष्यात नुकसान झालेल्या घरांच्या पुनर्बांधणीमध्ये सुद्धा जमाअत सहाय्य करील अशी माहिती नुसरत अली यांनी दिली. याशिवाय, ज्यांची गुरेढोरे मेलीत अशा लोकांनाही मदत केली जाईल. ज्यांना काही कारणांमुळे सरकारी मदत मिळू शकली नाही त्यांनाही जमाअत तर्फे देण्यात येईल. जमाअतने सर्व बांधवांकडे अपील केलेली आहे की, केरळच्या पुरग्रस्तांसाठी सढळ हाताने मदत करावी. तसेच जमाअतने केंद्र सरकारलाही विनंती केलेली आहे की, या घटनेला राष्ट्रीय आपत्ती घोषित करावी.
Post a Comment