(१३७) तुमच्यापूर्वी अनेक कालखंड होऊन गेली आहेत. पृथ्वीवर फेरफटका मारून पाहा त्या लोकांचा शेवट कसा झाला ज्यांनी (अल्लाहच्या आज्ञा व आदेशांना) खोटे लेखले.
(१३८) ही लोकांसाठी एक स्पष्ट व उघड चेतावणी आहे आणि जे अल्लाहचे भय बाळगतात त्यांच्याकरिता मार्गदर्शन व उपदेश.
(१३९) वैफल्यग्रस्त होऊ नका, दु:खी होऊ नका, तुम्हीच प्रभावी ठराल जर तुम्ही ईमानधारक असाल.
(१४०) यावेळी जरी तुम्हाला आघात पोहचला आहे तरी यापूर्वी असाच आघात तुमच्या विरोधकांनादेखील पोहचला आहे.१०० हे तर कालचक्र आहे ज्याला आम्ही लोकांदरम्यान भ्रमण करवीत असतो, तुमच्यावर ही वेळ अशासाठी आणली गेली की अल्लाह हे पाहू इच्छित होता की तुमच्यात खरे ईमानधारक कोण आहेत, आणि त्या लोकांना वेगळे करू इच्छित होता जे खरोखर (रास्त मार्गाचे) साक्षीदार आहेत.१०१ कारण अत्याचारी लोक अल्लाहला अप्रिय आहेत –
(१४१) आणि तो या परीक्षेद्वारे ईमानधारकांना वेगळे करून नाकारणाऱ्या (शत्रूंना) वठणीवर आणू इच्छित होता.
(१४२) तुम्ही अशी समजूत करून घेतली आहे काय की सहजपणे स्वर्गामध्ये दाखल व्हाल. वास्तविक पाहता अल्लाहने अद्याप हे पाहिलेलेच नाही की तुम्हापैकी ते कोण लोक आहेत जे त्याच्या मार्गात प्राण पणाला लावणारे आणि त्याच्यासाठी संयम बाळगणारे आहेत.
(१४३) तुम्ही तर मृत्यूची इच्छा करीत होता! पण ही त्यावेळेची गोष्ट होती जेव्हा मृत्यू समोर आलेला नव्हता, तर घ्या, तो तुमच्यासमोर आलेला आहे आणि तुम्ही त्याला डोळ्याने पाहिले.१०२
(१४४) मुहम्मद (स.) याशिवाय काही नाहीत की ते केवळ एक पैगंबर आहेत, त्यांच्यापूर्वी इतर पैगंबरदेखील होऊन गेले आहेत, मग काय जर ते मरण पावले अथवा त्याना ठार केले गेले तर तुम्ही लोक मागच्या पावली परताल?१०३ लक्षात ठेवा! जो परत फिरेल तो अल्लाहचे काहीही नुकसान करणार नाही, परंतु जे अल्लाहचे कृतज्ञ दास बनून राहतील तो त्यांना त्याचा मोबदला देईल.
(१४५) कोणीही सजीव अल्लाहच्या आज्ञेशिवाय मरू शकत नाही. मृत्यूची घटका तर लिहिली गेली आहे.१०४ जो कोणी ऐहिक लाभाच्या (सवाब) इराद्याने कार्य करील त्याला आम्ही इहलोकातच देऊ.
९९) व्याज खोरी ज्या समाजात अस्तित्वात असते त्या समाजात दोन प्रकारचे नैतिक रोग निर्माण होतात. व्याज घेणाऱ्यामध्ये लालसा, कंजूषी आणि स्वार्थीपणा आणि व्याज देणाऱ्यात द्वेष, तिरस्कार, राग निर्माण होतात. उहुद युद्धातील पराजयात या दोन्ही प्रकारच्या रोगांचा वाटा होता. अल्लाह मुस्लिमांना दाखवून देत आहे की व्याजखोरीमुळे दोन्ही पक्षांत (व्याज घेणारा आणि व्याज देणारा) जे नैतिक अवगुण निर्माण होतात त्यांच्या अगदी विरुद्ध वेगळेच सद्गुण ईशमार्गात खर्च केल्याने माणसात निर्माण होतात, आणि अल्लाहची क्षमा आणि स्वर्गप्राप्ती याच दुसऱ्या गुणांनी प्राप्त् होऊ शकते ना की पहिल्या प्रकारच्या अवगणुनांनी मुळीच नाही. (तपशीलासाठी पाहा, सूरह - २ टीप ३२०)
१००) संकेत आहे बदर युद्धाकडे. सांगण्याचा अर्थ आहे की बदरच्या युद्धात पराजित होऊनही शत्रू खचले नाहीत तर मग उहुदच्या युद्धात पराजित होऊन तुम्ही दु:खी का होत आहात.
१०१) या आयतीत मूळ अरबी वाक्य ``यत्तखिज मिन कुम शुहदाअ'' प्रयोग झाला आहे. त्याचा एक अर्थ आहे ``तुमच्यातून काही `शहीद' होऊ इच्छित होते'' म्हणजेच काहींना अल्लाह `शहादत' (हुतात्मा) चा सन्मान प्रदान करु इच्छित होता आणि दुसरा अर्थ आहे की मुस्लिम आणि दांभिकांच्या या एकत्रित समूहातून त्या लोकांना वेगळे करू इच्छित होता जे वास्तविकपणे `शुहदा अलन्नास' (लोकांवर साक्षी) आहेत. अर्थात या प्रतिष्ठित पदासाठी योग्य आहेत ज्यावर आम्ही मुस्लिमांना आसनस्थ केले आहे.
१०२) संकेत आहे शहीद होऊ इच्छिणाऱ्या लोकांकडे ज्यांच्या आग्रहा खातर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मदीना शहराच्या बाहेर जाऊन युद्ध करण्याचा निर्णय घेतला होता.
१०३) जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) शहीद झाल्याची अफवा पसरली तेव्हा बहुतांश सहाबा (रजि.) आपले साहस गमावून बसले. या स्थितीत दांभिकांनी (जे मुस्लिमांसोबतच होते) सांगणे सुरु केले की चला अब्दुल्लाह बिन उबई जवळ जाऊ या जेणेकरून त्याने आम्हाला अबू सुफियानच्या आश्रय मिळवून द्यावा. काहीनी (दांभिकांनी) तर असेही म्हटले की मुहम्मद (स.) अल्लाहचे पैगंबर असते तर त्यांची हत्या कशी झाली असती? चला आता पूर्वाश्रमीच्या धर्माकडे परत फिरू या. याच गोष्टींच्या उत्तरात अल्लाहने सांगितले की तुमची सत्यवादिता केवळ मुहम्मद (स.) यांच्या व्यक्तित्वाशीच संबंधित असेल आणि तुमचा इस्लाम अशा तकलादु पायावर उभा असेल की पैगंबर मुहम्मद (स.) यांचे महानिर्वाण होताच तुम्ही त्याच अधर्माकडे (अनेकेश्वरत्वाकडे) फिरून जाल ज्यातून आला होता, तर अल्लाहच्या दीनधर्माला (ईशप्रदत्त जीवनप्रणालीला) तुमची काहीएक गरज नाही.
१०४) यावरून हे मुस्लिमांच्या मनात रूजविणे आहे की मृत्यूच्या भीतीने तुमचे पळणे बेकार आहे. कोणीही अल्लाहने निर्धारित केलेल्या वेळेपूर्वी मरू शकत नाही आणि त्या नंतर जगूसुद्धा शकत नाही; म्हणून तुम्हाला चिंता मृत्यूपासून वाचण्याची नव्हे तर या गोष्टीची हवी की जी निर्धारित वेळ तुम्हाला प्राप्त् आहे त्यात तुमच्या धावपळीचा उद्देश काय आहे. हे जग की परलोक?
Post a Comment