वैरी संपला, वैर संपलं. शत्रूच्या मृतदेहाशी वैर करायचं नसतं. प्रेषित मुहम्मद सल्लम् यांनी युद्धानंतर शत्रू सैनिकांच्याही प्रेतांची विटंबना न करण्याची सक्त ताकीद सैनिकांना केलेली होती. एकदा एका ठिकाणी प्रेषित बसलेले असतांना प्रेषितांचे त्यावेळचे वैरी असलेल्या ज्यू समाजातील एकाची अंतिम यात्रा समोरून जात होती. त्यावेळी प्रेषित त्यांच्या सन्मानार्थ उठून उभे राहिले. त्यांच्या सहकार्यांनी सांगितलं की, तो ज्यू होता. त्यावर प्रेषितांनी सांगितलं, काय तो माणुस नव्हता? अशाप्रकारे प्रेषितांनी दिलेली माणुसकीची शिकवण आज सर्वांनीच अंगिकारण्याची गरज आहे. मृत व्यक्तीवर जर टिका करणे अनिवार्यच असेल तरीही भाषा सभ्य असावी. कारण टिका आणि विटंबना यात फरक असतो. टिकादेखील ससंदर्भ आणि संतुलित असावी, कारण त्याचा खुलासा करण्यासाठी ती व्यक्ती जीवंत नाही, याचे सदैव भान असू द्यावे.
औरंगाबादच्या महानगरपालिकेत माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्याच्या ठरावाला विरोध करणार्या एम.आय. एम.चे नगर सेवक सय्यद मतीन यांनी एकतर विरोधच करायला नको होता. श्रद्धांजली वाहायची नव्हती तर चूप राहायचं होतं किंवा त्या पक्षाचे इतर नगरसेवक जसे नमाज पडण्यासाठी निघून गेले होते तसं निघून जायला हवं होतं. अन् त्यानंतरही जर विरोध करण्यासाठी टिका करायचीच होती तरीही ती करतांनादेखील भाषा व्यवस्थित आणि संतुलित वापरायला हवी होती. त्यांनी केलेल्या कृतिचं समर्थन केलंच जाऊ शकत नाही.
परंतु सय्यद मतीन यांना भर सभागृहात झालेल्या मारहाणीचंही समर्थन केलं जाऊ शकत नाही. इथं लोकशाही आहे, कायदा आहे. कुणी काही आक्षेपार्ह बोललं तरीही त्यावर कायदेशीर कारवाई करता येते आणि तशी त्यांच्यावर केलेली कारवाईही पुरेशी आहे.
मात्र जे लोकं घटनेलाच मनापासून मानत नाहीत त्या लोकांना कायदा वगैरे काय असतो, काय माहित. शिवद्रोही माथेफिरू जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी घालण्याच्या मागणीवर अटलीजींनी विचारो की लढाई विचारों से लढणी चाहिये असं बोलून बंदी टाळली होती. मग हाच निकष मतीन यांना का लागू केला गेला नाही, असा प्रश्न उभा राहतो. दुसरा शिवद्रोही छिंदम अहमदनगरच्या महापालिकेत कसा काय साळसुदा येऊन बसतो? अल्पसंख्यांक व बहुजन समाजातील जे लोकं वाइट आहेत, त्यांचा निषेधच, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, पण कारवाई एकतर्फी नको. दुहेरी मापदंड नको. समान नागरी कायद्याचा आग्रह धरणार्यांनी तरी किमान समान न्याय करावा. समान न्याय करणार नसाल तर कितीही समान कायदे बनवा, काहीही फायदा होणार नाही. म्हणून आधी समान समाज बनवा, मग समान कायद्याचा विचार करा. दोषींवर कायदेशीर कारवाई करतांनाही प्रेषितांचं ते वाक्य लक्षात ठेवा ... काय तो माणुस नव्हता?
- नौशाद उस्मान, औरंगाबाद
Post a Comment