- लातूर (बशीर शेख)
सन्माननीय मित्रानों अल्लाहचे कोटी- कोटी उपकार आहेत की त्याने आपल्या सर्वांना इस्लाम सारख्या वैभवशाली धर्मामध्ये जन्म दिला. त्यातल्या त्यात भारतात जन्म दिला. आज आपण या ठिकाणी ईदच्या पावन पर्वावर नमाज अदा करण्यासाठी एकत्रित जमा झालो आहोत. आज जगातून लाखो मुस्लिम एकत्रितरित्या मक्कामध्ये नमाज अदा करत आहेत आणि आपण त्याच पद्धतीने या ठिकाणी नमाज अदा करत आहोत, ही समानता इस्लामचे वैशिष्ट्ये असल्याचे जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष तौफिक असलम खान यांनी सांगितले. ईद उल अजहा निमित्त लातूर येथील ईदगाह मैदानावर आयोजित नमाज प्रसंगी खुत्बा देताना ते बुधवारी बोलत होते.
ते पुढे म्हणाले, पैगम्बर इब्राहीम अलै. संबंधी कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ” आठवण करा जेव्हा अल्लाहने इब्राहीमची काही गोष्टींमध्ये परीक्षा घेतली आणि जेव्हा तो परीक्षेमध्ये पूर्ण उतरला तेव्हा अल्लाहने त्यांना म्हटले, ”मी तुला सर्व लोकांचा नेता म्हणून नियुक्त करीत आहे.” तेव्हा इब्राहीमने विचारले, ” आणि माझ्या संततीसाठीही हेच अभिवचन आहे का?” तेव्हा अल्लाहने उत्तर दिले, ” माझे अभिवचन अत्याचार्यांसाठी नाही.”( सुरह अलबकरा आयत नं. 124).
इब्राहीम अलै. यांच्या काळात काबागृहामध्ये अनेक मूर्त्या ठेवलेल्या होत्या आणि लोक त्यांची पूजा करीत होते. त्यांचे वडील स्वत: मूर्तीकार होते. त्यांची समाजात मोठी प्रतीष्ठा होती. मूर्तीपूजा त्या काळी प्रस्थापित अशी पूजा पद्धती होती. मात्र लहानपणापासूनच इब्राहीम अलै. सलाम यांना -(उर्वरित पान 7 वर)
मूर्तीपूजेमध्ये रस नव्हता. ते सारखा विचार करायचे की, ईश्वर कोण आहे? एकदा त्यांना आकाशात तारा चमकताना दिसला. त्यांना वाटले हा एवढा प्रकाशमान आहे तर हा ईश्वर असावा. पण तो लोप पावताच त्यांना वाटले की हा तर लोप पावला हा कसा ईश्वर असू शकतो. असेच चंद्र आणि सूर्या बाबतीत झाले. विचार प्रक्रियेनंतर त्यांच्या लक्षात आले की, ईश्वर तो आहे ज्याने हे चंद्र, सूर्य, तारे, पृथ्वी व सौरमंडल तयार केेली आहेत. पृथ्वीवरील सर्व जीव जंतू आणि मनुष्य यांना जन्माला घातले आहे. त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध केल्या आहेत. हे सत्य लक्षात आल्याबरोबर इब्राहीम अलै. यांनी एकदा गावातील सर्व लोक यात्रेमध्ये गेल्याची संधी साधून काबागृहात घुसून सर्व मुर्त्या कुर्हाडीने तोडून टाकल्या आणि कुर्हाड सर्वात मोठ्या मुर्तीच्या हातात ठेवून दिली. यात्रेतील लोक परत आल्यानंतर त्यांनी काबागृहातील मुर्त्यांची अवस्था पाहिली व त्यांचा संशय इब्राहीम अलैह सलामवर आला. त्यावर ते म्हणाले, मला काय माहित त्या मोठ्या मूर्तीला विचारा त्याच्या हातात कुर्हाड आहे. तेव्हा लोकांनी आश्चर्याने विचारले तो कसा काय तोडील तो तर हालचालच करू शकत नाही? तेव्हा इब्राहीम अलैह सलाम म्हणाले, लोक हो! जो स्वत: हालचाल करू शकत नाही तो तुमचा ईश्वर कसा असू शकतो? लोकांच्या लक्षात हे सत्य आले की, मूर्ती पूजेमुळे काही साध्य होत नाही. मात्र परंपरेपासून चालत आलेली मूर्तीपूजा आणि त्यासोबत येणारे पौरोहित्याचे फायदे सोडण्यासाठी ते तयार झाले नाही. यानंतर अग्नीकुंड पेटविण्यात आले व त्यात इब्राहीम अलै. यांना टाकण्यात आले. मात्र ईश्वरीय आदेशाने आगीने इब्राहीम अलै. यांना कुठलीही हानी पोहोचली नाही आणि ते सुखरूप बाहेर आले.
इब्राहीम अलै. सलामच नव्हे तर जेवढे काही प्रेषित या पृथ्वीवर आले, त्यांनी एका ईश्वराची भक्ती करण्याचा संदेश दिला. त्या सर्वांना त्या-त्या काळच्या लोकांनी अभूतपूर्व असा त्रास दिला. अनेकांना देशोधडीला लावले. अनेकांच्या हत्या केल्या. आजही एक ईश्वराची भक्ती करण्याची हाक दिली की, अनेक लोक त्याच्या विरोधात उठून उभे राहतात.
21 व्या शतकातल्या आधुनिक विज्ञानालासुद्धा आज हे सांगता येत नाही की, सौरमंडल किती मोठे आहे? आपल्याला एक चंद्र, एक सूर्य दिसतो पण सौर मंडलमध्ये लाखो चंद्र, सूर्य आहेत आणि आपल्याला दिसणार्या चंद्र, सूर्यापेक्षा मोठ्या आकाराचे आहेत. इब्राहीम अलै. यांनी सांगितले की, माझा ईश्वर तो आहे ज्याने हे सौरमंडल नुसते निर्माणच केले नाही तर ते व्यवस्थित संचलित सुद्धा केलेले आहे. सूर्य आणि चंद्र वेळेवर निघतात. त्यांच्या उगवण्या आणि मावळण्याचे जे वेळापत्रक आज आहे तेच हजारो वर्षापूर्वीही होते. हे सहज शक्य आहे का? लाख प्रयत्न करून सुद्धा रेल्वे वेळेवर धावू शकत नाही मात्र लाखो वर्षापासून सूर्य, चंद्र, तारे वेळेवर धावत आहेत. ही सर्व ईश्वरीय व्यवस्था आहे. इब्राहीम अलै. यांचे वारस प्रेषित मुहम्मद सल्ल. होत व त्यांचे उम्मती म्हणून आपल्या सर्वांचे हे कर्तव्य आहे की, एक ईश्वराच्या संकल्पनेपासून लांब असलेल्या सर्व बांधवांना एक ईश्वराच्या आराधनेचे महत्व समजावून सांगावे.
इब्राहीम अलै सलाम यांना मूलबाळ होत नव्हते. त्यांनी मुलासाठी विशेष अशी प्रार्थना केली व 80 वर्षाच्या पेक्षा जास्त वयात त्यांना मुलगा झाला. त्यालाही वाळवंटात एकटा सोडून देण्याबद्दल ईश्वरीय आज्ञा झाली. तेव्हा इब्राहीम अलै. यांनी आपली प्रिय पत्नी हाजरा अलै. आणि लहान बाळ ईस्माईल अलै. यांना मक्का येथील सफा व मरवा पर्वताच्या मध्ये वाळवंटात सोडून दिले. उतारवयात झालेल्या मुलाविषयी माणसाला किती प्रेम असते याचा अंदाज आपण करू शकतो. असे असतांनाही अल्लाहच्या आदेशाने त्यांनी आपल्या पत्नी आणि मुलाला तेथे सोडले. मुलगा तहान लागल्याने रडू लागला. हाजरा अलै. यांनी कुठला काफिला दिसतो का म्हणून सफा आणि मरवा पर्वतांमध्ये सात फेर्या मारल्या. इकडे बाळ आक्रस्ताळपणे रडत-रडत पाय खोरत होते. त्याच्या पायाच्या हालचालीने वाळू सरकू लागली आणि ईश्वरकृपेने वाळवंटात पाण्याचा प्रवाह सुरू झाला. ही ईश्वरीय लीला होती. आजही त्या ठिकाणी गोड पाण्याचा स्त्रोत अस्तित्वात आहे. त्याला आब-ए-जम-जम असे म्हणतात. आब म्हणजे पाणी जमजम म्हणजे थांब-थांब, असे हाजरा अलै. यांनी म्हटल्याने त्या पाण्याचा प्रवाह एकाच ठिकाणी थांबला. सार्या जगातील लोक हजला गेल्यानंतर ते पाणी पितात आणि सोबत घेऊनही जातात. आजही त्या ठिकाणी शक्तीशाली दोन मोटारीने रात्रंदिवस पाण्याचा उपसा केला जातो. परंतु, पाणी संपत नाही. हजारो वर्षांपासून ही प्रक्रिया सुरू आहे. रूक्ष वाळवंटात ज्या ठिकाणी पाणीच मिळत नाही अशा ठिकाणी गोड्या पाण्याचा एवढा मोठा स्त्रोत हजारो वर्षापासून अखंडपणे प्रवाहित राहणे ही एकच गोष्ट बुद्धीमान व्यक्तीसाठी अल्लाहचे अस्तित्व मान्य करण्यासाठी पुरेशी आहे.
जगातील प्रमुख तीन संप्रदाय ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम हे इब्राहीम अलै., हाजरा अलै., इस्माईल अलै. सलाम आणि या तिघांच्या जीवन प्रवासावर विश्वास ठेवतात. हे तीन्ही संप्रदाय मिळून जगातील दोन तृतीयांश लोक होतात. मात्र अजूनही एक तृतीयांश लोक एक ईश्वराच्या संकल्पनेपासून लांब आहेत. त्यांच्यापर्यंत इब्राहीम अलै. यांचा संदेश पोहोचविणे आवश्यक आहे.
कालांतराने ईश्वरीय आदेशाने इब्राहीम अलै. पुन्हा आपल्या परिवारात परत येतात. एव्हाना इस्माईल अलै. सलाम तरूण झालेले असतात. अशा अवस्थेत असतांना सतत तीन दिवस पुन्हा इब्राहीम अलै. यांना स्वप्न पडते की ते इस्माईल अलै. यांची कुर्बानी देत आहेत. प्रेषितांचे स्वप्न हे निव्वळ स्वप्न नसून ईश्वरीय मार्गदर्शनाचा एक स्त्रोत असतो. त्यांनी आपल्या या स्वप्नाची कल्पना हाजरा अलै. आणि इस्माईल अलै. सलाम यांना दिली. ते दोघेही कुर्बानी देण्यासाठी तयार झाले. इब्राहीम अलै. सलाम यांची ही शेवटची परीक्षा होती. त्यातही ते उत्तीर्ण झाले. त्यांनी आपल्या मुलाला गावापासून दूर निर्जनस्थळी नेले व आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून इस्माईल अलै. सलाम यांना जमिनीवर पाडून मानेवर सुरी चालविली. मात्र क्षणार्धात ईश्वरीय दूत हजरत जिब्राईल अलै. त्या ठिकाणी प्रकट झाले व त्यांनी स्वर्गातील मेंढा आणून इस्माईल अलै. सलाम यांच्या ठिकाणी ठेवला. येणेप्रमाणे इस्माईल अलै. यांच्या ठिकाणी मेंढ्याची कुर्बानी झाली. स्वत:च्या तरूण मुलाची कुर्बानी तेही ईश्वरीय आदेशाचे पालन म्हणून देणे हे किती कठीण काम आहे हे, एव्हाना आपल्या लक्षात आलेच असेल. इब्राहीम अलै. यांनी ती कुर्बानी दिली. अर्थात डोळ्याची पट्टी सोडल्यानंतर खरा प्रकार त्यांच्या लक्षात आला. मात्र सुरी तर त्यांनी मुलाच्या मानेवरच चालविली होती. ही घटना मानवी इतिहासातील एवढी मोठी घटना ठरली की, प्रलयाच्या दिवसापर्यंत संपूर्ण मुस्लिम समाजातील ऐपतदार लोकांना दरवर्षी त्या घटनेची आठवण रहावी म्हणून जनावर कुर्बान करण्याचा आदेश देण्यात आला.
म्हणून ईद-उल-अजहा ही आईचा त्याग, वडिलांची कुर्बानी आणि मुलाचे समर्पण या तिन्ही उच्च मानवी मुल्यांचा समुच्चय आहे. इब्राहीम अलै. सलाम हे आयुष्यातील प्रत्येक ईश्वरीय परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना सार्या जगाचे इमाम (नेता) केले जात असल्याची घोषणा अल्लाहने केली. त्यावर इब्राहीम अलै. यांनी हे नेतृत्व त्यांच्या वंशाकडेही राहील का अशी विचारणा केली. तेव्हा उत्तर मिळाले की, तुमच्या वंशामध्ये जर कोणी अत्याचारी निपजला तर त्याला नेतृत्व बहाल करण्यात येणार नाही.
आज ईब्राहीम अलै. यांचा हा संदेश तसेच कुरआनचा आदेश सार्वजनिक करण्याची आवश्यकता आहे. अल्लाहच्या सोबत कोणालाही सामिल करणे अर्थात शिर्क करणे यापेक्षा मोठा अपराध दूसरा नाही. हे सत्य पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपली आहे. वरील प्रमाणे नमूद ईश्वरीय आदेश जर का जाणते किंवा अजाणतेपणे आपण मानवजातीपासून लपवत असू तर आपल्यावर ईश्वराची अवकृपा झाल्याशिवाय राहणार नाही. आतापर्यंत जे काही अपराध आपल्याकडून झाले, कुरआनचा संदेश इतरांपर्यंत पोहोचविण्यामध्ये आपण गफलत केली, तरी शेवटचा एक मार्ग अजून मोकळा आहे तो म्हणजे तौबा (माफी) मागणे. आपल्या या नाकर्तेपणाची माफी मागून जर का आपण इस्लामचा संदेश जगापर्यंत पोहोचविण्याचा मार्ग पत्करला तर आजही आपल्यावर ईश्वरीय कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. अल्लाहने म्हटलेले आहे, मी माफी स्विकारणारा आहे. एवढी संधी असतानांसुद्धा जर आपण ईश्वरीय आदेश सर्व मानवजातीपर्यंत पोहोचविण्यामध्ये हयगय केली तर मात्र आपल्यावर ईश्वरीय कोप झाल्याशिवाय राहणार नाही. आज मुस्लिम समाजामध्ये या कर्तव्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती बळावते आहे, म्हणून त्यांना चारही बाजूने त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
इस्लामला स्वत: समजणे आणि दुसर्यापर्यंत त्याचा संदेश पोहोचविणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. यापासून सुटका नाही. मला माहित नव्हते, मला कोणी सांगितले नाही, अशा प्रकारची बहानेबाजी करता येणार नाही. केली तरी अल्लाहपुढे चालणार नाही. आज इस्लामसंबंधी कोणतीच गोष्ट लपून राहिलेली नाही. हजारोंच्या संख्येत मुफ्ती, आलीम उपलब्ध आहेत, लाखो पुस्तके उपलब्ध आहेत, कुरआनचे भाषांतरे जवळजवळ प्रत्येक मोठ्या भाषेत झालेली आहेत. इंटरनेटवर इस्लामसंबंधी सर्व बारिक सारीक माहिती अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे, असे असतांना आपण मागे राहिलो तर मात्र आपली काही खैर नाही.
इस्लामचा अभ्यास करताना भौतिक शास्त्रांचा अभ्यास करण्यापासून कोणीही रोखलेले नाही. उलट असे ज्ञान हस्तगत करण्यासाठी चीनपर्यंत जाण्याची प्रेरणा स्वत: प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी दिलेली आहे. तुम्ही दोन्ही विधींमध्ये अभ्यास करून मोठ्या पदावर जावू शकता. एस.पी. बनू शकता, कलेक्टर बनू शकता पण हे कशासाठी बनायचे? तर न्याय करण्यासाठी. याशिवाय, दूसरा तुमचा कुठला उद्देश असता कामा नये. इस्लामची इमारत न्यायावर उभी आहे. त्यासाठी स्वत: न्यायप्रिय असणे आवश्यक आहे, चारित्र्यवान असणे आवश्यक आहे. कारण जेव्हा तुम्ही दुसर्यासाठी न्याय करू इच्छिता तेव्हा अगोदर लोक तुमच्याकडे पाहतील, तुम्ही कसे आहात, तुमचा व्यवहार कसा आहे, तुमचे चारित्र्य कसे आहे? याकडे पाहूनच लोक तुमच्याबद्दल मत बनवतील.
इब्राहीम अलै. हे सगळ्यांचे इमाम आहे. कुरआन सगळ्या जगासाठी आहे. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना काळजी फक्त मुस्लिमांचीच नव्हती त्यांना सगळ्यांची काळजी होती. तीच काळजी आपणासर्वांची असायला हवी, हाच आजच्या ईदुल अजहाचा संदेश आहे. कुर्बानी तर करावीच लागणार आहे. कुर्बानी करण्यापासून कोणत्याही ऐपतदार व्यक्तीची सुटका नाही. कुठलेही कारणं सांगून कुर्बानी टाळता येत नाही. तुम्ही दुसर्या तर्फे कुर्बानी देऊ शकत नाही. तुम्हाला स्वत:ला कुर्बानी द्यावी लागेल. कारण त्यामुळे समाजातील अनेक दुर्बल घटकांचा उदा. पशुपालक व गरीबांचा फायदा होतो.
आपण आपल्या देशाच्या उन्नतीसाठी योगदान देणेही गरजेचे आहे. आपला देश लोकशाहीप्रधान देश आहे. आमचं भाग्य आहे की आम्ही या देशात जन्मलो. या देशाच्या उन्नतीसाठी आमचं मोठं योगदान असलं पाहिजे. सगळ्यांच हित हे आमचं हित आहे. जनकल्याणाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम करणं हे जरी अवघड असलं तरी यासाठी आम्ही स्वत:ला झोकून देऊन आमच्या आशा, आकांक्षाची कुर्बानी देत कार्य केलं तर नक्कीच आम्ही प्रगतीपथावर जाऊ शकू, सगळ्यांची मनं जिंकू शकू. आपसातील भेदभाव मिटविण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आमच्या देशाचं ब्रिदच ’सत्यमेव जयते’ हे आहे. म्हणजेच सत्यच विजयी होणार. देशात स्वच्छ भारत अभियान राबविलं जातंय. इस्लामच सांगणंच आहे की, ’पाकी आधा ईमान है’ याचा अर्थच स्वच्छता हे आमचं ईमान आहे, त्यासाठी आम्ही आपलं घर, परिसर, शहर, राज्य, देश स्वच्छ राहण्यासाठी प्रयत्न करावा. याकामी सर्व मुस्लिम बांधवांनी स्वतला झोकून द्यावे. धार्मिक शिक्षणाबरोबरोच आधुनिक शिक्षणही घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
केरळ हे राज्य सर्वांच्या मदतीला धावते. जेथे जेथे आजपर्यंत आपत्ती आली केरळवासियांनी मदतीसाठी सर्वात अधिक योगदान दिले. ते मोठ्या मयाळू प्रवृत्तीचे लोक आहेत. आज ते नैसर्गिक संकटात सापडलेले आहेत. आता आपली जबाबदारी आहे की आपण सर्वांनी आपसातील मतभेद विसरून त्यांच्या मदतीला धावले पाहिजे, शेवटी असे आवाहनही तौफिक असलम खान यांनी केले.
Post a Comment