Halloween Costume ideas 2015

पैगंबर सर्वोत्तम माणूस : प्रेषितवाणी (हदीस)

पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘तुम्हांपैकी सर्वोत्तम माणूस तो आहे जो आपल्या कुटुंबियांशी सर्वोत्तम वर्तन करीत असावा. आपल्या कुटुंबियांशी सद्वर्तन करण्यात मी तुम्हा सर्वांत  अग्रेसर आहे. (कुटुंबियांपैकी) एखाद्याला मृत्यू आला तर त्याच्या दुर्गुणांची चर्चा कदापि करू नका.’’ (तिर्मिजी)

निरुपण- कुटुंब समाजाचा एक घटक आहे. उपरोक्त हदीसमध्ये आदर्श कुटुंबाचे विवरण आहे. पैगंबरांनी जो माणूस आपली पत्नी, मुलेबाळे आणि इतर नातेवाईकांशी सद्वर्तन करतो,  त्याला सर्वोत्तम माणूस संबोधले आहे. माणसाच्या चारित्र्यसंपन्नतेची कसोटी त्याचे आपल्या घरातील वर्तन आहे. घराबाहेर अर्थात समाजात चांगले वाकायचे पण घरात मात्र उलट  वागायचे, ही चारित्र्यसंपन्नता नव्हे! मातापित्यांशी, बायकोशी, मुलाबाळांशी, भावाबहिणींशी अर्थात सर्वच नातलगांशी सद्वर्तन करीत असेल तो सर्वोत्तम माणूस आहे, असा पैगंबरांचा  संकेत आहे.
पत्नीशी सद्वर्तन करणे म्हणजे तिची हमदर्दी करणे, तिच्यावर प्रेम करणे, तिच्या भावनांचा आदर करणे, तिला न दुखावणे, शिवीकाळ न करणे, तिच्या क्षमतेपेक्षा अधिक जबाबदारी  तिच्यावर न टाकणे, तिच्या रास्त इच्छाआकांक्षांना पूर्ण करणे इ. आहे. कारण लग्नानंतर ती आपले मातापिता, घरदार सोडून पतीच्या घरी येते व नवजीवनाची सुरूवात करते. अशा  वेळी तिला पतीच्या प्रेम आणि सद्वर्तनाची, आपुलकीची नितांत गरज असते. आजारपणात तिची सेवा करणे, घरकामांत तिला सहकार्य करणे, इ. म्हणजे तिच्याशी सद्वर्तन करणे  होय.
घरात मुलाबाळांशी सद्वर्तन करणेसुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या शिक्षणाची, सुसंस्कारांची व चांगल्या संगोबनाची काळजी घेणे म्हणजेच त्यांच्याशी सद्वर्तन होय. घरातील इतर  नातेवाईकांशी सद्वर्तन करण्याने अभिप्रेत त्यांच्याशी आदरसन्मानाने वागणे, त्यांची सेवा करणे, त्यांच्या चूकभुलींकडे दुर्लक्ष करणे आणि त्यांच्या हितासाठी व उत्कर्षासाठी प्रयत्न करणे  होय.
‘‘मी आपल्या कुटुंबियांशी सद्वर्तनामध्ये तुम्हां सर्वांत अग्रेसर आहे.’’ हे एक वास्तव आहे. पैगंबरांसारख्या श्रेष्ठतम चारित्र्यसंपन्न व परिपूर्ण व्यक्तिमत्त्वाला इतिहासात जोड नाही!  त्यांच्या उदात्त चारित्र्याची साक्ष त्यांच्या हाडाच्या वैऱ्यांनीही दिली आहे.
‘‘ज्याला कालपरवापर्यंत पत्थर फेकून मारीत होते, त्याला ठार करण्यासाठी जंग जंग पछाडीत होते, त्यानेच नऊ-दहा वर्षांच्या अवधीत आपल्या लोकांना नैतिक अध:पतनाच्या दरीतून  पावित्र्य व न्याय यांच्या शिखरावर नेऊन बसविले. प्रणाम! सहृदय प्रणाम त्या महापुरुषाला!’’ पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याबद्दल साने गुरुजींचे हे खूप बोलके आहेत. ‘‘तुमच्या कुटुंबियांपैकी कुणाला मृत्यू आला तर त्याच्या दुर्गुणांची चर्चा करू नका.’’ याचा अर्थ हा आहे की ज्याने इहलोकाचा निरोप घेतला आहे त्याची निंदानालस्ती करू नका. किती महान  उपदेश आहे हा! जित्यापणी तर त्यांच्याशी सद्वर्तन कराच, पण त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याशी चांगलेच वागा, त्यांच्या चागल्या गुणांचीच चर्चा करा, वाईट कुणांची नको! असे उदात्त  चारित्र्य ज्या माणसाचे असेल, तो सर्वोत्तम माणूस होय! यात शंका ती कसली?
 

- संकलन : डॉ. सय्यद रफीक

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget