मैत्रीचे पक्के धागे विणणारा विणकर म्हणून प्रसिद्ध असलेले संपादक अब्दुल लतीफ नल्लामंदू यांना दूसरे दर्पणकार म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मूळ पिंड शिक्षकाचा असणार्या अब्दुल लतीफ नल्लामंदू यांनी सोलापूरमध्ये ’कासिद’ या साप्ताहिकाची 1974 रोजी मुहूर्तमेढ रोवली आणि मुस्लिम समाज प्रबोधनासाठी आयुष्यभर कंबर कसली.
नल्लामंदू कुटूंब मूळ नारायणपेठ दामरगिद्दा जिल्हा महेबूब नगर (जुना आंध्रप्रदेश) येथील आहेत. त्यांचे आजोबा सोलापुरात आले आणि येथेच स्थायिक झाले. सुरूवातीला विणकामाचा छोटा व्यवसाय या परिवाराने सुरू केला आणि अल्पावधीतच त्याचे रूपांतर हातमाग कारखान्यात झाले. आता तर त्या कारखान्याचे रूपच पालटले आहे. याच विणकर परिवारात 5 आक्टोबर 1935 रोजी सोलापूर येथे अब्दुल लतीफ नल्लामंदू यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव अब्दुल लतीफ इमामसाब नल्लामंदू असे आहे. एम.एच. विजापुरे प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षण तर एम.ए. पानगल हायस्कूल येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण करून लतीफ यांनी पुण्यात सिनिअर पीटीसी कोर्स पूर्ण केला. 1957 साली त्यांना बार्शी नगर पालिका शाळेत शिक्षकाची नोकरी लागली. त्यानंतर 1969 पासून ते सोलापूर मनपा मध्ये शिक्षक म्हणून कर्तव्य बजावू लागले. प्रदीर्घ सेवेनंतर 1992 साली ते निवृत्त झाले. दरम्यानच्या काळात त्यांना आदर्श शिक्षक आणि आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुस्लिम समाजातील शिक्षणाविषयीची अनास्था त्यांच्या मनात घर केल्याने आपल्या समाजामध्ये स्थिरता यावी व त्यांचे प्रबोधन व्हावे म्हणून त्यांनी हातात लेखनी घेतली. सुरूवातीला त्यांनी मालेगाव येथून प्रकाशित होणारे ’अल बयान’ हे उर्दू साप्ताहिक सोलापुरातही काढावे, असा विचार केला. मात्र तेथील मौलानांच्या सहकार्याने 1973 ला, ’नजात’ नावाचे साप्ताहिक सुरू केले. परंतु, काही कारणास्तव ते बंद पडले. मात्र त्यांनी 1974 साली कासिद नावाचे साप्ताहिक सुरू केले. येणेप्रमाणे कासिदला या भागातील पहिल्या साप्ताहिकाचा मान मिळाला. कासिद आजही अखंडपणे चालू आहे.
धागा-धागा अखंड विणुया या सुत्राप्रमाणे त्यांनी शिक्षक, पत्रकार, संपादक, साहित्यिक म्हणून अनेकांशी मैत्रीचे पक्के धागे विणले. बिहारमधील अन्यायी प्रेस बिलाच्या विरोधात सोलापुरात झालेल्या अभूतपूर्व अशा सत्याग्रहात सामिल महाराष्ट्राच्या 65 पत्रकारांमध्ये अब्दुल लतीफ हे ही सामिल होते. सर्वाबरोबर त्यांना या विरोधासाठी पाच दिवस हर्सूल तुरूंगातही रहावे लागले. पत्रकारितेबरोबर त्यांनी इतर लेखनही केलेले आहे. रौशन सितारे (हिंदी तीन भाग), त्यागमूर्ती सोनिया गांधी, जंगे आजादी के मुस्लिम मुजाहिदीन, सुशिलकुमार शिंदे एक तारीखसाज शख्सीयत, ही त्यांची अन्य प्रकाशित पुस्तके आहेत. शिवाय, डॉ. इ.जा. तांबोळी लिखित, ” कासिदकार” हे त्यांच्या जीवन चरित्रावरील पुस्तकही प्रकाशित झालेले आहे. अब्दुल लतीफ यांनी अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली. सोलापूर पत्रकार भवनाचे ते कार्याध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांच्या भरीव साहित्य योगदानाला सलाम.
- आनंद घोडके,
7397813236
Post a Comment