Halloween Costume ideas 2015

काँग्रेस आणि मुस्लिम यांच्यातील संबंध

कभी वो दिन भी आयेगा के अपना राज देखेंगे जब अपनी ज़मीं होगी और अपना आसमां होगा. रामप्रसाद बिस्मील यांच्या उर्दू कवितेतील या ओळीत नमूद इच्छेप्रमाणे ’अपना राज’ येऊन नुकतीच 71 वर्ष पूर्ण झाली. या काळात ’अपना आसमां’ खाली सर्वाधिक काळ शासन करण्याची संधी काँग्रेसला मिळाली.
मुठभर फुटिरतावादी मुस्लिम सोडले तर बहुसंख्य मुस्लिम हे सुरवातीपासूनच काँग्रेसशीच जोडले गेलेले होते. दारूल उलूम देवबंद व मौ. अबुल कलाम आझाद यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बहुसंख्य मुस्लिमांनी फाळणीनंतर ही याच भूमीत राहण्याचा निर्णय घेतला. महात्मा गांधी सारख्या सहृदयी, सनातन हिंदू नेत्याला मुस्लिमांनी ’दिल से’ आपला नेता मानले. पंडित नेहरूंच्या धर्मनिरपेक्षतेवर थंड डोक्याने विश्‍वास ठेवला. शेकडो वर्षापासून चालत आलेल्या ’गंगा-जमनी तहजीब’ च्या परंपरेला  मनापासून कवटाळले. मात्र बदल्यांत काँग्रेस ने मुस्लिमांना काय दिले? राहूल गांधींनी ’काँग्रेसला मुस्लिमांचा पक्ष’ म्हटल्याची एक बातमी उर्दू दै. इन्क्लाब मध्ये नुकतीच प्रकाशित झाली. त्याबरोबर भाजपाच्या वाचाळ प्रवक्त्यापासून ते प्रधानमंत्री यांच्यापर्यंत सर्वांनी राहूल गांधींच्या त्या (कथित?) विधानाची दखल घेतली. त्या विधानाचा प्रतिध्वनी अजूनही वाहिन्यांवर होणार्‍या ’डिबेट्स’ मधून ऐकू येतोय. म्हणून या आठवड्यात याच विषयावर चर्चा करण्याचा विचार आहे.  
स्वातंत्र्य लढा काँग्रेसच्या नेतृत्वात लढला गेला. त्यामुळे स्वतंत्र भारतावर शासन करण्याचा नैसर्गिक अधिकारही त्यांचाच होता. त्याप्रमाणे पंडित जवाहरलाल नेहरू पहिले प्रधानमंत्री बनले व काँग्रेसची सत्ता देशात अस्तित्वात आली. त्यानंतर नेहरूंनी 1950 साली डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या सहीने एक प्रेसिडेन्शियल ऑर्डर काढून ती घटनेच्या अनुच्छेद 341 मधील परिच्छेद 3 मध्ये सामिल केली. शिक्षण आणि सरकारी नोकर्‍यांमध्ये आरक्षणाचा लाभ फक्त ’हिंदू’ धर्मात आस्था असणार्‍यांनाच मिळेल, अशीही तरतूद आहे. त्यात मागील 72 वर्षात दोनदा सुधारणा करण्यात आली. पहिली सुधारणा 1956 साली करून शिखांना आणि दूसरी सुधारणा 1990 मध्ये करून बौद्धांना त्यात सामील करण्यात आले. 21 जानेवारी 2011 रोजी सर्वोच्च न्यायालयाने या उपकलमामध्ये मुस्लिम व ख्रिश्‍चन (उर्वरित लेख पान 2 वर)
समाजामधील मागास वर्गांना का सामिल करण्यात आले नाही? असा प्रश्‍न केंद्र सरकारला विचारला. परंतु, सत्तेमध्ये असेपर्यंत काँग्रेसने या प्रश्‍नाचे उत्तर सर्वोच्च न्यायालयाला दिलेले नाही. काँग्रेसने मुस्लिमांचा केेलेला हा पहिला विश्‍वास घात होता. 
स्वातंत्र्यापूर्वीची 150 वर्षे इंग्रजांबरोबर लढण्यात गेल्यामुळे अधिच खंगलेला मुस्लिम समाज स्वतंत्र भारतात आरक्षण नाकारल्या गेल्यामुळे इतका उध्वस्त झाला की न्या. सच्चर यांना लिहावे लागले की, ”मुस्लिमांची परिस्थिती अनुुसुचित जाती जमातीपेक्षाही वाईट आहे.”   
याशिवाय, खालीलप्रमाणे मुस्लिम हिताचे कार्य काँग्रेसने आपल्या सुवर्ण काळात केले. 1. काँग्रेसने अघोषितरित्या ’उर्दू’ भाषेला व्यवहारातून हद्दपार करून टाकले. हिंदी आणि इंग्रजी येत नसल्यामुळे अनेकांना सरकारी नोकर्‍या सोडाव्या लागल्या. उर्दूतून काम करणार्‍या अनेक सामाजिक संस्था (एनजीओ) आणि अनेक वर्तमानपत्रे हळूहळू बंद पडत गेली व त्यात काम करणारे अनेक लोक बेरोजगार झाले.
2. हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे अल्पसंख्यांक चरित्र तर संपूर्णपणे काढून टाकले.
3. अलिगढ मुस्लिम विद्यापीठ, जामीया मिल्लीया सारख्या मुस्लिमांच्या संपत्तीतून उभ्या राहिलेल्या विद्यापीठांचे अल्पसंख्यांक चरित्र संशयाच्या भोवर्‍यात अशा काही खुबीने अडकविले की आजही ती प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
4. देशभर पसरलेल्या अब्जावधी रूपयांच्या औकाफच्या संपत्तीच्या कायदेशीर लुटीची व्यवस्था केली. मूठभर ’जमीर फरोश’ मुस्लिमांना वक्फ मंत्री आणि वक्फ बोर्डावर घेऊन त्यांच्या हातानेच वक्फ संपत्तीचा मुस्लिम समाजाला आर्थिक लाभ होणार नाही याची दक्षता घेतली. आजही वक्फच्या अनेक जमिनींवर सर्वाधिक कब्जे काँग्रेसचेच आहेत. एक ठिकाणी तर काँग्रेस भवनच वक्फच्या जमिनीवर उभे आहे.
5. ए.एस.आय. अर्थात आर्कियॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना करून त्या मार्फतीने अनेक ऐतिहासिक मस्जिदींना राष्ट्रीय संपत्ती घोषित करून त्या ठिकाणी मुस्लिमांना नमाज अदा करण्यापासून प्रतिबंध केला.
6. काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांमध्ये सामिल असणारे अबुल कलाम आझाद, मौलाना हुसैन अहेमद मदनी आणि मौ. हिफ्जुर्रहमान सेवहारवी यांच्या सारख्या नेत्यांच्या उपस्थितीत घटनेच्या चौथ्या भागात अनुच्छे 44 सामिल करण्यात आला व कॉमन सिव्हील कोडची तरतूद करण्यात आली. 
7. काँग्रेसने मुस्लिमांविरूद्ध होणार्‍या दंग्यात कधीही सरळ भाग घेतला नाही. मात्र नियमित अंतराने दंगे होत राहतील व दंगेखोरांना शिक्षा होणार नाही याची पक्की व्यवस्था करून ठेवली. म्हणूनच स्वातंत्र्यानंतर एकही वर्षे असे गेले नाही की  ज्या वर्षात, देशात मुस्लिम कुश दंगे झाले नाहीत तसेच एका ही मोठ्या दंग्यात सामिल लोकांना शिक्षा झाली नाही. 
8. 1984 साली शीखविरोधी दंगल न थोपवता आल्याने काँग्रेसने शीख समाजाची माफी मागितली मात्र असंख्य दंगे झेललेल्या मुस्लिम समाजाची माफी मागण्याचे साधे सौजन्यही काँग्रेसला दाखविता आले नाही. यावरून काँग्रेसच्या नजरेमध्ये मुस्लिमांचे किती महत्व आहे हे स्पष्ट होते.  
9. इलेक्ट्रॉनिक मीडियाचा जेंव्हा उदय झाला व अनेक वाहिन्या सुरू झाल्या. हातात कॅमेरा व माईक चे दांडके घेऊन तरूण-तरूणी गल्लो-गल्ली फिरू लागली तेव्हा दंगली घडविणे अवघड झाले. तेंव्हा देशभरात बॉम्बस्फोट घडविले गेले. त्यातही अनेक निरपराध मुस्लिमांना गोवून तुरूंगात पाठविले गेले. 
10. त्यासाठी यु.ए.पी.ए. अर्थात ’अन लॉफुल अ‍ॅक्टीव्हीटीज प्रिव्हेंन्शन अ‍ॅक्ट’ या जुनाट कायद्याचे पुनरूज्जीवन करून निरपराध तरूणांना वर्षोंवर्षे तुरूंगात सडविण्याची व्यवस्था ही काँग्रेसनेच केली. 1990 च्या दशकात निरपराध तरूणांच्या सर्वाधिक अटका ह्या दिल्ली, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश सारख्या काँग्रेस शासित राज्यातच झाल्या. 
11. 22 नोव्हेंबर 1949 रोजी अयोध्येतील बाबरी मस्जिदमध्ये रात्री गुपचुप कोणीतरी राम आणि सीतेच्या मूर्त्या आणून ठेवल्या आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंथ आणि पंतप्रधान पंडित नेहरू यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. एवढेच नव्हे तर शेकडो वर्षाच्या जुन्या चालू मस्जिदीला टाळे ठोकून दिले. 
काँग्रेसने 1989 साली लालकृष्ण आडवाणी यांच्या नेतृत्वात बाबरी मस्जिद उध्वस्त  करण्यासाठी निघालेल्या रथयात्रेला परवानगी दिली. एवढेच नव्हे तर 10 नोव्हेंबर 1989 रोजी अयोध्येत झालेल्या भूमी पूजनला केंद्रीय गृहमंत्री स्वत: बुटासिंग यांना हजर राहू दिले. तसेच 6 डिसेंबर 1992 रोजी मस्जिद दिवसा ढवळ्या शहीद होऊ दिली. 
12. या उध्वस्तीप्रकरणी ज्यांच्यावर खटले दाखल झाले ते लवकर निकाली निघणार नाहीत यासाठीही काँग्रेसने खटले प्रलंबित ठेवण्याच्या व्यवस्थित खेळी केल्या. आजही ते खटले प्रलंबितच आहेत. 
13. एवढे कमी होते म्हणून की काय 1992-93 मध्ये मुंबईत झालेल्या भयानक मुस्लिम विरोधी दंगलीच्या चौकशी प्रकरणी नेमलेल्या न्या. श्रीकृष्ण आयोगाने चिन्हीत केलेल्या दंगलीत सामिल असलेल्या लोकांना ”आम्ही जरूर शिक्षा करू”, असे निवडणूक जाहिरनाम्यामध्ये लेखी आश्‍वासन देवूनही त्यांना शिक्षा होणार नाही, याची पक्की व्यवस्था काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकार ने केली. 
14. मात्र त्याचवेळी काँग्रेसने दंगलीच्या प्रतिक्रियेस्वरूप 12 मार्च 1993 रोजी मुंबईत झालेल्या साखळी  बॉम्बस्फोटाच्या प्रकरणामध्ये मात्र शिक्षा करण्यासाठी विशेष कोर्टाचे गठन करून, त्यांच्या नियमित सुनावण्या करवून घेऊन शंभराहून अधिक लोकांना  शिक्षा घडवून आणली.
15. मात्र या उलट बॉम्बस्फोटाच्या घटनांमध्ये अटक असलेल्या मुस्लिम तरूणांना लवकर जामीन मिळणार नाही, यासाठी यु.ए.पी.ए.च्या खटल्यांच्या सुनावण्या करण्यासाठी अतिशय कमी कोर्टाचे गठण केले. आज देशभर साधे खटले चालविण्यासाठी देशाच्या कानाकोपर्‍यात तालुका स्तरावर न्यायालये आहेत पण मुस्लिम तरूणांच्या जीवन मरणाचा प्रश्‍न असलेल्या यु.ए.पी.ए.च्या खटल्यांच्या सुनावणीसाठी मात्र राज्यात दोन तीन पेक्षा अधिक न्यायालये नाहीत. 
16. न्या. श्रीकृष्ण, न्या.लिब्रहन कमीशन, न्या. गोपालसिंग कमिशन, गुजराल कमिशन, महेमूदर रहेमान कमिशन, न्या.सच्चर समिती, न्या. रंगनाथ मिश्रा कमिशन या सर्व कमिशनांची स्थापना काँग्रेसनेच केली व त्यांच्या शिफारशींची अवहेलना ही काँग्रेसनेच केली. मात्र हा निव्वळ योगायोग समजावा का हे मी चाणाक्ष वाचकांच्या न्यायबुद्धीवर सोडतो. 
16. एवढेच नव्हे तर मुस्लिमांच्या कल्याणाचा केवळ देखावा करण्यासाठी ’प्रधानमंत्र्यांच्या पंधरा कलमी अल्पसंख्यांक कल्याण कार्यक्रमा’ची घोषणा काँग्रेसने केली. सदरच्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची रास्त देखरेख पी.एम.ओ.कडे दिली असल्यामुळे मुस्लिमांना ’आता आपले नक्कीच कल्याण होईल’, असे वाटले.  मात्र 10 वर्षे सत्तेत राहूनही या पंधरा कलमांचा बोजवारा कसा उडाला हे सुद्धा आपण सर्वांनी पाहिलेलेच आहे. हे पुण्यकर्मही काँग्रेसचेच.  
काँग्रेस हा एक असा पक्ष आहे की, ज्यात 21 व्या शतकात ही घरानेशाही सुरू आहे. काँग्रेसने गांधी घराण्याचीच नव्हे तर देश भरात अनेक घराण्यांची राजकीय मक्तेदरी जोपासली. त्यामुळे प्रत्येक राज्यात विशिष्ट घराण्याचे लोकच सातत्याने निवडून गेले. त्यांना अभूतपूर्व राजकीय स्थैर्य प्राप्त झाले. म्हणून त्यांनी भ्रष्टाचारही अभूतपूर्व असाच केला. काँग्रेसच्या या राजकीय संस्कृतीत चांगली माणसे निवडून येणेच अशक्य झाले. राजकारणातच नव्हे तर शिक्षण, उद्योग, व्यापार इत्यादी क्षेत्रातही काँग्रेसने घराणेशाहीलाच चालना दिली. मुठभर घराण्यांशिवाय दूसरे लोक या क्षेत्रात येणार नाहीत व आले तरी टिकणार नाहीत याची पक्की व्यवस्था करण्याचे श्रेय सुद्धा काँग्रेसचेच. काँग्रेसने आपल्या कार्यकर्त्यांच्या शिक्षण संस्थाना संस्थानांचे रूप दिले, सहकार क्षेत्रात प्रचंड भ्रष्टाचार केला. सहकारी साखर कारखान्यामध्ये मक्तेदारी निर्माण केली. 
काँग्रेसला काय हे माहित नव्हते की, सरकारी शिक्षण संस्था आणि रूग्णालयांना आर्थिक बळ दिले तर सामान्य जनतेचे आयुष्य समृद्ध होईल? नक्कीच माहित होते! तरी पण त्यांनी ठरवून सरकारी शिक्षण संस्था व रूग्णालये बकाल होतील व खाजगी शिक्षण संस्था व रूग्णालये सदृढ होतील, असे धोरण आखले. यातून काँग्रेसचे कार्यकर्ते गबर झाले. मात्र सामान्य जनतेला काँग्रेसच्या या धोरणाचा जबर फटका बसला. शेतकर्‍यांच्या आत्महत्या व देशभर पसरलेली घोर गरिबी काँग्रेसच्या याच धोरणाचे फलित आहे. विकासाच्या शेवटच्या पायरीवर उभे असल्या कारणाने काँग्रेसच्या या धोरणाचा सर्वाधिक फटका मुस्लिमांना व शेतकर्‍यांना सर्वाधिक बसला.  काँग्रेसच्या या चुकीच्या धोरणामुळे देशभरात अभूतपूर्व असा राजकीय चिखल निर्माण झाला आणि मग त्याच चिखलातून कमळ फुलले.
काँग्रेसमध्ये सुरूवातीपासूनच मुस्लिमांचा छुपा तिरस्कार करणार्‍यांचा भरणा राहिलेला आहे. म्हणून मुस्लिमांचा विकास होणार नाही यासाठी त्यांनी दुहेरी धोरण अवलंबविले. एकीकडे त्यांनी प्रत्येक राज्यात आपल्या कलेने वागण्याचे संकेत देणार्‍या मुठभर मुस्लिमांना मुद्दाम जवळ केले, रोजा नसतांना इफ्तार पार्ट्यांना हजेरी लावून, नमाज अदा न करता नमाजच्या टोप्या घालून, ईदगाहवर येऊन खर्‍या अर्थाने त्यांनी मुस्लिमांना टोप्या घातल्या. तसेच मुस्लिमांना हिंदूत्ववादी शक्तींची भीती दाखवून खंडणी वसूल केल्यासारखी त्यांची मतं वसूल केली. तर दूसरीकडे हिंदूत्ववादी शक्तींचीही माफक वाढ होईल व ते ही कानापेक्षा उंच होणार नाहीत यासाठी ही कुटनीतिक प्रयत्न केले. 
काँग्रेसच्या या दमदार कुटनीतिला तितक्याच दमदार पद्धतीने उत्तर मिळाले ते 2014 साली. भाजपाने काँग्रेसच्या निवडणूक रणनीतिचा अभ्यास केला तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की, काँग्रेसची स्वत:ची अशी कुठलीही मतपेढी नाही. काँग्रेसचा मुख्य आधार अनुसुचित जाती जमाती, बहुजन व मुस्लिम आहेत. तेव्हा भाजपने हिंदूत्वाच्या नावाखाली पहिल्या दोन वर्गात आपला जनाधार वाढवला व तिसर्‍या वर्गाकडे दुर्लक्ष करून 2014 च्या लोकसभा निवडणुका मोठ्या फरकाने जिंकल्या. काँग्रेसच्या जनाधाराचा संकोच इतका झाला की त्याचे फक्त 44 खासदार लोकसभेची पायरी चढू शकले. त्यांना विरोधी पक्षनेत्याचे पद सुद्धा मिळवता आले नाही. काँग्रेसची ही ऐतिहासिक घसरण होती.
8 नोव्हेंबर 2016 रोजी अचानक नोटबंदी करून व त्यातून सहकारी बँका व मल्टी स्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायट्यांना जुन्या नोटा बदलण्याच्या प्रक्रियेतून वगळून भाजपाने काँग्रेसच्या आर्थिक नाड्या आवळल्या. त्यामुळे गेल्या सव्वाचार वर्षात काँग्रेसचे ’तारे जमींपर’ आल्या.
येत्या सहा महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्याने काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांना अचानक आपल्या जुन्या विश्‍वासू सहकार्‍यांची म्हणजेच मुस्लिमांची आठवण झाली व त्यांनी 11 जुलै रोजी मुस्लिम बद्धिजीवीं बरोबर एक बैठक केली आणि मुस्लिमांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात प्रसिद्ध इतिहासकार इरफान हबीब, सामाजिक कार्यकर्ते इलियास मलिक, व्यापारी जुनैद रहमान, ए.एफ. फारूकी, अमीर मुहम्मद खान, अ‍ॅड. झेड.के. फैजान, फराह नक्वी, रक्षंदा जलील सह 15 लोक सामिल होते. याची बातमी देतांना उर्दू दै. इन्क्लाबने शिर्षक दिले की, ’राहूल गांधी यांनी काँग्रेसला मुस्लिमांचा पक्ष म्हंटले.’ वास्तविकता तशी नाही. न्यूज पोर्टल द वायर ने या संबंधी सविस्तर अहवाल प्रकाशित केला जो की आज ही त्यांच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.  
प्रश्‍न हा नाही की राहूल गांधी यांनी काँग्रेस पक्ष मुस्लिमांचा पक्ष आहे असे विधान केले किंवा नाही? असे विधान काँग्रेसचा शालेय स्तरावरचा कार्यकर्ता सुद्धा करू शकणार नाही. राहूल गांधी तर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आश्‍चर्य या गोष्टीचे वाटते की मुस्लिमांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेण्यासाठी राहूल गांधींना मुस्लिम बुद्धिजीवींना विचारावे लागेल. केवळ सच्चर समितीचा अहवाल त्यांनी नजरे खालून घातला असता तरी त्यांना मुस्लिमांच्या समस्यांचे सखोल असे ज्ञान झाले असते. अर्थात राहूल गांधी यांना ते जाणून घ्यायचेच नव्हते. येथे ही राजकारण करावयाचे होते. केवळ मुस्लिमांना एक संकेत द्यावयाचा होता की मला तुमची परवा आहे. वास्तविक पाहता त्यांना मुस्लिमांची काळजी असती तर त्यांच्या सल्लागार मंडळात एखादा तरी मुस्लिम चेहरा त्यांनी घेतला असता. तसे त्यांनी केलेले नाही. यातच सारे आले. 
कोणताही मुस्लिम अशी अपेक्षा करणार नाही की राहूल गांधी यांनी 80 टक्के हिंदू मतांचा विचार न करता 15 टक्के मुस्लिम मतांचा विचार करावा. मुस्लिमांचे लांगूलचालन करावे. काँग्रेसकडून मुस्लिमांची फक्त एवढीच अपेक्षा होती आणि आहे की, राहूल गांधी यांनी फक्त दोन गोष्टी कराव्यात. एक पक्षाद्वारे  भूतकाळात केल्या गेेलेल्या चुका भविष्यात पुन्हा केल्या जाणार नाहीत याचे ठोस आश्‍वासन द्यावे. दोन मुस्लिमांशी प्रत्येक क्षेत्रात न्याय करण्याचा प्रयत्न करावा. एवढे जरी त्यांनी केले तरी बाकी विकास स्वबळावर करण्या एवढा कष्टाळू मुस्लिम समाज नक्कीच आहे.शेवटी इतकेच की, मुस्लिमांनी सुद्धा काँग्रेसचा हा दगलबाजीचा इतिहास डोळ्यासमोर ठेवूनच समर्थन किंवा विरोध करावा. मागे केले तसे एकतर्फी प्रेम करू नये. खरे पाहता पक्ष पाहून मतदान न करता पुढील निवडणुकीत व्यक्ती पाहून मतदान करावे. आजकाल निष्ठा कपड्या सारख्या बदलल्या जातात. याचे भान ठेऊन उमेदवाराचा इतिहास आणि त्याची प्रवृत्ती पाहून मतदान करावे. प्रतिक्रियावादी बनू नये. शांतपणे ज्याला मत द्यायचे आहे त्याला देवून पुन्हा आपल्या व्यावसायाकडे व मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे. बस्स!

- एम.आय.शेख
9764000737

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget