Halloween Costume ideas 2015

सर्वाधिक प्रिय कर्म : प्रेषितवाणी (हदीस)

आदरणीय अब्दुल्लाह बिन मसऊद (र.) म्हणतात, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले की, अल्लाहला कोणते कर्म सर्वाधिक प्रिय आहे? पैगंबरांनी उत्तर दिले, वेळेवर नमाज अदा  करणे. मी विचारले, त्यानंतर? पैगंबर म्हणाले, माता-पित्यांशी सद्वर्तन. मी पुन्हा विचारले, त्यानंतर? पैगंबर (स.) म्हणाले, ईशमार्गात जिहाद करणे.

निरुपण-
उपरोक्त हदीसमध्ये पैगंबरांनी मानवी जीवनाचे सार्थक करण्यासाठी तीन सर्वश्रेष्ठ कर्म करण्याचा उपदेश केला आहे.
(१) माणसाने जीवनात अल्लाहशी सदैव कृतज्ञ राहावे. हे अनंत विश्व अल्लाहचे आहे. त्यानेच मला निर्माण केले आणि या अनंत कृपा त्याच्याच आहेत ही जाणीव सतत ध्यानीमनी  ठेवावी. हे ईशऋण व्यक्त करण्याचे श्रेष्ठतम माध्यम नमाज आहे. दिवसातून पाच वेळा वक्तशीरपणे आयुष्यभर अल्लाहसमोर नतमस्तक होऊन नमाज अदा करणाऱ्याचे जीवन  यशस्वी, सफल होईल. यात शंकाच नाही.
(२) जीवनाचे सार्थक करण्यासाठी दुसरे श्रेष्ठ कर्म ज्याचा पैगंबर उपदेश करतात, ते आहे माता-पित्यांशी सद्वर्तन! खरे तर अल्लाहनेच माणसाला माता-पित्यांशी सद्वर्तन करण्याचा  आदेश दिला आहे. ही माणसाच्या सात्विकतेची लिटमस टेस्ट आहे. जो माता-पित्यांशीच सद्वर्तन करत नसेल त्याच्यात सात्विकता ती कोणती? माता-पित्यांशी सद्वर्तन हे इस्लामी  समाजाचे पायाभूत तत्त्व आहे, जे कुटुंब व्यवस्थेला मजबूत बनवते. ज्या कुटुंबात माता-पिताच दुर्लक्षित, उपेक्षित असतील, ते कुटुंब उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहात नाही.
(३) यानंतर ज्या श्रेष्ठ कर्माचा पैगंबरांनी उपदेश केला आहे ते जिहाद. माणसावर सामाजिक जबाबदारीदेखील आहे, जिला पूर्ण केल्याशिवाय त्याच्या जीवनाचे सार्थक होणार नाही.  समाजामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे म्हणजेच गुलामीविरूद्ध संघर्ष करणे व मानवजातीला स्वार्थी लोकांच्या गुलामीतून मुक्त करणे, शोषणमुक्त समाज निर्माण करणे. सामाजिक विषमता, परस्पर द्वेष आणि अन्यायाविरूद्ध बंड करणे हाच जिहाद आहे. दुर्दैवाने समाजकंटकांनी जिहादविषयी जाणीवपूर्वक गैरसमज पसरवलेले आहेत. ते दूर करून जिहादचे वास्तव समाजासमोर आणणे गरजेचे आहे. समाजामध्ये शांती, सद्भावना आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे म्हणजेच जिहाद होय. याकामी आपले सर्वस्व पणाला लावणे, त्यात येणाऱ्या संकटांना धैर्याने सामोरे जाणे आणि प्रसंगी प्राणाची आहुती देणे हाच खरा जिहाद आहे.
समाजामध्ये अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार बोकाळलेला असताना सज्जनांचे शांतपणे, निष्क्रियपणे जगणे इस्लामला कदापि मान्य नाही. या उलट इस्लामला असे नमाजी व असे हाजी  अपेक्षित आहेत जे सामाजिक स्वास्थ्यासाठीही संघर्ष करण्यास तत्पर असावेत. आपल्या देशातील सर्व शांतीप्रिय नागरिकांनी संघटित होऊन आदर्श, सत्याधिष्ठित, समताधिष्ठित व  न्यायाधिष्ठित भारताच्या नवनिर्माणासाठी जिहाद करणे ही आज काळाची गरज आहे. अन्यथा सर्व भारतीयांना या निष्क्रिय राहण्याची कटु फळे भोगावी लागतील व पश्चात्तापाची वेळ  येईल. अल्लाह आम्हा सर्वांना वेळीच सद्बुद्धी देवो, आमीन.

(संकलन : डॉ. सय्यद रफीक)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget