Halloween Costume ideas 2015

केरळमध्ये हाहाकार

मुसळधार पाऊस व पुरामुळे प्रचंड वित्त व जिवितहानी केरळवासियांना सोसावी लागत आहे. या नैसर्गिक आपत्तीपासून बाहेर येण्यासाठी अनेक वर्षे लागतील. 100 वर्षातील ही सर्वात मोठी आपत्ती मानली जात आहे. या संकटातून सावरण्यासाठी केरळने केंद्राकडे 2600 कोटी रुपयांची विशेष आर्थिक मदत मागितली आहे. याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत संमत करण्यात आला. मनरेगा या रोजगार योजनेसह केंद्राच्या विविध योजनांच्या अंतर्गत राज्याला ही मदत देण्यात यावी, असेही मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी म्हटले आहे. शासनाचे विविध विभाग, मिलिट्री, जमाअते इस्लामी हिंद व अन्य संघटनाचे केरळमध्ये मदतकार्य सुरू आहे. आतापर्यंत 10 लाख लोकांना रिलीफ कॅम्पमध्ये पाठविण्यात आले आहे.
केरळमध्ये सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. पुराचे पाणी ओसरु लागले आहे. विस्थापित लोक घरी परतू लागले आहेत. केरळमध्ये पाऊस व पुरामुळे सुमारे 20 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अन्य दोन मंत्र्यांनी मिळून या राज्याला हंगामी 680 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. राज्यातील शेतकर्‍यांनी घेतलेल्या कृषीकर्जाच्या परतफेडीला एक वर्षासाठी स्थगिती देण्याचे बँकांनी ठरविले आहे.
नैसर्गिक आपत्तीने झालेल्या हानीमुळे राज्यातील 14 पैकी 13 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर इमारती व अन्य पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीची कामे हाती घ्यावी लागणार असून त्यासाठी कर्ज घेण्याच्या मर्यादेत वाढ करावी, अशी मागणीही केरळ सरकारने केंद्राकडे केली आहे. सध्या राज्याच्या सकल उत्पन्नाच्या 3 टक्के इतकेच कर्ज घेण्याची मुभा आहे ती 4.5 टक्क्यांपर्यंत वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याला पुनर्बांधणीच्या कामांसाठी खुल्या बाजारातून साडेदहा हजार कोटी रुपये इतक्या रकमेचे कर्ज घेणे शक्य होईल.
ईद-उल-अजहा, ओनमवर पाणी
22 ऑगस्ट रोजी ईद उल अजहाचा उत्साही केरळमध्ये दिसून आला नाही. 25 ऑगस्ट येत असलेला ओनम हा महत्त्वाचा सण सुद्धा करण्याच्या मन:स्थितीत केरळमधील जनता नसणार नाही. या सणानिमित्त आयोजिलेले कार्यक्रम रद्द करून ते पैसे मदतनिधीसाठी देण्यात येणार आहेत.
जमाअते इस्लामी हिंदची 24 तास 
मदत कार्य मोहिम
देशभरात जाळे असलेल्या जमाअते इस्लामी हिंद शाखांतर्फे केरळसाठी मदत देण्यात येत आहे. जमाअतच्या स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन आणि आयआरडब्लू यासाठी रात्रंदिवस मदतीत लागलेले आहेत. डॉक्टर्स, नर्सेस आणि जी मॅनपॉवर उपलब्ध आहे ती केरळसाठी पाठविण्यात येत आहे. केंद्रीय कार्यालय दिल्ली आणि प्रत्येक राज्यामार्फत निधी पाठविला जात आहे. महाराष्ट्रातर्फे आतापर्यंत 30 लाख जमा केल्याचे सांगितले. 1 करोड रूपयांची मदत महाराष्ट्र जमात संकलित करणार असल्याचे मजहर फारूखी यांनी सांगितले. स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया साऊथ झोनकडून 3 लाख रूपयांचा निधीही दिला आहे. अजून निधी संकलित करण्याचे काम सुरू आहे. विद्यार्थी कॉलेज कॅम्पस, महाविद्यालयात जावून निधी जमा करीत आहेत. जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रचे 23 ऑगस्टला एक शिष्टमंडळी केरळला गेले आहे. ज्यामध्ये काही डॉक्टर्स, इंजिनिअर्स, नर्सेस व अन्य लोकांचा समावेश आहे. 
यूएई देणार 700 कोटींची मदत
संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) केरळला 700 कोटी रुपयांची मदत देण्याचे ठरविले आहे. अबुधाबीचे युवराज शेख मोहम्मद बिन झायेग अल नह्यान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करुन ही माहिती दिली.  अरब राष्ट्रात रोजगारासाठी गेलेल्या भारतीय ’मुस्लिमांनी’ आतापर्यंत कोट्यावधींची रक्कम मदत स्वरूपात पाठविली आहे. खलीज टाईम्स आणि गल्फ न्यूजनुसार आतापर्यंत 60 हजार जणांनी आपली एक दिवसाची पगार केरळच्या मदतकार्यासाठी देऊ केली आहे. भारताबद्दल नितांत प्रेम असलेल्या अरबांनी कोट्यवधींची मदत पाठविली आहे. केरळचा उद्योजक अब्दुल्लाह युसूफ याने 5 कोटींची मदत दिली आहे. युएई ने आतापर्यंत 64 कोटी दिले आहेत तर कतरने 35 कोटींची मदत केली आहे. डॉ. के. पी. हुसेन या औषधनिर्मात्याने 50 लाखांची मदत केली आहे. युएई च्या प्रसिद्ध अल अन्सार उद्योग समूहाने 8 कोटींची मदत दिली आहे. केरळला मदत करा म्हणून अरबी वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या जाहीर आवाहन करीत आहेत. भारतीय मीडियाच्या आवडत्या ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने आपल्या ईदच्या बजेटच्या किमान 10 टक्के तरी केरळला मदत म्हणून देण्याचे आवाहन केले आहे. केरळच्या अनेक मशिदी आणि मदरसे पुरग्रस्तांची आश्रयस्थाने बनली आहेत. केरळच्या अनेक इस्लामी संस्था आणि जमाती मदतकार्यात जुंपल्या आहेत.
अशाप्रकारे केवळ मुस्लिमांनी केरळच्या पुरग्रस्तांना 100-150 कोटींची मदत केली आहे. वाईटाचा संबंध धर्माशी जोडण्यास उत्सुक असलेले चांगुलपणाचा संबंध धर्माशी जोडत नाहीत. वाईटचे खापर धर्माच्या माथ्यावर फोडून चांगुलपणा मात्र मानवतेच्या खात्यात टाकतात. मुस्लिमांना वादात अडकवून कचाट्यात पकडल्याचा आनंद घेणार्‍यांनी ’मुस्लिमांच्या’ या सेवाभावाबद्दलही बोलायला हवे, असल्याच्या प्रतिक्रिया समाजातून उमटल्या. 
मदतीचा ओघ सुरुच
देशभरातील रेल्वेच्या कर्मचार्‍यांनी एक दिवसाचा पगार, मारुती सुझुकीच्या कर्मचार्‍यांनी 3.5 कोटी केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचे ठरविले आहे. आयटीसी, कोका कोला, हिंदुस्थान लिव्हर आदी 12 कंपन्यांनी पिण्याचे पाणी, अन्नधान्य व अन्य जीवनावश्यक वस्तू पाठविल्या आहेत. पूरग्रस्तांसाठी कोची बंदरात देशभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. या वस्तूंची साठवणूक करण्यासाठी कोची पोर्ट ट्रस्टने दोन गोदामे उपलब्ध करुन दिली आहेत. देशभरातून सर्व स्तरातून केरळवासियांची मदत सुरू आहे. आपणही यात कुठं न कुठं हातभार लावणे गरजेचे आहे. 

- (शोधन सेवा)

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget