Halloween Costume ideas 2015

धर्म व्यंगचित्रांचा विषय कसा होऊ शकतो?

वो फाकाकश मौत से डरता नहीं जरा
रूहे मुहम्मद उसके दिल से निकाल दो

हॉलंड युरोपचा एक चिमुकला देश, ज्याचा आकार अवघ्या 4 हजार 488 वर्ग किलोमीटर आहे. लोकसंख्या 65.5 लाख आहे. त्यात 10 लाख मुस्लिम आहेत. या देशाच्या एका संसद सदस्याने, ज्याचे नाव ग्रिट विल्डर्स आहे ने येत्या 10 नोव्हेंबरला प्रेषित ह. मुहम्मद सल्ल. यांच्यावर आधारित एक व्यंगचित्र स्पर्धा आयोजित केली होती. जगभरातील समाजमाध्यमांमधून या विरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. अनेक ठिकाणी प्रदर्शने झाली. म्हणून त्याने तूर्त ही स्पर्धा स्थगित केली आहे. पण प्रश्‍न असा उत्पन्न होतो की, विल्डरला अशी स्पर्धा का आयोजित करावीशी वाटली? या आठवड्यात आपण याच गोष्टीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करू.
    जगात प्रेषित हजरत मुहम्मद मुस्तफा सल्ललालहु अलैहि व सल्लम यांचा पराकोटीचा द्वेष करणारे व त्यांच्यावर पराकोटीचे प्रेम करणारे दोघांचीही संख्या कमी नाही. एकीकडे विल्डर आहे, जो प्रेषित मुहम्मद सल्लम. यांना व्यंगचित्राचा विषय समजतो तर दूसरीकडे मायकल हार्ट आहे जो प्रेषित सल्ल. यांना जगातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती समजतो. जगावर प्रभाव टाकणार्‍या शंभर व्यक्तींच्या जीवनावर त्याने लिहिलेल्या ’द हंड्रेड्स’ या पुस्तकामध्ये स्वत: ख्रीश्‍चन असून त्याने प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे नाव पहिल्या क्रमांकावर घेतले आहे. याबाबत विचारणा केली असता तो म्हणाला  की, ”प्रेषित्व मिळाल्यानंतर अवघ्या 23 वर्षात त्यांनी आपल्या प्रयत्नांतून जगावर जो प्रभाव टाकला तो मानवजातीच्या इतिहासात दुसर्‍या कुठल्याही व्यक्तीला टाकता आला नाही. म्हणून ते माझ्या नजरेत सर्वश्रेष्ठ व्यक्ती आहेत”.
काही ठळक घटना
    1. सलमान रूश्दी याने सटॅनिक व्हर्सेस ही कादंबरी लिहून, त्यात प्रेषित सल्ल. यांच्या पत्नीच्या नावाचे काल्पनिक पात्र रचून, मुद्दामहून त्यांची अवहेलना केली. परिणामी, जगभरातून त्याचा विरोध झाला. एकीकडे खोमेनी यांनी त्याच्या हत्येचा फतवा जारी केला तर दूसरीकडे 24 फेब्रुवारी 1989 रोजी या विरोधात प्रदर्शन करणार्‍या मुस्लिमांच्या जमावावर मुंबई पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 12 लोक ठार तर 40जखमी झाले होते. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते.
    2) 30 सप्टेंबर 2005 रोजी ’जेलँड पोस्टन’ नावाच्या डेन्मार्क येथून प्रकाशित होणार्‍या वर्तमानपत्रात प्रेषित सल्ल. यांचे व्यंगचित्र प्रकाशित करण्यात आले. त्याचा जागतिक स्तरावर विरोध करण्यात आला. अनेक देशात हिंसाचार व जाळपोळ झाली.
    3) 7 जानेवारी 2015 रोजी पॅरीस येथून प्रकाशित होणार्‍या ’शारली हेब्दो’ नावाच्या नियतकालीच्या कार्यालयावर काही मुस्लिम तरूणांनी हल्ला करून प्रेषित सल्ल. यांचे व्यंगचित्र काढणार्‍या चित्रकारांची हत्या केली.
    इस्लाम आणि प्रेषित हे मुस्लिमांच्या आस्थेचा अतिशय संवेदनशील विषय आहे. याविरूद्ध कोणीही लिहिले बोलले तरी मुस्लिमांची माथी भडकतात. मग ते मरण्या मारण्यासाठी तयार होतात. याच मानसिकतेतून मग पाकिस्तानमध्ये पंजाबचे राज्यपाल सलमान तासीर यांची 14 जानेवारी 2011 रोजी हत्या होते. तर 2 ऑगस्ट 2007 रोजी हैद्राबादमध्ये तस्लीमा नसरीनवर हल्ला होतो.
    गेल्या 100 वर्षात पश्‍चिमेमध्ये प्रेषित सल्ल. यांच्या विरोधात काढण्यात आलेल्या चित्रपट, पुस्तके व्यंगचित्रे यांची संख्या 60 हजार पेक्षा अधिक आहे. मात्र विडंबना पहा गेल्या 100 वर्षातच पश्‍चिमेमध्ये इस्लामचा जितक्या वेगाने प्रचार झाला व जेवढ्या मोठ्या संख्येने लोकांनी धर्मपरिवर्तन करून इस्लामचा स्विकार केला तेवढे इस्लामच्या स्थापनेपासून कधी झाले नाही.
    आज पृथ्वीच्या पाठीवर असा कुठलाच देश नाही जिथे मुस्लिम नाहीत. ज्या मुठभर लोकांना प्रेषित व्यंग चित्रपटाचा विषय वाटतात त्याच प्रेषित सल्ल. यांच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगणारे 1.75 अब्ज लोक या पृथ्वीवर राहतात.
प्रेषित सल्ल. यांच्या विरोधाची कारणे
    या प्रश्‍नाचा मागोवा घेता खालील कारणे ठळकपणे लक्षात येतात. पहिले कारण म्हणजे प्रत्येक माणसाच्या मनामध्ये स्वच्छंदी जीवन जगण्याची एक सुप्त इच्छा असते. प्रत्येकाला वाटते की मनुष्य जन्म एकदाच लाभतो म्हणून निती-धर्माची सर्व बंधने झुगारून मुक्तपणे जगावे. माणसांच्या या इच्छेच्या आड धर्म येतो म्हणून पश्‍चिमेत धर्माला नाकारण्यात आले व असे लोक स्वत:च्या इच्छेचे गुलाम झाले. पश्‍चिमेत ख्रिश्‍चन धर्माला मानणार्‍यांची संख्या सर्वात जास्त आहे, असा एक समज आहे. तो अतिशय चुकीचा आहे. युरोप आणि अमेरिकमध्ये नास्तीक लोकांची संख्या ही कुठल्याही धर्माला मानणार्‍यांपेक्षा जास्त आहे. येथील बहुतेक लोकांनी जी मुक्त आणि स्वैराचारी जीवन व्यवस्था स्विकारलेली आहे ती धर्माला गाडून स्विकारलेली आहे. आपल्या चंगळवादी जीवनशैलीसाठी अमेरिकेमध्ये लाखो काळे रेड इंडियन्स तर ऑस्ट्रेलियामध्ये लाखो काळे अबोरगिनीजचा वंशविच्छेद करण्यात आलेला आहे. व्याजाधारित अर्थव्यवस्थेचा स्विकार करून गरीब देशात राहणार्‍या कोट्यावधी लोकांचे रक्त शोषले आहे, तेव्हा कुठे युरोप आणि अमेरिकेवर झळाळी आलेली आहे. हे सर्व ख्रिश्‍चन लोकांनी आपल्या धर्म तत्वांच्या विरोधात जावून केलेले आहे.
मुसलमानों को मुसलमां कर दिया तुफान-ए- मगरिब ने,
तलातुम हाय-ए-दरिया ही से है गौहर की सैराबी
    आजमितीला पृथ्वीवर फक्त इस्लामच  एक असा धर्म आहे जो, ”प्रॅक्टिसिंग” आहे. त्याचे श्रेय प्रेषित सल्ल. यांच्या शिकवणीला जाते. कोट्यावधी लोक या उम्मी (निरक्षर) प्रेषित सल्ल. यांना आपल्या जीवनाचा तारणहार मानतात. त्यांनी सांगितल्याप्रमाणे दिवसातून पाच वेळेस नमाज, वर्षातून 30 दिवस उपवास तर सातत्याने हज आणि उमरा करतात. या धार्मिक आचरणातून त्यांना जी ऊर्जा मिळते त्यातून ते स्वैराचारी जीवनापासून लांब राहतात व एक सरळ सदाचारी जीवन जगतात. अमेरिका आणि युरोपमधील दुराचार्‍यांना हेच पाहवत नाही. ज्याप्रमाणे शेपूट कापलेल्या श्‍वानांना झुपकेदार शेपूट असलेल्या श्‍वानाचा हेवा वाटतो त्याचप्रमाणे या दुराचारी लोकांना सदाचारी मुस्लिमांचा हेवा वाटतो. आज जर का मुस्लिमांनी सदाचार सोडून त्यांच्याचप्रमाणे दुराचारी जीवन जगण्याला सुरूवात केली, कमरेचे वस्त्र फेडून डोक्याला गुंडाळले, मुस्लिम महिलांनी बुरखा सोडून बिकीनी घातली तर हेच लोक त्यांचे मोकळेपणे स्वागत करतील.
     येशूख्रिस्त (अलै.) सारख्या अलौकिक प्रेषितांचे वारसदार असलेल्या ख्रिश्‍चन लोकांनी स्वत:च्या हाताने दारू, ड्रग्स, स्वैराचार आणि संगीताला जवळ करून आपले जीवन उध्वस्त करून घेतलेले आहे. मात्र ज्या माणसाच्या शिकवणीवरून जगातील 1.75 अब्ज लोक सदाचारी लोक जगतात ते यांना पाहवत नाही. मग ते आपली कुंठा, व्यंगचित्र, बदनामीकारक साहित्य व चित्रफिती काढून व्यक्त करतात. खरे पाहता असे लोक दयेचे पात्र आहेत. मुस्लिमांनी त्यांचा तिरस्कार न करता, त्यांच्या अशा कृत्यांना हिंसात्मक प्रतिक्रिया न देता एका मानसोपचार तज्ज्ञाप्रमाणे त्यांच्यावर मानसिक उपचार करावेत. जसे की, सटॅनिक व्हर्सेसचे उत्तर, ” इस्लाम अँड कुरआन” नावाचे पुस्तक लिहून डॉ. रफिक जकेरिया यांनी दिले होते. प्रेषित सल्ल. यांच्या शिकवणींना वेगवेगळ्या माध्यमातून या मनोरूग्ण लोकांपर्यंत पोहोचवाव्यात.
    दूसरे कारण असे की, 19 व्या शतकाच्या शेवटच्या काळात युरोप आणि अमेरिकेमध्ये त्यांच्याच जीवन शैलीमुळे महिला घराबाहेर पडल्या, त्यांनी अर्थप्राप्तीस प्राधान्य तर पुत्रप्राप्तीस दुय्यम स्थान दिले. त्यामुळे या लोकांचा जन्मदर घसरला. त्यामुळे पुढे विसाव्या शतकात त्यांना आपली दैनंदिन कामे करण्यासाठी सुद्धा माणसे मिळेनासी झाली. तेव्हा त्यांनी इमिग्रेशन पॉलिसी बदलली व बाहेरील देशातून काम करण्यासाठी माणसे बोलाविली. साहजीकच या संधीचा लाभ मुस्लिमांनी उठविला व मोठ्या संख्येने मुस्लिमांनी युरोप आणि अमेरिकेमध्ये प्रवेश मिळविला. तेथे कष्ट उपसले, तेथील संस्कृती आत्मसात केली मात्र आपला धर्म काही सोडला नाही. परिणामी, त्यांची कुटुंब आणि समाज व्यवस्था मजबूत राहिली मात्र स्वैराचारामुळे युरोप आणि अमेरिकेची स्वत:ची सामाजिक आणि कौटुंबिक व्यवस्था पार मोडकळीस आली. यातून निर्माण झालेल्या न्यूनगंडातून इस्लाम आणि प्रेषितांचा विरोध सुरू झाला.
    तीसरे कारण असे की, पश्‍चिमेमध्ये एक तत्व अवलंबिले जाते ते असे की, जर आपल्याला ’डिफेंड’ करता येत नसेल तर समोरच्याला ’डिफेम’ करा. याच पराभूत मानसिकतेतून स्वत:ला डिफेंड करता येत नसल्यामुळे इस्लाम आणि प्रेषित (सल्ल.)यांना डिफेम करण्याची प्रवृत्ती या लोकांमध्ये बळावली आहे.
    चौथे कारण म्हणजे त्यांना वाटते की, आमची लोकशाही प्रगल्भ आहे आणि आमच्याकडे फ्रिडम ऑफ एक्सप्रेशन आहे. विचार स्वातंत्र्याच्या गोंडस नावाखाली हे लोक आपल्या विकृत मानसिकतेला मोकळी वाट करून देतात. त्यांना चांगल्या पद्धतीने माहित असते की कुठलेही स्वातंत्र्य निरंकुश नसते. त्यांना हे पण माहित आहे की जगाला हे स्वातंत्र्य सर्वप्रथम मुस्लिमांनी मिळवून दिले. इस्लाम पूर्व काळामध्ये कैसर आणि किसरा अर्थात रोमन आणि पार्शियन साम्राज्यात राजाला ईश्‍वर समजले जात असे. हे सम्राट प्रजेकडून आपली पूजा करून घेत. त्यांच्या विरोधात बोलण्याची कोणाची हिम्मत नव्हती. गुलामाची पद्धत रूढ होती. ब्रिटनमध्ये सुद्धा विसाव्या शतकापर्यंत ’किंग कॅन डू नो राँग’ अर्थात राजा चूक करूच शकत नाही, अशी धारणा होती. अशा  शेकडो वर्षाच्या अंधकारमय जगातून माणसाच्या गुलामीतून माणसांना काढून मुस्लिमांनी त्यांना स्वातंत्र्य देण्यासाठी नाईलाजाने हातात तलवार उचलली होती. मुस्लिमांनी केलेल्या या साम्राज्याच्या पाडावानंतरच जगाला विचार स्वातंत्र्य मिळाले. या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास डॉ. भुषणकुमार उपाध्याय आयपीएस यांचे यू ट्यूबवरचे भाषण ऐकावे.
    या लोभी व धर्मभ्रष्ट लोकांना जेव्हा-जेव्हा  पैशाची गरज पडली तेव्हा-तेव्हा स्वत:च्या हाताने यांनी स्वत:चे चर्च विकले. आजही विकत आहेत. अशा चर्चेसच्या अनेक इमारती मुस्लिमांनी विकत घेवून त्यांचे रूपांतर मस्जिदींमध्ये केले. आता युरोप, अमेरिकेमध्ये मस्जिदींची संख्या वेगाने वाढत आहे. मुस्लिमांचा होत असलेला धार्मिक उत्कर्ष आणि आपली होत असलेली अधोगती यातून निर्माण झालेल्या कुंठेतून प्रेषित आणि मुस्लिमांची बदनामी करण्याचे प्रयत्न अधून-मधून होत असतात.
    प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी जगाला एक देणगी दिलेली आहे. ती म्हणजे इस्लामची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, प्रशासकीय तसेच कायदा आणि न्यायाची स्वतंत्र व्यवस्था. याच व्यवस्थेच्या माध्यमातून चार पवित्र खलीफांनी 30 वर्षे, त्यानंतर अब्बासी खलीफांनी 700 वर्षे, उस्मानी खलीफांनी 623 वर्षे, तातारी (मोगल) आदी वंशाच्या लोकांनी मिळून पृथ्वीच्या मोठ्या भूभागावर 1 हजार वर्षे शासन केलेले आहे. युरोप आणि अमेरिकेच्या लोकांना याचीच भिती वाटते. त्यांना माहित आहे त्यांच्याकडे खरी लोकशाही व्यवस्था आहे. याच व्यवस्थेचा लाभ उठवून मुस्लिम जर सत्तेवर काबिज झाले तर आपल्या हातात काही राहणार नाही. या भितीतूनच इस्लाम आणि प्रेषित सल्ल. यांची बदनामी करण्याची हुक्की अधूनमधून या लोकांना उठत असते.
    त्यांना माहित आहे, इस्लाम पूर्णपणे प्रेषित सल्ल. यांच्यावर अवलंबून आहे. कुरआन सुद्धा त्यांच्याच माध्यमाने मिळाला  असल्याचा दावा मुस्लिमांचा आहे. म्हणून त्याच प्रेषित सल्ल. यांना बदनाम केल्यास मुस्लिम त्यांच्यापासून दुरावतील या आशेवरून सुद्धा हे लोक प्रेषित सल्ल. यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात.
    विल्डरने व्यंगचित्राची स्पर्धा भरविली. टेरिस जोन्स या इस्लामोफोबियाग्रस्त पाश्‍चरने 2010 मध्ये फ्लोरिडा येथे सार्वजनिक ठिकाणी कुरआन जाळण्याची घोषणा केली होती. अर्थात त्याला तसे करता आले नाही ही गोष्ट अलाहिदा. परंतू, असे प्रयत्न अधूनमधून होतच असतात, यात नवीन काही नाही.
--- उपाय ---
    कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ” आम्ही तर अशाच प्रकारे सैतानी प्रवृत्तीच्या मानव व जिन्न यांना प्रत्येक प्रेषितांचे शत्रू बनविले आहे. जे एकमेकांपाशी तोंडपूजलेपणा, धोकेबाजी व फसवणूक करीत राहिले आहेत. जर तुमच्या पालनकर्त्याची अशी इच्छा असते की, ते लोक असे करू नयेत तर त्यांनी तसे कधीही केले नसते. म्हणून तुम्ही त्यांना त्यांच्या स्थितीत सोडून द्या, की ते कुंभाड रचत राहतील” (सुरे अलअनाम : आ.क्र. 112).   
    दूसर्‍या ठिकाणी म्हटलेले आहे की, ” हे पैगम्बर (सल्ल.)! आम्ही तर अशाच प्रकारे गुन्हेगारांना प्रत्येक पैगंबराचे शत्रू बनविलेले आहे आणि तुमच्यासाठी तुमचा पालनकर्ता, मार्गदर्शन आणि सहाय्य करण्यासाठी पुरेसा आहे.” (सुरे : फुरकान आयत नं.31).
    प्रेषित सल्ल. यांनीसुद्धा म्हटलेले आहे की, ”एक वेळ अशी येईल की, पृथ्वीवरील प्रत्येक कच्चा किंवा पक्क्या घरात इस्लामच्या शिकवणी दाखल होतील. मग ते त्या शिकवणींना सन्माने स्विकारो की नाईलाजाने.” (संदर्भ : तर्फे हजरत मिकदार राजी, मस्नद अहेमद).
इस्लाम की फितरत में कुदरत ने लचक दी है
इसे जितना दबाओगे ये उतना उभरता है
    वरील दोन आयातींवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, सर्वच प्रेषितांना त्यांच्या जीवंतपणी व त्यांच्या नंतर सुद्धा त्रास देणारे लोक आहेत. त्यामुळे कोणी व्यंगचित्र काढून प्रेषित सल्ल. यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असेल तर यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काही नाही. असे लोक हे मार्गभ्रष्ट लोक आहेत. अशा घटनांचा हिंसक विरोध करणे हा काही उपाय होऊ शकत नाही. त्यासाठी मुस्लिमांतील उलेमा व बुद्धीजीवींनी जगाच्या प्रत्येक प्रमुख भाषेतून इस्लामच्या शिकवणी या मुस्लिमेत्तर बंधूंपर्यंत प्रभावी पद्धतीने पोहचवाव्यात. त्यासाठी उपलब्ध व प्रचलित माध्यमांचा भरपूर उपयोग करावा. तेव्हा कुठे इस्लामचा खरा संदेश  व सत्य परिस्थिती लोकांच्या लक्षात येईल.  तूर्तास या विषयाचा सखोल अभ्यास करू इच्छिणार्‍यांना मी अभ्यासासाठी खालील पुस्तके वाचण्याची शिफारस करत आहे. 1. खिलाफत और मुलूकियत (लेखक : सय्यद अबुल आला मौदूदी), 2. अल जिहाद फिल इस्लाम (लेखक : सय्यद अबुल आला मौदूदी), 3. इस्लामी सियात (लेखक : सय्यद अबुल आला मौदूदी) 4. इस्लाम दौरे जदीद का खालेक (लेखक: मौलाना वहिदुद्दीन खान), 5. गॉड रायजेस (लेखक: मौलाना वहिदुद्दीन खान) 6. इस्लाम अँड कुरआन (लेखक : डॉ. रफिक जकेरिया).
    शेवटी वाचकांच्या लक्षात एकच गोष्ट आणून देतो की, युरोपमधील अनेक देशात  होलोकॉस्ट अर्थात 1940 ते 45 या कालावधीत हिटलरने केलेला 60 लाख ज्यूंचा नरसंहार यावर टिका करणे फौजदारी गुन्हा मानला जातो. कारण त्यामुळे जगातील 1 कोटी 20 लाख ज्यू लोकांच्या धार्मिक भावना दुखावतात. त्याच न्यायाने जगाने 1 अब्ज 75 कोटी मुस्लिमांच्या भावनांचा विचार का करू नये?

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget