जो है फर्क मुझमे तुझमें
तेरा दर्द, दर्द-ए-तनहा
मेरा गम, गम-ए-जमाना
इस्लामी व्यवस्थेच्या साऱ्या मागण्या चांगल्या व्यक्तिगत आचरणाने पूर्ण होऊ शकत नाहीत त्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज असते. म्हणूनच इस्लाम सामुहिकतेवर भर देतो. इस्लामचा थोडासाच भाग व्यक्तिगत जीवनाशी संबंधित आहे. त्याला आपल्या जीवनात लागू जरी केले गेले तरी आदर्श समाज रचनेचे व्यापक उद्देश्य साध्य होत नाही. त्यासाठी सामुहिक प्रयत्नांची आवश्यकता असते. जमाअत-ए-इस्लामी हिंद गेल्या 77 वर्षांपासून यासाठीच प्रयत्नशील आहे. ही भारतीय मुस्लिमांच्या अनेक शिर्ष संस्थांपैकी एक आहे. मात्र या जमाअत संबंधी फारशी माहिती मराठी वाचकांना नाही. या जमाअतचा संदेश काय आहे? याची माहिती वाचकांना देण्यासाठी हा लेखन प्रपंच मांडला आहे.
ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि दळणवळणाच्या अत्याधुनिक साधनामुळे आज संपूर्ण जगाचे जणू एका राष्ट्रात रूपांतर झालेले आहे. आणि 200 पेक्षा अधिक देश हे या राष्ट्राचे प्रांत किंवा जिल्हे आहेत, इतपत सर्व देश एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. एवढा संपर्क तर 100 वर्षापूर्वी कोणत्याही देशातील जिल्ह्यात व तालुक्यांमध्येही नव्हता. एका दिवसात माणूस विमानाने सकाळची न्याहारी शांघायला, दुपारचे जेवण कोलकत्याला, संध्याकाळचा चहा दुबईला तर रात्रीचे जेवण लंडनला करू शकतो. गरज पडल्यास आज विभिन्न देशातील लोक एका ठिकाणी असे गोळा होऊ शकतात जसे आप आपल्या घरातून निघून लोक आपल्या गल्लीतील चौकात जमा होतात.
आजच्या काळात जगातील सर्व देशात ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण ही प्रचंड आहे. या सर्वांचा नैसर्गिक परिणाम देशा-देशात, वंशा-वंशात, प्रेम, बंधुभाव, दया, करूणा आणि एकमेकांना मदद करण्याची भावना वृंद्धीगत होण्यात व्हावयास हवा होता. मात्र झाले उलटेच. देशा-देशात, वंशा-वंशात तिरस्कार आणि वैर इतके वाढलेले आहेत की अनेक देश एकमेकांविरूद्ध कायम युद्धरत आहेत. महासत्ता म्हणविणारे देश सुद्धा एकमेकांना अणुयुद्धाच्या धमक्या देत आहेत. अनेक देशामध्ये ट्रेडवॉर जोरात सुरू आहे. परिणामी अनेक देशांचे चलन कोसळत आहेत. अनेक देशातील लोक इतक्या दारिद्रयात जगत आहेत की, त्याचे वर्णन करण्यासाठी सिद्धहस्त लेखकाला सुद्धा शब्द अपूरे पडावेत. अनेक देश एकमेकांचे लचके तोडण्यासाठी उपाशी लांडग्यासारखे एकमेकांवर तुटून पडत आहेत.
या स्थितीमुळे अनेक मानवतावादी विचारवंत चिंतीत आहेत की असे का घडत आहे? त्यांच्या समोर हा यक्ष प्रश्न आ वासून उभा आहे की, मोठ मोठ्या विद्यापीठातून शिकलेले थ्री-पीस सूट घातलेले उच्च शिक्षित, विकसित लोक जे की सकृतदर्शनी सभ्य दिसतात, आपल्याच सारख्या दुसऱ्या माणसासाठी कुत्र्यापेक्षा अधिक भयंकर जनावरासारखे का वागतात? त्यांना जवळून पाहिले, त्यांच्या व्यक्तिगत जीवनाचा वेध घेतला आणि त्यांच्या सार्वजनिक जीवनाचे आकलन केले तर त्यांची वर्तणूक पाहता असा भास होतो की जणू जंगलातील श्वापदे सभ्य कपडे घालून जगातील संसाधनांवर आणि सत्तेच्या गाद्यांवर कब्जा करून बसलेले आहेत.
या विश्वव्यापी वाईटपणा आणि मानसिक रोगाचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केल्यास ठळकपणे आपल्या लक्षात येई की ही सारी विकृती जीवनाप्रती चुकीचा दृष्टीकोण जोपासल्या आणि ईश्वराचे अस्तित्व नाकारणारी जीवनशैली अवलंबविल्यामुळे निर्माण झालेली आहे.
मला याची जाणीव आहे की आतापर्यंत आपण हा लेख मन लाऊन वाचत होता पण मी जेंव्हा निष्कर्ष काढला की ईश्वरी मार्गदर्शन नाकारल्यामुळे ही सगळी विकृती जागतिक स्तरावर निर्माण झालेली आहे. तेव्हा आपल्यापैकी अनेकांच्या कपाळावर आठ्या पडल्या असतील. अनेकजण कदाचित पुढाचा मजकूर वाचणार सुद्धा नाहीत. हे सर्व ईश्वराचे अस्तित्व नाकारून प्रगती साधणाऱ्या पश्चिमी जीवनशैलीच्या अंधानुकरणामुळे घडते आहे. माणुसकीला काळीमा फासणारे जे व्यवसाय जगाच्या एका टोकापासून दूसऱ्या टोकापर्यंत साथीच्या रोगासारखे फोफावलेले आहेत, ते केवळ ईश्वराची संकल्पना नाकारून स्वमर्जीने जीवन जगण्यामुळे फोफावलेले आहेत. या सर्व विचारांना कळत नकळत अनेक देशातील नेते आणि विचारवंतांनी प्लेगच्या विषाणूंसारखे जोपासून समाजात पसरविण्यात महत्वपूर्ण भूमिका वठवलेली आहे. आता प्लेगच्या या गाठी विकृत स्वसंप्रदाय प्रेम आणि दुसऱ्या संप्रदायाचा तिरस्कार करून पोसलेल्या संकुचित राष्ट्रवादा, वंशवादा, प्रादेशिकवादाच्या रूपाने अनेक देशांच्या काखेमध्ये उत्पन्न झालेल्या आहेत.
याच अतिरेकी राष्ट्रप्रेमामुळे अनेक बलशाली राष्ट्रानी अनेक दुर्बल राष्ट्रांची हत्या केलेली आहे. त्या राष्ट्रांच्या सडलेल्या प्रेतांमधून सुटलेल्या दुर्गंधीमुळे वाचलेल्या लोकांच्या आरोग्याला ही धोका निर्माण झालेला आहे. अनेक राष्ट्र जखमांनी विव्हळत आहेत. अनेक भुकेने तडफडत आहेत. त्यांच्यावर जेवढे उपचार तथाकथित अंतरराष्ट्रीय कल्याण संस्थांकडून केले जात आहेत. तेवढाच त्या देशांचा आजार बळवत चाललेला आहे. आज जगात प्रस्थापित वैचारिक दृष्टीकोणांनी जीवनाचे तत्वज्ञानच बदलून टाकलेले आहे. ज्यात लोकांना वंशवाद, संप्रदायवाद तर राष्ट्रांना राष्ट्रवादाचे धडे दिलेले आहेत. कोणालाच यापेक्षा वेगळा विचार जगाला देता आलेला नाही. परिणामी जे एका वंशाचे होते त्यांना त्यांच्या वंशाच्या आधारे, तर जे एका संप्रदायाचे होते त्यांना त्यांच्या संप्रदायाच्या आधारे आणि जे एका राष्ट्राचे होते त्यांना एका राष्ट्राच्या आधारे गटातटात गोळा करण्यात आले. जगात याच आधारावर आपापल्या गटाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अनेक संस्था, संघटना उभ्या राहिल्या.
स्पष्ट आहे जेंव्हा आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाने वेळ आणि अंतरावर विजय मिळवलेला आहे. वेगवेगळे देश जिल्ह्यांसारखे आपसात जोडले गेलेले आहेत, त्यात राहणारे लोक गटातटात विभागलेले आहेत, त्यांचे संघटन वंश, संप्रदाय आणि राष्ट्राधारे झालेले आहेत. अशा लोकांसमोर कुठलाही संयुक्त अजेंडा नसेल, जीवन जगण्याचा कुठलाच महान उद्देश नसेल, त्यांना आपसात जोडण्यासाठी वंश, जात, देश, भय यापेक्षा दूसरी कुठलीही गोष्ट नसेल तर त्यांच्यात कायम आपसात भांडण होणे नैसर्गिक बाब आहे. कारण वंशवाद आणि संप्रदायवाद किंवा संकुचित राष्ट्रवाद मुळातच या गोष्टीची मागणी करतो की, आपल्या वंशा, आपल्या संप्रदाया, आपल्या देशासाठी मग त्यांची भूमिका न्याय असो की अन्यायी ’आपल्याच’ लोकांना साथ द्यावी. मग त्यांच्या या भूमिकेमुळे दुसऱ्या लोकांचे कितीही नुकसान होवो. आपल्या वंश, संप्रदाय व देशातील प्रत्येक माणूस व्यक्तीगत, सामुहिकरित्या स्वहितासाठी संपूर्ण ताकतीनिशी, याचा अजिबात विचार न करता लढेल की, त्याच्या अशा लढण्याने दूसऱ्या वंश, संप्रदाय व देशातील लोकांची किती हानी होत आहे. अशा लोकांकडे कोणतीही गोष्ट किंवा काम चांगले की वाईट, खरे की खोटे, सत्य की असत्य, हे मोजण्याचे मापच हे असते की ती गोष्ट किंवा ते काम स्वहितात आहे की नाही? त्यांना हे पाहण्याची मुदलातच गरज नसते की त्यांच्या कृतीमुळे ’दुसऱ्यां’ची किती हानी होत आहे? याच प्रवृत्तीतून मग पॅलेस्टीनच्या निरपराध जनतेची त्यांच्याच भूमित कोंडी केली जाते. रोहिंग्यांवर त्यांच्याच भूमित अमानवीय अत्याचार केले जातात आणी जग मुकदर्शक बनून राहते. कारण जगातील बहुतेक देश याच तत्वाची अंमलबजावणी करत कोणावर तरी अत्याचार करतच असतात. ’नेशन फर्स्ट’ सारखे नारे याच भावनेतून दिले जातात.
’राष्ट्रपेमा’ची भावना किती ही महान असली तरीही फक्त देश प्रेम पुरेसे नसते. माणसाला माणूस म्हणून वागणे, ईतर लोकांच्या कल्याणाचा विचार करणे, चांगले संस्कार, चांगल्या चालीरिती, चांगल्या सवई, चांगली संस्कृती यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. जगाने भौतिक ज्ञानात उत्तूंग झेप घेतली आहे. अगदी सुर्यावर यान पाठवण्यापर्यंत माणसाची मजल गेली आहे. मात्र एका माणसाने दूसऱ्या माणसाशी माणुसकीने कसे वागावे याचे मात्र पुरेसे शिक्षण बहुसंख्य माणसांनी घेतलेले नाही. भौतिक ज्ञानात शंभर टक्के गुण मिळवणारी अनेक माणसं नैतिक ज्ञानात शुन्य गुणांवर आहेत. नैतिक ज्ञानाचे अगदी शालेय स्तर ही त्यांना गाठता आलेले नाही, असेच दुर्देवाने म्हणावे लागेल. काम, क्रोध, लोभ, मत्सर, स्वार्थ यावर बहुतेक उच्चशिक्षितांना विजय मिळवता आलेला नाही. माणसाला माणुसकीची संपूर्ण जाणीव झालेली नाही. खरे पाहता माणसाला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची इतकी गरज नाही जितकी मानवकल्याण देणाऱ्या नैतिक ज्ञानाची आहे.
कल्याणकारी लोकशाहीच्या नावाखाली जोपासला जाणारा वंश, संप्रदाय व संकुचित राष्ट्रवादाला नाकारत, मध्येच रशियाने जनकल्याणाची अचुक जीवन पद्धती म्हणून विसाव्या शतकात जगाला ’साम्यवादा’चा परिचय करून दिला. पण अवघ्या 70 वर्षात म्हणजे 1991 साली सोव्हिएत युनियनच्या विघटनाने साम्यवादाच्या भ्रमाचा फुगा फुटला. आज जगात ’साम्यवाद’ आपल्या शुद्ध स्वरूपात कुठेही अस्तित्वात नाही अगदी रशीया आणि चीन मध्ये सुद्धा.
आता प्रश्न हा उत्पन्न होतो की, जेव्हा मानवाच्या प्राथमिक अवस्थेतील टोळी व्यवस्था, तद्नंतर आलेली राजेशाही मग आलेली साम्राज्यवादी व्यवस्था ह्या व्यापक जनकल्याण साधण्यामध्ये अपयशी ठरल्या. त्यानंतर आधुनिक जगात ज्या व्यवस्थेने अगदी धर्माचे आणि राज्य घटनेने धार्मिक ग्रंथाचे स्थान पटकावले ती आधुनिक लोकशाही, समाजवादी आणि साम्यवादी व्यवस्था ह्या, ज्यांना हजारो वर्षाच्या अभ्यास व अनुभवा अंति जुन्या टोळी व राजेशाही व्यवस्थांना रद्द करून, उत्कृष्ट जीवनव्यवस्था म्हणून स्वीकारल्या गेल्या होत्या. त्या सुद्धा व्यापक जनहित साधू शकलेल्या नाहीत हे एव्हाना सिद्ध झालेले आहे. ह्या आधुनिक व्यवस्था सुद्धा माणसाला माणूस म्हणून चांगली वागणूक देऊ शकलेल्या नाहीत. ह्या व्यवस्था सुद्धा पूर्वीच्या व्यवस्थांपेक्षा किंचित ही कमी उपद्रवी नाहीत. तर मग अशी कोणती व्यवस्था आहे जी माणसाला माणूस म्हणून योग्य वागणूक देईल?
ज्या व्यवस्थेत वंश, लिंग, राष्ट्र, सांप्रदाय या संकल्पनांना बाजूला सारून प्रत्येकाचा सम्मान राखला जाईल. अशी कोणती व्यवस्था आहे की जिच्यामध्ये माणसाला दूसऱ्या माणसांप्रती प्रेम, दया, करूणा आणि सहकार्य करण्यास प्रेरित करेल?
स्पष्ट आहे सर्व जगात शांती प्रस्थापित करण्याचा फक्त एकच मार्ग आहे, ज्याची दोन वैशिष्ट्ये आहेत. पहिले वैशिष्ट्ये हे की, ग्लोबलायझेशन (जागतिकीकरणा) चा लाभ उठवत पृथ्वीच्या एका टोकापासून दूसऱ्या टोकापर्यंत राहणाऱ्यांचे वास्तविक कल्याण साधण्याची त्या व्यवस्थेमध्ये तरतूद असली पाहिजे. दूसरे वैशिष्ट्ये हे की, जागतिक समुहांमध्ये व्याप्त वेगवेगळ्या विचारसरणींना बाजूला सारून आपण सर्व ’एकाच आई-वडिलांची लेकर आहोत’ जे लाखो वर्ष एकमेकांपासून विलग राहत असल्यामुळे एकमेकांशी अपरिचित झालेले आहेत, अशी भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण करेल.
हे सत्य ही कुणापासून लपलेले नाही की, व्यापक जनहित व जागतिक शांततेसाठी राज्य शासनाची गरज भासेल. त्यासाठी जगातील अस्तित्वात असलेल्या लोकसंख्येपैकी बहुसंख्य लोकांना अशी व्यवस्था पटली पाहिजे. त्यांनी त्या व्यवस्थेसमोर नतमस्तक व्हायला पाहिजे. त्याशिवाय अशी वैश्वीक व्यवस्था अस्तित्वात येणे शक्य नाही.
मग अशी व्यवस्था देणार कोण? कारण वेगवेगळ्या देशांनी एकत्र येऊन एक व्यापक व्यवस्था निर्माण करण्याची शक्यता संपलेली आहे. जगातील सर्वात यशस्वी मानले गेलेेले 28 देशांवर आधारित युरोपीयन युनियनमधील देशांना ब्रेक्झिटमुळे तडा गेलेला आहे. मग अशी व्यवस्था कोण देणार?
तो कोण?
त्यासाठी अशा एका सत्ताधिशाची ओळख करून घ्यावी लागेल जो की,
1. ज्याची सत्ता संपूर्ण जगावर व्याप्त होऊ शकेल. स्थायी असेल. एवढेच नव्हे तर त्याला जगातील सर्व समुहांवर सत्ता गाजवण्याच्या अधिकार असेल.
2. ज्याच्या समोर नतमस्तक होताना कोणत्याही व्यक्ती, समुह, वंश किंवा वर्गाला लाज वाटणार नाही.
3-जो स्वत: सर्व खल प्रवृत्ती व त्रुटीपासून मुक्त असेल.
4.-ज्याची वर्तणूक सर्व लोकांच्या पालकासारखी असेल आणि तो सर्वांना एका नजरेने पाहणारा असेल.
5. तो स्वत: एवढा शक्तीशाली असेल की ज्याच्या समोर कुठलाही इसम, गट, संप्रदाय, देश किंवा जगातील सर्व लोक मिळून ही त्याला आव्हान देण्याचे साहस करू शकणार नाहीत. उलट तोच सर्वांची विचारपूस करणारा, त्यांच्या कृत्यांचा हिशोब करणारा, वंचितांना त्यांचा अधिकार मिळवून देणारा, गुन्हेगारांना पूरेपूर शिक्षा देणारा असेल. कुणीही त्याच्या तावडीतून सुटू शकणार नाही.
6. जो प्रत्येकाच्या प्रवृत्ती, मन, भावना, गरजा, बलस्थाने, त्रुटीच नव्हे तर जगात अस्तित्वात असलेल्या सर्व शक्तींनाही ओळखणारा असेल.
7. ज्याची दृष्टी सर्व माणसांच्या भूत, वर्तमान आणि भविष्यावर पसरलेली असेल.
8. तो असे नियम, तत्व बनवण्यालायक असेल जे सर्व मानवांसाठी हितकारक असतील. ज्यांची अंमलबजावणी माणसाच्या कुवतीचा अचुक वेध घेणारी असेल. ते नीयम जे सर्वांना समान न्याय देण्यास समर्थ असतील.
9. ज्याच्या ज्ञानाच्या कक्षेबाहेर काही सुद्धा नसेल.
10. ज्याची शान एवढी बुलंद असेल की दूसरा कोणीही दूसरा कोणीही त्याच्या सारखा नसेल.
स्पष्ट आहे येवढे गुण कुठल्याही हाडा मासांच्या एका माणसात असणे शक्य नाही. मात्र आशा आलमगीर (विश्वव्यापी) शक्तीशाली शासकाला अरबी भाषेत ’इलाहुल आलमीन’ म्हणजेच सर्व ब्रम्हांडाचा निर्मिक, संचालक व मालक म्हणतात. तो एकमेवाद्वितीय आहे. स्पष्ट आहे पृथ्वीवर एवढी गुण संपन्न कुठली व्यक्ती असेल व त्याच्या समोर जगातील सर्व लोक ’दिल से’ नतमस्तक होतील ह्या दोन्ही बाबी अशक्य आहेत. मात्र आपल्याला जाणीव आहे की, ब्रम्हांडावर पूर्णपणे नियंत्रण करणारा एक शासक आहे. पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे यांचे वेळापत्रक अनादीकालापासून त्यानेच ठरवून दिलेले आहे व ते अविरतपणे ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे आपापल्या कक्षेत भ्रमण करत आहेत. त्यात त्यांना कुठलाही बदल करण्याचा अधिकार नाही. यावरून आपण म्हणून शकतो की मानवी जीवनाला संचलित करण्यासाठी एक शक्तीशाली शासक अस्तित्वात आहे. त्याचे नियम जागतिक नियम आहेत. राष्ट्रांनी केलेले नीयम हे त्रुटीपूर्ण आहेत. ज्या शासकाने सूक्ष्म जीवाणूंपासून ते हत्ती एवढ्या आकाराच्या जीवांसाठी परिपूर्ण जीवन व्यवस्था दिलेली आहे. तर हे कसे शक्य आहे की, त्याने माणसासाठी अशी व्यवस्था दिली नसेल? जेव्हा आधुनिक मानव ग्लोबल (जागतिक) झालेला आहे, तर त्याची जीवन जगण्याची पद्धतीही ग्लोबलच असावी की नाही? त्यासाठी ग्लोबल कायदा असावयास हवा का नाही? तसा तो आहे ही. परंतू, आपले पूर्वग्रह दुषित असल्यामुळे आपण त्या कायद्याकडे म्हणावे तेवढे लक्ष देत नाही.
एवढ्या विवेचनानंतर आपल्या लक्षात आलेच असेल की मानवी अस्तित्वात व त्याच्या सन्मानासाठी इस्लामी जीवन व्यवस्था हीच परिपूर्ण अशी व्यवस्था आहे, जीचा पाया कुरआन आणि सुन्नाहवर आधारित आहे व जी ग्लोबल आहे. ती ईश्वरीय असल्यामुळे त्रुटीमुक्त आहे. तिच्यामध्ये काळे, गोरे, अरबी, अजमी, स्त्री, पुरूष सर्वांचे हित साधण्याची शक्ती आहे. हाच जमाअते इस्लामीचा संदेश आहे. आणि हा संदेश जगातील सर्व लोकांपर्यंत पोहोचविणे तसेच या विचाराचा प्रचार, प्रसार करणे हा तिचा उद्देश आहे.
(मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी यांच्या जमाअते इस्लामी की दावत और मक्सद या लेखावर आधारित)
- एम.आय.शेख
9764000737
www.naiummid.com
Post a Comment