(१२२) स्मरण करा जेव्हा तुमच्यापैकी दोन गट दुबळेपणा दाखवित होते,९५ वास्तविक पाहाता अल्लाह त्यांच्या मदतीसाठी उपस्थित होता आणि ईमानधारकांनी अल्लाहवरच भिस्त ठेवली पाहिजे.
(१२३) बरे यापूर्वी बदरच्या युद्धात अल्लाहने तुम्हाला मदत केली होती. खरे पाहाता त्या वेळी तुम्ही फार दुर्बल होता. म्हणून तुम्ही अल्लाहच्या कृतघ्नतेपासून दूर राहा. आशा आहे की तुम्ही आता कृतज्ञ बनाल.
(१२४) हे पैगंबर (स.)! स्मरण करा जेव्हा तुम्ही ईमानधारकांना सांगत होता, ‘‘काय तुमच्यासाठी ही गोष्ट पुरेशी नाही की अल्लाहने तीन हजार फरिश्ते उतरवून तुमची मदत करावी?’’९६
(१२५) नि:संशय जर तुम्ही संयम दाखविला आणि अल्लाहचे भय बाळगून काम केले तर ज्या क्षणी शत्रू तुमच्यावर चाल करून येईल त्याचक्षणी तुमचा पालनकर्ता (तीन हजारच नव्हे) पाच हजार सुसज्ज ईशदूतांद्वारे मदत करील.
(१२६) ही गोष्ट अल्लाहने तुम्हाला या कारणास्तव सांगितली आहे की तुम्ही खूश व्हावे आणि तुमची हृदये संतुष्ट व्हावीत, विजय व साहाय्य जे काही आहे ते अल्लाहकडूनच आहे जो अत्यंत शक्तिमान, बुद्धिमान व द्रष्टा आहे.
(१२७) (आणि ही मदत तुम्हाला तो यासाठी देईल) जेणेकरून अश्रद्धेच्या (कुफ्र). मार्गावर चालणाऱ्यांची एक बाजू तोडून टाकील अथवा त्यांचा असा अपमानजनक पराभव करील की त्यांनी विफलतेने परास्त व्हावे.
(१२८) (हे पैगंबर-स.) निर्णयाच्या अधिकारात तुमचा कोणताही वाटा नाही. अल्लाहला अधिकार आहे हवे तर त्यांना माफ करावे, हवे तर त्यांना शिक्षा करावी कारण ते अत्याचारी आहेत.
(१२९) पृथ्वी व आकाशात जे काही आहे त्याचा मालक अल्लाह आहे, हवे त्याला त्याने क्षमा करावे व हवे त्याला यातना देईल. तो माफ करणारा व परम दयाळू आहे.९७
(१३०) हे ईमानधाकांनो! हे दाम दुप्पट व्याज खाण्याचे सोडून द्या९८ आणि अल्लाहचे भय बाळगा, आशा आहे की सफल व्हाल.
(१३१) त्या आगीपासून स्वत:चा बचाव करा जी नाकारणाऱ्यांसाठी तयार केली गेली आहे.
(१३२) अल्लाह आणि पैगंबरांचे आज्ञा पालन करा, अपेक्षा आहे की तुम्हावर दया केली जाईल.
(१३३) त्या मार्गावर धावत चला जो तुमच्या पालनकत्र्याची क्षमा व त्या स्वर्गाकडे (जन्नत) जातो ज्याचा विस्तार पृथ्वी व आकाशासमान आहे, आणि तो त्या ईशपरायण लोकांसाठी तयार केला गेला आहे.
(१३४) जे कोणत्याही स्थितीत आपली संपत्ती खर्च करतात, मग ते बिकट स्थितीत असोत अथवा चांगल्या स्थितीत, जे राग गिळून टाकतात व दुसऱ्याचे अपराध माफ करतात – असे सदाचारी लोक अल्लाहला अतिशय प्रिय आहेत–९९
(१३५) आणि ज्यांची स्थिती अशी आहे की जर त्यांच्याकडून एखादे अश्लील कृत्य घडल्यास किंवा एखादा गुन्हा करून त्यांनी स्वत:वर अत्याचार केल्यास त्यांना लगेच अल्लाहचे स्मरण होते आणि ते त्याच्याकडे आपल्या अपराधांची क्षमा-याचना करतात – कारण अल्लाहशिवाय इतर कोण आहे जो अपराध माफ करू शकतो– आणि ते समजूनउमजून आपल्या कर्मावर अडून बसत नाहीत.
(१३६) अशा लोकांचा मोबदला त्यांच्या पालनकत्र्याजवळ असा आहे की तो त्यांना माफ करील व अशा नंदनवनात त्यांना दाखल करील ज्यांच्याखाली कालवे वहात असतील आणि तेथे ते सदैव राहतील. किती छान मोबदला आहे सत्कृत्य करणाऱ्यांसाठी!
९५) हा संकेत आहे बनू सलमा आणि बनूहारीसाकडे ज्यांचे धैर्य अब्दुल्लाह बिन उबई आणि त्याच्या साथीदारांच्या परत फिरल्यानंतर खचले होते.
९६) मुस्लिमांनी जेव्हा पाहिले की एकीकडे शत्रू तीन हजाराच्या संख्येत आहेत आणि आमच्या एक हजारातूनसुद्धा तीनशे सैन्य कमी झाले तर त्यांचे साहस सुटू लागले. त्या वेळी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी त्यांच्याशी हे संभाषण केले होते.
९७) उहुद युद्धात जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) जखमी झाले तेव्हा त्यांच्या तोंडून शत्रूसाठी बद्दुवा (शाप) निघाली की, ``ते लोक कसे सफल होऊ शकतात जे आपल्या पैगंबराला जखमी करतात.'' या आयती त्याच्याच उत्तरात आलेल्या आहेत.
९८) उहुद युद्धाच्या पराजयाचे मोठे कारण होते की मुस्लिम ठीक सफलतेच्या समयी संपत्तीच्या लोभात पडले आणि कार्याला निर्णायक स्थितीत पोहचविण्याऐवजी युद्धसंपत्ती गोळा करण्यात मग्न झाले. यासाठी पूर्णत्वदर्शी अल्लाहने या स्थितीच्या सुधारासाठी धनासक्ती रोगावर उपाय करण्यासाठी आवश्यक समजून आदेश दिला की व्याज खाण्यापासून दूर राहा. व्याजखोरीत मनुष्य रात्रंदिवस लाभवृद्धीचा हिशेब लावतो व त्यामुळे मनुष्यांत धनाशक्ती अमर्यादपणे वाढतच जाते.
९९) व्याज खोरी ज्या समाजात अस्तित्वात असते त्या समाजात दोन प्रकारचे नैतिक रोग निर्माण होतात. व्याज घेणाऱ्यामध्ये लालसा, कंजूषी आणि स्वार्थीपणा आणि व्याज देणाऱ्यात द्वेष, तिरस्कार, राग निर्माण होतात. उहुद युद्धातील पराजयात या दोन्ही प्रकारच्या रोगांचा वाटा होता. अल्लाह मुस्लिमांना दाखवून देत आहे की व्याजखोरीमुळे दोन्ही पक्षांत (व्याज घेणारा आणि व्याज देणारा) जे नैतिक अवगुण निर्माण होतात त्यांच्या अगदी विरुद्ध वेगळेच सद्गुण ईशमार्गात खर्च केल्याने माणसात निर्माण होतात, आणि अल्लाहची क्षमा आणि स्वर्गप्राप्ती याच दुसऱ्या गुणांनी प्राप्त् होऊ शकते ना की पहिल्या प्रकारच्या अवगणुनांनी मुळीच नाही. (तपशीलासाठी पाहा, सूरह - २ टीप ३२०)
Post a Comment