प्रत्येक माणूस मनापासून निरोगी राहू इच्छितो. परंतु, समाजात दिवसेंदिवस रोगी माणसांची संख्या वाढत आहे, हेच वास्तव आहे. कोणत्याही शहराच्या विकासामध्ये, ”डॉक्टर लेन” चा मोठा सहभाग आहे. देशात शेकडो वैद्यकीय महाविद्यालये सुरू आहेत. त्यातून दरवर्षी लाखो विद्यार्थी डॉक्टर होऊन बाहेर पडत आहेत. खाजगी आणि सरकारी रूग्णालयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मेडिकल स्टोअर्सची संख्या लाखोंमध्ये आहे. अब्जावधी रूपयाच्या औषधांची निर्मिती नियमितपणे सुरू आहे. आरोग्य सुविधा दिल्लीपासून गल्लीपर्यंत पसरलेल्या आहेत. नागरिकांमध्ये आरोग्यविषयी जागरूकता वाढलेली आहे. ती वाढावी म्हणून नियमितपणे वर्तमानपत्रातून आरोग्यासंबंधीचे रकाणे प्रकाशित केले जातात. अनेक वाहिन्यांवर निरोगी कसे रहावे, या संबंधीची माहिती नियमितपणे पुरविली जाते. अनेक वेबसाईट अशा आहेत ज्या आपल्याला निरोगी कसे रहावे, याचे कानमंत्र देत असतात. आज कुठलाही आजार असा नाही ज्या संबंधी सविस्तर माहिती इंटरनेटवर उपलब्ध नाही. स्वच्छतेचे नियम जवळजवळ सगळ्यांनाच माहित आहेत. शुद्ध पिण्याच्या पाण्याचे महत्त्व लोकांच्या मनामध्ये किती आहे, याचा अंदाज बाटलीबंद पाण्याच्या दिवसेंदिवस वाढत्या विक्रीवरून येतो. एवढी सगळी जागरूकता निर्माण झाल्यानंतरसुद्धा आज आपल्या देशात आजारी लोकांची संख्या भरमसाठ वाढत आहे. याचे कारण काय? याचाच विचार या लेखातून करण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
मागच्या म्हणजे विसाव्या शतकात विषाणू किंवा सुक्ष्म जंतू संसर्गामुळे होणाऱ्या रोगांची संख्या जास्त होती. उदा. कॉलरा, स्मॉलपॉक्स (देवी), टायफॉईड, प्लेग इत्यादी. त्या शतकामध्ये त्यावर उपचारही मर्यादितच उपलब्ध होत होते. मात्र या शतकात म्हणजे 21 व्या शतकात विषाणू किंवा जंतू संसर्गामुळे होणाऱ्या प्रत्येक आजारावर प्रभावी औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध झालेली आहेत. अनेक प्रकारची प्रतिजैविके (ऍन्टीबायोटिक्स), वेगवेगळ्या प्रकारच्या रोगप्रतिबंधात्मक लसी सहज उपलब्ध आहेत. ती सामान्य माणसाला घेण्याइतपत स्वस्त सुद्धा आहेत. म्हणून या शतकात वरिल प्रकारच्या आजारांची भिती राहिलेली नाही. काही कारणामुळे कोणी अशा रोगांमुळे आजारी पडलाच तर तात्काळ त्याला औषधोपचार उपलब्ध होतात आणि तो बरा होऊ शकतो. मात्र या शतकाचे आव्हान वेगळे आहे. आज बहुतेक लोक विषाणू किंवा जंतू संसर्गामुळे आजारी पडत नाहीत तर, ”लाईफ स्टाईल” अर्थात चुकीच्या जीवनशैलीमुळे उत्पन्न होणाऱ्या आजाराचे बळी पडत आहेत.
बदलती जीवनशैली
आजकाल रात्री उशीरापर्यंत जागणे आणि दिवसा उशीरा उठणे सामान्यबाब झालेली आहे. उशीरा रात्रीपर्यंत चालणारे क्लब, पब, हॉटेल्स यामधून भटकंती करत फिरणाऱ्यांची संख्या कोट्यावधीमध्ये आहे. जे लोक काही कारणामुळे यापासून दूर आहेत ते टी.व्ही.वरील शेकडो वाहिन्या आणि स्मार्टफोनमध्ये गुंतून उशीरापर्यंत जागतात. शिवाय, दारू, बिअर किंवा तत्सम नशा करणारे लोकही रात्री उशीरापर्यंत जागतात. रेव्ह पार्ट्यामधून रात्रभर अक्षरश: नंगानाच केला जातो. थोडक्यात उशीरापर्यंत जागण्याची सवय लागल्यामुळे अनेक लोकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.
याशिवाय, वेगवान जीवन जगतांना निवांतपणे जेवण्यासाठीही काही लोकांना वेळ मिळत नाही. त्यामुळे ’फास्ट फुड’ ज्याला जंक फुड सुद्धा म्हटले जाते, चे प्रमाण वाढले आहे. फास्ट फुडमध्ये आरोग्यदायी घटकांचा समावेश कमी असतो. उलट शरिराला अपाय करणाऱ्या घटकांचा समावेश जास्त असतो. असे अन्न शिजविताना चमचमीतपणा वाढावा म्हणून ट्रान्सफॅट, शिसेमिश्रित रंग, रसायनमिश्रित सॉसेस व अजिनोमोटो सारखे अपायकारक मीठ वापरले जाते. अशा प्रकारचे जंक फुड खाण्याची सवय जडल्यामुळे व त्यासोबत हानिकारक असे शीतपेय वापरले जात असल्यामुळे त्यातून अनेक प्रकारचे आजार माणसाला होत आहेत.
शारीरिक श्रमाचा अभाव
वाढते औद्योगिकीकरण आणि संगणकीकरणामुळे बहुतेक माणसांचे शारीरिक श्रम कमी झालेले आहे. सारखे एकाच ठिकाणी तासन्तास संगणकासमोर बसून राहिल्यामुळे अनेक लोकांच्या रक्तामध्ये कोलेस्टेरॉल वाढण्याची व त्यातून लठ्ठपणाची समस्या निर्माण होत आहे.
मानसिक ताण-तणाव
बदलत्या सामाजिक व्यवस्थेने अनेक लोकांचे जीवनच बदलून टाकलेले आहे. संस्कृतीची व्याख्याच बदललेली आहे. कामाच्या ठिकाणी स्त्री - पुरूषांचा वाढता वावर व त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंती, वेगाने व ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करण्याचा दबाव, कार्पोरेट क्षेत्रामध्ये होणारे वेगवान बदल, त्यातून ’जॉब्स’ अस्थिर होण्याची शक्यता व त्यातून निर्माण होणारा ’स्ट्रेस’ (तणाव) इत्यादी कारणामुळे या शतकात माणसे मोठ्या प्रमाणात आजारी पडत आहेत.
हवामानातील बदल
वाढत्या औद्योगिकरणामुळे कुठल्या वस्तूंचे उत्पादन करावे याला काही धरबंध राहिलेला नाही. त्यामुळे अनेक वस्तूंचे अमाप उत्पादन केले जात आहे. त्यासाठी नवनवीन कारखाने स्थापित केले जातात. कोट्यावधी कारखान्यांनी ही पृथ्वी वेढलेली आहे. बहुतेक कारखान्यातून तीन पाळ्यांमध्ये काम होते. म्हणजे हे कारखाने रात्रंदिवस विषारी धूर ओकत असतात. हेच ग्रीन हाऊस इफेक्टला कारणीभूत आहेत. याच कारखान्यांमधून सोडलेले जाणारे लाखो गॅलनचे विषारी द्रव्य, नद्या, नाले आणि समुद्रात सोडले जातात. त्यातून पाण्याचे प्रदूषण वाढते. विशेष म्हणजे यातूनच वातावरणातील अचानक होणारे बदल (ड्रास्टिक क्लायमेट चेंज) आजकाल मोठ्या प्रमाणात घडून येत आहेत. त्यामुळे कुठे अचानक अतिवृष्टी तर कुठे अचानक दुष्काळ अश्या समस्या निर्माण होत आहेत. शिवाय, वाढत्या शहरीकरणामुळे शहरांचा अमर्याद विस्तार होत आहे. त्या विस्तारासाठी अनेक जलसाठ्यांचा, मैदानांचा आणि वृक्षांचा बळी दिला जात आहे. मोठ्या शहरात राहण्याच्या ठिकाणापासून कामाचे ठिकाण लांब असल्यामुळे नियमितपणे प्रवास करावा लागतो. त्यामुळे वाहनांची संख्या अमाप वाढलेली आहे. त्या वाहनातून निघणाऱ्या धुरात कार्बन मोनॉक्साईडसारखे विषारी पदार्थ रात्रंदिवस वातावरणात मिसळत आहेत. हेच कार्बन मोनॉक्साईड शहरी लोकांच्या फफ्फुसात जावून श्वसनाच्या अनेक तक्रारी उत्पन्न करतात.
संकरित पदार्थ
वाढत्या लोकसंख्येच्या भुकेचा प्रश्न सोडविण्यासाठी जैविक प्रक्रिया करून त्यातून नवनवीन धान्य आणि भाजीपाला मोठ्या प्रमाणात निर्माण केला जातो. तो वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा वापर केला जातो आणि जहाल अशा विषारी औषधांची फवारणी केली जाते. त्यातून उत्पन्न होणारा भाजीपाल व अन्नपदार्थ या माध्यमातून अनेक विषारी पदार्थ आजकाल लोकांच्या शरीरात जात आहेत. ज्यातून असे विविध आजार उत्पन्न होत आहेत जे की विसाव्या शतकात फार कमी प्रमाणात होते. या जीवनशैलीतील बदलामुळे जे आजार होत आहेत आता त्या संबंधी थोडक्यात आपण माहिती पाहू.
बदलत्या जीवनशैलीतील आजार
सर्वप्रथम हृदय विकाराची समस्या या बदलत्या जीवनशैलीमुळे मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. हृदयघात हा आजही भारतीय नागरिकांमध्ये मृत्यूचे पहिले कारण आहे. विसाव्या शतकात महिलांना हृदय विकाराचा झटका येणे ही एक आश्चर्याची बाब मानली जायची आता ती आता या शतकात सामान्य बाब होऊ पाहत आहे. आजही महिलांच्या तुलनेत पुरूषांनाच या आजाराला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत आहे.
रक्ताच्या धमन्यांमध्ये चरबी (रींहशीेीलश्रशीेीळी) तयार होण्याची समस्या या बदलत्या जीवनशैलीमुळे वाढलेली आहे.
ब्रेन स्ट्रोक अर्थात मेंदूमध्ये अचानक रक्तस्त्राव होणे किंवा रक्ताचा पुरवठा कमी होणे त्यामुळे होणाऱ्या आजाराला ब्रेन स्ट्रोक म्हणतात. हा एक घातक आजार आहे. ज्याचे प्रमाण वाढत आहे.
देशात होणाऱ्या मृत्यूंपैकी 61 टक्के मृत्यू हे बिघडलेल्या जीवनशैलीमुळे उत्पन्न होणाऱ्या आजारातून होत आहेत. तसेच 2005 ते 2015 या कालावधीमध्ये लठ्ठ लोकांची संख्या दुपटीने वाढली असल्याचा अहवाल नुकताच सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट विभागाने प्रकाशित केला आहे.
उपाय
सर्वप्रथम एका गोष्टीकडे मी वाचकांचे लक्ष वेधू इच्छितो की, ओव्हर इटिंग (मर्यादपेक्षा जास्त खाणे) ची समस्या देशामध्ये वाढत आहे. चमचमीत, मसालेदार जेवण मोठ्या प्रमाणात करण्याची सवय जडल्यामुळे अनेक लोकांच्या पोटाचा घेर सातत्याने वाढत असतो, अशा लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
या संदर्भात प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे मार्गदर्शन अतिशय उपयोगी आहे. हजरत मुकदाम बिन मआद रजि. म्हणतात की, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी फर्माविले की, ” आदम अलै.च्या मुलांनी (अर्थात जगातील सर्व लोक) पोटापेक्षा वाईट कुठलेच ताट भरलेले नाही. त्यांच्यासाठी तर थोडेशे घास पुरेशे आहेत पाठीचा कणा ताठ ठेवण्यासाठी. जर इच्छाच झाली तर त्यापेक्षा थोडे अधिकही खाता येईल. परंतु, पोटाची विभागणी तीन भागात करावी. एकात अन्न, एकात पाणी तर एकात हवा, असावी.” या हदीसचा अर्थ असा आहे की, माणसं नेहमीच वाजवीपेक्षा जास्त खातात. वास्तविकपणे त्यांनी थोड्याशा जेवणावर संतुष्ट व्हावयास हवे. पोट एक तृतीयांशच भरेल एवढेच जेवण करावे, असे केल्यास अति खाण्यावर उत्पन्न होणाऱ्या आजारांवर आपोआप प्रतिबंध बसेल. अनेक लोकांमध्ये असा समज प्रचलित आहे की, जास्त खाल्यामुळे माणूस जास्त सदृढ होतो. हा समज चुकीचा आहे.
एकदा प्रेषित सल्ल. यांनी म्हटले की, ” ज्याने आपले जेवण कमी केले त्याने आपले पोट व्यवस्थित ठेवले आणि त्याने आपले मनही स्वच्छ ठेवले. ज्याने जेवण जास्त केले त्याने आपल्या पोटाला आजारी केले आणि त्याचे मनही कठोर झाले.” (बुखारी)
जेवण कमी केल्यामुळे शरीर व मन दोन्ही हल्के राहते, एकाग्र चित्त होता येते त्यामुळे जीवनात अनेक फायदे मिळतात. याउलट पोट जड होईपर्यंत खाल्याने पचन संस्थेवर विनाकारण दबाव वाढतो त्यातून आरोग्य बिघडते, मन विचलित होते, माणूस सुस्त होवून जातो. वास्तविकपाहता वर नमूद हदीसमध्ये एवढ्या महत्वपूर्ण गोष्टी सांगितलेल्या आहेत की, किमान काही डॉक्टर्सनी यावर अधिक संशोधन करून या संबंधीचे विस्तृत मार्गदर्शन जगाला करणे आवश्यक आहे.
जेवणाच्या चांगल्या सवयी
1. एक घास 32 वेळा चावून खावा.
2. रात्रीचे जेवण 9 वाजण्याच्या आत करावे व जेवल्यानंतर न विसरता थोडीशी शतपावली करावी.
3. अधून-मधून जेवण टाळावे किंवा वाजवीपेक्षा कमी खाणे.
4. जेवण करतांना जेवणावरच लक्ष ठेवणे आणि जेवण करणे एक आनंददायक प्रक्रिया आहे, त्याचा अनुभव घ्यावा. अनेक लोक आज टी.व्ही., मोबाईल पाहत जेवण करतात. त्यामुळे घास किती वेळेस चावला आणि किती प्रमाणात जेवले याचा त्यांचा त्यांनाच अंदाज येत नाही.
5. हॉटेलचे जेवण शक्यतो टाळावे आणि घरच्या जेवणाला प्राथमिकता द्यावी.
6. जॉन हॉपकिन्स इन्स्टिट्यूचे म्हणणे आहे की, घरी तयार करण्यात आलेल्या जेवणातून हॉटेलच्या जेवणापेक्षा 200 कॅलरी कमी असतात.
7. जेवण करतांना सलाद अर्थात गाजर, मुळा, बीट, काकडी इत्यादींचा वापर प्रत्यक्षात अन्नापेक्षा जास्त करावा.
पश्चिमेने जगाला, ” जीवनमान उंचावणे” चे जे लक्ष्य दिलेले आहे ते गाठण्यासाठी आज प्रत्येक माणूस स्वत:ला धोकादायक पद्धतीने स्पर्धेमध्ये झोकून देत आहे. त्यामुळे सुद्धा त्यांना अनेक शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अल्पसंतुष्ट राहण्याची सवयसुद्धा लावून घेतल्यास या पासून निर्माण होणाऱ्या अवाजवी तणावापासून माणसाला मुक्ती मिळू शकतो.
तसेच पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि मोबाईल व टिव्हीचा मर्यादित वापर इत्यादीमुळे आजही या शतकात आरोग्यदायी जीवन जगता येते. औषधांवरचे अवलंबवित्व कमी करून रोग होणारच नाहीत यासाठी प्रयत्न करणे, स्वच्छतेचे नियम पाळणे इत्यादी गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- डॉ.मुहम्मद हादी
Post a Comment