Halloween Costume ideas 2015

‘मुस्लिमांनी वर्तमानासह इतिहासाचेही आकलन भक्कम करावे’

- कोल्हापूर (शोधन सेवा)
मुसलमानांचा वर्तमान नासवण्यामागे जमातवादी इतिहासलेखन जबाबदार आहे, उज्जवल भविष्यासाठी मुस्लिम समाजाला इतिहासाचे आकलन होण्याची फार मोठी गरज निर्माण झाली आहे. येणार्‍या काळात देशात सामाजिक सदभाव कायम ठेवायचा असेल तर मुस्लिमांनी वर्तमानासह इतिहासाचेही आकलन भक्कमपणे करावे, असं वक्तव्य ज्येष्ठ साहित्यिक जावेद पाशा कुरेशी यांनी ‘आम्ही भारतीय’ पुरस्काराला उत्तर देताना केले. भारतीय मुस्लिम समाजात सहिष्णुतेची मूल्य परंपरेने चालत आली आहेत, याचा काही लोकांनी गैरवापर केल्यानं आज जनमाणसात तेढ निर्माण झाली आहे, ती दूर करायची असेल तर इस्लामचा मूळ बंधूभावाचा संदेश पुन्हा एकदा नव्यानं सागण्याची गरज निर्माण झाली आहे, असेही कुरेशी म्हणाले.
    जिल्ह्यातील कुरुंदवाड येथे 2 सप्टेंबर रविवार रोजी अल फताह मुस्लिम युवक संघटनेच्या वतीने ‘आम्ही भारतीय’ पुरस्काराचा वितरण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र पाटील-यड्रावकर होते. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून इतिहास संशोधक व लेखक सरफराज अहमद उपस्थित होते.
    यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. आम्ही भारतीयचा विशेष साहित्यकृती पुरस्कार नागपूरचे जावेद पाशा कुरेशी यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्यांनी मराठी मुस्लिम समाजमनावर बीजभाषण केले. संघटनेचा मुक्त लेखनाचा सन्मान पुण्यातील सत्याग्रही विचारधाराचे कार्यकारी संपादक कलीम अजीम यांना देण्यात आला. धुळेच्या लतिका चौधरी यांना ज्योती-साऊ विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित नसल्याने त्यांचा पुरस्कार ताहेरा कुरेशी यांनी स्वीकारला. प्रमुख पाहुणे व अल फताह मुस्लिम युवक संघटनेचे अध्यक्ष शकील गरगरे यांच्या हस्ते शिक्षणात विशेष प्राविण्य मिळविलेल्या 10 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
    कलीम अजीम यांनी पुरस्काराला उत्तर देताना राज्यघटनेनं दिलेल्या मूलभूत कर्तव्यावर भाष्य केलं. बदलत्या राजकीय परीप्रेक्ष्यात मुस्लिम तरुणांनी उच्च शिक्षणाचा मार्ग स्वीकारुन आपला विकास घडवावा असेही ते म्हणाले. शैक्षाणिक व सामाजिक विकासातून समाज व कुटुंबाचा विकास शक्य आहे असेही ते म्हणाले. इस्लामने दिलेली सहिष्णुतेची मूल्य जगण्याचा आधार होऊ शकतात, त्यामुळे प्रत्येक मुस्लिमांनी इस्लामची सहिष्णुतेचे तत्व पाळलं पाहिजे असंही कलीम अजीम म्हणाले. सरफराज अहमद यांनी मुस्लिमांच्या इतिहास न वाचण्याच्या पद्धतीवर प्रखर शब्दात टीका कली. आज मुसलमानांनी आपलाच इतिहास वाचला नसल्यानं जमातवादी शक्तींना संधी मिळाली आहे. मुस्लिमांची आदर्श प्रतीके नष्ट करण्याची मोहिम विरोधी गटाकडून राबविली जात आहे, त्यामुळे आपले इतिहास पुरुष आपणच जपले पाहिजेत. त्यांच्या आदर्श प्रतिमेला कसलाही धक्का लागता कामा नये, याची सर्व जबाबदारी मुस्लिम समाजावर आहे. इतिहासाचे योग्य आकलन मुसलमानांचे वर्तमान सक्षम करू शकते. खोट्या इतिहासाला वस्तुनिष्ठ इतिहास लेखनातून उत्तर देण्यासाठी मुस्लिम विचारवंत व लेखकांनी पुढे यावे असेही आवाहन सरफराज अहमद यांनी केले.
    कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेद्र पाटील-यड्रावकर यांनी मुस्लिम युवकांनी शिक्षणात विशेष प्राविण्य मिळवावे असे आवाहन केलं. शिक्षणामुळे समाजात चेतना निर्माण होऊ शकते असेही ते म्हणाले. सामाजिक सोहार्द निर्माण करण्यासाठी दोन्ही समाजातील युवकांनी महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे असेही ते म्हणाले.
    कुरुंदवाडच्या भालचंद्र थियटरमध्ये झालेल्या कार्यक्रमासाठी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्यासाठी अनेक मान्यवर पाहुणे राज्याच्या विविध भागातून कुरुंदवाडला आदल्या दिवशीच दाखल झाले होते. त्यात सातारचे मिन्हाज सय्यद, पुण्याचे समीर शेख, तासगावचे फारुख गवंडी, सांगलीचे मुनीर मुल्ला, बार्शीचे अब्दुल शेख, कोल्हापूरचे नियाज आत्तार पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे मुख्य संयोजन व संकल्पना साहील शेख यांची होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच त्यांनी पुरस्कार सोहळ्यामागची भूमिका स्पष्ट केली. परिसरात सामाजिक सौहार्द अबाधित ठेवण्यासाठी हा छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. साहिल शेख यांच्यासह कार्यक्रम यशस्वी करण्यामागे अल फताह युवक संघटनेचे सर्व पदाधिकारी यांचे सहाय्य लाभले.

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget