Halloween Costume ideas 2015

अभ्यासाची नको घाई!


राज्य शासनाने बुधवार 15 जून पासून शाळा सुरू करण्याचा अतिशय महत्वाचा निर्णय घेतला. राज्य शासनाच्या या निर्णयाचं स्वागतच करायला हवं. गेली दोन वर्षे कधी सुरू, कधी बंद असणाऱ्या शाळांमध्ये मुलांचा विशेषत: चिमुकल्यांचा किलबिलाट आता पुन्हा नव्याने, नव्या जोमाने सुरू होणार आहे. 2020-21 व 2021-22 ही दोन शैक्षणिक सत्र शिक्षण क्षेत्राच्या इतिहासात कधी नव्हे ती सुरू बंद होत राहिली. 2020-21 च्या तुलनेत मागील शैक्षणिक सत्र काहीसे दिलासादायक होते. तरी शाळांच्या पूर्ण क्षमतेनं सुरू होण्यास या शैक्षणिक सत्राची वाट पहावी लागली आहे. 

आता नव्याने 2022-23 या शैक्षणिक सत्राला सुरवात होत आहे. शाळा सुरू होणार इतक्यातच कोरोनाने पुसटशी दस्तक दिलीच. कोरोनाचा हा ओझरता स्पर्श रुग्ण वाढीच्या रूपाने सध्या जाणवू लागला आहे. मात्र राज्याच्या टास्क फोर्सने शाळा सुरू करण्याबाबत हिरवा कंदिल दाखविल्याने शाळा सुरू होण्यास सद्यातरी काही अडचण नाही. 

15 जून पासून विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू होत असल्या तरी तात्काळ अभ्यास सुरू व्हायला नको असं जाणकारांचं मत आहे. अनेक प्रयोगशील शिक्षक सुद्धा या विचाराचे समर्थक आहेत. कारण शाळेसाठी आधी मुलांची मानसिकता तयार करायला हवी. शाळेत येण्याची, वर्गात बसण्याची, शिक्षण घेण्याची, शिस्तीत वागण्याची आणि वेळापत्रकाचं, शिक्षकांच्या सूचनांचं पालन करण्याची सवय मुलांना लागायला हवी. यापूर्वी मुलांनी कधी नव्हे एवढ्या मोठ्या सुट्या अनुभवलेल्या आहेत. गेली दोन शैक्षणिक सत्र शाळा सुरू-बंद होत राहिल्याने शाळा पूर्ण वेळ, पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्यामुळे मुले काहीशी संभ्रमात होती. शाळेत कमी आणि घरीच त्यांचा जास्त वेळ गेला. पालकही मुलांना शाळेत पाठवावे किंवा कसे या दृष्ट चक्रात सापडले होते. त्यामुळे मुलांची घरी राहून काहीशी शिस्त बिघडली आहे. त्यांचं झोपण्याचं, उठण्याचं, जेवणाचं वेळापत्रक बिघडलं आहे. त्यांची शिकण्याची गती बरीचशी मंदावली आहे. वाचन आणि लेखनासोबतच त्यांच्या आकलनाच्या गतीत कमालीची घट झाली आहे. यासर्व बाबी रुळावर येण्यासाठी काही काळ लागेल. तो आम्ही त्यांना द्यायलाच हवा. त्यासाठी शाळा सुरू होताच लगेच अभ्यासाची घाई नको. परीक्षा तर नकोच नको. 

मुलांसाठी सुरू होणाऱ्या शाळा यावेळी सुखद धक्काच आहे. प्रदीर्घ काळाने शाळेत आल्यावर त्यांना मित्रांना भेटू द्यायला हवं. त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारू द्याव्यात. मनमोकळं बोलू द्यावं. मुलांना थोडं हलकं होवू द्यावं. गाणी, गप्पा आणि गोष्टींची धम्माल वर्गात होऊन जाऊ द्यावी. वर्गात व शाळेत किमान दोन आठवडे तरी गाणी, गप्पा आणि गोष्टींचा हा आनंद महोत्सव सुरू राहायला हवा. शिक्षकांनी मुलांच्या या गप्पांमध्ये सहभागी व्हायला हवं. कारण त्यांची मोठी भूमिका या नव्यानं सुरु होणाऱ्या शिक्षण प्रक्रियेत असणार आहे. गप्पात भाग न घेणाऱ्या मुलांना बोलतं करायला शिक्षकांचे जाणीवपूर्वक प्रयत्न असायला हवेत. 

शाळा सुरू होताच अभ्यासाचा घोषा मुलांमागे न लावता त्यांना पुस्तकं चाळायला, वाचायला द्या. पदार्थ बनवायची कृती सांगू द्या. प्राणी, पक्षी, वाहने, शास्त्रज्ञ, खेळाडू, संत, थोर नेते, राष्ट्रपुरुष, समाजसुधारक यांच्या विषयी बोलू द्या. चर्चा करू द्या. माहितीसह चित्रांचा संग्रह करायला सुचवा. वर्तमानपत्राची एका विषयाची माहिती देणारी कात्रण वही बनवायला सहकार्य करा. शालेय परिसरात किल्ला बनवू द्या. मातीच्या, कापडाच्या विविध वस्तू, आकार बनवू द्या. कागदापासून विविध वस्तू तयार करुन घ्या. त्यांची प्रदर्शनी लावा. पाऊस मोजू द्या. पाऊस जमिनीत जिरवू द्या. झाडं लावू द्या. गाणी गाऊ द्या. ती रेकोर्ड करून ठेवा. विविध विषयांवर माहिती लिहू द्या. ती भाषण रुपाने व्यक्त करायला सांगा. ही भाषणं रेकॉर्ड करा. वाद्य वाजवू द्या. वाद्य ऐकू द्या. संगीताचा आनंद घेवू द्या. मेहंदी काढणं, कोन बनविणं ही कामंही करु द्या. शाळेत रांगोळी घालायला सांगा. रांगोळीची वही बनवू द्या. फराळाचे व खायचे विविध पदार्थ कसे बनवितात याचं मुलांचं स्वत:चं ‘होममेड’ रेसिपी बुक तयार करु द्या.

कोविडमुळे गेले अनेक दिवस शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती बदलली आहे. यापूर्वी सुरु झालेल्या शाळांमधील मुलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात रोडावली होती. अनेक विद्यार्थ्यांना दुपारच्या सत्रात वर्गात उपस्थित राहण्याची इच्छाच होत नव्हती. तेव्हा विद्यार्थ्यांना पूर्ववत शैक्षणिक प्रवाहात आणण्याकरीता विद्यार्थ्यांना आवडेल, रुचेल, पचेल असे हलके फुलके आनंददायी उपक्रम शाळेने घ्यावेत. खेळण्या बागडण्याचा हा आनंद महोत्सव शाळांशाळांमध्ये राबविला जावा. विद्यार्थ्यांचे गट करून गटांना विद्यार्थ्यांना आवडेल अशी नावे द्या. दररोज एक इनडोअर व एक आउटडोअर उपक्रम घ्या. सुलेखन, संगीत खुर्ची, अंताक्षरी, लिंबू चमचा, एक मिनिट स्पर्धा, दोरीवरच्या उड्या, संदेश पोहचविणे, रंग भरण, पोत्याची शर्यत, बेडूक उडी, बटाटा शर्यत, कोडे ओळखा, सुई दोरा, शुभेच्छा कार्ड बनवणे, स्लो सायकलींग, अनुभव कथन, कथा कथन, कविता वाचन व गायन, धावणे, मनोरंजक प्रश्नमंजुषा, वेशभूषा, नाट्यीकरण, नकला, क्रिकेट, एक पात्री प्रयोग, फुगडी असे अनेक खेळ, स्पर्धा बाल महोत्सवातंर्गत घ्या. स्पर्धांमधील विजेत्या मुलांना बक्षिसे देऊन त्यांचा उत्साह वाढवा. गप्पात, खेळात आणि स्पर्धांमध्ये भाग न घेणाऱ्या मुलांना बोलतं करायला, सहभागी व्हायला शिक्षकांचे प्रयत्न असावेत. शिक्षकांनी असे प्रयत्न केले तर शाळेत मुले येतील. आलेली मुले पूर्ण वेळ टिकतील. त्यामुळे ते पुन्हा एकदा शिकू लागतील.

वर्गात आणि शाळेत मुलांचा हा आनंदोत्सव सुरू करण्याची, तो टिकेल असं वातावरण तयार करण्याचं काम शिक्षकांनी शाळा सुरू होताच हाती घ्यायला हवं. त्यासाठी आवश्यक ते नियोजन आणि पूर्वतयारी त्यांना करावी लागेल. 

मुलांच्या शाळेत जाण्याची तयारी पालकांनी सुध्दा करायला हवी. मुलांच्या वह्या, पुस्तके लेखन साहित्य, स्कुल बॅग, पाण्याची बाटली, शूज, सॉक्स, गणवेश या गोष्टींची तयारी तर आलीच शिवाय मुलांना शाळेसाठी वेळेवर उठण्याची, शिस्त व वेळापत्रक पाळण्याची सवय लागावी म्हणून शाळा सुरू होण्यापूर्वी चार दिवस आधी त्यांना या बाबींची जाणीव करून द्यायला हवी. शाळेत राहावं कसं? वागावं कसं? याचं प्रशिक्षण घरी द्यायला हवं. आवश्यक त्या सूचना द्यायला हव्यात. त्यांचं पालन करायला सांगायला हवं. मुलं एकदा शाळेत रूळली की मग हळूहळू त्यांना अभ्यासाकडे वळवायला हवं. मुलांना एकदाची शाळा सरावाची झाली की त्यांना स्वाध्याय, गृहकार्य, सराव व मग अभ्यासाला लावायला हवं.

- आमीन चौहान

9423409606

(लेखक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित प्रयोगशील शिक्षक आहेत.)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget