Halloween Costume ideas 2015

रमजान मनं, शरीर शुद्धीचाही महिना

prayer

गेल्या दोन महिन्यापासून काउंटडान सुरू होता तो आता संपलेला आहे. रमजानुल मुबारकचा पवित्र महिना आपल्या सगळ्यांना लाभला आहे. यानिमित्ताने आपण ईश्वराचे जितके आभार मानले तितके कमी. कारण आपण जीवंत आहोत, निरोगी आहोत, कित्येक लोक जे मागच्या रमजानमध्ये जिवंत होते हा रमजान बघू शकले नाही. (अल्लाह त्यांची मग्फिरत करो). 

आपणास माहित आहे का असा एक पाहूणा ज्याची वाट संपूर्ण जगभरातील 249 देशांतील लोक पाहतात आणि तो एकमेव असा पाहूणा की वाट पाहत असलेल्या सर्वांच्या घरी एकदाच हजर होतो? तो आहे तुमचा आमचा सगळ्यांचा लाडका रमजानुल मुबारक!

रमजानुल मुबारक हा हिजरी कॅलेंडरमधला नववा महिना आहे. त्याला मुबारक (पवित्र) का म्हणतात? तर पवित्र कुरआन हा या महिन्यात अवतरित होण्यास सुरूवात झाली. जो की समस्त मानवतेचे मार्गदर्शन करणारा ग्रंथ आहे. आणि याच महिन्यात ’शबे कद्र’ एक रात्र आहे जी हजार रात्रींपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. रमजान हा पाहूणा फक्त महिनाभर आपल्या सोबत असतो मात्र आपल्याला पूर्ण वर्षभराची ट्रेनिंग देऊन जातो.

रमजानच्या महिन्यात पहाटेपासून ते सूर्य मावळेपर्यंत अन्न, पाणी आणि कामवासना त्यागने याला ’रोजा’ म्हणतात. अरबीमध्ये याला ’सौम’ म्हणतात. हा इस्लामच्या पाच मूलतत्त्वांपैकी एक मूलतत्व आहे.

‘रोजा’चा उद्देश काय?

फक्त उपाशी राहणे हा रोजाचा हेतू नसून माणसात ईश्वराची भीती येणे जेणेकरून तो दुष्टकर्मांपासून लांब राहील व प्रत्येक वाईट गोष्ट करण्याआधी विचार करेल की अल्लाह मला बघत आहे. ही ’’इशपारायणता’’ माणसात निर्माण करणे हाच रोजाचा उद्देश आहे. नमाज (सलात) जकात, हज हे दिसणाऱ्या इबादती आहेत. मात्र रोजा हे अल्लाह आणि बंद्यालाच माहित असते, म्हणून अल्लाह म्हणतो रोजा माझ्यासाठी आहे आणि मीच त्याचा मोबदला देणार आहे. 

रोजा हा पोटाचाच नसून, डोळ्यांचा असतो. डोळ्यांनी काही वाईट बघू नये, कोणावर वाईट नजर टाकू नये, हाताचा असतो, हातांनी कोणाचे वाईट करू नये, पायांचा असतो, पायांनी कोठे वाईट मार्गाला जावू नये, तोंडाचा असतो,  तोंडानी कोणाला वाईट म्हणू नये, खोटे बोलू नये, कोणाच्या पाठीमागे किंवा समोर वाईट म्हणूच नये. कानाचा असतो, वाईट  गोष्टी ऐकू नयेत इत्यादी.

आपण पाहूणे येण्याआदी कितीतरी तयारी (पूर्व नियोजन) करतो, घर साफ ठेवणे, त्यांचे पाहूणचार कसे करायचे हे ठरविणे, कोणते खाद्यपदार्थ बनवायचे? वगैरे. सर्वकाहीचे नियोजन केले जाते. तसेच रमजान या पाहूण्यासाठी ही काही नियोजन आपल्याला करावया लागतील. खरं तर रमजानच्या आधी जो महिना येतो तो असतो ’शाबान’ चा महिना. या महिन्यापासून आपल्याला रमजानची तयारी करावी लागते. पैगंबर मुहम्मद सल्ल. हे शाबान मध्येही रोजे करत होते. बीबी आयशा (रजि.) सांगतात की, ’’आम्ही बघीतले आहे की पैगंबर मुहम्मद सल्ल. हे शाबानमध्येही रोजे ठेवत होते. दुसऱ्या महिन्यापेक्षा जास्त.  

सलमा बिन कुहेल म्हणतात की, शाबानला ’किराअतचा महिना’ कुरआन वाचण्याचा महिना म्हणतात. आमीर इब्ने कैस हे शाबानमध्ये आपले दुकान बंद ठेवून ’’किराअत ’’ करायचे.

सहसा आपण शाबान महिन्याबाबत गाफिल असतो. त्याकडे दुर्लक्ष करतो पण अबुबकर बलखी (रहे.) म्हणतात रजब महिन्याचे उदाहरण शेती लावायची, पेरणी करायची शाबानमध्ये पाणी द्यायचे आणि रमजानमध्ये तिची रास करायचे तर मग ज्याने परेणीच केली नसेल त्याला काय मिळणार? निराश नका होवू, रजब, शाबानचे महिने आपल्या हातातून गेलेत. यंदा मात्र पुढच्या रजब, शाबानमध्ये आपण भरपूर मेहनत करू अशी आशा ठेवत आणि अल्लाहकडे प्रार्थना करत की आम्हा सगळ्यांना पुढचा रजब, शाबान आणि रमजान लाभो आपण रमजानचे स्वागत करू. 

आधीचे लोक 6 महिन्या अगोदरपासून प्रार्थना करायचे.     

’’ हे अल्लाह आम्हाला रमजानपर्यंत पोहोचव’’ रमजान झाल्यानंतर 5 महिन्यांपर्यंत प्रार्थना करायचे की आम्ही केलेले चांगले कर्म स्वीकार कर.

रमजानुल मुबारकच्या पवित्र महिन्यात दाखल होत आहात तर खालील कामे जरूर करा. 

1. सर्वप्रथम आपण केलेले आतापर्यंतच्या चुकांची माफी मागा. अल्लाह अत्यंत दयाळू, कृपा करणारा आहे. तुमच्या सर्व चुकांना तो माफ करेल. अल्लाहकडे माफी तर मागायचीच सोबत कुणाला वाईट बोलले असेल तर त्यांची पण माफी मागायची, गुन्ह्यांचे ओझे घेऊन नाही तर ते त्यांच्यापासून मुक्त होवून रमजानमध्ये दाखल व्हा. 

2. आपल्याला खास प्रार्थना करावी लागणार की ह्या कोरोना महामारीपासून मानवजातीला मुक्ती दे. कोणताही त्रास रमजानमध्ये होऊ नये. शारीरिक, मानसिक, सामाजिकदृष्ट्या चांगले ठेव. 

3. आपली नियत साफ ठेवणे, नियत दुरूस्त करणे, मी जे काही चांगले कार्य करीन, उपासना करेन, रोजा हा सर्व काही फक्त अल्लाहसाठीच कोणाला दाखविण्यासाठी नव्हेच.

4. मनाच्या खुशीने व पुण्याई मिळेल या आशेने रोजे ठेवणे, खूप उन्हं आहे रोजे कसे होतील ही चिंता करायची नाही, मागील 2 वर्षांचा अनुभव आहे ना सुरूवातीला थोडेफार सहन होत नाही तर पुन्हा सवय होऊन जाते आपल्या शरीराला रिफ्रेश करणारे हे रोजे असतात. रिसर्च मध्ये हे आढळून आले आहे की, रोजामुळे शरीरात अ‍ॅटोफॅगी म्हणजे वाईट पेशी संपतात व कँसर सारख्या खतरनाक रोगापासून संरक्षण होते. 

5. मनाची स्वच्छता अतिशय मोलाची. मनात ’’इमान’’ येण्यासाठी त्याला स्वच्छ करणे गरजेचे. मनाला इर्षा, छळ, कपट, वाईट भावनांपासून स्वच्छ करणे हे घर आणि परिसर स्वच्छ करण्याइतकेच महत्त्वाचे. अब्दुल्ला इब्ने मसउद (रजि.) यांना कोणी विचारले की पैंगबरांचे अनुयायी रमजानचे स्वागत कसे करीत असत? त्यांनी उत्तर दिले कोणीही अनुयायी जेव्हा रमजानचा चंद्र पाहत होता त्याच्या मनात थोडाही द्वेष कोणाबद्दल नसायचा. आधीच्या लोकांना मान मिळाला ते जास्त नमाज, रोजामुळे नव्हे हे तर अनिवार्यच आहेत पण त्यांचे हृदय (मन) खूप सुंदर होते ते जनकल्याणाबाबत जागरूक होते. दुसऱ्यांची मदत करणे हे त्यांचे मूलमंत्र होते. साद बिन मुआझ (रजिअल्लाहु अनहु) एक अनुयायी होते. एकदा पैगंबर (सल्लम.) त्यांच्या अनुयायींसोबत बसले होते आणि म्हटले आता जो माणूस येईल त्याला स्वर्ग भेटणार, साद बिन मुआज आले. एका व्यक्तीला खूप आश्चर्य झाले. त्याला फार उत्सुकता झाली की हे असे काय करतात की ह्यांना स्वर्ग मिळणार. जेव्हा ते घरी चालले तर ती व्यक्ती सुद्धा त्यांच्या घरी गेली, 3 दिवस राहिली त्यांना विचारले मी बघायला आलो होतो तुम्ही काय चांगले काम करता, त्यांनी सांगितले माझे मन स्वच्छ आहे. मी कुणाबद्दल वाईट मनात ठेवत नाही आणि अल्लाहच्या आदेशाचे पालन करतो, फर्ज आणि नफील नमाज अदा करतो. 

6. आई-वडिलांचे आज्ञाधारक बनले पाहिजे. त्यांची सेवा करणे, त्यांना ’’उफ’’ सुद्धा न म्हणणे, आई-वडिलांची अवज्ञा करून केलेले चांगले कर्म अल्लाह स्वीकार करत नाही.

7. वेळेचे नियोजन करणे महत्त्वाचे. रमजान हे फक्त खाणेपिणे आणि झोपण्याचा महिना नसून जास्तीत जास्त ’’इबादत’’ करण्याचा महिना आहे. त्यामुळे जसे विद्यार्थी टाईम-टेबल बनवितात तसेच आपल्यालाही टाईम-टेबल बनवायचा आणि त्याप्रमाणे चालायचे आणि रमजानमध्ये यशस्वी व्हायचे आहे. 

8. जास्त वेळ सोशल मीडियामध्ये घालवू नये. बंद करणे शक्य नसेल तर थोडेसे वेळेचे नियोजन करून बघा. 

9. ह्या महिन्यात कुरआन वाचने, त्याच्यावर विचार करणे आणि त्यामधील शिकवणी आचरणात आणणे गरजेचे. फक्त वाचल्यामुळे पुण्याई मिळेल पण ज्या उद्देशासाठी कुरआन अवतरले ते साधता येणार नाही. म्हणून जास्तीत जास्त लक्ष कुरआन समजून वाचण्याकडे देणे हे महत्त्वाचे. हा एकमेव ग्रंथ आहे जो मानवाचे आयुष्य बदलू शकतो. 

10. आपले चरित्र दुरूस्त ठेवणे. तरूणाईत, आपल्याला कोणीतरी काळजी करणारा, स्तुती करणारा, प्रेम करणारा पाहिजे असतो. मग कोणाची तरी स्टाईल आवडते, कोणाचे सौंदर्य आपल्या मनाला भावते, कोणाचे स्टेटस, कोणाच्या ऐश्वर्यावर आपण प्रेम करायला लागतो किंवा कोणीतरी आपल्याला समजून घेतो म्हणून आपण प्रेमात अडकतो. प्रेम करा परंतु, परमेश्वराशी. हेच खरे प्रेम. तोच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा. बाकी सर्व प्रेम श्वासापुरते पण परमेशवराचे प्रेम हे नेहमी राहणारे. मृत्यूनंतरही कामात येणारे, आपण दररोज मृत्यूचे तांडव बघत आहोत मग प्रश्न हा मृत्यू पावलेल्या लोकांचा आत्मा कोठे जाणार? विज्ञान याचे उत्तर देऊ शकत नाही. येथे धर्म आपले मार्गदर्शन करतो की, चांगली आत्मा स्वर्गात व वाईट आत्मा नरकात जाईल. जे कोणी स्वर्गाला नाकारत असतील किंवा परमेश्वरालाच नाकारत असतील त्यांच्यासाठी एक उदाहरण आईच्या पोटात असलेल्या बाळाला आई दिसत नाही म्हणून का त्याने आईचे अस्तित्व नाकारावे? त्या बाळाला आपण पोटाबाहेरच्या जगाची कल्पना देऊ शकतो का? आणि दिली तरी तो त्याच्या बुद्धी बाहेरीलच. तशीच आपली व्यथा, ईश्वर दिसत नाही म्हणून मानायचेच नाही आणि स्वर्ग-नर्क तर आपल्याबुद्धी पलीकडील. मेलं की संपलं असं नाही, सर्व मानवजात आपसात बंधुत्वाच्या नात्याने बांधली गेलेली. त्या एक निर्मात्याच्या प्रेमात पडून आपसात प्रेम करा. कारण त्याचे हेच शिक्षण माणसाचे ऑक्सीजन. 

अनैतिक प्रेमप्रकरणातून दररोज कितीतरी आत्महत्या होतात म्हणून अल्लाहवरच प्रेम करा त्याची सर्व वचने हे खरी आहेत. त्याने मानवासाठी असा स्वर्ग बनवून ठेवला आहे की तो कोणी बघितलेला नाही, न ऐकले, न कुणाच्या मनात, विचारातही आला नाही म्हणून प्रेम फक्त अल्लाहवरच. पूर्ण जगाचा मालक तरी आपल्यावर प्रेम करायला तयार आहे. त्याचा चेहरा पाहण्यासाठी आपल्याला चांगले कर्म करायचे. कारण तो स्वर्गातल्या लोकांना दर्शन देणार.

11. जकात देणे, गोरगरीबांची काळजी करणे आपल्या राशनसोबत त्यांचेही राशन भरणे.

12. आपण पैसा गोळा करतो लग्नासाठी, घर बांधण्यासाठी वगैरे पण आधीचे लोक पैसा गोळा करायचे रमजानमध्ये गोरगरीबांची मदत करण्यासाठी.

13. शेजाऱ्यांची खबरगीरी घेणे, त्यांची मदत करणे. 

14. मोलकरणीचे ओझे हलके करणे तिची मदत करणे ही पुण्याई. घाम वाळण्या अगोदर मजुरी देणे ही पुण्याई.

15. कोणाशी चांगले बोलणे, आनंदीत होवून भेटणे हे ही पुण्याईच.

16. बी.पी. शुगरच्या रूग्णांनी डॉ्नटरांचा सल्ला घेऊन रोजे ठेवावेत. स्वर्गाची आठ दारे आहेत. त्यापैकी एका दरवाजाचे नाव अर-रिय्यान आहे. त्या दाराहून फक्त रोजा ठेवणारे लोकच स्वर्गात प्रवेश करू शकतील, आणि रमजानमध्ये एक पुण्याईचे 10, 70, 700 पर्यंत पुण्य दिले जाते. जणू काही पुण्याई करण्याचेच हे दिवस आहेत. कोठे सेल लागल्यास आपण कसा त्वरा करतो तसेच आपल्याला त्वरा करायची आहे. अर-रिय्यान मधून प्रवेश करण्यासाठी अल्लाह सर्वांना सदबुद्धी देवो आणि सत्कर्मांना स्वीकार करो. (आमीन.)


डॉ. सीमीन शहापूरे 

8788327935


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget