Halloween Costume ideas 2015
September 2018

कुरआनच्या आदेशाचा सारांश असा की, वाचा, शिका त्या परमेश्वराच्या नावाने ज्याने ज्ञान दिले, माहीत नसलेले, लेखणीच्या द्वारे. शिक्षण ही जन्मापासून मृत्यूपर्यंत निरंतर चालणारी  प्रक्रिया आहे. ती कधीच थांबत नसते आणि ही विकासात्मक प्रक्रिया असते. ही जीवनाच्या सर्वच क्षेत्रात घडत असते, परिवर्तनशील आणि गतिशील असते.
पैगम्बर हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांच्या काळातील हदीस आहे की, ज्ञान प्राप्त करायचे असेल तर चीन ला देखील जा. पैगरबर (स.अ.स.) यांच्या काळात मक्का हे तत्कालीन  आंतर्राष्ट्रीय व्यापाराचे केंद्र होते. या बाजारपेठेत विविध देशाचे जीन्नस, कपडे, भांडी, विविध यंत्रे व नवसंशोधित बाबींची माहिती व वस्तू येत असत. कुरआन आणि पैगरबर (सल्ल)  यांच्या मार्गदर्शनाचे केंद्र चिंतन आहे. चिंतन हा मानवाच्या अंगी असलेला ईेशरदत्त आणि शक्तिशाली गुणधर्म आहे. यालाच चेतना माणून ही प्रत्येक समयी क्रीयाशील ठेवण्याचे  संशोधनात्मत आवाहन वारंवार कुरआन करीत असतो. आणि त्याच अनुषंगाणे पैगरबर सल्ल. यांनी नविन ज्ञान प्राप्त करायचे असेल तर चीन पर्यन्त जाण्याची आज्ञा केलेली आहे.  मक्का शहराच्या बाजारात चीन निर्मीत विविध वस्तू जिन्नस येत असते. त्यांच्या उत्पादनाचे ज्ञान चीनमधे होते. तेव्हा ते प्राप्त करण्यासाठी मुस्लिमांनी चीनला देखील जायला पाहिजे,  हा स्पष्ट संदेश होता.
याचा दुसरा अर्थ अगदी स्पष्ट आहे की, इस्लाम, कुरआन आणि पैगरबरांच्या शिक्षणात आध्यात्मिक शिक्षणाएवढेच भौतिक शिक्षणही महत्वाचे, आवश्यक व त्यासाठी कुठेही जाण्याची,  खर्च व त्याग करण्याची दिशा स्पष्ट आहे! इस्लाम, कुरआन यांचा शिक्षणाकडे पाहन्याचा दृष्टिकोण हा वास्तविक जगताच्या समाज विकास व भौतिक विकासाच्या संदर्भात देखील स्पष्ट  आहे.मानवाच्या, समाजाच्या विकासासाठी ज्ञानाकडे, शिक्षणाकडे इस्लाम निरपेक्ष (म्हटल्यास धमनिर्पेक्षपने!) दृष्टीने पहात असतो.
खलीफांच्या काळात व अनेक सुलतान,बादशाह यांच्या काळात (७ वे शतक ते १७ व्या शतकापर्यंत) मोठाल्या विद्यापीठांचि निर्मिति, विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहांची निर्मीती, संशोधनाना  दिलेले उत्तेजन, आणि विशेष म्हणजे, अरब पंडितानी विविध भाषेतील ग्रन्थांचे केलेले भाषांतरण अत्यंत महत्वाचे व इस्लामच्या वैश्विक शैक्षणिक दृष्टिकोणाचे मार्गदर्शक आहेत.  इजिप्त आणि यूनान च्या तत्वज्ञानांचे, राज्यशास्त्र ते अर्थशास्त्र, खगोलशास्त्र, गणीत, वैद्यकशास्त्र, तर्कशास्त्र आणि विविध क्षेत्रातील वैज्ञानिकांचे केलेले संशोधन, त्यांच्या ग्रंथांचे विश्लेषण, भाषांतरण यावर मुस्लिम पंडितांनी केलेले श्रम त्यांच्या ज्ञान प्राप्तिच्या सन्दर्भातील तृष्णेचि ग्वाही देणारे आहे! कुरआन व पैगम्बर प्रणीत निरिक्षण करा, शोध घ्या, विचार  करा, निसर्गात दडलेल्या घटनांचे कार्यकारण भाव शोधा ईत्यादी मार्गदशन ज्ञानाच्या क्षेत्राच्या व्याप्तिला समजून घेण्यासाठीच आहे.
ज्ञान हे बंदिस्त, साचेबंद व स्तिथिवादी कधीच नसते! म्हणून ते नीट समजून घेण्यासाठी कुरआन दोन प्रकारच्या ज्ञान प्रवाहांचा मार्ग स्पष्ट करतो. एक प्रवाह ज्ञान प्रवाह तो, जो  प्रेषित, ईश्दूत यांच्या मार्फत दिल्या जातो! यात अध्यात्म, ईेशरीय रचना, प्रेरणा आदींचा समावेश असतो.
दुसऱ्या प्रकारात ज्ञान हे निसर्गात अस्तीत्वात आहेच! त्याचा शोध स्वतःच्या प्रज्ञेनें घ्यायचा असतो. यासाठी प्रत्यक्ष निरिक्षण, संशोधन, विश्लेषण व तर्क-परीक्षण या द्वारे ज्ञान प्राप्त करून घेण्याचे मार्गदर्शन आहे. यालाच वैज्ञानिक ज्ञान प्राप्तिचा मार्ग, असे इस्लामिक संशोधनांचे तत्वज्ञान आहे.
हे सर्व असतानांही, विशेष करून भारतीय मुस्लिमांत आणि महाराष्ट्रातील मुस्लीमात शिक्षणाचे प्रमाण अत्यंत अल्प म्हणजे वर्तमानातील ६ टक्केच शिक्षित आहेत! मुसलमांनातील  आर्थिक- समाजिक दुर्बलतेच्या अनेक कारकांपैकी हे महत्वाचे कारण आहे. मुस्लिमानातील पारंपारिक निरक्षरतेचे कारण इस्लामपूर्व शिक्षाणापासून वंचित करणाऱ्या ब्राम्हणी वर्ण-जात  व्यवस्थेत आहेत. परंतू सध्या हा विषय बाजुला ठेऊन, दुसऱ्या कारणांची मीमांसा अत्यंत आवश्यक आहे. मध्ययुगाच्या अंतापर्यंत जगात आद्योगिक व वैज्ञानिक क्रांतिने उचल खाल्लेली  होती. उत्पादन साधने तांत्रिक, आधुनिक बाजारपेठ, विपणन व्यवस्थेतील बदल, यासह वेगाने बदलत असलेले आर्थिक, सामाजीक व राजकीय व्यवस्थेतील बदल वेगाने घडत होते. या  बदलांच्या मुळाशी होते. मानवाला प्राप्त होत असलेले ज्ञान. त्याने संशोधन, प्रयोग, विज्ञानाच्या सहाय्याने लावलेले नवे शोध व नवे तंत्र व यंत्र. याबाबतचे त्याने लिपीबद्ध केलेले, ग्रंथांच्या स्वरूपात लिहिलेले फार्मुले, आणि पुढच्या ज्ञानासाठी सुचविलेला आणि प्रशस्त केलेले मार्ग. या ज्ञानाच्या विस्ताराने पारम्पारीक ज्ञान देणाऱ्या संस्था यांचे पारम्पारिक ज्ञान व  पद्धति ही कालबाह्य ठरू लागली. नव्या शाळा, कॉलेजेस, शिक्षण संस्था स्थापन व्हायला लागल्या. ज्ञानाच्या भाषा संशोधकांच्या व देश निहाय भाषांच्या माध्यमातून देण्याची व्यवस्था निर्माण व्हायला लागली.
ज्या मुस्लिम देशांनी हे वास्तव ओळखले आणि ज्ञानाच्या बाबतीत खऱ्या इस्लामिक मार्गदर्शनाचे वास्तव समजून घेतले, त्या-त्या देशांनी आपआपल्या शैक्षणिक व्यवस्थेत अमूलाग्र बदल घडवून आणला. कुराणाची भाषा अरबी, म्हणून कुरआन समजून घेण्यासाठी या भाषेसोबत स्थानिक भाषांचा वापर हा ९ व्या, १० व्या शतकापासूनच या देशांनी चालू केला  (भारतात याला १८ वे शतक यावे लागले) मात्र, वास्तविक भौतिक ज्ञानासाठी इंग्रजी, भाषा व तत्सम ज्ञान देणारी भाषा शैक्षणिक म्हणून वापरली व जगातील ज्ञान, तंत्रज्ञान, व समस्त  स्पर्धेत अस्तित्वात राहिले! इजिप्त, तुर्कस्तान, ईरान, सीरिया, लेबनान असे असंख्य देश उदाहरणादाखल घेता येतील.
भारतातही इंग्रज राज्यानंतर शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल घडत होते! या बदलात किमान त्याही काळी सुशिक्षित असलेला मुस्लिम (उर्दू भाषिक) वर्ग (मुस्लिमातील २० टक्के होता)  हा या स्पर्धेत तिकला पाहिजे म्हणून सर सय्यद अहमद, मौलाना आजाद, तुफेल अहमद मंगलोरी, मौलाना हसरत मोहानी यानी इंग्रजी शिक्षणाची कास धरण्याची, शिक्षणासाठी स्थापन  होत असलेल्या  मुस्लिमेतर शिक्षण संस्थांमधे शिक्षण घेण्याचे मार्गदर्शन, तांत्रिक शिक्षण घेण्याचे मार्गदर्शन करितच होते.
भारतीय मुस्लिमातील ८० टक्के समाज हा श्रम संस्कृतीतून आला असल्याने परम्परागत व्यवसायात जीवन जगणे व आपल्या धर्माचे पालन करणे एवढेच त्याच्या आवाक्यात होते!  म्हणून स्वातंत्र्यानंतरही भारतातील मुस्लिमांच्यां ७० ते ७५ टक्के अशिक्षित असण्याचे कारण सहज लक्षात येते. 
दूसरीकडे कुरआन स्पष्ट सांगत आहे की, ज्ञान घेणे मुस्लिमांसाठी फर्ज आहे, व हे सांगणारे आलीम, मौलाना साहेब कितीही घसा ओरडून सांगते झाले तरीही, शिक्षण घ्यायला व  द्यायला एका व्यवस्थेची गरज असते. शिक्षण संस्थेसह, वास्तुसह, मोठ्या नियोजनाची आणि आर्थिक व्यवस्थेची गरज असते. ही जबाबदारी दोन स्तरावर असते. एक तर सरकारने ही व्यवस्था पूरवायची असते. कारण हा समूह नागरिकांचा असतो व मतदान करून सरकार निवडून देत असतो.
दुसरे, भारताच्या संविधानाने असली व्यवस्था प्रत्येक समाजाला दिलेली आहे की त्यांनी आपल्या समाजाच्या शिक्षणाच्या सोयी स्वतः उभाराव्यात. ही जबाबदारी त्या त्या समाजातील  उच्चवर्ग, साधन सम्पन्न वर्ग, जागरूक वर्गाची, सत्ताधारी वर्गाची असते. आज महाराष्ट्रात मराठा, जैन, मारवाड़ी, कुनबी, माळी आणि इतर समाजाच्या अनेक शैक्षणिक संस्था भौतिक  ज्ञान व स्पर्धेच्या युगात आपल्या समाज समुहांच्या अस्तित्व व सहभागासाठी उभ्या टाकलेल्या आहेत. या स्तरावर मुस्लिम समाजाचा विचार केला असता काही मोजक्या, अपवादात्मक  कॉलेज, शाळा सोडल्या तर दुःखदायक स्थिती आहे. मुस्लिमातील वरिष्ठ वर्गीय समाजाकडे भरपूर पैसा आहे. अफाट जमीनी आहेत. पण नाइलाजाने म्हणावे लागते, कुरआनने दिलेले  आदेश की ज्ञान प्राप्त करा, जे दिलेत लेखनीच्या माध्यमातून हे वास्तवात उतरविण्यासाठी कॉलेजेस, हॉस्टेल्स, शाळा, ग्रंथालय स्थापन करण्याची चळवळ उभारण्यासाठी दृष्टी नाही.  मोहल्ल्यातील शाळा बंद झाली, मात्र त्याच मोहल्ल्यात ४ मस्जिदी लोकवर्गनितून उभ्या झाल्याचे चित्र आहे. विचार करा, या मस्जिदीसोबत भौतिक-अभौतिक ज्ञान देणाऱ्या शाळा उभ्या  राहिल्यात तर, जगाचा विज्ञानाचा इतिहास लिहीणारा जॉर्ज सरटोंन आणि रॉबोर्ट ब्रिफोल्ट म्हणतात त्या प्रमाणे कुरआनच्या मार्गदर्शनाने ७ व्या शतकातील अंधकार युगात विज्ञानाची  प्रकाशमय दारे उघडली हे सत्य आजच्या युगात वास्तवतेत आणता येईल.

- हाजी प्रा.जावेद पाशा कुरेशी
9422154223

पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘तुम्हांपैकी सर्वोत्तम माणूस तो आहे जो आपल्या कुटुंबियांशी सर्वोत्तम वर्तन करीत असावा. आपल्या कुटुंबियांशी सद्वर्तन करण्यात मी तुम्हा सर्वांत  अग्रेसर आहे. (कुटुंबियांपैकी) एखाद्याला मृत्यू आला तर त्याच्या दुर्गुणांची चर्चा कदापि करू नका.’’ (तिर्मिजी)

निरुपण- कुटुंब समाजाचा एक घटक आहे. उपरोक्त हदीसमध्ये आदर्श कुटुंबाचे विवरण आहे. पैगंबरांनी जो माणूस आपली पत्नी, मुलेबाळे आणि इतर नातेवाईकांशी सद्वर्तन करतो,  त्याला सर्वोत्तम माणूस संबोधले आहे. माणसाच्या चारित्र्यसंपन्नतेची कसोटी त्याचे आपल्या घरातील वर्तन आहे. घराबाहेर अर्थात समाजात चांगले वाकायचे पण घरात मात्र उलट  वागायचे, ही चारित्र्यसंपन्नता नव्हे! मातापित्यांशी, बायकोशी, मुलाबाळांशी, भावाबहिणींशी अर्थात सर्वच नातलगांशी सद्वर्तन करीत असेल तो सर्वोत्तम माणूस आहे, असा पैगंबरांचा  संकेत आहे.
पत्नीशी सद्वर्तन करणे म्हणजे तिची हमदर्दी करणे, तिच्यावर प्रेम करणे, तिच्या भावनांचा आदर करणे, तिला न दुखावणे, शिवीकाळ न करणे, तिच्या क्षमतेपेक्षा अधिक जबाबदारी  तिच्यावर न टाकणे, तिच्या रास्त इच्छाआकांक्षांना पूर्ण करणे इ. आहे. कारण लग्नानंतर ती आपले मातापिता, घरदार सोडून पतीच्या घरी येते व नवजीवनाची सुरूवात करते. अशा  वेळी तिला पतीच्या प्रेम आणि सद्वर्तनाची, आपुलकीची नितांत गरज असते. आजारपणात तिची सेवा करणे, घरकामांत तिला सहकार्य करणे, इ. म्हणजे तिच्याशी सद्वर्तन करणे  होय.
घरात मुलाबाळांशी सद्वर्तन करणेसुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या शिक्षणाची, सुसंस्कारांची व चांगल्या संगोबनाची काळजी घेणे म्हणजेच त्यांच्याशी सद्वर्तन होय. घरातील इतर  नातेवाईकांशी सद्वर्तन करण्याने अभिप्रेत त्यांच्याशी आदरसन्मानाने वागणे, त्यांची सेवा करणे, त्यांच्या चूकभुलींकडे दुर्लक्ष करणे आणि त्यांच्या हितासाठी व उत्कर्षासाठी प्रयत्न करणे  होय.
‘‘मी आपल्या कुटुंबियांशी सद्वर्तनामध्ये तुम्हां सर्वांत अग्रेसर आहे.’’ हे एक वास्तव आहे. पैगंबरांसारख्या श्रेष्ठतम चारित्र्यसंपन्न व परिपूर्ण व्यक्तिमत्त्वाला इतिहासात जोड नाही!  त्यांच्या उदात्त चारित्र्याची साक्ष त्यांच्या हाडाच्या वैऱ्यांनीही दिली आहे.
‘‘ज्याला कालपरवापर्यंत पत्थर फेकून मारीत होते, त्याला ठार करण्यासाठी जंग जंग पछाडीत होते, त्यानेच नऊ-दहा वर्षांच्या अवधीत आपल्या लोकांना नैतिक अध:पतनाच्या दरीतून  पावित्र्य व न्याय यांच्या शिखरावर नेऊन बसविले. प्रणाम! सहृदय प्रणाम त्या महापुरुषाला!’’ पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याबद्दल साने गुरुजींचे हे खूप बोलके आहेत. ‘‘तुमच्या कुटुंबियांपैकी कुणाला मृत्यू आला तर त्याच्या दुर्गुणांची चर्चा करू नका.’’ याचा अर्थ हा आहे की ज्याने इहलोकाचा निरोप घेतला आहे त्याची निंदानालस्ती करू नका. किती महान  उपदेश आहे हा! जित्यापणी तर त्यांच्याशी सद्वर्तन कराच, पण त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याशी चांगलेच वागा, त्यांच्या चागल्या गुणांचीच चर्चा करा, वाईट कुणांची नको! असे उदात्त  चारित्र्य ज्या माणसाचे असेल, तो सर्वोत्तम माणूस होय! यात शंका ती कसली?
 

- संकलन : डॉ. सय्यद रफीक

(१३७) तुमच्यापूर्वी अनेक कालखंड होऊन गेली आहेत. पृथ्वीवर फेरफटका मारून पाहा त्या लोकांचा शेवट कसा झाला ज्यांनी (अल्लाहच्या आज्ञा व आदेशांना) खोटे लेखले.
(१३८) ही लोकांसाठी एक स्पष्ट व उघड चेतावणी आहे आणि जे अल्लाहचे भय बाळगतात त्यांच्याकरिता मार्गदर्शन व उपदेश.
(१३९) वैफल्यग्रस्त होऊ नका, दु:खी होऊ नका, तुम्हीच प्रभावी ठराल जर तुम्ही ईमानधारक असाल.
(१४०) यावेळी जरी तुम्हाला आघात पोहचला आहे तरी यापूर्वी असाच आघात तुमच्या विरोधकांनादेखील पोहचला आहे.१०० हे तर कालचक्र आहे ज्याला आम्ही लोकांदरम्यान भ्रमण  करवीत असतो, तुमच्यावर ही वेळ अशासाठी आणली गेली की अल्लाह हे पाहू इच्छित होता की तुमच्यात खरे ईमानधारक कोण आहेत, आणि त्या लोकांना वेगळे करू इच्छित होता  जे खरोखर (रास्त मार्गाचे) साक्षीदार आहेत.१०१ कारण अत्याचारी लोक अल्लाहला अप्रिय आहेत –
(१४१) आणि तो या परीक्षेद्वारे ईमानधारकांना वेगळे करून नाकारणाऱ्या (शत्रूंना) वठणीवर आणू इच्छित होता.
(१४२) तुम्ही अशी समजूत करून घेतली आहे काय की सहजपणे स्वर्गामध्ये दाखल व्हाल. वास्तविक पाहता अल्लाहने अद्याप हे पाहिलेलेच नाही की तुम्हापैकी ते कोण लोक आहेत जे  त्याच्या मार्गात प्राण पणाला लावणारे आणि त्याच्यासाठी संयम बाळगणारे आहेत.
(१४३) तुम्ही तर मृत्यूची इच्छा करीत होता! पण ही त्यावेळेची गोष्ट होती जेव्हा मृत्यू समोर आलेला नव्हता, तर घ्या, तो तुमच्यासमोर आलेला आहे आणि तुम्ही त्याला डोळ्याने  पाहिले.१०२
(१४४) मुहम्मद (स.) याशिवाय काही नाहीत की ते केवळ एक पैगंबर आहेत, त्यांच्यापूर्वी इतर पैगंबरदेखील होऊन गेले आहेत, मग काय जर ते मरण पावले अथवा त्याना ठार केले  गेले तर तुम्ही लोक मागच्या पावली परताल?१०३ लक्षात ठेवा! जो परत फिरेल तो अल्लाहचे काहीही नुकसान करणार नाही, परंतु जे अल्लाहचे कृतज्ञ दास बनून राहतील तो त्यांना  त्याचा मोबदला देईल.
(१४५) कोणीही सजीव अल्लाहच्या आज्ञेशिवाय मरू शकत नाही. मृत्यूची घटका तर लिहिली गेली आहे.१०४ जो कोणी ऐहिक लाभाच्या (सवाब) इराद्याने कार्य करील त्याला आम्ही  इहलोकातच देऊ.


९९) व्याज खोरी ज्या समाजात अस्तित्वात असते त्या समाजात दोन प्रकारचे नैतिक रोग निर्माण होतात. व्याज घेणाऱ्यामध्ये लालसा, कंजूषी आणि स्वार्थीपणा आणि व्याज देणाऱ्यात  द्वेष, तिरस्कार, राग निर्माण होतात. उहुद युद्धातील पराजयात या दोन्ही प्रकारच्या रोगांचा वाटा होता. अल्लाह मुस्लिमांना दाखवून देत आहे की व्याजखोरीमुळे दोन्ही पक्षांत (व्याज  घेणारा आणि व्याज देणारा) जे नैतिक अवगुण निर्माण होतात त्यांच्या अगदी विरुद्ध वेगळेच सद्गुण ईशमार्गात खर्च केल्याने माणसात निर्माण होतात, आणि अल्लाहची क्षमा आणि  स्वर्गप्राप्ती याच दुसऱ्या गुणांनी प्राप्त् होऊ शकते ना की पहिल्या प्रकारच्या अवगणुनांनी मुळीच नाही. (तपशीलासाठी पाहा, सूरह - २ टीप ३२०)
१००) संकेत आहे बदर युद्धाकडे. सांगण्याचा अर्थ आहे की बदरच्या युद्धात पराजित होऊनही शत्रू खचले नाहीत तर मग उहुदच्या युद्धात पराजित होऊन तुम्ही दु:खी का होत आहात.
१०१) या आयतीत मूळ अरबी वाक्य ``यत्तखिज मिन कुम शुहदाअ'' प्रयोग झाला आहे. त्याचा एक अर्थ आहे ``तुमच्यातून काही `शहीद' होऊ इच्छित होते'' म्हणजेच काहींना अल्लाह  `शहादत' (हुतात्मा) चा सन्मान प्रदान करु इच्छित होता आणि दुसरा अर्थ आहे की मुस्लिम आणि दांभिकांच्या या एकत्रित समूहातून त्या लोकांना वेगळे करू इच्छित होता जे  वास्तविकपणे `शुहदा अलन्नास' (लोकांवर साक्षी) आहेत. अर्थात या प्रतिष्ठित पदासाठी योग्य आहेत ज्यावर आम्ही मुस्लिमांना आसनस्थ केले आहे.
१०२) संकेत आहे शहीद होऊ इच्छिणाऱ्या लोकांकडे ज्यांच्या आग्रहा खातर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मदीना शहराच्या बाहेर जाऊन युद्ध करण्याचा निर्णय घेतला होता.
१०३) जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) शहीद झाल्याची अफवा पसरली तेव्हा बहुतांश सहाबा (रजि.) आपले साहस गमावून बसले. या स्थितीत दांभिकांनी (जे मुस्लिमांसोबतच होते) सांगणे  सुरु केले की चला अब्दुल्लाह बिन उबई जवळ जाऊ या जेणेकरून त्याने आम्हाला अबू सुफियानच्या आश्रय मिळवून द्यावा. काहीनी (दांभिकांनी) तर असेही म्हटले की मुहम्मद (स.) अल्लाहचे पैगंबर असते तर त्यांची हत्या कशी झाली असती? चला आता पूर्वाश्रमीच्या धर्माकडे परत फिरू या. याच गोष्टींच्या उत्तरात अल्लाहने सांगितले की तुमची सत्यवादिता केवळ  मुहम्मद (स.) यांच्या व्यक्तित्वाशीच संबंधित असेल आणि तुमचा इस्लाम अशा तकलादु पायावर उभा असेल की पैगंबर मुहम्मद (स.) यांचे महानिर्वाण होताच तुम्ही त्याच अधर्माकडे  (अनेकेश्वरत्वाकडे) फिरून जाल ज्यातून आला होता, तर अल्लाहच्या दीनधर्माला (ईशप्रदत्त जीवनप्रणालीला) तुमची काहीएक गरज नाही.
१०४) यावरून हे मुस्लिमांच्या मनात रूजविणे आहे की मृत्यूच्या भीतीने तुमचे पळणे बेकार आहे. कोणीही अल्लाहने निर्धारित केलेल्या वेळेपूर्वी मरू शकत नाही आणि त्या नंतर  जगूसुद्धा शकत नाही; म्हणून तुम्हाला चिंता मृत्यूपासून वाचण्याची नव्हे तर या गोष्टीची हवी की जी निर्धारित वेळ तुम्हाला प्राप्त् आहे त्यात तुमच्या धावपळीचा उद्देश काय आहे. हे जग की परलोक?

आगामी लोकसभेच्या निवडणुका जवळ येऊ लागताच भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रप्रेम (भलेही स्वातंत्र्यलढ्यात सक्रीय सहभाग नसला तरी), हिंदुत्व (राष्ट्रीयतेची  व्याख्या बदलून राजकीय पोळी भाजण्यासाठी), बाबरी मस्जिद (राम मंदिराची निर्मितीचा वाद नेहमीप्रमाणे), मुस्लिम प्रेम (मग त्यांना निवडणुकीत एकही तिकीट द्यायचे नसेना!)  इत्यादी अगदी उफाळून येते. एकदा का निवडणुका जिंकल्या की मग गोरक्षकांचा धिंगाणा, राष्ट्रभक्तीचा मुखवटा, मॉब लिंचिंग, लव्ह जिहाद, मुस्लिम द्वेष, संविधानाचा अवमान, अशा  प्रकारचे मुद्दे उपस्थित करून देशातील असामाजिक तत्त्वांच्या कारवायांना खतपाणी घालण्याचे काम तथाकथित राष्ट्रप्रेमी लोक करताना आढळतात.
कदाचित आगामी निवडणुकांवर डोळा ठेवून मुस्लिम प्रेम जागृत झालेले रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत दिल्ली येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'भविष्यातील भारत' या  विषयावरील दुसऱ्या दिवशीच्या सत्रात गेल्या मंगळवारी म्हणाले की हिंदू राष्ट्र म्हणजे तेथे मुस्लिमांसाठी जागाच नसेल असे नव्हे. हिंदू राष्ट्र ही सर्व धर्मसमावेशक संकल्पना आहे. संघ  जागतिक बंधुभावाच्या संकल्पनेसाठी कार्यरत आहे आणि या बंधुभावाच्या संकल्पनेत विविधतेतून एकता अभिप्रेत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्वज्ञान हे प्रत्येकाला सोबत घेऊन जाते. हिंदू राष्ट्र म्हणजे तेथे मुस्लिमांना स्थानच नाही असे नाही. ज्या दिवशी असे म्हटले जाईल त्या दिवशी हिंदुत्व संपेल. हिंदुत्व वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेबद्दल बोलतो. तर  लगेच दुसऱ्या दिवशी केंद्रातील भाजप सरकारने तीन तलाकबाबत राज्यसभेत प्रलंबित बिलावर अध्यादेश जारी करून मुस्लिम समाजाला आश्चर्यचकित केले. यामागचे पक्षाचे धोरण  असे की यामुळे मुस्लिम महिलांचे सशक्तीकरणाचा मुद्दा उपस्थित करून मुस्लिमांची मते आपल्याकडे वळतील. मात्र त्याचा विपरित परिणाम होण्याचीच शक्यता जास्त आहे. या अध्यादेशामुळे तिहेरी तलाक आता गुन्हा ठरणार आहे. लोकसभेत मंजूर झालेल्या या बिलामध्ये थोड्याफार प्रमाणात बदल करून या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रीमंडळाने बुधवारी मंजुरी  दिली. हा अध्यादेश सहा महिन्यांपर्यंत लागू असेल. या सहा महिन्यांत सरकारला संसदेत विधेयक मंजूर करावे लागेल. यासाठी सरकारला संसदेच्या हिवाळी अधिवेशनातच हे विधेयक  मंजूर करावे लागेल. यानुसार, तीन तलाक अजामीनपात्र गुन्हाच राहील. परंतु, मॅजिस्ट्रेट आरोपीला जामीन मंजूर करू शकतील. या विधेयकाच्या तरतूदींनुसार, पती पत्नीला भरपाई देण्याच्या मुद्यावर सहमत असेल तेव्हा मॅजिस्ट्रेट जामीन मंजूर करण्याचा किंवा न करण्याचा निर्णय घेतील. भरपाईची रक्कम मॅजिस्ट्रेट ठरवतील. मॅजिस्ट्रेट पती-पत्नीमधील वाद  मिटवण्यासाठी आपले अधिकार वापरू शकतील. तसेच, पीडित महिलेच्या नातेवाईकांनाही तक्रार दाखल करण्याचा हक्क असेल. तीन वर्षांच्या शिक्षेत बदल केला जाणार नाही, अशा  काही तरतूदी यात निश्चित करण्यात आल्या आहेत.
एकीकडे भाजपशी सामना करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सॉफ्ट हिंदुत्वाचा मार्ग अवलंबतात तर दुसरीकडे मुस्लिमांपासून दूर पळणारी भाजप आता त्यांची गळाभेट घ्यायला उत्सुक आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी मुहर्रमच्या मातममध्ये सहभागी होतात तर रा. स्व. संघाचे मुस्लिम प्रेम ऊतू जाऊ लागले आहे. खरे तर संघाद्वारे हिंदू राष्ट्र उभारणीच्या मनसुब्यासह मुस्लिम  तुष्टीकरण, धर्मांतर, गोहत्या, समान नागरी कायदा यासारखे धार्मिक मुद्दे वेळोवेळी उपस्थित करण्यात आले आहेत. त्याच संघाचे प्रमुख भागवत आता मुस्लिमांबरोबर बंधुत्वाची भाषा  बोलू लागले आहेत. एकंदरित हा भागवतांचा पॉलिटिकल स्टंट असल्याचेच दिसून येते. उदारवादी हिंदू समाज विकासाच्या मुद्द्यावर भाजपच्या जवळ आला होता तो आता लिंचिंग आणि  हिंसक घटनांमुळे दूर जाऊ लागला आहे. त्याला पुन्हा जवळ करण्यासाठी अशा प्रकारच्या क्ऌप्त्या करण्यात येत आहेत. संघाची विचारधारा बदलायची असेल तर सर्वप्रथम त्यांनी  स्वत:पासून सुरूवात करावी. हिंदू नसलेल्या भारतीयांना राष्ट्रावादापासून अलिप्त ठेवणाऱ्या सावरकरांच्या हिंदुत्वाच्या सिद्धान्ताला तिलांजली द्यावी लागेल. लव्ह जिहाद, घरवापसी आणि  गोहत्येच्या नावाने होत असलेल्या मॉब लिंचिंगविरोधात देशव्यापी आंदोलन उभारावे आणि आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करावेत.
भागवतांनी यापूर्वी मुस्लिमविरोधी अनेक वक्तव्ये केलेली आपणास आढळून येतील. बाबरी मस्जिदीच्या जागी फक्त राम मंदिरच उभारले जाईल. हे प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात  प्रलंबित असतानाही त्यांनी असे वक्तव्य केले होते. संघ व भाजपचे हे मुस्लिम निश्चितच २०१९मधील लोकसभा निवडणुकीशी संलग्न आहे. मुस्लिम समाजातील एका विशिष्ट गटाला  आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न आता भाजपने चालविला आहे. सीएसडीएसच्या अहवालानुसार २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत १० टक्के मुस्लिमांनी भाजपला मतदान केले होते. २०१७ सालच्या उत्तर प्रदेशातील निवडणुकीत हा आकडा जवळपास १२ टक्क्यांवर पोहोचला. त्यामुळे आता २०१९ मध्ये मुस्लिम मतांच्या मोठ्या गटाची जवळीक साधण्याचा  प्रयत्न सुरू आहे. संघाचा सर्वसमावेशक मुखवटा फक्त येत्या लोकसभा निवडणुकीपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. एकदा का निवडणुका जिंकल्या की मग संविधान, हिंदू राष्ट्र,  समान नागरी कायदा इत्यादी वादग्रस्त मुद्दे आपोआपच मार्गी लावण्याचा मनसुबा संघाचा असेल.

-शाहजहान मगदुम
(मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@eshodhan.com)

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी तीन वेळा उच्चारले, ‘‘तो भयंकर अपमानित आणि तिरस्कृत झाला.’’ लोकांनी विचारले, ‘‘कोण?’’ पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘ज्याला वृद्ध माता-पिता दोघांपैकी  एक अथवा दोघेही लाभले आणि तरीही तो स्वर्गाला मुकला.’’ (मुस्लिम)

निरुपण-
अल्लाहनंतर मनाणसावर सर्वाधिक हक्क कुणाचे असतील तर ते माता-पित्यांचे आहेत. माता-पिता वृद्धावस्थेत जर कोणाला लाभले तर ही अल्लाहची महान कृपा आहे. हे मोठे भाग्य  आहे. असा माणूस सहजपणे स्वर्गात आपले ठिकाण ‘रिझर्व्ह’ करू शकतो. अर्थात वृद्ध माता-पित्यांची सेवा करून.

पैगंबर मुहम्मद (स.) एकदा म्हणाले, ‘‘माता-पित्यांना एका प्रेमाच्या नजरेने पाहणे एक सार्थक हज करण्यासमान आहे.’’ त्यावर कोणी विचारले, ‘‘मग जर मी दिवसातून शंभर वेळा  त्यांना प्रेमाने पाहिले तर?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘तर तुला शंभर हजचे पुण्य लाभेल. अल्लाहच्या खजिन्यात कसलीच कमतरता नाही.’’

माता-पित्यांच्या थोरवीसंबंधी अशा आशयाचे अनेक उपदेश पैगंबरांच्या वाङ्मयात उपलब्ध आहेत. तात्पर्य हे आहे की वृद्धावस्थेत माता-पिता लाभणे आणि आपल्या हातून त्यांची सेवा  घडणे यासारखे भाग्य दुसरे नाही. असा माणूस निश्चितच ऐहिक जीवनातही सुखी-समाधानी व यशस्वी आहे आणि मरणोत्तर जीवनात तर त्याच्यासाठी यशाची अर्थात स्वर्गाची हमी  आहे. वृद्ध माता-पित्यांच्या स्वरूपात शाश्वत वर्ग प्राप्त करण्याची चालून आलेली एवढी सुवर्णसंधी जो दवडील व माता-पित्याकडे दुर्लक्ष करून त्यांना झिडकारून वृद्धाश्रमाची वाट दाखवील  अशा नीच माणसाविषयी काय बोलावे?
उपरोक्त उपदेशामध्ये पैगंबर अशा अभाग्यांना जणू शाप देत आहेत. पैगंबर (स.) म्हणतात, ‘‘तो अपमानित झाला! तिरस्कृत झाला!’’ अर्थात त्याचे वाटोळे झाले! आणि एकदा नव्हे  दोनदा नव्हे तर तीन वेळा पैगंबरांनी या शापाचा उल्लेख केला. यासाठी की लोकांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी. लोकांनी चिंतेने विचारल्यावर पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘तो ज्याला माता- पित्यांपैकी एक अथवा दोघेही वृद्धावस्थेत लाभले, मात्र तरीसुद्धा तो स्वर्गाला, जन्नतला मुकला.’’
चंगळवादाच्या विळख्यात अडकलेल्या सद्य समाजासाठी हा पैगंबरी उपदेश मोठा मोलाचा आहे. आज एका विद्यापीठाचे माजी कुलगुरू वृद्धाश्रमात आहेत, माजी केंद्रीय मंत्री वृद्धाश्रमात  आहेत! आपण देशातील हजारो वृद्धाश्रमांत जाऊन प्रत्यक्ष पाहू शकतो की कसे कसे महाभाग वृद्धाश्रमात खितपत पडलेले आहेत! संतती असूनही! आणि हो, प्रॉपर्टी असूनही! अजून वेळ  गेलेली नाही. या परस्थितीतूनही आपण समाजाला सावरू शकतो. मात्र त्यासाठी गरज आहे या चंगळवादाच्या विळख्यातून बाहेर येण्याची! आणि जीवनासंबंधी पैगंबरी दृष्टिकोनातून  चिंतन करण्याची!

(संकलन : डॉ. सय्यद रफीक)

(१२२) स्मरण करा जेव्हा तुमच्यापैकी दोन गट दुबळेपणा दाखवित होते,९५ वास्तविक पाहाता अल्लाह त्यांच्या मदतीसाठी उपस्थित होता आणि ईमानधारकांनी अल्लाहवरच भिस्त  ठेवली पाहिजे.
(१२३) बरे यापूर्वी बदरच्या युद्धात अल्लाहने तुम्हाला मदत केली होती. खरे पाहाता त्या वेळी तुम्ही फार दुर्बल होता. म्हणून तुम्ही अल्लाहच्या कृतघ्नतेपासून दूर राहा. आशा आहे की  तुम्ही आता कृतज्ञ बनाल.
(१२४) हे पैगंबर (स.)! स्मरण करा जेव्हा तुम्ही ईमानधारकांना सांगत होता, ‘‘काय तुमच्यासाठी ही गोष्ट पुरेशी नाही की अल्लाहने तीन हजार फरिश्ते उतरवून तुमची मदत  करावी?’’९६
(१२५) नि:संशय जर तुम्ही संयम दाखविला आणि अल्लाहचे भय बाळगून काम केले तर ज्या क्षणी शत्रू तुमच्यावर चाल करून येईल त्याचक्षणी तुमचा पालनकर्ता (तीन हजारच नव्हे)  पाच हजार सुसज्ज ईशदूतांद्वारे मदत करील.
(१२६) ही गोष्ट अल्लाहने तुम्हाला या कारणास्तव सांगितली आहे की तुम्ही खूश व्हावे आणि तुमची हृदये संतुष्ट व्हावीत, विजय व साहाय्य जे काही आहे ते अल्लाहकडूनच आहे जो  अत्यंत शक्तिमान, बुद्धिमान व द्रष्टा आहे.
(१२७) (आणि ही मदत तुम्हाला तो यासाठी देईल) जेणेकरून अश्रद्धेच्या (कुफ्र). मार्गावर चालणाऱ्यांची एक बाजू तोडून टाकील अथवा त्यांचा असा अपमानजनक पराभव करील की  त्यांनी विफलतेने परास्त व्हावे.
(१२८) (हे पैगंबर-स.) निर्णयाच्या अधिकारात तुमचा कोणताही वाटा नाही. अल्लाहला अधिकार आहे हवे तर त्यांना माफ करावे, हवे तर त्यांना शिक्षा करावी कारण ते अत्याचारी आहेत.
(१२९) पृथ्वी व आकाशात जे काही आहे त्याचा मालक अल्लाह आहे, हवे त्याला त्याने क्षमा करावे व हवे त्याला यातना देईल. तो माफ करणारा व परम दयाळू आहे.९७
(१३०) हे  ईमानधाकांनो! हे दाम दुप्पट व्याज खाण्याचे सोडून द्या९८ आणि अल्लाहचे भय बाळगा, आशा आहे की सफल व्हाल.
(१३१) त्या आगीपासून स्वत:चा बचाव करा जी नाकारणाऱ्यांसाठी तयार केली गेली आहे.
(१३२) अल्लाह आणि पैगंबरांचे आज्ञा पालन करा, अपेक्षा आहे की तुम्हावर दया केली जाईल.
(१३३) त्या मार्गावर धावत चला जो तुमच्या पालनकत्र्याची क्षमा व त्या स्वर्गाकडे (जन्नत) जातो ज्याचा विस्तार पृथ्वी व आकाशासमान आहे, आणि तो त्या ईशपरायण लोकांसाठी  तयार केला गेला आहे.
(१३४) जे कोणत्याही स्थितीत आपली संपत्ती खर्च करतात, मग ते बिकट स्थितीत असोत अथवा चांगल्या स्थितीत, जे राग गिळून टाकतात व दुसऱ्याचे अपराध माफ करतात – असे  सदाचारी लोक अल्लाहला अतिशय प्रिय आहेत–९९
(१३५) आणि ज्यांची स्थिती अशी आहे की जर त्यांच्याकडून एखादे अश्लील कृत्य घडल्यास किंवा एखादा गुन्हा करून त्यांनी स्वत:वर अत्याचार केल्यास त्यांना लगेच अल्लाहचे स्मरण  होते आणि ते त्याच्याकडे आपल्या अपराधांची क्षमा-याचना करतात – कारण अल्लाहशिवाय इतर कोण आहे जो अपराध माफ करू शकतो– आणि ते समजूनउमजून आपल्या कर्मावर  अडून बसत नाहीत.
(१३६) अशा लोकांचा मोबदला त्यांच्या पालनकत्र्याजवळ असा आहे की तो त्यांना माफ करील व अशा नंदनवनात त्यांना दाखल करील ज्यांच्याखाली कालवे वहात असतील आणि तेथे  ते सदैव राहतील. किती छान मोबदला आहे सत्कृत्य करणाऱ्यांसाठी!


९५) हा संकेत आहे बनू सलमा आणि बनूहारीसाकडे ज्यांचे धैर्य अब्दुल्लाह बिन उबई आणि त्याच्या साथीदारांच्या परत फिरल्यानंतर खचले होते.
९६) मुस्लिमांनी जेव्हा पाहिले की एकीकडे शत्रू तीन हजाराच्या संख्येत आहेत आणि आमच्या एक हजारातूनसुद्धा तीनशे सैन्य कमी झाले तर त्यांचे साहस सुटू लागले. त्या वेळी पैगंबर  मुहम्मद (स.) यांनी त्यांच्याशी हे संभाषण केले होते.
९७) उहुद युद्धात जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) जखमी झाले तेव्हा त्यांच्या तोंडून शत्रूसाठी बद्दुवा (शाप) निघाली की, ``ते लोक कसे सफल होऊ शकतात जे आपल्या पैगंबराला जखमी  करतात.'' या आयती त्याच्याच उत्तरात आलेल्या आहेत.
९८) उहुद युद्धाच्या पराजयाचे मोठे कारण होते की मुस्लिम ठीक सफलतेच्या समयी संपत्तीच्या लोभात पडले आणि कार्याला निर्णायक स्थितीत पोहचविण्याऐवजी युद्धसंपत्ती गोळा  करण्यात मग्न झाले. यासाठी पूर्णत्वदर्शी अल्लाहने या स्थितीच्या सुधारासाठी धनासक्ती रोगावर उपाय करण्यासाठी आवश्यक समजून आदेश दिला की व्याज खाण्यापासून दूर राहा.  व्याजखोरीत मनुष्य रात्रंदिवस लाभवृद्धीचा हिशेब लावतो व त्यामुळे मनुष्यांत धनाशक्ती अमर्यादपणे वाढतच जाते.
९९) व्याज खोरी ज्या समाजात अस्तित्वात असते त्या समाजात दोन प्रकारचे नैतिक रोग निर्माण होतात. व्याज घेणाऱ्यामध्ये लालसा, कंजूषी आणि स्वार्थीपणा आणि व्याज देणाऱ्यात  द्वेष, तिरस्कार, राग निर्माण होतात. उहुद युद्धातील पराजयात या दोन्ही प्रकारच्या रोगांचा वाटा होता. अल्लाह मुस्लिमांना दाखवून देत आहे की व्याजखोरीमुळे दोन्ही पक्षांत (व्याज  घेणारा आणि व्याज देणारा) जे नैतिक अवगुण निर्माण होतात त्यांच्या अगदी विरुद्ध वेगळेच सद्गुण ईशमार्गात खर्च केल्याने माणसात निर्माण होतात, आणि अल्लाहची क्षमा आणि  स्वर्गप्राप्ती याच दुसऱ्या गुणांनी प्राप्त् होऊ शकते ना की पहिल्या प्रकारच्या अवगणुनांनी मुळीच नाही. (तपशीलासाठी पाहा, सूरह - २ टीप ३२०)

इंधन दरवाढ, महागाई आणि राफेल कराराच्या विरोधात वातावरण तापवण्यासाठी पुकारण्यात आलेल्या या बंद मागे जनतेत या सरकारविषयी प्रचंड रोष असल्याचे चित्र निर्माण  करण्याचा प्रयत्न होता. एकीकडे हा बंद सुरू असताना दुसरीकडे इंधनातील दरवाढ सुरूच होती. रुपयाची किंमत पुन्हा घसरली आणि पुन्हा एक नीचांकाचा विक्रम नोंदवला गेला. पेट्रोल,  डिझेलच्या दरात सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळे महागाईचा भडका किती पेटणार आणि त्यात सामान्य माणूस किती होरपळणार याचा अंदाज बांधणेच कठीण होऊन बसले आहे. पेट्रोल, डिझेलची दरवाढ ही पायाभूत असल्याने त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीवर होतो. त्यामुळे साडेचार वर्षांपूर्वी ‘अच्छे दिन आनेवाले  हैं’चे गाजर दाखवलेल्या भाजपचा खरा चेहरा समोर आलेला आहे. यानंतर रिक्षा, टॅक्सी आणि अन्य ट्रान्स्पोर्टचे दर वाढणार हेही निश्चित आहे. डिझेल दरवाढीचे कारण सांगून काही  दिवसांपूर्वीच बेस्ट बसचेही दर वाढले आहेत, तर एसटीनेही मागच्याच महिन्यात दरवाढ केली होती. पेट्रोल, डिझेलची ही दरवाढ सर्वसामान्य माणसांना अक्षरश: होरपळून काढताना  दिसत आहे.
भाजपचा विरोधात असतानाचा चेहरा आणि सत्तेत असतानाचा चेहरा यात जमीन अस्मानाचा फरक झालेला आहे. काँग्रेसचा चेहरा घेऊनच भाजप दिल्लीत बसली आहे काय, असा प्रश्न  पडतो. म्हणजे विरोधात असताना हाच भारतीय जनता पक्ष पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीविरोधात पेटून उठायचा. रस्त्यावर उतरायचा. सतत आंदोलने करायचा. यापूर्वी असेच पेट्रोल, डिझेल  दरवाढीविरोधात २०१० ला भाजपने देशभरातील सर्व विरोधी पक्षांना एकत्र करून देशव्यापी आंदोलन केले होते. पण सत्तेवर आल्यानंतर मात्र भाजपला यावर कोणतीही उपाययोजना  करता आलेली नाही. काही गोष्टी हातात असूनही भाजप त्याकडे का दुर्लक्ष करते आहे असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे भाजप हा काँग्रेसच्याच पावलावर पाऊल टाकत  सरकार चालवत असेल तर ‘अच्छे दिन’ येणार कसे?
लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रचारात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आपल्या पक्षाला केंद्रात सत्ता मिळाल्यास महागाईवर नियंत्रण आणून, सर्वसामान्य जनतेला ‘अच्छे  दिन’ येतील, अशी ग्वाही दिली होती. मोदी पंतप्रधान झाले आणि ‘अच्छे दिन’च्या आश्वासनाचाही त्यांना विसर पडला. त्यांनी दिलेली आश्वासने म्हणजे निवडणूक ‘जुमला’ होता, हे  आता स्पष्ट झाले आहे. मोदी सरकारच्या गेल्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात महागाई कमी झाली नाहीच, उलट गोरगरीब, शोषित, वंचित जनतेच्या समस्यांची सोडवणूकही झाली नाही.  पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढवून महागाईच्या वणव्यात तेल ओतण्याचा उद्योग मात्र मोदी सरकारने सुरूच ठेवला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती  वाढत असल्यानेच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत असल्याची सरकारची सबब दिशाभूल करणारी आहे. दोन वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलांच्या किमती कमी  होत्या. तेव्हाही केंद्राचा उत्पादन कर, अबकारी कर, राज्य सरकारांचा मूल्यवर्धित कर अशा विविध करांचा बोजा इंधनाच्या मूळ किमतीच्या दुप्पटच होता. तेव्हा सरकारने ग्राहकांना  खनिज तेलाची किंमत कमी झाल्याचा दिलासा देशातल्या ग्राहकांना दिला नाही. महागाई आणि इंधन दरवाढीमुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडलेले असताना त्यावर उपाययोजना करण्याची जबाबदारी सरकारची आहे. पण सरकार मूग गिळून गप्प आहे. या करप्रणालीतून डिझेल, पेट्रोल मात्र सोयीस्करपणे वगळून केंद्र आणि राज्य सरकारांनी सर्वसामान्य जनतेला  लुटण्याचे लुटीचे धोरण कायम ठेवले आहे. महसुली उत्पन्न मिळविण्याच्या नादात पेट्रोल आणि डिझेलवर जबर कर आकारणी करून जनतेला महागाईच्या वरवंटयाखाली भरडण्याचे  धोरण बदलण्याची मानसिकता मोदी सरकारची दिसत नाही.
जीएसटीमुळे राज्यांच्या महसुली करात घट होण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीद्वारे मिळणारे हुकमी मूल्यवर्धित कराचे उत्पन्न सोडायला तयार  नाहीत. त्यामुळेच गरीब जनतेचे कंबरडे पार मोडले आहे. महागाईवाढीच्या दुष्टचक्रात इंधनवाढीचे कारण सर्विाधक महत्त्वाचे ठरते. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे महागाईचा वणवा असाच  भडकत राहिला तर जनतेला अच्छे दिन येणार नाहीतच, मात्र काँग्रेसप्रमाणे भाजपलाही वाईट दिवसांना सामोरे जावे लागेल. पेट्रोल-डिझेलला जीएसटीमध्ये आणण्याबाबत निर्णय घेतला  जात नाही. भाजपला जे देशभर अच्छे दिन आलेले आहेत ते २०१९ ला राहणार नाहीत. शत प्रतिशत भाजपसाठी प्रयत्न करणाऱ्या भाजप नेत्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल  हे निश्चित आहे. लोकांच्या असंतोषाचा सरकारवर यत्किंचितही परिणाम झालेला दिसत नाही. झोपेचे सोंग आणलेल्यांना आता जागे करण्याची वेळ आली आहे.

-शाहजहान मगदुम
(मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@eshodhan.com)

कुरुंदवाडच्या ‘अल फतह’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मला ‘आम्ही भारतीय’ हा सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. माझं वय आणि काम पाहता मी या सन्मानाला पात्र नाही असं मला राहून-राहून वाटतं. कारण माझ्यापेक्षाही कितीतरी पटीनं उत्तमरित्या सार्वजनिक जीवनात कार्य करणारे व्यक्ती उपेक्षित व भणंगाचं आयुष्य जगत आहेत. आधी त्यांचा यथोचित सन्मान होणं गरजेचं आहे. त्यांचं कार्य सन्मान व पुरस्काराचं याचक नसतं पण त्यांनी केलेल्या सामाजउपयोगी कामाची दखल समाजानं वेळीच घेतली पाहिजे. नसता त्या कामात पुसटशा नैराश्याच्या किनारी चिकटू शकतात. सामाजिक कार्यामुळे मानवी जीवनाला जगण्याचं अधिष्ठान प्राप्त होतं, त्यामुळे ते काम संथ होऊ नये यासाठी त्या कर्त्यांची दखल योग्य वेळी घेतली गेली पाहिजे.
आम्ही भारतीय हा पुरस्कार स्वीकारताना एका अर्थानं बरं वाटतंय. त्याला दोन कारणं आहेत, पहिलं म्हणजे- मला एक भारतीय म्हणून सिव्हिल लाईफ जगताना माझ्या आत घडणाऱ्या कुचंबणा मोकळंपणानं या प्लॅटफॉर्मवरून मांडता येतील. दुसरं म्हणजे- या सन्मानानं माझ्या भारतीयत्वाच्या जाणीव व जबाबदाऱ्यांना गंभीर स्वरूप प्राप्त होणार आहे. एका अर्थानं माझ्या नागरी कर्तव्याची जाण नव्यानं सांगणारा हा सन्मान आहे, असं मी मानतो.
शाळेत असताना नागरिकशास्त्रात मूलभूत अधिकाराची पारायणे आपण अनेकदा केली आहेत. समाजात नागरी जीवन जगताना त्या अधिकाराची मागणीही वारंवार आपण केली आहे. मी तर म्हणेन की स्वतंत्र भारतात मूलभूत अधिकारासाठी सर्वांत जास्त आंदोलनं झाली असावी. पण हे करताना आपण एक गल्लत नेहमी करतो, ती म्हणजे नागरी हक्कांबद्दल नेहमी बोलतोय पण मूलभूत कर्तव्याचं काय? भारतीय राज्यघटनेनं जसे मानवाला मूलभूत अधिकार प्रदान केलं तसंच काही मूलभूत कर्तव्येसुद्धा पाळण्याची ग्वाही आपल्याकडून घेतली आहे.
आता मूलभूत अधिकारच मिळत नाही तर कर्तव्ये कुठली पाळणार? असा विरोधाभासी सूर समाजात ऐकायला मिळतो. शासन 'संस्था' म्हणून कार्य करत असताना एखादा व्यक्ती, समूह किंवा समाजगटाबद्दल विचार करून चालत नाही तर बहूअयामी विचार तिथं अपेक्षित असतो. त्यामुळे एखादा वर्गगट समान न्याय या तत्त्वापासून वंचित राहू शकतो. न्यायाचा लाभ उशीरा का होईना त्या-त्या समाजगटाला मिळतो, परिणामी तक्रारीचा सूरही कालांतरानं मावळतो. अशा परिस्थितीत किमान पातळीवर मूलभूत कर्तव्ये पाळणे आपल्यासाठी बंधनकारक ठरतं.
आपणास राज्यघटनेनं कलम ५१ (अ) आणि ५५ मध्ये १० मूलभूत कर्तव्ये बहाल केली आहेत. त्याची संवैधानिक व्याख्या मी इथं करत नाही, पण सार्वजनिक स्थळी केर-कचरा न टाकणं त्या परिसराची स्वच्छता राखणं हे आपले कर्तव्य आहे ना! तसंच सार्वजनिक मालमत्तेची निगा राखणं हेही एक कर्तव्य आहे. रस्त्यावर वाहता नळ बंद करणं, बस व ट्रेनमध्ये तिथल्या वस्तूंचं नुकसान न करणं, त्याचा नेटकेपणा अबाधित ठेवणं, सार्वजनिक मालमत्ता व नैसर्गिक साधन संपत्तीचं जतन करणं यांचादेखील मूलभूत कर्तव्यांमध्ये सामावेश होऊ शकतो. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास कुठल्याही सार्वजनिक स्थळी फिरताना आणि वावरताना आपली जबाबदारी ओळखून ती पाळणं म्हणजे मूलभूत कर्तव्याचं पालन करणं होय. इतरांना त्यांच्या कर्तव्यांची जाण करून देण्यापेक्षा आपणच का आपली जबाबदारी ओळखून काम करू नयेत?
भारताचे सार्वभौमत्व व एकात्मतेचं संरक्षण करणे ही प्रत्येक भारतीय नागरिकांची जबाबदारी आहे. मग त्यात वर्ग,जात, समूहभेद होता कामा नये. मुस्लिम समुदायाला तर मी म्हणेल की वरील घटकांचे जतन व संरक्षण करणं आपलं धार्मिक कर्तव्य आहे, कारण ‘बाय चॉईस’ आपण भारताला स्वीकारलंय ना! भारतभूमी प्रिय आहे म्हणूनच ना आपण इथल्या मातीला चिकटून फाळणी नाकारली. कुरआन व हदीस वचनातही 'मुल्क'परस्तीवर अनेकदा भाष्य आलेलं आहे. ‘अपने वतन से मुहब्बत रखो’ या प्रेषित मुहंमद (स) यांच्या वाक्याचा आपणास विसर पडता कामा नये.
इस्लामी तत्त्वज्ञानानं आपणास सहिष्णुता शिकवली आहे. भारतीय संस्कृतीतही सहिष्णुतेचा वैभवशाली वारसा आहे. काही तुरळक शक्तिंच्या स्वार्थी व धार्मिक प्रचाराला बळी पडून आपण प्रतिक्रियावादी, असहिष्णू, हेकेखोर, तुच्छतावादी झालोय. सोशल मीडियानं तर आपणास रियक्शनरी बनविले आहे. फेसबुक अल्गोरिदमला साजेसं आपण वागतोय, फेसबुक आपल्या बिझनेससाठी एखादा टॉपीक चर्चेला आणतो, त्या चर्चेत फेसबुक प्रत्येकाला सामावून घेतो. म्हणजे फेसबुकच्या बिझनेससाठी तुम्हाला ‘सोशल कनेक्टेड’ राहावं लागतं. त्यामुळेच फेसबुक तुमच्या वॉलवर येऊन वारंवार म्हणतो ‘इथं काहीतरी लिहा’. म्हणजे तुम्ही तुमचं मत तिथं मांडत नाहीयेत तर फेसबुकला हवं असलेलं ‘आक्रमक’ मत तुम्ही मांडता, म्हणजे ते मत तुमचं कुठं झालं? ते तर फेसबुकचं मत आहे ना! फेसबुक तुम्हाला आक्रमक मत मांडण्यासाठी उद्धूत करतो, याचा अर्थ असा होतो की म्हणजे फेसबुकनं तुमच्या ह्यूमन सायकोल़ॉजी व मानवी मेंदूवर ताबा मिळवलाय. त्यामुळेच आपण सोशल मीडिया व व्हॉट्सअपवर इतरांना शिवीगाळ करून आपल्या सजीव बुद्धीचे निर्जीव प्रदर्शन मांडतो. म्हणजे आपल्या रियक्शनरी होण्यामागे सोशल मीडिया कारणीभूत आहे. त्यानं आपली जीवनशैलीच नाही तर मानवी संवदेनावरदेखील आघात केलाय. यातूनच आपण असहिष्णू होत त्याचं रुपांतर ‘काऊंटर सोसायटी’त झालं आहे. आपण प्रत्येकजण ग्लोबल अशा काऊंटर कॉलनीत राहतोय.
कुठलही स्टेटस वाचत असतानाच मनात आपण निगेटिव्ह मत तयार करतो, वर तात्काळ तो त्यावर लादतो. प्रतिक्रिया देण्याच्या घाईत आपणास तो विचार कळतंच नाही किंवा तो कळायला आणि पचवायला आपण पुरेसा अवधीच देत नाही. अशा पद्धतीनं आपला बौद्धिक विकास करण्याऐवजी आपण तो थांबवतोय. नियमीत वाचन करणे जमत नसलं तरी तर्क व समजून घेण्याच्या भूमिकेतून शास्त्रीय दृष्टिकोन व अभ्यासू वृत्ती वाढू शकते. यासाठी जाडजूड पुस्तके व संदर्भ ग्रंथे वाचण्याची गरज नाही.
खरं सांगू तर आपण सर्वजण ‘कल्पनेचे बळी’ ठरलो आहोत. कुठला तरी एक प्रचारी मेसेज आपण वाचून दहशतीत वावरतो, कुणी म्हणतो भारत ‘हिंदूराष्ट्र होणार’, तर कोणी म्हणतो हिंदूस्थानला ‘दारूल हरब’ करू. दोन्ही समुदायाकडून कल्पना रंगवून सांगितली जाते. खरं सांगू तर इकडे दारूल हरब आणि तिकडे हिंदू राष्ट्राची नेमकी संकल्पना काय हेदेखील अजून बऱ्याच जणांना माहीत नाही. हे का लक्षात घेतले जात नाही की भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे, त्याला एक स्वतंत्र राज्यघटना आहे, आंतरराष्ट्रीय कायदे आहेत, इतर देशांसोबत केलेला ट्रीटी आहे, भारत या शब्दामागे एक मोठा सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास आहे. त्यामुळे २०२५ काय तर येत्या हजार वर्षातही माझी भारतभूमी दारुल हरब किंवा हिंदूराष्ट्र होऊ शकत नाही. त्यामुळे कल्पनेचे व अफवेचे बळी ठरू नका. संघ हे करतंय, सनातनी ते करताहेत, मुसलमान एकत्र होताहेत, त्यांच्या मस्जिदा वाढताहेत, दलितांचं संघटन फोफावतेय इत्यादी गोष्टी गौण आहेत. आपली सजग व विवेकी नागरिक होण्याची प्रक्रिया ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी या सर्व यंत्रणा मातीमोल होतील. त्यामुळे त्यात फारसं अडकू नका.
विखारी वृत्ती भारतीय जनमाणसात बळावल्याने समाज अध:पतनाकडे कूच करत आहे. गरिबी, नैराश्य, बेरोजगारी, बकालपणा ही त्याचीच विषारी फळं आहेत. अशा अवस्थेतून स्वतला आणि भारतीय समाजाला बाहेर काढण्याचे मार्ग उपलब्ध आहेत. त्यासाठी आपला विवेकीपणा व ज्ञानसंचित वाढवण्याची गरज आहे. हे भारतीयत्व अंगी बाळगल्याशिवाय शक्य होणार नाही. धर्मभेदी राजकीय विचारसरणीच्या आहारी जाऊन आपण आपलं भारतीयत्व संपुष्टात आणत आहोत. भारतीय राज्यघटनेने येथील साऱ्या लोकांना समान नागरी अधिकार आणि जबाबदाऱ्या दिल्या आहेत, त्यात मुस्लिमदेखील येतात, त्याप्रमाणे भारत अजूनही घडतो आहे. ७० वर्षांत सरकारनं काय केले, ही तक्रार आता थांबवा. मुस्लिमांना संधी लाथाडणे ही दोन्ही गटाची राजकीय़ गरज आहे, मुस्लिमच काय तर कुठल्याही शोषित आणि पीडित गटांना समान संधीपासून वंचित ठेवणे ही सर्व राजकीय पक्षांची गरज असते. ‘याचक’ आणि ‘दानशूर’ असे दोन घटक प्रत्येक समाजात असतातच. आज फक्त त्याला हिंतसंबधीय राजकारणाची जोड मिळाली आहे. मूलभूत अधिकार मिळवण्यासाठी राजकारण्यांकडे याचना करावी लागते हे भारतीय राज्यघटनेनं दिलेल्या तत्त्वांची फार मोठी थट्टा आहे. हे होऊ नये यासाठी आपले घटनात्मक अधिकार काय आहेत आणि ते मिळवण्याचे संवैधानिक मार्ग काय आहेत, हे शोधून त्याचा विकास करण्याची गरज आहे.

- कलीम अज़ीम

(2 सप्टेंबर 2018 रोजी कोल्हापूरच्या कुरुंदवाड येथे  ‘आम्ही भारतीय’ पुरस्कार स्वीकारताना केलेल्या मनोगताचा पहिला भाग)

आदरणीय अब्दुल्लाह बिन मसऊद (र.) म्हणतात, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले की, अल्लाहला कोणते कर्म सर्वाधिक प्रिय आहे? पैगंबरांनी उत्तर दिले, वेळेवर नमाज अदा  करणे. मी विचारले, त्यानंतर? पैगंबर म्हणाले, माता-पित्यांशी सद्वर्तन. मी पुन्हा विचारले, त्यानंतर? पैगंबर (स.) म्हणाले, ईशमार्गात जिहाद करणे.

निरुपण-
उपरोक्त हदीसमध्ये पैगंबरांनी मानवी जीवनाचे सार्थक करण्यासाठी तीन सर्वश्रेष्ठ कर्म करण्याचा उपदेश केला आहे.
(१) माणसाने जीवनात अल्लाहशी सदैव कृतज्ञ राहावे. हे अनंत विश्व अल्लाहचे आहे. त्यानेच मला निर्माण केले आणि या अनंत कृपा त्याच्याच आहेत ही जाणीव सतत ध्यानीमनी  ठेवावी. हे ईशऋण व्यक्त करण्याचे श्रेष्ठतम माध्यम नमाज आहे. दिवसातून पाच वेळा वक्तशीरपणे आयुष्यभर अल्लाहसमोर नतमस्तक होऊन नमाज अदा करणाऱ्याचे जीवन  यशस्वी, सफल होईल. यात शंकाच नाही.
(२) जीवनाचे सार्थक करण्यासाठी दुसरे श्रेष्ठ कर्म ज्याचा पैगंबर उपदेश करतात, ते आहे माता-पित्यांशी सद्वर्तन! खरे तर अल्लाहनेच माणसाला माता-पित्यांशी सद्वर्तन करण्याचा  आदेश दिला आहे. ही माणसाच्या सात्विकतेची लिटमस टेस्ट आहे. जो माता-पित्यांशीच सद्वर्तन करत नसेल त्याच्यात सात्विकता ती कोणती? माता-पित्यांशी सद्वर्तन हे इस्लामी  समाजाचे पायाभूत तत्त्व आहे, जे कुटुंब व्यवस्थेला मजबूत बनवते. ज्या कुटुंबात माता-पिताच दुर्लक्षित, उपेक्षित असतील, ते कुटुंब उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहात नाही.
(३) यानंतर ज्या श्रेष्ठ कर्माचा पैगंबरांनी उपदेश केला आहे ते जिहाद. माणसावर सामाजिक जबाबदारीदेखील आहे, जिला पूर्ण केल्याशिवाय त्याच्या जीवनाचे सार्थक होणार नाही.  समाजामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे म्हणजेच गुलामीविरूद्ध संघर्ष करणे व मानवजातीला स्वार्थी लोकांच्या गुलामीतून मुक्त करणे, शोषणमुक्त समाज निर्माण करणे. सामाजिक विषमता, परस्पर द्वेष आणि अन्यायाविरूद्ध बंड करणे हाच जिहाद आहे. दुर्दैवाने समाजकंटकांनी जिहादविषयी जाणीवपूर्वक गैरसमज पसरवलेले आहेत. ते दूर करून जिहादचे वास्तव समाजासमोर आणणे गरजेचे आहे. समाजामध्ये शांती, सद्भावना आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे म्हणजेच जिहाद होय. याकामी आपले सर्वस्व पणाला लावणे, त्यात येणाऱ्या संकटांना धैर्याने सामोरे जाणे आणि प्रसंगी प्राणाची आहुती देणे हाच खरा जिहाद आहे.
समाजामध्ये अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार बोकाळलेला असताना सज्जनांचे शांतपणे, निष्क्रियपणे जगणे इस्लामला कदापि मान्य नाही. या उलट इस्लामला असे नमाजी व असे हाजी  अपेक्षित आहेत जे सामाजिक स्वास्थ्यासाठीही संघर्ष करण्यास तत्पर असावेत. आपल्या देशातील सर्व शांतीप्रिय नागरिकांनी संघटित होऊन आदर्श, सत्याधिष्ठित, समताधिष्ठित व  न्यायाधिष्ठित भारताच्या नवनिर्माणासाठी जिहाद करणे ही आज काळाची गरज आहे. अन्यथा सर्व भारतीयांना या निष्क्रिय राहण्याची कटु फळे भोगावी लागतील व पश्चात्तापाची वेळ  येईल. अल्लाह आम्हा सर्वांना वेळीच सद्बुद्धी देवो, आमीन.

(संकलन : डॉ. सय्यद रफीक)

आपल्या समाजाचे ध्रूवीकरण अथवा सांप्रदायिककरण न करता लैंगिक न्यायाचे लक्ष्य साध्य केले जाऊ शकते. विधी आयोगाचा या विवादास्पद मुद्द्यावरील दृष्टिकोन त्याचे अध्यक्ष न्या.  बी. एस. चव्हाण यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रावरून स्पष्ट झाला. विधी आयोगाने स्पष्टपणे म्हटले आहे की सद्य:स्थितीत समान नागरी कायदा  अव्यवहार्य असून अनावश्यकही आहे. आपल्या कायद्यांच्या अनेकतावादाला विधी आयोग्य मान्यता देतो. आयोगाच्या प्रतिक्रियेमुळे निश्चितच समान नागरी कायद्याचा मुद्दा उपस्थित होताच आठवडेच्याआठवडे ‘एक राष्ट्र, एक कायदा’चा राग आलापणाऱ्या कार्पोरेट मीडियातील अँकरांना चांगलीच चपराक बसली. येथील सामाजिक स्थितीचे मूलभूत सत्य जाणून न  घेताच समान नागरी कायदा बनविण्याची शिफारस यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने केल्याचे आपणास आढळून येते. अनेकदा अनावश्यकरित्या समान नागरी कायदाची शिफारस  न्यायाधीशांकडून करण्यात येते. (एसीबी विरूद्ध राज्य, सन २०१५) तसेच पर्सनल लॉ आणि त्यांचे संविधानातील समानतेसंबंधी अंतर्भावाच्या विपरित असण्याबद्दल कोणताही विवाद  नसताना सरला मुद्गल (२०१५) प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की देशाच्या विभाजनानंतर भारतात राहू इच्छिणाऱ्यांना माहीत होते की भारत ‘एक राष्ट्र एक कायदा’ यावर  विश्वास ठेवतो. त्यामुळे कोणताही समुदाय पृथक धार्मिक कायद्याची मागणी करू शकत नाही. भारतीय विविधता पाहता विधी आयोगाने जे म्हटले आहे ते योग्यच आहे. समान नागरी  कायदा येथे लागू करणे सध्या तरी शक्य नाही.
निश्चितच पर्सनल लॉमध्ये सुधारणा घडवून आणणे सरकारला शक्य आहे. उदा. हिंदू कोड बिल सन १९५४-५५ पास झाले. परंतु यापूर्वी सन १९४१मध्ये ‘हिंदू लॉ रिफॉर्म कमिटी’  बनविण्यात आली होती. या समितीने अहवाल सादर केला आणि त्यावर चर्चा घडवून आणण्यात आली. अहवालातील शिफारसी एकाच वेळी स्वीकारण्यात आल्या नाहीत. डॉ. बाबासाहेब  आंबेडकर त्या वेळी कायदामंत्री होते, त्यांना त्या शिफारसी तीन वेळा पास कराव्या लागल्या. डॉ. आंबेडकरांवर आरोप लावण्यात आला की ते हिंदू धर्म नष्ट करू इच्छितात आणि ते  बदला घेत आहेत. त्या वेळी हिंदुत्ववादी संघटनांनी या बिलाचा कडाडून विरोध केला होता. कोणत्याही पर्सनल लॉमध्ये सुधार घडवून आणण्यापूर्वी एका एक्सपर्ट कमिटीचे गठन  करण्यात यावे, जशी हिंदू कोड बिलाच्या वेळी स्थापन करण्यात आली होती. त्या कमिटीच्या शिफारसी मागविण्यात याव्यात, त्यावर चर्चा घडवून आणावी आणि जर त्यात दुरुस्ती करता आली तर त्यात बदल करण्यात यावा. हे सर्व संबंधित समुदायाच्या संगनमताने झाले तरच त्याच्या स्वीकारार्हतेत वाढ होईल. फक्त कायद्यात दुरुस्ती करून समाजात बदल  घडून येत नाही.
समाजात परिवर्तन घडवायचा असेल तर अगोदर समाजाला तयार करावे लागेल. समाजाला साक्षर करावे लागेल. सरकारने त्या समुदायाला साक्षर करण्यासाठी कोणकोणती पावले  उचलली आहेत, तेदेखील स्पष्ट नाही. आपल्याला वाटते की हिंदू लॉ संपूर्ण देशात एकसारखा आहे, परंतु तसे नाही. क्रिमिनल लॉदेखील संपूर्ण भारतात एकसारखा नाही, भारतीय दंड  विधान (आयपीसी) देखील संपूर्ण भारतात एकसारखा नाही. टीव्ही चॅनलच्या अँकरांना याबाबत फारसे जाणून घेण्यात रस नाही हेच त्यांच्या कर्तृत्वावरून दिसून येते. विधी आयोगाच्या  काही सूचनांबाबत समस्या निर्माण होऊ शकते, यात वाद नाही. देशाबाबत निष्ठा आणि कायद्यांतील समानाता एकमेकांशी संलग्न नसतात. भारतीय संविधानाने स्वातंत्र्य आणि  अधिकार येथील नागरिकांना सशर्त प्रदान केलेले नाहीत. ‘कर्तव्य नाहीत तर अधिकार नाही किंवा अधिकार नाही तर कर्तव्य नाही’ असे म्हणता येणार नाही. फ्रेंच स्कॉलर लियोन   ड्युगुट यांच्या ‘कर्तव्य निर्वहन हा प्रत्येक नागरिकाचा एकमात्र अधिकार आहे.’ या मताशी भारतीय संविधान सहमत आहे. म्हणून कोणत्याही मूलभूत कर्तव्यांकडे दुर्लक्ष  करणाऱ्याचेदेखील मूलभूत अधिकार अबाधित राहातात. खरे तर कोणतेही उदार लोकशाहीचे संविधान (जपान वगळता) मूलभूत अधिकारांत कर्तव्यांचादेखील समावेश करीत नाही. मूलभूत  कर्तव्य भारतीय संविधानाचा अगदी सुरूवातीपासूनच भाग नाही. म्हणून समान नागरी कायद्याचा स्वीकार केला नाही तर त्याच्या मतदानाचा अधिकार, अभिव्यक्तीचा अधिकार,  भारतीयत्वाचा अधिकार संवैधानिक स्वरूपात हिरावला जाऊ शकत नाही. सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ जे. डंकन एम. डेरिट यांनी म्हटले होते की ‘मुस्लिम कायद्यांमध्ये सुधारणा घडविण्याची  सर्वोत्तम पद्धत म्हणजे त्यामध्ये सुधारणाच करू नये. जर पर्सनल कायद्यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतला तर तो अधिकच दृढ स्वरूप धारण करील.’ मुस्लिम जगतात किंवा  मुस्लिम बहुसंख्यक देशांत होत असलेल्या सुधारणांकडे पाहून आपल्या देशात त्यांचे अनुकरण करणे देशाच्या लोकशाहीला घातक ठरेल. याबाबत केंद्र सरकार, सर्वोच्च न्यायालय विद्वत्तापूर्ण विचार करतील अशी आशा आहे.

- शाहजहान मगदुम
(मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@eshodhan.com)

- औरंगाबाद (शोधन सेवा) 
जमाअते इस्लामी हिंद तर्फे दक्षीण औरंगाबादमध्ये नुकतेच मस्जिद परिचय, ईदच्या शुभेच्छा पत्रांचे वाटप आणि केरळ पूरग्रस्तांसाठी सहाय्यता निधी जमा करणे इत्यादी उपक्रम घेण्यात आले. सदरचे उपक्रम मुंबईच्या अनम प्रेम मुंबई यांच्यासह घेण्यात आले. त्यात मुंबईहून आलेले मोरे, मोकल, आढळराव, रमेश सावंत, डॉ. रमेश यांनी 500 ईद शुभेच्छा पत्रांचे वाटप केले. शिवाय, मस्जिद-ए-अक्सा येथे हिंदू-मुस्लिम बांधवांसाठी मस्जिद परिचय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
    अनम प्रेम संस्था आणि स्थानिक नागरिकांनी मगरीब आणि इशाची नमाज अदा केली. शिवाय, दक्षिण औरंगाबादच्या दावती कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांनी सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांना खजूरचे वाटप करण्यात आले. शिवाय, केरळमध्ये आलेल्या पूरामध्ये ज्या हिंदू-मुस्लिम बांधवांची अपरिमित हानी झाली त्यांच्यासाठी सहाय्यता निधी गोळा करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. त्यासाठी हँडबिल प्रकाशित करून त्याचेही वितरण करण्यात आले. यावेळी जमाते इस्लामी दक्षिण औरंगाबादचे अध्यक्ष प्रा. वाजीद अली खान यांच्यासह जमाअतचे पदाधिकारी उपस्थित होते.

- कोल्हापूर (शोधन सेवा)
मुसलमानांचा वर्तमान नासवण्यामागे जमातवादी इतिहासलेखन जबाबदार आहे, उज्जवल भविष्यासाठी मुस्लिम समाजाला इतिहासाचे आकलन होण्याची फार मोठी गरज निर्माण झाली आहे. येणार्‍या काळात देशात सामाजिक सदभाव कायम ठेवायचा असेल तर मुस्लिमांनी वर्तमानासह इतिहासाचेही आकलन भक्कमपणे करावे, असं वक्तव्य ज्येष्ठ साहित्यिक जावेद पाशा कुरेशी यांनी ‘आम्ही भारतीय’ पुरस्काराला उत्तर देताना केले. भारतीय मुस्लिम समाजात सहिष्णुतेची मूल्य परंपरेने चालत आली आहेत, याचा काही लोकांनी गैरवापर केल्यानं आज जनमाणसात तेढ निर्माण झाली आहे, ती दूर करायची असेल तर इस्लामचा मूळ बंधूभावाचा संदेश पुन्हा एकदा नव्यानं सागण्याची गरज निर्माण झाली आहे, असेही कुरेशी म्हणाले.
    जिल्ह्यातील कुरुंदवाड येथे 2 सप्टेंबर रविवार रोजी अल फताह मुस्लिम युवक संघटनेच्या वतीने ‘आम्ही भारतीय’ पुरस्काराचा वितरण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र पाटील-यड्रावकर होते. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून इतिहास संशोधक व लेखक सरफराज अहमद उपस्थित होते.
    यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. आम्ही भारतीयचा विशेष साहित्यकृती पुरस्कार नागपूरचे जावेद पाशा कुरेशी यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्यांनी मराठी मुस्लिम समाजमनावर बीजभाषण केले. संघटनेचा मुक्त लेखनाचा सन्मान पुण्यातील सत्याग्रही विचारधाराचे कार्यकारी संपादक कलीम अजीम यांना देण्यात आला. धुळेच्या लतिका चौधरी यांना ज्योती-साऊ विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित नसल्याने त्यांचा पुरस्कार ताहेरा कुरेशी यांनी स्वीकारला. प्रमुख पाहुणे व अल फताह मुस्लिम युवक संघटनेचे अध्यक्ष शकील गरगरे यांच्या हस्ते शिक्षणात विशेष प्राविण्य मिळविलेल्या 10 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
    कलीम अजीम यांनी पुरस्काराला उत्तर देताना राज्यघटनेनं दिलेल्या मूलभूत कर्तव्यावर भाष्य केलं. बदलत्या राजकीय परीप्रेक्ष्यात मुस्लिम तरुणांनी उच्च शिक्षणाचा मार्ग स्वीकारुन आपला विकास घडवावा असेही ते म्हणाले. शैक्षाणिक व सामाजिक विकासातून समाज व कुटुंबाचा विकास शक्य आहे असेही ते म्हणाले. इस्लामने दिलेली सहिष्णुतेची मूल्य जगण्याचा आधार होऊ शकतात, त्यामुळे प्रत्येक मुस्लिमांनी इस्लामची सहिष्णुतेचे तत्व पाळलं पाहिजे असंही कलीम अजीम म्हणाले. सरफराज अहमद यांनी मुस्लिमांच्या इतिहास न वाचण्याच्या पद्धतीवर प्रखर शब्दात टीका कली. आज मुसलमानांनी आपलाच इतिहास वाचला नसल्यानं जमातवादी शक्तींना संधी मिळाली आहे. मुस्लिमांची आदर्श प्रतीके नष्ट करण्याची मोहिम विरोधी गटाकडून राबविली जात आहे, त्यामुळे आपले इतिहास पुरुष आपणच जपले पाहिजेत. त्यांच्या आदर्श प्रतिमेला कसलाही धक्का लागता कामा नये, याची सर्व जबाबदारी मुस्लिम समाजावर आहे. इतिहासाचे योग्य आकलन मुसलमानांचे वर्तमान सक्षम करू शकते. खोट्या इतिहासाला वस्तुनिष्ठ इतिहास लेखनातून उत्तर देण्यासाठी मुस्लिम विचारवंत व लेखकांनी पुढे यावे असेही आवाहन सरफराज अहमद यांनी केले.
    कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेद्र पाटील-यड्रावकर यांनी मुस्लिम युवकांनी शिक्षणात विशेष प्राविण्य मिळवावे असे आवाहन केलं. शिक्षणामुळे समाजात चेतना निर्माण होऊ शकते असेही ते म्हणाले. सामाजिक सोहार्द निर्माण करण्यासाठी दोन्ही समाजातील युवकांनी महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे असेही ते म्हणाले.
    कुरुंदवाडच्या भालचंद्र थियटरमध्ये झालेल्या कार्यक्रमासाठी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्यासाठी अनेक मान्यवर पाहुणे राज्याच्या विविध भागातून कुरुंदवाडला आदल्या दिवशीच दाखल झाले होते. त्यात सातारचे मिन्हाज सय्यद, पुण्याचे समीर शेख, तासगावचे फारुख गवंडी, सांगलीचे मुनीर मुल्ला, बार्शीचे अब्दुल शेख, कोल्हापूरचे नियाज आत्तार पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे मुख्य संयोजन व संकल्पना साहील शेख यांची होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच त्यांनी पुरस्कार सोहळ्यामागची भूमिका स्पष्ट केली. परिसरात सामाजिक सौहार्द अबाधित ठेवण्यासाठी हा छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. साहिल शेख यांच्यासह कार्यक्रम यशस्वी करण्यामागे अल फताह युवक संघटनेचे सर्व पदाधिकारी यांचे सहाय्य लाभले.

पुणे (शोधन सेवा) 
बहुधार्मिकता हे आमच्या जगाचे वास्तव आहे. त्यामुळे अर्थपूर्ण सहजीवनच विश्‍वात्मक समुदायास लाभदायक ठरेल. अशांत व अस्वस्थ वातावरणात मानवता व राष्ट्रीयता फुलत नसते, विकसितही होत नसते. सर्व धर्मात मानवतावादी विचार आहेत, पण आंधळे अनुयायीच खर्‍या धर्माचा पराभव करतात. धर्माचे शुद्ध स्वरूप सर्वांनी समजून घेऊन चांगल्या विचारांची बेरीज करावी. प्रत्येक धर्म प्रेमाचा व शांततेचा संदेश देतो. विश्‍वशांतीसाठी बहुसांस्कृतिक संवाद आवश्यक असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी येथे केले.
    मराठी साहित्य परिषद, सदाशिव पेठ पुणे येथे गुरूवार, जमाअत-ए-इस्लामी हिंद पुणे (कॅम्प)द्वारा आयोजित बहुसांस्कृतिक सद्भाव जागरण सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सकाळ मीडिया ग्रुपचे अध्यक्ष प्रतापराव पवार होते. मंचावर प्रा.अजीज मोहियोद्दीन, डॉ. सय्यद रफिक पारनेरकर, सचिन पवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात कुरआन पठणाने झाली.
    यावेळी प्रतापराव पवार म्हणाले, ”लोक एकत्र येतात तेव्हा एखादा समाज अथवा धर्म वाढत असतो. मात्र त्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली तर समाज किंवा धर्माचा र्‍हास होतो. संघटित झालो तर विचारशक्ती वाढते. प्रत्येक धर्मातील व्यक्तीलादेखील त्याचे आयुष्य चांगले असावे, असे वाटते. म्हणूनच भारताचे भवितव्य उज्ज्वल करण्याची जबाबदारी समाजातील सर्व घटकांची आहे. सर्वधर्मीय एकोपा हा समाजाच्या व देशाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. कारण जगभरातील कोणत्याही धर्माचा सर्वसामान्य माणूस असो, तो चांगला आहे. त्याच्या मनात पाप नाही. मात्र, सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवली तर सर्वांचेच भले होईल. समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी ज्या कोणी व्यक्ती व संस्था झटत आहेत, त्या सर्वांना माझा मनापासून पाठिंबा आहे. त्याच भूमिकेतून मी येथे आलो आहे, असे पवार म्हणाले.”
    डॉ. पारनेरकर म्हणाले, संतांनी व पैगंबरांनी आपल्या वचनांतून मानव जातींचे रक्ताचे नाते वर्णिले आहे; परंतु, माणसे संस्कृती व धर्माला विसरली असून, चंगळवाद बोकाळला आहे. प्रा. अजीज मोहियोद्दीन म्हणाले, ” धर्मा-धर्मातील वादविवाद मिटविण्यासाठी प्रेमाची भाषा उपयुक्त ठरेल.” सचिन पवार म्हणाले, धर्म एकमेकांप्रती बंधुता शिकवितो. म्हणून अल्लाह व ईश्‍वरासमोर आपण समान आहोत, हीच भावना नागरिकांमध्ये असावयास हवी.
    प्रास्ताविक इम्तियाज शेख यांनी केले. सुत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी केले. आभार फरजाना सय्यद यांनी मानले. यावेळी पुणेकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

वो फाकाकश मौत से डरता नहीं जरा
रूहे मुहम्मद उसके दिल से निकाल दो

हॉलंड युरोपचा एक चिमुकला देश, ज्याचा आकार अवघ्या 4 हजार 488 वर्ग किलोमीटर आहे. लोकसंख्या 65.5 लाख आहे. त्यात 10 लाख मुस्लिम आहेत. या देशाच्या एका संसद सदस्याने, ज्याचे नाव ग्रिट विल्डर्स आहे ने येत्या 10 नोव्हेंबरला प्रेषित ह. मुहम्मद सल्ल. यांच्यावर आधारित एक व्यंगचित्र स्पर्धा आयोजित केली होती. जगभरातील समाजमाध्यमांमधून या विरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. अनेक ठिकाणी प्रदर्शने झाली. म्हणून त्याने तूर्त ही स्पर्धा स्थगित केली आहे. पण प्रश्‍न असा उत्पन्न होतो की, विल्डरला अशी स्पर्धा का आयोजित करावीशी वाटली? या आठवड्यात आपण याच गोष्टीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करू.
    जगात प्रेषित हजरत मुहम्मद मुस्तफा सल्ललालहु अलैहि व सल्लम यांचा पराकोटीचा द्वेष करणारे व त्यांच्यावर पराकोटीचे प्रेम करणारे दोघांचीही संख्या कमी नाही. एकीकडे विल्डर आहे, जो प्रेषित मुहम्मद सल्लम. यांना व्यंगचित्राचा विषय समजतो तर दूसरीकडे मायकल हार्ट आहे जो प्रेषित सल्ल. यांना जगातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती समजतो. जगावर प्रभाव टाकणार्‍या शंभर व्यक्तींच्या जीवनावर त्याने लिहिलेल्या ’द हंड्रेड्स’ या पुस्तकामध्ये स्वत: ख्रीश्‍चन असून त्याने प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे नाव पहिल्या क्रमांकावर घेतले आहे. याबाबत विचारणा केली असता तो म्हणाला  की, ”प्रेषित्व मिळाल्यानंतर अवघ्या 23 वर्षात त्यांनी आपल्या प्रयत्नांतून जगावर जो प्रभाव टाकला तो मानवजातीच्या इतिहासात दुसर्‍या कुठल्याही व्यक्तीला टाकता आला नाही. म्हणून ते माझ्या नजरेत सर्वश्रेष्ठ व्यक्ती आहेत”.
काही ठळक घटना
    1. सलमान रूश्दी याने सटॅनिक व्हर्सेस ही कादंबरी लिहून, त्यात प्रेषित सल्ल. यांच्या पत्नीच्या नावाचे काल्पनिक पात्र रचून, मुद्दामहून त्यांची अवहेलना केली. परिणामी, जगभरातून त्याचा विरोध झाला. एकीकडे खोमेनी यांनी त्याच्या हत्येचा फतवा जारी केला तर दूसरीकडे 24 फेब्रुवारी 1989 रोजी या विरोधात प्रदर्शन करणार्‍या मुस्लिमांच्या जमावावर मुंबई पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 12 लोक ठार तर 40जखमी झाले होते. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते.
    2) 30 सप्टेंबर 2005 रोजी ’जेलँड पोस्टन’ नावाच्या डेन्मार्क येथून प्रकाशित होणार्‍या वर्तमानपत्रात प्रेषित सल्ल. यांचे व्यंगचित्र प्रकाशित करण्यात आले. त्याचा जागतिक स्तरावर विरोध करण्यात आला. अनेक देशात हिंसाचार व जाळपोळ झाली.
    3) 7 जानेवारी 2015 रोजी पॅरीस येथून प्रकाशित होणार्‍या ’शारली हेब्दो’ नावाच्या नियतकालीच्या कार्यालयावर काही मुस्लिम तरूणांनी हल्ला करून प्रेषित सल्ल. यांचे व्यंगचित्र काढणार्‍या चित्रकारांची हत्या केली.
    इस्लाम आणि प्रेषित हे मुस्लिमांच्या आस्थेचा अतिशय संवेदनशील विषय आहे. याविरूद्ध कोणीही लिहिले बोलले तरी मुस्लिमांची माथी भडकतात. मग ते मरण्या मारण्यासाठी तयार होतात. याच मानसिकतेतून मग पाकिस्तानमध्ये पंजाबचे राज्यपाल सलमान तासीर यांची 14 जानेवारी 2011 रोजी हत्या होते. तर 2 ऑगस्ट 2007 रोजी हैद्राबादमध्ये तस्लीमा नसरीनवर हल्ला होतो.
    गेल्या 100 वर्षात पश्‍चिमेमध्ये प्रेषित सल्ल. यांच्या विरोधात काढण्यात आलेल्या चित्रपट, पुस्तके व्यंगचित्रे यांची संख्या 60 हजार पेक्षा अधिक आहे. मात्र विडंबना पहा गेल्या 100 वर्षातच पश्‍चिमेमध्ये इस्लामचा जितक्या वेगाने प्रचार झाला व जेवढ्या मोठ्या संख्येने लोकांनी धर्मपरिवर्तन करून इस्लामचा स्विकार केला तेवढे इस्लामच्या स्थापनेपासून कधी झाले नाही.
    आज पृथ्वीच्या पाठीवर असा कुठलाच देश नाही जिथे मुस्लिम नाहीत. ज्या मुठभर लोकांना प्रेषित व्यंग चित्रपटाचा विषय वाटतात त्याच प्रेषित सल्ल. यांच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगणारे 1.75 अब्ज लोक या पृथ्वीवर राहतात.
प्रेषित सल्ल. यांच्या विरोधाची कारणे
    या प्रश्‍नाचा मागोवा घेता खालील कारणे ठळकपणे लक्षात येतात. पहिले कारण म्हणजे प्रत्येक माणसाच्या मनामध्ये स्वच्छंदी जीवन जगण्याची एक सुप्त इच्छा असते. प्रत्येकाला वाटते की मनुष्य जन्म एकदाच लाभतो म्हणून निती-धर्माची सर्व बंधने झुगारून मुक्तपणे जगावे. माणसांच्या या इच्छेच्या आड धर्म येतो म्हणून पश्‍चिमेत धर्माला नाकारण्यात आले व असे लोक स्वत:च्या इच्छेचे गुलाम झाले. पश्‍चिमेत ख्रिश्‍चन धर्माला मानणार्‍यांची संख्या सर्वात जास्त आहे, असा एक समज आहे. तो अतिशय चुकीचा आहे. युरोप आणि अमेरिकमध्ये नास्तीक लोकांची संख्या ही कुठल्याही धर्माला मानणार्‍यांपेक्षा जास्त आहे. येथील बहुतेक लोकांनी जी मुक्त आणि स्वैराचारी जीवन व्यवस्था स्विकारलेली आहे ती धर्माला गाडून स्विकारलेली आहे. आपल्या चंगळवादी जीवनशैलीसाठी अमेरिकेमध्ये लाखो काळे रेड इंडियन्स तर ऑस्ट्रेलियामध्ये लाखो काळे अबोरगिनीजचा वंशविच्छेद करण्यात आलेला आहे. व्याजाधारित अर्थव्यवस्थेचा स्विकार करून गरीब देशात राहणार्‍या कोट्यावधी लोकांचे रक्त शोषले आहे, तेव्हा कुठे युरोप आणि अमेरिकेवर झळाळी आलेली आहे. हे सर्व ख्रिश्‍चन लोकांनी आपल्या धर्म तत्वांच्या विरोधात जावून केलेले आहे.
मुसलमानों को मुसलमां कर दिया तुफान-ए- मगरिब ने,
तलातुम हाय-ए-दरिया ही से है गौहर की सैराबी
    आजमितीला पृथ्वीवर फक्त इस्लामच  एक असा धर्म आहे जो, ”प्रॅक्टिसिंग” आहे. त्याचे श्रेय प्रेषित सल्ल. यांच्या शिकवणीला जाते. कोट्यावधी लोक या उम्मी (निरक्षर) प्रेषित सल्ल. यांना आपल्या जीवनाचा तारणहार मानतात. त्यांनी सांगितल्याप्रमाणे दिवसातून पाच वेळेस नमाज, वर्षातून 30 दिवस उपवास तर सातत्याने हज आणि उमरा करतात. या धार्मिक आचरणातून त्यांना जी ऊर्जा मिळते त्यातून ते स्वैराचारी जीवनापासून लांब राहतात व एक सरळ सदाचारी जीवन जगतात. अमेरिका आणि युरोपमधील दुराचार्‍यांना हेच पाहवत नाही. ज्याप्रमाणे शेपूट कापलेल्या श्‍वानांना झुपकेदार शेपूट असलेल्या श्‍वानाचा हेवा वाटतो त्याचप्रमाणे या दुराचारी लोकांना सदाचारी मुस्लिमांचा हेवा वाटतो. आज जर का मुस्लिमांनी सदाचार सोडून त्यांच्याचप्रमाणे दुराचारी जीवन जगण्याला सुरूवात केली, कमरेचे वस्त्र फेडून डोक्याला गुंडाळले, मुस्लिम महिलांनी बुरखा सोडून बिकीनी घातली तर हेच लोक त्यांचे मोकळेपणे स्वागत करतील.
     येशूख्रिस्त (अलै.) सारख्या अलौकिक प्रेषितांचे वारसदार असलेल्या ख्रिश्‍चन लोकांनी स्वत:च्या हाताने दारू, ड्रग्स, स्वैराचार आणि संगीताला जवळ करून आपले जीवन उध्वस्त करून घेतलेले आहे. मात्र ज्या माणसाच्या शिकवणीवरून जगातील 1.75 अब्ज लोक सदाचारी लोक जगतात ते यांना पाहवत नाही. मग ते आपली कुंठा, व्यंगचित्र, बदनामीकारक साहित्य व चित्रफिती काढून व्यक्त करतात. खरे पाहता असे लोक दयेचे पात्र आहेत. मुस्लिमांनी त्यांचा तिरस्कार न करता, त्यांच्या अशा कृत्यांना हिंसात्मक प्रतिक्रिया न देता एका मानसोपचार तज्ज्ञाप्रमाणे त्यांच्यावर मानसिक उपचार करावेत. जसे की, सटॅनिक व्हर्सेसचे उत्तर, ” इस्लाम अँड कुरआन” नावाचे पुस्तक लिहून डॉ. रफिक जकेरिया यांनी दिले होते. प्रेषित सल्ल. यांच्या शिकवणींना वेगवेगळ्या माध्यमातून या मनोरूग्ण लोकांपर्यंत पोहोचवाव्यात.
    दूसरे कारण असे की, 19 व्या शतकाच्या शेवटच्या काळात युरोप आणि अमेरिकेमध्ये त्यांच्याच जीवन शैलीमुळे महिला घराबाहेर पडल्या, त्यांनी अर्थप्राप्तीस प्राधान्य तर पुत्रप्राप्तीस दुय्यम स्थान दिले. त्यामुळे या लोकांचा जन्मदर घसरला. त्यामुळे पुढे विसाव्या शतकात त्यांना आपली दैनंदिन कामे करण्यासाठी सुद्धा माणसे मिळेनासी झाली. तेव्हा त्यांनी इमिग्रेशन पॉलिसी बदलली व बाहेरील देशातून काम करण्यासाठी माणसे बोलाविली. साहजीकच या संधीचा लाभ मुस्लिमांनी उठविला व मोठ्या संख्येने मुस्लिमांनी युरोप आणि अमेरिकेमध्ये प्रवेश मिळविला. तेथे कष्ट उपसले, तेथील संस्कृती आत्मसात केली मात्र आपला धर्म काही सोडला नाही. परिणामी, त्यांची कुटुंब आणि समाज व्यवस्था मजबूत राहिली मात्र स्वैराचारामुळे युरोप आणि अमेरिकेची स्वत:ची सामाजिक आणि कौटुंबिक व्यवस्था पार मोडकळीस आली. यातून निर्माण झालेल्या न्यूनगंडातून इस्लाम आणि प्रेषितांचा विरोध सुरू झाला.
    तीसरे कारण असे की, पश्‍चिमेमध्ये एक तत्व अवलंबिले जाते ते असे की, जर आपल्याला ’डिफेंड’ करता येत नसेल तर समोरच्याला ’डिफेम’ करा. याच पराभूत मानसिकतेतून स्वत:ला डिफेंड करता येत नसल्यामुळे इस्लाम आणि प्रेषित (सल्ल.)यांना डिफेम करण्याची प्रवृत्ती या लोकांमध्ये बळावली आहे.
    चौथे कारण म्हणजे त्यांना वाटते की, आमची लोकशाही प्रगल्भ आहे आणि आमच्याकडे फ्रिडम ऑफ एक्सप्रेशन आहे. विचार स्वातंत्र्याच्या गोंडस नावाखाली हे लोक आपल्या विकृत मानसिकतेला मोकळी वाट करून देतात. त्यांना चांगल्या पद्धतीने माहित असते की कुठलेही स्वातंत्र्य निरंकुश नसते. त्यांना हे पण माहित आहे की जगाला हे स्वातंत्र्य सर्वप्रथम मुस्लिमांनी मिळवून दिले. इस्लाम पूर्व काळामध्ये कैसर आणि किसरा अर्थात रोमन आणि पार्शियन साम्राज्यात राजाला ईश्‍वर समजले जात असे. हे सम्राट प्रजेकडून आपली पूजा करून घेत. त्यांच्या विरोधात बोलण्याची कोणाची हिम्मत नव्हती. गुलामाची पद्धत रूढ होती. ब्रिटनमध्ये सुद्धा विसाव्या शतकापर्यंत ’किंग कॅन डू नो राँग’ अर्थात राजा चूक करूच शकत नाही, अशी धारणा होती. अशा  शेकडो वर्षाच्या अंधकारमय जगातून माणसाच्या गुलामीतून माणसांना काढून मुस्लिमांनी त्यांना स्वातंत्र्य देण्यासाठी नाईलाजाने हातात तलवार उचलली होती. मुस्लिमांनी केलेल्या या साम्राज्याच्या पाडावानंतरच जगाला विचार स्वातंत्र्य मिळाले. या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास डॉ. भुषणकुमार उपाध्याय आयपीएस यांचे यू ट्यूबवरचे भाषण ऐकावे.
    या लोभी व धर्मभ्रष्ट लोकांना जेव्हा-जेव्हा  पैशाची गरज पडली तेव्हा-तेव्हा स्वत:च्या हाताने यांनी स्वत:चे चर्च विकले. आजही विकत आहेत. अशा चर्चेसच्या अनेक इमारती मुस्लिमांनी विकत घेवून त्यांचे रूपांतर मस्जिदींमध्ये केले. आता युरोप, अमेरिकेमध्ये मस्जिदींची संख्या वेगाने वाढत आहे. मुस्लिमांचा होत असलेला धार्मिक उत्कर्ष आणि आपली होत असलेली अधोगती यातून निर्माण झालेल्या कुंठेतून प्रेषित आणि मुस्लिमांची बदनामी करण्याचे प्रयत्न अधून-मधून होत असतात.
    प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी जगाला एक देणगी दिलेली आहे. ती म्हणजे इस्लामची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, प्रशासकीय तसेच कायदा आणि न्यायाची स्वतंत्र व्यवस्था. याच व्यवस्थेच्या माध्यमातून चार पवित्र खलीफांनी 30 वर्षे, त्यानंतर अब्बासी खलीफांनी 700 वर्षे, उस्मानी खलीफांनी 623 वर्षे, तातारी (मोगल) आदी वंशाच्या लोकांनी मिळून पृथ्वीच्या मोठ्या भूभागावर 1 हजार वर्षे शासन केलेले आहे. युरोप आणि अमेरिकेच्या लोकांना याचीच भिती वाटते. त्यांना माहित आहे त्यांच्याकडे खरी लोकशाही व्यवस्था आहे. याच व्यवस्थेचा लाभ उठवून मुस्लिम जर सत्तेवर काबिज झाले तर आपल्या हातात काही राहणार नाही. या भितीतूनच इस्लाम आणि प्रेषित सल्ल. यांची बदनामी करण्याची हुक्की अधूनमधून या लोकांना उठत असते.
    त्यांना माहित आहे, इस्लाम पूर्णपणे प्रेषित सल्ल. यांच्यावर अवलंबून आहे. कुरआन सुद्धा त्यांच्याच माध्यमाने मिळाला  असल्याचा दावा मुस्लिमांचा आहे. म्हणून त्याच प्रेषित सल्ल. यांना बदनाम केल्यास मुस्लिम त्यांच्यापासून दुरावतील या आशेवरून सुद्धा हे लोक प्रेषित सल्ल. यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात.
    विल्डरने व्यंगचित्राची स्पर्धा भरविली. टेरिस जोन्स या इस्लामोफोबियाग्रस्त पाश्‍चरने 2010 मध्ये फ्लोरिडा येथे सार्वजनिक ठिकाणी कुरआन जाळण्याची घोषणा केली होती. अर्थात त्याला तसे करता आले नाही ही गोष्ट अलाहिदा. परंतू, असे प्रयत्न अधूनमधून होतच असतात, यात नवीन काही नाही.
--- उपाय ---
    कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ” आम्ही तर अशाच प्रकारे सैतानी प्रवृत्तीच्या मानव व जिन्न यांना प्रत्येक प्रेषितांचे शत्रू बनविले आहे. जे एकमेकांपाशी तोंडपूजलेपणा, धोकेबाजी व फसवणूक करीत राहिले आहेत. जर तुमच्या पालनकर्त्याची अशी इच्छा असते की, ते लोक असे करू नयेत तर त्यांनी तसे कधीही केले नसते. म्हणून तुम्ही त्यांना त्यांच्या स्थितीत सोडून द्या, की ते कुंभाड रचत राहतील” (सुरे अलअनाम : आ.क्र. 112).   
    दूसर्‍या ठिकाणी म्हटलेले आहे की, ” हे पैगम्बर (सल्ल.)! आम्ही तर अशाच प्रकारे गुन्हेगारांना प्रत्येक पैगंबराचे शत्रू बनविलेले आहे आणि तुमच्यासाठी तुमचा पालनकर्ता, मार्गदर्शन आणि सहाय्य करण्यासाठी पुरेसा आहे.” (सुरे : फुरकान आयत नं.31).
    प्रेषित सल्ल. यांनीसुद्धा म्हटलेले आहे की, ”एक वेळ अशी येईल की, पृथ्वीवरील प्रत्येक कच्चा किंवा पक्क्या घरात इस्लामच्या शिकवणी दाखल होतील. मग ते त्या शिकवणींना सन्माने स्विकारो की नाईलाजाने.” (संदर्भ : तर्फे हजरत मिकदार राजी, मस्नद अहेमद).
इस्लाम की फितरत में कुदरत ने लचक दी है
इसे जितना दबाओगे ये उतना उभरता है
    वरील दोन आयातींवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, सर्वच प्रेषितांना त्यांच्या जीवंतपणी व त्यांच्या नंतर सुद्धा त्रास देणारे लोक आहेत. त्यामुळे कोणी व्यंगचित्र काढून प्रेषित सल्ल. यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असेल तर यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काही नाही. असे लोक हे मार्गभ्रष्ट लोक आहेत. अशा घटनांचा हिंसक विरोध करणे हा काही उपाय होऊ शकत नाही. त्यासाठी मुस्लिमांतील उलेमा व बुद्धीजीवींनी जगाच्या प्रत्येक प्रमुख भाषेतून इस्लामच्या शिकवणी या मुस्लिमेत्तर बंधूंपर्यंत प्रभावी पद्धतीने पोहचवाव्यात. त्यासाठी उपलब्ध व प्रचलित माध्यमांचा भरपूर उपयोग करावा. तेव्हा कुठे इस्लामचा खरा संदेश  व सत्य परिस्थिती लोकांच्या लक्षात येईल.  तूर्तास या विषयाचा सखोल अभ्यास करू इच्छिणार्‍यांना मी अभ्यासासाठी खालील पुस्तके वाचण्याची शिफारस करत आहे. 1. खिलाफत और मुलूकियत (लेखक : सय्यद अबुल आला मौदूदी), 2. अल जिहाद फिल इस्लाम (लेखक : सय्यद अबुल आला मौदूदी), 3. इस्लामी सियात (लेखक : सय्यद अबुल आला मौदूदी) 4. इस्लाम दौरे जदीद का खालेक (लेखक: मौलाना वहिदुद्दीन खान), 5. गॉड रायजेस (लेखक: मौलाना वहिदुद्दीन खान) 6. इस्लाम अँड कुरआन (लेखक : डॉ. रफिक जकेरिया).
    शेवटी वाचकांच्या लक्षात एकच गोष्ट आणून देतो की, युरोपमधील अनेक देशात  होलोकॉस्ट अर्थात 1940 ते 45 या कालावधीत हिटलरने केलेला 60 लाख ज्यूंचा नरसंहार यावर टिका करणे फौजदारी गुन्हा मानला जातो. कारण त्यामुळे जगातील 1 कोटी 20 लाख ज्यू लोकांच्या धार्मिक भावना दुखावतात. त्याच न्यायाने जगाने 1 अब्ज 75 कोटी मुस्लिमांच्या भावनांचा विचार का करू नये?

मुस्लिम समाज आरक्षण संघर्ष समितीचा निर्धार


उस्मानाबाद (शोधन सेवा) -  मुस्लिम समाज आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहामध्ये शनिवारी आरक्षण परिषद घेण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी मुस्लिम आरक्षणाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त केला.
    आरक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी  खा. हुसेन दलवाई होते. यावेळी मंचावर आ़ आरेफ नसीम खान, आ़ बाबाजानी दुर्राणी, नवाब मलिक, युसुफ अब्राहानी, आ़ आबु आसीम आझमी, आ़ ख्वॉजा बेग, आ़ डॉ़ वजाहत मिर्झा, स्वागताध्यक्ष आ़ राणाजगजितसिंह पाटील, आ़ राहुल मोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
    यावेळी अध्यक्षीय भाषणात खा. हुसेन दलवाई म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात मुस्लिम समाजाला आरक्षण दिले होते. परंतु, सत्तांतर झाल्यानंतर विद्यमान सरकारने मुदतीमध्ये निर्णयाचे कायद्यात रूपांतर केले नाही.  दरम्यानच्या काळात या आरक्षणाला न्यायालयामध्ये आव्हान दिले गेले. शिक्षणातील 5 टक्के आरक्षण न्यायालयानेही कायम ठेवले. मात्र, या सरकारने मुस्लिमांना धर्माच्या नावावर आरक्षण देता येत नाही, असे सांगत ही मागणी थंडबस्त्यात गुंडाळली. यानंतर मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरला. परंतु, हे सरकार आरक्षण देण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे अशा मनुवादी लोकांचे सरकार घालवल्याशिवाय मुस्लिमांना आरक्षण मिळणे शक्य नाही, असेही खा. दलवाई म्हणाले. सरकारने मुस्लिम समाजाच्या आरक्षण प्रश्‍नाकडे कितीही डोळेझाक केली तरी आम्ही आता गप्प बसणार नाही आहोत. यापुढेही वेगवेगळी आंदोलने केली जातील. परंतु, ती शांततेच्या मार्गाने, केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
    आमदार अबू आसीम आझमी म्हणाले, मुस्लिम समाजाच्या मागासलेपणाला विद्यमान सरकारसोबतच काँग्रेसप्रणित युपीए सरकारही जबाबदार आहे. काँग्रेसच्या सरकारने राज्यातील मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय  2014 मध्ये  घेतला होता. निर्णयानंतर लागलीच त्याचे कायद्यात रूपांतर केले असते तर भाजपाला आरक्षण रद्द करण्याची संधी मिळाली नसती. सध्याचे सरकार मुस्लिमांना सहजासहजी आरक्षण देणार्‍यांतील नाही. त्यामुळे आपणाला दबाव वाढवावा लागेल. परंतु, तो शांततेच्या मार्गाने. आंदोलनाची दिशा योग्य असावी, यासाठी राज्यस्तरावर एक समिती स्थापन करावी, असा सल्लाही त्यांनी दिला. आंदोलनावेळी जे कोणी सोबत येतील, जे पाठींबा देतील त्यांचा पाठींबा घेतल्यास आरक्षण चळवळ अधिक व्यापक आणि सक्षम होईल, असेही ते म्हणाले. सध्याचे सरकार हिंदू-मुस्लिमांमध्ये दरी निर्माण करून  राजकारण करीत आहे. भाजपाचा हा डाव हाणून पाडणे गरजेचे आहे. हिंदू-मुस्लिम एकोपा वाढविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. तरच सरकारचे मनसुबे उधळून लावण्यात आपण नक्कीच यशस्वी होऊ, असेही आ. आजमी यांनी नमूद केले.
    आ़ डॉ़ वजाहत मिर्झा म्हणाले, मुस्लिम समाजाला धर्माच्या नावावर आरक्षण मिळाले नव्हते तर ते मागासलेपणाच्या निकषावर देण्यात आले होते. आणि धर्माच्या नावावर आरक्षण देण्याची घटनेतही तशी तरतूद नाही. परंतु, सध्याचे  हे सरकार ‘धर्माच्या नावावर आरक्षण देता येत नाही’, असे म्हणत मुस्लिम समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत असल्याचा आरोपही डॉ. मिर्झा यांनी केला.
    यावेळी प्रा़ इलियास इनामदार, विश्‍वास शिंदे, डॉ़स्मिता शहापूरकर, इक्बाल अन्सारी, अ‍ॅडफ़रहत बेग, मोहसीन खान, सक्षणा सलगर यांच्यासह राज्यभरातील प्रतिनिधींनी आपली मते मांडली़ परिषदेसाठी  कादर खान, शमियोद्दीन मशायक, मसूद शेख, खलिफा कुरेशी, बिलाल तांबोळी, असद पठाण यांच्यासह मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे पदाधिकारी व समाजबांधवांनी परिश्रम घेतले.
    आपण गप्प बसून चालणार नाही..
     विद्यमान सरकार मुस्लिम समाजाला आरक्षण देईल, अशी अपेक्षा नाही. त्यामुळे आपण गप्प बसून चालणार नाही. तर जे सरकार आपला आवाज ऐकून घेईल, त्यांना संधी देण्याची गरज आहे. अशा सरकारवर रंगनाथन मिश्रा समितीने दिलेला अहवाल लोकसभेच्या पटलावर मांडण्यासाठी दबाव आणा. याही सरकारने काही केले नाही तर दुसर्‍या सरकारला करावे लागेल. या माध्यमातून आपणाला ‘दोस्त कोण आणि शत्रू कोण’ हे कळण्यास मदत होईल, असे नवाब  मलिक यांनी नमूद केले.
शांततेच्या मार्गाने लढा सुरू ठेवावा...
    सच्चर समिती, रंगनाथ मिश्रा आयोग, मेहमुद उर रहेमान समितीने मुस्लिम समाजाच्या परिस्थितीचा अभ्यास केला. अहवालातून मुस्लिम समाज मागास असल्याचे स्पष्ट झाले. याच आधारावर मागील सरकारने 5 टक्के आरक्षणही दिले. परंतु,  सरकार बदलल्यानंतर आरक्षण रद्द झाले. असे असले तरी मुस्लिम समाजाने आरक्षणासाठीचा लढा सुरूच ठेवावा. मात्र आंदोलने शांततेच्या मार्गाने करावीत, असे आवाहन आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी केले.
नागपूरच्या इशार्‍यावर चालणारे सरकार...
    मुस्लिमांना आघाडी सरकारने आरक्षण दिले. परंतु, नागपूरच्या इशार्‍यावर चालणार्‍या विद्यमान सरकाने ते रोखून धरले. प्रत्येक अधिवेशनात मुस्लिम, मराठा आरक्षणावर चर्चा केली. परंतु, ‘गुंगी’ सरकार गप्पच आहे. दिल्ली आणि महाराष्टलातील सरकार एकाच विचाराने काम करीत आहे. ‘तारीख पे तारीख’ देण्यापलिकडे यांचे काहीच काम नाही. ‘युपीए’ सरकारने मुस्लिम समाजासाठी सुरू केलेल्या बहुतांश योजना विद्यमान सरकारने थंडबस्त्यात गुंडाळल्याचा आरोप आमदार आरेफ नसीम खान यांनी केला.
आरक्षणासाठी समाजाच्या
भक्कम पाठींब्याची गरज
    मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आरक्षण समितीच्या माध्यमातून मागील चार वर्षामध्ये जेलभरो, रेलरोको, जलसमाधी यासोबतच अन्य प्रकारची आंदोलने केली. परंतु, विद्यमान सरकारकडून या आंदोलनाची अद्याप दखल घेतली गेली नाही. येणार्‍या काळातही समितीच्या वतीने राज्यभरात आंदोलने केली जातील. मात्र, ही आंदोलने समाजाच्या भक्कम पाठींब्याशिवाय यशस्वी होणार नाहीत, असे आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष अजीज पठाण म्हणाले. येणार्‍या काळात आरक्षणाचा लढा अधिक तीव्र आणि व्यापक करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.
    आरक्षण परिषदेस महाराष्ट्रातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुस्लिम अभ्यासक सरफराज अहमद यांचं ‘मध्ययुगीन मुस्लिम विद्वान’ हे पुस्तक नुकतंच लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित झालं आहे. मध्ययुगीन इतिहासाच्या आजवर कधीही  चर्चिल्या न गेलेल्या बाजूवर हे पुस्तक प्रकाश टाकतं. अनेक मुस्लिम विद्वांनाचा परिचय करून देतं. पुस्तकाला मुस्लिम अभ्यासक दिवंगत प्रा. फकरूद्दीन बेन्नूर यांनी लिहिलेल्या  प्रस्तावनेचा हा संपादित अंश...
भारतात आणि महाराष्ट्रात इतिहास हा अभ्यासाचा विषय नसून जाती-जमातींचे एकमेकांवर कुरघोडी करण्याचे आणि सूड उगवण्याचे साधन बनलेला आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या काळातच इतिहास हा अ‍ॅकेडमिक विषय राहिला नाही. ज्या पद्धतीने पाश्चात्य देशात मोठ मोठे इतिहासकार, उदाहरणार्थ विल ड्युरांडसारखे इतिहासकार होऊन गेले. त्यांनी इतिहासाचे तत्त्वज्ञान  विकसित केले. केवळ पाश्चात्य देशातच नव्हे, तर पौर्वात्य देशातदेखील इब्ने खल्दूनसारखे इतिहासकार झाले. त्याने इतिहासाच्या तत्त्वज्ञानाची मांडणी केली. जगाच्या इतिहासाचे टप्पे पाडले. त्याच्या लिखाणाचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणावर पाश्चात्य इतिहासकारांवर पडला आहे. इतिहासाचे तत्त्वज्ञान असते, याची जाणीव इब्ने खल्दूनने पाश्चात्य जगाला करून दिली.  असे म्हटले जाते की, इतिहासलेखनाची परंपरा भारतात नव्हतीच, ती मुस्लिम इतिहासकारांनी निर्माण केली.
मुहम्मद गझनीबरोबर आलेला इतिहासकार अल् बेरूनी याने पहिल्यांदा भारताच्या इतिहासाचे टप्पे पाडले. राजकीय इतिहासाबरोबरच सामाजिक इतिहास त्याने लिहिला. लोकांच्या रूढी, परंपरा, चालीरीती एकत्रित केल्या. त्याचे लेखन इतिहासलेखनाचा एक आदर्श मानला जातो. ‘अल् बेरूनीचा भारत’ (किताबुल हिंद) या नावाने तो प्रसिद्ध आहे. मुस्लिम राज्यकर्त्यांनी इतिहासकार, तवारीखकार यांची टीमच बाळगलेली होती. दैनंदिन व्यवहारापासून युद्धाच्या घटना याची नोंद मुस्लिम इतिहासकारांच्या ग्रंथात आढळते.
सल्तनतकाळात जियाऊद्दीन बरनी, अमीर खुसरोंसारखे इतिहासकार होऊन गेले. अभ्यासकांनी भारताचे समाजशास्त्र त्यातूनच निर्माण केले आहे. अर्थात तवारिखकारांचा इतिहास हा  पक्षपाती असला तरी तो इतिहासाचा फार मोठा खजिना मानला जातो. आधुनिक अभ्यासक प्रा. मुजीब, डॉ. इरफान हबीब यांनी त्याचा अभ्यास केला आहे. इरफान हबीब यांनी  इतिहासातील अनेक भ्रम मोडीत काढले आहेत. प्रा. मुजीब यांचा ‘इंडियन मुस्लिम’ हा महाग्रंथ, मुस्लिम भारतात आल्यापासूनचा इतिहास आपल्यासमोर ठेवतो. भारतातील मुसलमानांचे  आचारविचार, त्यांचे जगणे, त्यांनी निर्माण केलेले सण, उत्सव यांचा तो अभ्यास आहे.
भारतात बिगर मुस्लिम इतिहासात इतिहासकार, राज्यकर्त्यांचे केवळ गुणगान करणारे लेखन करत असत. भारतीय इतिहास भाटगीरीने बनला आहे. उदाहरणार्थ विजयनगरच्या लढायात  तुंगभद्र किंवा गोदावरी यांच्या खोऱ्यातील सुपीक जमीन बळकावण्याची भूमिका काय असावी, याचा अभ्यास अजून झालेला नाही. त्याला बिगर मुस्लिम इतिहासकारांनी हिंदू आणि  मुस्लिम यांच्या शत्रुत्वाचे रूप दिले आहे. म्हणून असे म्हणता येईल की, मध्ययुगातच भारताचा इतिहास हा जमातवादी झाला. वास्तविक बिगर मुस्लिम इतिहासकारांनी इतिहासाचे  विकृतीकरण केले. या सर्व गुंतागुंतीत शास्त्रीय पद्धतीने इतिहास तयार करण्याचा प्रयत्न होतो आहे.
इतिहासाच्या मांडणीबद्दल असे म्हणता येईल की, अगदी प्राचीन काळापासूनच इतिहास सत्ता प्राप्त करण्याचे साधन बनलेले आहे. उदाहरणार्थ प्राचीन काळापासून पक्षपाती लिखाण  भारतात दिसून येते. रिचर्ड इटन यांनी ‘अल् हिंद’ या पुस्तकातून अशा प्रकारच्या इतिहासलेखनाची समीक्षा केलेली आहे. असे म्हटले जाते की, मुस्लिम राज्यकर्त्यांच्या काळातील  इतिहास हा केवळ बाटवाबाटवीचा आहे. रिचर्ड इटन यांनी मुस्लिम राज्यकर्त्यांचे राजकारण बाटवाबाटवीचे कसे नव्हते, हे लिहिले आहे. मुळात ब्राह्मणी सत्ता एवढी शक्तिशाली होती  की, तिचा मुकाबला करणे अवघड होते. मुस्लिम राज्यकर्त्यांचा तो उद्देशदेखील नव्हता. मुस्लिम राज्यकर्ते ज्या भागामध्ये मागास जनता आहे दारिद्रय आहे अशा भागामध्ये गेले आणि  त्यांनी विकासाचे प्रयत्न केले. उदाहरणार्थ बंगालच्या खाडीमधील दलदल त्यांनीच बुजवली. धुमाकूळ घालणाऱ्या वाघांचा बंदोबस्त केला. स्थानिकांवर औषधोपचार केले. मुस्लिम राज्यकर्त्यांबरोबर आलेले साधू, संतांनी त्या भागामध्ये आपल्या झोपड्या टाकल्या. त्यांनीच तेथील लोकांना शेतीची कला शिकवण्यास सुरुवात केली. कालांतराने तिथल्या काही जमातींनी  इस्लाम धर्माचा स्वीकार केला. या उलट युरोपियन इतिहासकारांचा ‘उद्देश प्रोजेक्ट’ निराळा होता.
इस्लामच्या उदय आणि विस्तारामुळे स्पेन व इतर युरोपियन देशात जी पोपची सत्ता  आणि रोमन साम्राज्य पसरले होते. त्यांना धोका निर्माण झाला. म्हणून त्यांनी प्रेषित मुहम्मद (स) साहेबांविरुद्ध सुडाचे लिखाण केले. खोट्यानाट्या कहाण्या लिहिल्या. कारेन आर्मस्ट्राँग  यांनी ‘मोहम्मद’ या पुस्तकात त्याची चर्चा केली आहे. कुरआनाचे अवतरण झाल्यापासून बायबलमधील मिथके वापरून प्रेषित मुहम्मद (स) तोतया (?) होते. कुरआनातील समीकरणे  भ्रष्ट नक्कल आहेत. अल्लाहने म्हणजे परमेश्वराने येशू खिस्त, मोझेस यांनाच पाठवले होते, अशा प्रकारचे भरपूर लिखाण केलेले दिसून येते. हा संघर्ष पेटवल्यामुळे युरोपात क्रूसेड धर्मयुद्ध) झाले.
तेव्हा इतिहास हा सरळ कधीच नसतो. भारतातदेखील चातुवर्ण, मनुस्मृती यांच्याप्रमाणे समाज घडवून गुलामगिरी वाढवण्यासाठी इतिहासाचा वापर केला गेला. थोडक्यात  इतिहासाचे स्वरूप असे आहे. इतिहासात वस्तुनिष्ठता आणि तत्त्वज्ञानाऐवजी त्यांनी जातीय व्यवस्था भक्कम केली. यातून भारतात अस्पृश्यतेचा पाया घातला गेला.
औद्यौगिक क्रांतीनंतर राष्ट्रवादाची मांडणी सुरू झाली. इतिहास त्या राष्ट्रापुरताच मर्यिादत करण्यात आला. राष्ट्रवादाने स्वकीय आणि परकीय असे भेद पाडले. ज्यांना परकीय मानले  त्यांना हाकलून देण्याचे प्रयत्न केले. भारतात मुस्लिमांसारख्या जमाती आलेल्या होत्या. त्या सर्वांची शत्रूपक्षात गणना केली.
पाश्चात्त्य इतिहासकार आणि ब्रिटिश साम्राज्यवादी इतिहास लेखकांनी मुस्लिमासंबंधी जी साचेबंद समीकरणे तयार केली होती, त्यामुळे खूपच गुंतागुंत निर्माण झाली आहे. खुद्द मुस्लिम  विचारवंत, राजकारणी आणि त्यांचे धर्मगुरू यांनीही परस्परविरोधी आणि मोठ्या प्रमाणावर ‘जमातवादी दृष्टिकोन’ स्वीकारून केलेल्या लिखाणामुळेही असे घडले आहे. त्याचबरोबर गेल्या  दोन-तीन दशकांत इस्लाम संबंधाने आणि विशेषत: भारतीय मुसलमानांसंबंधाने नव्या माहितीच्या आधारे केले गेलेले लिखाण प्रकाशित होत आहे. इस्लाम आणि मुसलमान यांच्या  संबंधाने लिहिणारे जे इतिहासकार आणि अभ्यासक आहेत, त्यांच्यावर परस्परविरोधी प्रभाव आहेत. तसेच त्यांचे हेतू आणि प्रेरणाही समान आणि तटस्थ नाहीत.
१८१५-१६ साली भारतात येणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी जेम्स मिलने इंग्लंडमध्ये बसून इतिहासलेखन केले. त्याच वेळी ब्रिटिश इतिहासकारांनीदेखील अशाच प्रकारचे  लिखाण केले होते. तर ईस्ट इंडिया कंपनीने वेळोवेळी इंग्लंडला पाठवलेल्या अहवालाच्या सहाय्याने ‘ब्रिटिश इंडियन हिस्टरी’ हे पुस्तक लिहिले गेले. मिल् हा ब्रिटिश साम्राज्यवादाचा प्रतिनिधी होता. भारतीय लोक भित्रे, नामर्द, असत्य बोलणारे, नीतीमत्तेची चाड नसणारे आणि कमजोर असल्यामुळे त्यांच्यावर सर्वाथाने श्रेष्ठ असणाऱ्या ब्रिटिशांचे राज्य कसे श्रेयस्कर  आहे, हे दाखवण्याचा त्याचा उद्देश होता. (चौसाळकर, इतिहासाची जमातवादी मांडणी आणि राष्ट्रीय एकात्मता, पान-३) जेम्स मिल् यांचे मत होते की, कोणत्याही संस्कृतीचे नीट  आकलन लांब बसून आणि अनुवादित ठांथांवरून होऊ शकते. मिल् यांची सांस्कृतिक अस्मितेची (आयडेंडीटीज) संकल्पना, भूतकाळातील संबंध आणि इतिहासकारांची भूमिका यासंबंधीचे  त्याचे जे मत होते, त्यावर आधारित होती.
आपल्या स्वत:च्या आकलनानुसार त्याने भारतात परस्परांपासून पूर्णपणे भिन्न असलेल्या दोन लोकसमुदायांचे स्वायत्त अस्तित्व गृहीत धरले आणि हिंदु-मुसलमानातील समाजरचना, शासनपद्धती, कायदे, धर्म, कला, वगैरेंची तुलना करून हे दोन्ही लोकसमुदाय एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न कसे आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न केला. भारतीय इतिहासाची विभागणी  त्याने धर्मानुसार केली. प्राचीन हिंदू इतिहास, मध्ययुगीन मुसलमानी इतिहास आणि आधुनिक ब्रिटिश इतिहास अशी विभागणी केली. अशा प्रकारे, जेम्स मिल् याने भारतातील हिंदू  आणि मुस्लिम एकमेकांपासून भिन्न असून धर्मामुळे ते एकसंघ (मोनोलिथ) झालेले आहेत, अशी मांडणी केली. यातून हिंदू आणि मुस्लिम लोकसमुदायांचे ‘मोनोलिथायझेशन’ तयार झाले. भारताचा प्राचीन इतिहास हा हिंदू इतिहास आहे आणि मध्ययुगीन इतिहास हा मुस्लिम इतिहास आहे हा भ्रम प्रस्थापित झाला. आधुनिक इतिहासाला मात्र त्याचे धार्मिकीकरण न  करता ‘ब्रिटिश इतिहास’ असे म्हटले गेले. हीच कालगणना नंतरच्या सर्व इतिहासकारांनी स्वीकारली आणि इतिहासाचे जमातवादीकरण झाले.
एलियट आणि डाऊसन यांनी भारतीय इतिहासाला पूर्णपणे जमातवादी वळण देऊन भारताचा इतिहास हिंदू-मुस्लिमांच्या ‘शत्रुत्वाचा इतिहास’ म्हणून पुढे आणला. इतिहासाचे पद्धतशीर विकृतीकरण करून त्यांनी दाखवले की, भारताचा इ.स. १००० पासून १९१७ पर्यंतचा इतिहास हा हिंदू आणि मुसलमानांच्या धार्मिक संघर्षाचा इतिहास आहे. त्यांनी असे स्पष्ट लिहिले  आहे की, या इतिहासाचे परिशीलन केल्यानंतर हिंदूंच्या लक्षात येईल की, मुसलमानी अंमलात हिंदूंवर फार मोठ्या प्रमाणात अत्याचार होत होते. त्यांनी असेही मत व्यक्त केले आहे  की, भारतात हिंदू आणि मुसलमान ही दोन स्वतंत्र राष्ट्रे आहेत आणि मुसलमान परकीय आक्रमक आहेत. एलियट आणि डाऊसन यांनी स्वत:ला सोयीचे वाटतील असे उतारे निवडले.  त्यामुळे लोकांमध्ये जातीय आणि धार्मिक पूर्वग्रहांचा प्रसार झाला. या संदर्भात प्रा. मुहम्मद हबीब यांनी लिहिले आहे की, ब्रिटिश सरकारच्या शिक्षण खात्यानेही याच मताचा पुरस्कार  करणारी पाठ्यपुस्तके अनेक पिढ्यांच्या माथी मारली. हिंदू व मुसलमान यांना एकमेकांचे शत्रू म्हणून त्यात रेखाटले.
रॉबर्ट ओर्मे या ईस्ट इंडिया कंपनीच्या इतिहासकाराने साऱ्या मोघलांचा इतिहास औरंगजेबच्या कृत्यांच्या चष्म्यातून लिहिला आहे. मोघलांनी देवळे उद्ध्वस्त केली, जिझिया कर लादला  यावरच त्याने भर दिला. गिबनच्या इतिहास लेखनाचे प्रभाव ब्रिटिश इतिहासकारावर होते. जेम्स मिलने भारताच्या इतिहासाचे वर्णन गिबनच्या मूल्यमापनावरून घेतलेले होते. गिबननेच  मुस्लिम हे इतरांपासून पूर्णपणे भिन्न असणारे लोक आहेत, हे लिहून ठेवले होते. विल्यम जोन्स याने गिबनचे अनुकरण करूनच प्राचीन भारतीय हा हिंदूंचा स्वतंत्र इतिहास आहे, अशा  अर्थाचे लिखाण केले आणि हिंदू सभ्यतेचा ऱ्हास हा मुस्लिम अंमलाखाली झाला, असे लिहून ठेवले.
थॉमस मॉरिस हा ब्रिटिश इतिहासकार पूर्णपणे मुस्लिमविरोधी होता. त्याने मुस्लिम राज्यकर्त्यांचे अतिरेकी वर्णन करणारे लिखाण केले. मुस्लिम राज्यकर्त्यांना विश्वासघातकी, लुटालूट  करणारे, भ्रष्ट आणि अमानुष अशी विशेषणे लावली. ते केवळ पिपासू वृत्तीचे होते त्यांच्याकडे कोणतेही शहाणपण नव्हते ते अनुदार असल्याचा इतिहास मॉरिसने लिहिला. त्याने १८०२  मध्ये भारताचा इतिहास अशा प्रकारे अतिरंजित पद्धतीने रचला होता.
ब्रिटिश वसाहतकालीन इतिहासकारांचे वैशिठ्य म्हणजे त्यांनी भारताच्या इतिहासाचे विश्लेषण ‘हिंदू-मुसलमानांच्या धार्मिक संघर्षाच्या चष्म्यातून’ केले. विल्यम् हंटर याने भारतीय  मुसलमानांच्या इतिहास म्हणून जो काही इतिहास लिहिला आणि त्यांच्या परिस्थितीचे वर्णन केले त्यामधूनच मुस्लिम अलगतावादाचा उदय झाला त्याअर्थाने विल्यम हंटर हा  द्विराष्ट्रवादाच्या सिद्धान्ताचा जनक असे म्हणता येईल. (मुहम्मद दिलावर हुसेन, सेन्च्युरी इंडियन हिस्टोरिकल राईटिंग इन इंग्लिश, पान-११२) त्याने केवळ बंगाली मुसलमानांची  उदाहरणे घेऊन मुसलमानांवर होत असलेल्या अन्यायाचे एकांगी चित्रण केले होते. नेमके तेच चित्रण अलगतावादाचे बीज ठरले. एलफिन्स्टन् यांनी ‘फोडा आणि राज्य करा’ या  ब्रिटिशांच्या धोरणाचा जाहीरपणे पुरस्कार केलेला होता. सर्व ब्रिटिश इतिहासकारांच्या इतिहास लेखनाचा हाच मुख्य दृष्टिकोन होता.

-प्रा. फकरुद्दीन बेन्नूर

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget