Halloween Costume ideas 2015

अन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(१३४) जो कोणी केवळ ऐहिक लाभाचा इच्छुक आहे त्याला माहीत असावे की अल्लाहजवळ ऐहिक लाभदेखील आहे आणि परलोकचा लाभसुद्धा. आणि अल्लाह सर्वकाही ऐकणारा व  सर्वकाही पाहणारा आहे.१६३
(१३५) हे श्रद्धावंतांनो! न्यायाचे ध्वजवाहक बना१६४ आणि अल्लाहसाठी साक्षीदार बना,१६५ यद्यपि तुमच्या न्यायाचा व तुमच्या साक्षीचा आघात तुम्हा स्वत:वर अथवा तुमच्या  आईबापावर व नातेवाईकांवर जरी होत असेल तरीदेखील! मामल्यातील पक्षकार मग तो श्रीमंत असो अथवा गरीब, अल्लाह तुमच्यापेक्षा जास्त त्यांचा हितिंचतक आहे. म्हणून आपल्या मनोवासनेच्या अनुकरणात न्यायापासून दूर राहू नका आणि जर तुम्ही पक्षपाताची गोष्ट बोललाच अथवा सत्याला बगल दिली तर समजून असा की जे काही तुम्ही करता अल्लाहला  त्याची माहिती आहे.
(१३६) हे श्रद्धावंतांनो! श्रद्धा ठेवा१६६ अल्लाहवर आणि त्याच्या पैगंबरावर आणि त्या ग्रंथावर जो अल्लाहने आपल्या पैगंबरावर उतरविला आहे आणि प्रत्येक त्या ग्रंथावर जो यापूर्वी त्याने  उतरविला आहे. ज्याने अल्लाह आणि त्याचे दूत व त्याचे ग्रंथ आणि त्याचे पैगंबर आणि अंतिम निवाड्याच्या दिवसाला (परलोक) नाकारले (कुफ्र),१६७ तो मार्गभ्रष्टतेत भरकटून फार दूर निघाला.




१६३) सामान्यत: कायद्याविषयी वर्णन केल्यानंतर आणि मुख्यत्वे सभ्यता आणि संस्कृतीच्या त्या क्षेत्राच्या सुधाराकडे जोर दिल्यानंतर जिथे मनुष्य स्वभावत: अत्याचार व अन्याय  करतो; अल्लाह या प्रकारच्या काही प्रभावकारी वाक्यांत एक संक्षिप्त् उपदेश अवश्य देतो. याने अभिप्रेत आहे की लोकांना त्या आदेशपालनासाठी तयार केले जावे. वर स्त्री आणि अनाथ  बालकांशी न्यायोचित व्यवहार करण्याचा आदेश दिला आहे. म्हणून आता उचित समजण्यात आले की ईमानधारकांच्या मनावर काही गोष्टी जरूर बिंबवाव्यात.
(१) म्हणजे तुम्ही या गफलतीत बिलकुल राहू नका की एखाद्याच्या भाग्याला बनविणे आणि बिघडविणे तुमच्या हातात आहे. तुम्ही त्याच्याकडे लक्ष देणे बंद केले तर तो निराधार  होईल आणि त्याचा कोठेच ठिकाणा राहणार नाही. नाही! तुमचा आणि त्याचा तसेच सर्वांच्या भाग्याचा स्वामी अल्लाह आहे आणि अल्लाहजवळ त्याच्या एखाद्या दासाच्या मदतीसाठी  तुम्ही एकटेच साधनमात्र नाही. पृथ्वी आणि आकाशांच्या स्वामीचे संसाधने अथांग आहेत. अल्लाह आपल्या संसाधनाशी योग्य काम घेणे चांगले जाणतो.
(२) हे आहे की तुम्हाला आणि तुमच्यासारख्या मागील सर्व पैगंबरांच्या अनुयायींना नेहमी हाच आदेश दिला गेला आहे, की अल्लाहच्या कोपाचे भय बाळगून काम करत राहा. या  आदेशपालनात तुमची स्वत:ची सफलता आहे; अल्लाहचा काही एक लाभ नाही. जर तुम्ही त्याविरुद्ध आचरण ठेवाल तर मागील लोकसमुदायांनी अल्लाहची नाफरमानी करून त्याचे काय  नुकसान केले तर आता तुम्ही कराल? सृष्टीनिर्माता आणि शासक अल्लाहला पूर्वीसुद्धा कोणाचीच पर्वा नव्हती आणि आता तुमचीही पर्वा नाही. त्याच्या आदेशांचे तुम्ही आज्ञापालन केले  नाही तर तो तुम्हाला बाजूला सारून दुसऱ्या लोकसमुदायाला या कामासाठी नियुक्त करील आणि तुम्ही बाजूला होण्याने अल्लाहच्या साम्राज्यातील शोभा किंचितही फिकी पडणार नाही.  (३) म्हणजे अल्लाहजवळ या जगातील लाभसुद्धा आहेत आणि परलोकातील लाभसुद्धा आहेत. क्षणिक लाभ आहेत आणि शाश्वत लाभसुद्धा आहेत. आता ही तुमची स्वत:ची क्षमता,  सामर्थ्य आणि धैर्याची बाब आहे की तुम्ही त्याच्यापासून कोणत्या प्रकारचे लाभ मिळवू इच्छिता. जर तुम्ही या जीवनाच्या क्षणिक लाभानेच खूश आहात आणि यासाठी आपल्या शाश्वत  जीवनाच्या लाभांना त्यागून देण्यास तयार आहात, तर अल्लाह तुम्हाला याच लौकिक जीवनात सर्वकाही देईल, परंतु परलोकीच्या शाश्वत जीवनात तुमचा काहीएक वाटा नसेल. नदी तर  तुमच्या शेतीवाडीलाने नेहमीच सिंचन करण्यास तयार आहे. परंतु ही तुमच्या क्षमतेची कमतरता आणि धैर्याची कमतरता आहे की तुम्ही एकाच पिकाच्या सिंचनासाठी शाश्वत  दुष्काळाला कवटाळून बसता. क्षमतेतील व्यापकता आणि धैर्य असेल तर आज्ञापालन आणि उपासनेचा तो मार्ग स्वीकारा ज्यामुळे लौकिक आणि पारलौकिक अशा दोन्हींचे लाभ तुम्हाला  मिळतील. शेवटी सांगितले ``अल्लाह ऐकणारा आणि पाहाणारा आहे'' याचा अर्थ होतो की अल्लाह आंधळा आणि बहिरा नाही, की एखाद्या बेखबऱ्या (अज्ञानी) बादशाहप्रमाणे अंधाधुंद  काम करीत जावे आणि आपले अनुग्रह व अनुदानाविषयी चांगल्या आणि वाईटात काही फरक करू नये. अल्लाह तर पूर्ण ज्ञानानिशी या सृष्टीवर राज्य करत आहे. प्रत्येकाच्या क्षमतेवर  आणि हिमतीवर तो नजर ठेवून आहे. प्रत्येकाच्या गुणांना तो जाणून आहे.
१६४) असे सांगून थांबले गेले नाही की न्यायनीतीवर चालावे तर असे सांगितले गेले, ``न्यायाचे ध्वजवाहक बना.'' तुमचे काम फक्त न्याय करणेच नाही तर न्यायाचा ध्वज घेऊन उठणे  आहे. तुम्हाला यावर तत्पर असणे आवश्यक आहे की अत्याचार व अन्याय नष्ट व्हावा आणि त्या जागी सत्य आणि न्याय स्थापित व्हावे. न्याय स्थापनेसाठी ज्या आधाराची गरज  आहे, ईमानधारक (मोमीन) असल्यामुळे तुमचे हे स्थान आहे की न्याय स्थापित करण्यासाठीचा आधार तुम्ही बनावे.
१६५) म्हणजे तुमची साक्ष केवळ अल्लाहसाठी असणे आवश्यक आहे. यात दुसऱ्या कोणाचा पक्ष अथवा बाजू घेणे अभिप्रेत नसावे तसेच स्वत:चा स्वार्थ नसावा. अल्लाहशिवाय दुसऱ्या  कोणाचीच प्रसन्नताप्राप्तीचे ध्येय तुमच्यापुढे नसावे.
१६६) ईमानवाल्यांना सांगावे की ईमान धारण करा, प्रत्यक्षात विचित्र वाटते. वास्तविकपणे येथे `ईमान' हा शब्द दोन अर्थाने आलेला आहे. ईमान धारण करण्याचा अर्थ म्हणजे मनुष्याने  अवज्ञा, विद्रोहऐवजी आज्ञाधारकता व श्रद्धाशीलतेचा मार्ग स्वीकारावा. मनुष्याने अमान्य करणाऱ्यांपासून अलग होऊन मान्य करणाऱ्यांत सामील व्हावे. याचा दुसरा अर्थ होतो मनुष्य  ज्याला मान्य करतो त्याला मन:पूर्वक मानावे. पूर्ण गंभीरता व निष्ठापूर्वक मानावे. या आयतमध्ये त्या सर्व मुस्लिमांना संबोधन केले आहे जे पहिल्या अर्थाच्या दृष्टीने ``मानणारे'' आहेत. त्यांच्याशी अपेक्षा आहे की दुसऱ्या अर्थाच्या दृष्टीने ``सच्चे ईमानधारक'' बनावे.
१६७) नकार देण्याचे (कुफ्र करण्याचे) ही दोन अर्थ आहेत. एक म्हणजे मनुष्याने स्पष्टत: नकार द्यावा. दुसरा अर्थ म्हणजे तोंडाने (तोंडी) मान्य करावे, परंतु मनातून मान्य करू नये  किंवा आपल्या कर्मनीतीने सिद्ध करावे की तो ज्याला मान्य करण्याचा दावा करीत आहे वास्तविकपणे तो त्यास मानत नाही. येथे हे दोन्ही अर्थ योग्य आहेत. आयतद्वारा लोकांना  सचेत करणे आहे की इस्लामच्या या मूळ धारणेशी नकार देण्याच्या या दोन्ही भावार्थाने ज्या एकाचे वर्तन स्वीकारील, तेव्हा मनुष्य परिणामत: सत्यापासून दूर आणि असत्याची विफलता आणि अंधारात भटकण्याशिवाय काहीच प्राप्त् करू शकत नाही.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget