प्रा. फ. म. शहाजिंदे शहाजिंदे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार साताऱ्यात संपन्न
सातारा : (कलीम अजीम)
जे अनुभवले, जगताना जे भोग वाट्याला आले ते प्रामाणिकपणे लिहीत गेलो. माझ्या लिहिण्यामुळे कुणाचे नुकसान होईल, असे काहीच लिहिले नाही. कुणाला बरे वाटेल, कुणातरी चांगले वाटावे म्हणून मी कधीही लिहिले नाही. जे माझ्या संवेदनशील मनाला लिहिण्यासारखे, लोकांना सांगण्यासारखे वाटले, ते लिहीत गेलो, असे विधान ज्येष्ठ साहित्यिक प्रा. फ. म. शहाजिंदे (लातूर) यांनी सातारा येथे काढले. प्रा. शहाजिंदे पंच्चाहत्तरीत पदार्पण करत आहेत, या अमृत महोत्सवानिमित सातारा येथे त्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्याला उत्तर देताना प्रा. शहाजिंदे यांनी आपला लेखन प्रवास उलगडून दाखविला. मुस्लिम जागृती अभियान व परिवर्तनवादी संघटना यांच्या वतीने शहरातील पाठक भवन येथे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या निमित्ताने प्रा. शहाजिंदे लिखित ‘दखलपात्र शब्दांचा उरूस’ या पुस्तकाचा डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा झाला. यावेळी इतिहास संशोधक सरफराज अहमद, मिनाज सय्यद, सत्याग्रही विचारधाराचे सहसंपादक कलीम अजीम, साहिल कबीर, प्रा. पुरुषोत्तम शेठ, संध्या चौगुले हे मान्यवर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना शहाजिंदे पुढे म्हणाले, हितसंबंध जोपासण्यासाठी, कुणाला चांगले म्हणण्यासाठी मी कधीही लिहिले नाही, मी मराठी मुसलमान आहे, मी प्राध्यापक म्हणून अनेक वर्ष मराठीचे अध्यापन केले. मुसलमान असून मराठी बोलतो! त्याला मराठी बोलता येते का? तो कसला मराठीचा प्राध्यापक? तो मटन खाणारा? तो चार लग्न करणारा? इत्यादी असा शेलक्या भाषेत मला हिणवण्यात आले. पदोपदी माझ्या भारतीयत्वाचा पुरावा मागितला गेला, जातीभेदाच्या अनेक वेदना माझ्या वाट्याला आल्या. समाजातील अभिजन व्यवस्थेने जे मला जे भोग दिले त्यातून भरमसाठ वेदना माझ्या वाट्याला आल्या, त्या वेदनांनी मला लिहायला भाग पाडले आणि मी लिहिता झालो, असे सांगून शहाजिंदे म्हणाले की, मराठवाड्यातील खेड्यात राहणाऱ्या एका मुस्लिम माणसाचा सत्कार सातारा येथे होतोय ही आजच्या काळात फार दुर्मिळ गोष्ट आहे. असे प्रसंग माझ्या जीवनात आले नाहीत. ही संस्मरणीय घटना आहे. ‘दखलपात्र शब्दांचा उरूस’ पुस्तकाच्या लोकार्पण सोहळ्यानंतर डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांनी स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकरांच्या विवेकवादी धोरणावर प्रकाश टाकला. शहाजिंदे यांच्या लेखनातून याच महापुरुषाचा विचार आपल्यासमोर येतो, असेही दाभोलकर म्हणाले. इस्लाम आमि मुस्लिम समाजाचे सामाजिक चारित्र्य सोयीने विकृत केले जात आहे, असे प्रतिपादन इतिहास संशोधक सरफराज अहमद यांनी केले. अनेक महापुरुषांनी इस्लामचा विचार मानवी कल्याणाचा विचार म्हणून मांडला, पण हे अलीकडे विसरून इस्लामचा विकृत चेहरा मांडण्यातच अनेकजण अग्रणी आहेत, सुधारणावाद्यांनी ऐकिव माहितीवर नाही तर इस्लामला वाचून समजून घ्यावे, त्याशिवाय त्यांचे जनकल्याणाचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असेही सरफराज अहमद म्हणाले. स्वागत मिनाज सय्यद यांनी तर प्रास्ताविक मुस्लिम जागृती अभियानचे मुजफ्फर सय्यद यांनी केले. सूत्र संचालन साहित्यिक व कवी साहिल कबीर यांनी केले. यावेळी मुजावर खान, नंदकुमार चोरगे, डॉ. वैशाली चव्हाण, डॉ. अनिमिष चव्हाण, विजय मांडके, दिनकर झिंब्रे, सय्यद गुरुजी, कॉ. किरण माने, सुधीर पवार, प्रा. सुनील गायकवाड, डॉ. राजश्री देशपांडे, जयंत उथळे, दिलिप ससाणे, दिलीप गलांडे, आरिफ बागवान, सलीम आतार आदी मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment