सार्वत्रिक निवडणुका झाल्या. मोदी-०.२ कालखंडाची सुरूवात झाली. याचबरोबर जवळपास सर्वच गोष्टींची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर ज्या प्रमाणे भाजपला भरघोस मताधिक्क्य मिळाले अगदी त्याच धर्तीवर त्यांच्या पाठिराख्यांचा अराजकतेचा उन्माद उशिरा आगमन झालेल्या मानसूनमधील धबधब्यासारखा उभाळून येऊ लागला आहे. भय, घृणा, हिंसा, हत्या इत्यादी सर्व वारंवार होतच असतात. मात्र त्यांचे मुक्तपणे घडण्यामागची कारणे, आधार, संधी आणि बहाणा सहजासहजी असामाजिक तत्त्वांच्या हाती लागत आहे. धर्म आणि राजकारणाची एकमेकांमध्ये घुसखोरी झाल्याचे दररोज आपणास दिसून येत आहे. संसदेतदेखील धार्मिक घोषणाबाजी ऐकायला मिळत आहे. धर्मनिरपेक्ष संविधानांतर्गत बनलेल्या संसदेत धार्मिक घोषणा दिल्या जातात. धार्मिकतेचा ही नवीन उभारी सर्व धर्मांच्या काही मानवतावादी आणि आध्यात्मिक मूल्यांप्रती निष्ठा वाढविण्याचे प्रमाणदेखील असायला हवी. मात्र असे घडताना दिसत नाही, हे दुर्भाग्य. खरे तर प्रेम, पावित्र्य, सद्भावाचे दमन करणारी ही विकृत धार्मिकता आहे. ही धार्मिकता इतर धर्मांशी घृणा, त्यांच्याप्रती असहिष्णू आणि आक्रामक झाल्याचे दिसून येते. व्रूâरता, अमानवीयता, हिंसा, हत्या इत्यादींचा आधार घेण्यात तिला कसलाही संकोच वाटत नाही. हिंसा-हत्या-लिंचिंग इत्यादी प्रकारच्या अगदी विकोपाला पोहोचलेल्या मानसिकतेत मानवता, पावित्र्याला नगण्य स्थान उरले आहे. कोणत्याही व्यक्तीची प्रतिष्ठा, त्याचे शरीर, त्याचा प्राणसुद्धा आता सुरक्षित राहिलेला नाही. राजकारण, धर्म, जात, मीडिया, बाजार यांच्या महाआघाडीने भारतीय समाजाला कोणत्या स्थितीत नेऊन सोडले आहे हेच आजच्या परिस्थितीचे द्योतक आहे. आज भारतीय समाज, त्याचा सुशिक्षित भाग नैतिक समाज उरलेला नाही. तो नीतीमत्तेला थारा नसलेल्या राजकारणाच्या कचाट्यात सापडला आहे. प्रामाणिकपणा, सत्याचा आदर, भलेपणा, बंधुभाव,मदत इत्यादी गुण कस्रfचत सर्वसामान्य लोकांमध्येच उरलेले आहेत. त्यांची दुर्दशा, त्यांच्या जीवनावश्यक समस्या कुणालाही दिसत नाहीत. मोदी-०.१ काळात श्रीमंतविरोधी व काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटबंदी लादली गेली, मात्र त्यामुळे गरिबांचे रोजगार नष्ट झाले. मोदींनी निवडणुका जिंकल्यानंतर भाजपच्या कार्यालयात दिलेल्या भाषणात म्हटले होते की आता फक्त दोन जाती असतील – एक गरीब आणि दुसरी गरिबी हटविण्यासाठी कोणत्याही प्रकारचे योगदान देणाऱ्यांची. राजकीय जुमलेबाजीच्या मदतीने मोदी सरकारने सांस्कृतिक राष्ट्रवादाबरोबरच सांस्कृतिक समाजवादाची नीतीवरदेखील कार्य करण्यास सुरूवात केलेली आहे. त्याचाच गैरफायदा समाजातील असामाजिक तत्त्व घेत असताना दिसत आहेत. विशिष्ट समाजाला लक्ष्य करून त्यांना त्रास दिला जात आहे, त्यांना जीवे मारले जात आहे. अशा प्रकारच्या घटना पाहता एखाद्या समाजात भीतीचे वातावरण निर्माण होणे साहजिकच आहे. मात्र अशा घटनांना निश्चित प्रत्येकाने विरोध केला पाहिजे. आपल्यावर होत असलेला अन्याय निमूटपणे सहन करणे हेदेखील महाभित्रेपणाचे लक्षण आहे. भित्रा वारंवार मरत असतो, मात्र बहादूर एकदाच मरतो. भारतीय संविधानाने दिलेले अधिकार प्रत्येक भारतीयाला माहीत असले पाहिजेत. जर कोणी एखाद्याच्या जीवावर अथवा संपत्तीवर हल्ला करीत असेल तर त्याचा बचाव करण्याचा त्याला कायद्यानुसार अधिकार आहे. स्वत:चा बचाव करणे कायद्याचे उल्लंघन नसून लोकतांत्रिक अधिकार आहे. आजकाल सुरू असलेल्या मॉबलिंचिंगच्या घटना पाहता फक्त मुस्लिमच नव्हे तर हिंदू बांधवदेखील त्यास बळी पडलेले दिसून येतात. दोन्ही समाजात न्यायप्रिय लोक अस्तित्वात आहेत, त्यांच्याकडून मॉब लिंचिंग अथवा मॉब टेररिझमचा विरोध होत आहे. मुस्लिम तरुण आणि काही संघटनांनी शांततापूर्ण विरोध सुरू केला आहे. मात्र या सर्व गोष्टींचा सरकारवर कसलाही परिणाम होताना दिसून येत नसला तरी अन्याय, दुव्र्यवहार, दमन व अत्याचाराविरूद्ध यथाशक्ती आवाज उठविण्याची गरज आहे. मालेगावात लाखोच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी रस्त्यावर उतरून सरकारला मॉब लिंचिंगविरूद्ध जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या शुक्रवारी मुस्लिम समाजाच्या जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी झालेल्यांनी खिशाला काळ्या फिती लावल्या होत्या. ‘संविधान बचाव... देश बचाव’, ‘हिंदू, मुस्लिम’, ‘शिख, इसाई हम सब एक है’, ‘सबल मिलके एक बनो...भारत जोडो’, ‘तबरेज तेरे खुनसे इन्कालाब आयेगा’... अशा घोषणा मोर्चेकरी देत होते. भारतीय राज्यघटनेने सर्व भारतीयांना आपल्या धर्मप्रमाणे राहण्याचा व जीवन जगण्याचा अधिकार दिला आहे. परंतु काही कट्टरवादी मानसिकतेचे समाजकंटक हे देशाला बरबाद करण्याचे व तोडण्याचे षडयंत्र रचत आहे. नियोजनबद्ध पद्धतीने अल्पसंख्याक समाजाची मॉब लिचिंगद्वारे हत्या करून माणुसकी संपविण्याचा हा प्रयत्न आहे. त्यातूनच झारखंड येथील तबरेज अन्सारी याची हत्या करण्यात आली आहे. सरकारने या घटना रोखण्यासाठी कडक कायदा करून समाजकंटकांना फाशीच्या शिक्षेची कायद्यात तरतूद करावी, त्याचबरोबर मुस्लिम समाजाची प्रगती होण्यासाठी आरक्षण देण्यात यावे, अशा प्रकारच्या मागण्या या मोर्चाद्वारे सरकारकडे करण्यात आल्या ही सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने निश्चिच जमेची बाजू ठरेल.
-शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४,
Email: magdumshah@eshodhan.com
-शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४,
Email: magdumshah@eshodhan.com
Post a Comment