Halloween Costume ideas 2015

अहंकाराला गाडून, इमानेइतबारे सुखाचा उजेड उजळवत राहू...

येत्या काळाचा नैराश्यमयी अंधार भयभीत करणाराच आहे, तरीही अस्सल भारतीयत्वाची अखंड जाणीव प्रत्येक उपऱ्या सहिष्णूतेच्या संघर्षात ठळक करत राहू. बळी म्हणून अधोरेखित,  संशयी म्हणून सवयीचे, होण्यापेक्षा आपल्यातल्याच ‘अहं’ला गाडून, इमानेइतबार सुखाचा उजेड उजळवत राहू
सध्या श्रीरामाच्या साक्षीसोबतीनेच लोकशाहीची विटंबना सुरू आहे. नव्या राष्ट्रवादाची विद्वेषी प्रखरता घेऊन उभा आहे. देशाचा भविष्य असणारा तरूण वर्ग एकीकडे निराशावादाचा कहर  खोल वेदना देतोय. एकीकडे मुठभरांच्या हातात संपत्तीचे केंद्रीकरण होतय; आणि मधला नागरीक भरडला जातोय, जात-धर्म अस्तित्व अस्मितेंच्या भुलावणाऱ्या गोड थापेबाजीत !  जखमांची सवय आणि मुरदाडलेपणा काहींना पशुप्रीय, पशुसम बनवित आहे. प्रत्येक पालखीचा ऊदो-ऊदो सुरूय, अखंड गजर पालखी वाहणाऱ्यांची डोकी सडवली जाताहेत ’धर्म’ प्रीयतेच्या नावाखाली.
येणारा काळ सामान्यांसाठी अतिभयानक आहे. सर्व क्षेत्रातील मुस्कटदाबी जीवघेणी ठरतेय. प्रश्नांचे अनेक घोळ मांडून ठेवलेत आणि उत्तरांच्या वाटा तोकड्या, अहंवाद झाल्या आहेत.  साधारणतः बारोमास किंवा वर्षभर काही मांडण्याचा प्रयत्न केला इथे. भयाण वर्तमानाच्या खाणाखुणा अस्वस्थ करताहेत. त्यांच्या मागे, सुगावा लावण्याचा माझ्या परीने प्रयत्न केला,  आतली कळ मांडत राहिलो.
’अस्वस्थ वर्तमान’ व ’ऊपरी सहिष्णूता’ या दोन्ही शब्दांचे केवळ संदर्भ न शोधता अनुभवाचा पसारा मर्यादेत इथे सांडत राहिलो. सुरूवातीला ईदच्या घाईत नजिब आठवत राहिला. ’तो  कुठे हरवला’ या शिर्षकाने आज या अंगाने लिहितानाही नजीब आठवतोयच. तबरेजसाठीच्या मोर्च्यांचे फोटो अजून अपलोड होताहेत मोबाईलवर. एकरेषीय समतल असाच राहिलाय हा  काळ. काळ बनून, मनमस्तिष्कावर घाला घालतोय. परिवर्तनाची हाक देणाऱ्यांची संख्या वाढली की कमी याची चिकित्सा कधीतरी होईल, पण नजिब, मोहसिन, पहलू, अख्लाक,  आसिफा, डॉ. पायल तडवी अशी ज्ञात आणि हजारो अज्ञात असे बळी, भयाण कुरूपतेचा चेहरा घेऊन समोर उभे आहेत.
’सुकून’ मिळावा म्हणून दुवाप्राथ र्नेत मग्न राहून सुद्धा चिड-वैतागाला आवर नाही घालता येत. ’सब्र का फल मीठा होता है’ ऐकत राहिलोय. दिवसागणिक वाढणाऱ्या अतिअंधधार्मिक  कट्टरतेने भितीच्या भक्कम भिंती उभ्या झाल्यात. गल्ली-रस्त्यांत निरागसतेने बागडणाऱ्या छोट्या चिल्ल्यांपिल्यांचा आवाजही आता धार्मिक झालाय. झेंडे आणि नोटांचे राजकारण  शिरलंय प्रत्येकात. याऊपर चिंता आहे समुहसंघी प्रबळ मानसिकतेची. खोलवर पाळंमूळं रूजवत, बहुजात-बहुजनी तरूणांच्या हातात लाठीकाठी शस्त्रांचे आणि घातकी प्रशिक्षणाचे  वर्गबैठका शाखा फुलत आहेत.
जातीच्या काजव्यांचा उजेड डोळ्यांना त्रासदायक होतोय. धर्म नावाचा अजस्त्र किडा वळवळत गिळंकृत करतोय माणूसपण!! पहिल्यांदा रस्त्यावर येणाऱ्या न्यायाधिशांपासून, नोटबंदीच्या  मरणप्राय गर्दीपर्यंत. थापाअफवांच्या अफिमी वक्तव्यांपासून - संविधान दहनाच्या सनातनी सोहळ्यापर्यंत, लेखक साहित्यिकांच्या हत्यासत्रापासून लोहिया, भट्ट सारख्या गुन्ह्यापर्यंत किंवा  अगदी भोतमांगेंच्या विनान्याय मृत्यूपासून आसिफाच्या तडफेपर्यंत डॉ. कफिल अहमद यांच्या प्रामाणिकतेला दिलेल्या जबर शिक्षेपासून..’भात-भात’ म्हणून मेलेल्या आदिवासी  बालकांपर्यंत.. पुतळ्यांची उंची वाढली जरी, धरणांना खेकड्यांनी पाडे पर्यंत. लोकशाहीला ईव्हीएम मधून संपण्यापर्यंत... किंवा रामनामजप पे नथुरामापर्यंत... नालासोपारा  शस्त्रसाग्यांपासून- कोरेगाव भिमाच्या दंग्यापर्यंत अगदी ट्रोलिंगच्या नीच पातळीपासून खा. मोईत्राच्या फॅसिझमच्या भाषणापर्यंत सगळ्याच क्षेत्रातला सनातनी चिरतरूण होतोय. शासकीय-  प्रशासकीय योजनांच्या बोजवाऱ्यांपासून प्रचंड जाहिरातीचंच्या गदारोळापर्यंत ..विद्यार्थ्यांच्या संविधानिक लढाईपासून, शेणमुत्राच्या गाई पर्यंत... हातातला मोबाईल, मीडिया, न्यूजचॅनेल्स,  मालिका, सिनेमॅटिक बायोपिकचा पिसारा... पीक जोमानं तरारूण जोरात आहे, फवारणी गडद झालीय केवळ हिंसा तिरस्कार द्वेषाची... अभ्यासक्रमातील बदल, संस्थाचे खाजगीकरण,  कर्जाऊ रकमांचा काळ्या पैसे परत आणण्याच्या वल्गनेचा काळ, पतंजली रामदेवी फुसक्या बाणापासून हंगामी लोकनेत्यांच्या उपोषणाचा काळ, ’पैसा फेको-तमाशा देखो’ परफेक्ट लागू  पडणाऱ्या उसण्या विचारवंत-शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञांचा काळ.
चिकित्सा झाली डायरेक्ट हिंसेचा पवित्र पावित्रा घेणारा काळ. काळ कठीण भयाण भयंकर... समाधानाची गोष्ट, पाकळी फुलावी दुर्लक्षित फुलाची पावसात तेवढ्याच मुठभरांचा आक्रोश  रस्त्यावर उतरला. युनोतल्या आवाजाची व्हिडीओ क्लीप फिरली मीडियावर ’एक पत्थर तो तबियत से उछालो यारो’ म्हणत का असेना मान्सूनच्या मौसमात मौसमी हंगामी रक्षण  आरक्षणाच्या टिकाटिपण्या झडल्या.
तुकड्या-तुकड्यांच्या या लेखनात सरळधोपट अस्वस्थता किंवा जाणवणाऱ्या गोष्टी मांडत राहिलो. कुणी प्रत्यक्ष ’दाद’ दिली, कुणी साद. कुणी फोनवरून संवाद केला. काहींनी थातूर मातूर  म्हणून अधिक अभ्यासू होण्याची प्रेरणा दिली. काहींनी सूचना, सुधार सुचविल्या. अनुभव भिडतात. उतरतात सरळं.. कुठलाही अभिनिवेश आणि अभ्यासू बांधिलकी न घेता लिहलं.  उण्यादुण्याची खिचडी मात्र चारदोनांची भूक भागवित असेल तर सध्या तेही योग्यच! ’’जात से जात जलाते चलो’’च्या उघड अजेंड्यात सामिल न होता, कट्टरभिंतींना उखडून  टाकण्याची धडपड स्पष्ट होत राहो.
येत्या काळाचा नैराश्यमयी अंधार. भयभीत करणाराच आहे, तरीही अस्सल भारतीयत्वाची अखंड जाणीव प्रत्येक उपऱ्या सहिष्णूतेच्या संघर्षात ठळक करत राहू. बळी म्हणून अधोरेखित,  संशयी म्हणून सवयीचे, होण्यापेक्षा आपल्यातल्याच ’अहं’ला गाडून, इमानेइतबार सुखाचा उजेड उजळवत राहू. धरणाच्या भिंती ध्वस्त होताहेत. मजुरांवर इमारतींच्या भिंती कोसळताहेत.  माणूस मरतोय. संवेदना जिवंत रहावी यासाठी माणुसकीआड येणाऱ्या भिंती मुद्दाम पाडू या.. लिहिण्याचा भावनिक पिसारा फुलतोय. मोर होऊन नाचण्याची ही वेळ नक्की नाही. हा वेदनोचा पसारा सावरतो.

‘‘साहिल पे खडे हो, तुम्हे क्या गम चले जाना,
मै डूब रहा हूं अभी डूबा तो नहीं हूँ’’

- साहिल शेख
9923030668

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget