Halloween Costume ideas 2015

अन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(१४४) हे श्रद्धावंतांनो! श्रद्धावंतांना सोडून इन्कार करणाऱ्या अधर्मींना आपले मित्र बनवू नका. काय तुम्ही इच्छिता की अल्लाहला स्वत:च्याविरूद्ध उघड पुरावा द्यावा?
(१४५) खात्री बाळगा की ढोंगी नरकामध्ये सर्वात खालच्या थरात जातील आणि तुम्हाला त्यांचा सहाय्यक कोणीच आढळणार नाही.
(१४६) परंतु यांच्यापैकी जे पश्चात्ताप करतील आणि आपल्या वागणुकीत सुधारणा करतील आणि अल्लाहशी बांधील राहतील आणि आपला धर्म फक्त अल्लाहसाठीच निर्भेळ  ठेवतील,१७४ असे लोक श्रद्धावंतांसमवेत आहेत. आणि अल्लाह श्रद्धावंतांना अवश्य महान मोबदला प्रदान करील.
(१४७) शेवटी अल्लाहला काय पडले आहे की तुम्हाला विनाकारण त्याने शिक्षा द्यावी. जर तुम्ही कृतज्ञ दास बनून राहिलात१७५ आणि ईमानच्या मार्गावर चालत राहिलात तर अल्लाह  मोठा गुणग्राहक आहे.१७६ आणि सर्वांची परिस्थिती जाणणारा आहे.
(१४८) अल्लाह हे पसंत करीत नाही की माणसाने अपशब्दाकरिता तोंड उघडावे परंतु या व्यतिरिक्त की एखाद्यावर अत्याचार केला गेला असेल,आणि अल्लाह सर्वकाही ऐकणारा व  जाणणारा आहे.
(१४९) (अत्याचारपीडित अवस्थेत जरी तुम्हाला अपशब्द उच्चारण्याचा हक्क आहे) परंतु जर तुम्ही अंतर्बाह्य चांगुलपणाच दाखवाल अथवा कमीत कमी वाईटाकडे दुर्लक्ष कराल, तर अल्लाह (चादेखील हाच गुण आहे की तो) मोठा क्षमा करणारा आहे (यद्यपि तो शिक्षा देण्याचे) पूर्ण सामथ्र्य बाळगतो.१७७
(१५०) जे लोक अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांशी द्रोह  करतात आणि इच्छितात की अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांच्या दरम्यान भेदभाव करावा आणि म्हणतात की आम्ही काहींना मान्य करू आणि काहींना मानणार नाही व कुफ्र व ईमान यांच्या दरम्यानातून एक मार्ग काढण्याचा निश्चय करतात,
(१५१) ते सर्व पक्के अधर्मी आहेत१७८ आणि अशा अधर्मीयांसाठी आम्ही अशी शिक्षा तयार करून ठेवली आहे जी त्यांना अपमानित व तिरस्करणीय करून सोडणारी असेल.



१७४) आपल्या धर्माला अल्लाहसाठी विशिष्ट करण्याचा अर्थ आहे, की मनुष्याची वचनबद्धता अल्लाहशिवाय दुसऱ्या कोणाशीही जुडलेली नसावी. आपल्या सर्व आवडीनिवडी, प्रेम आणि  श्रद्धांना अल्लाहसमोर समर्पित करावे. अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी सर्वकाही समर्पित करण्यास तयार राहावा.
१७५) `शुक्र'चा मूळ अर्थ होतो उपकाराची स्वीकृती व कृतज्ञतेची अनुभूती होणे. आयतचा अर्थ होतो, ``तुम्ही अल्लाह प्रति  कृतघ्नता आणि विश्वासघातकीपणाची पद्धत स्वीकारू नये तर  त्याचे खरे कृतज्ञ दास बनून राहावे. अशा स्थितीत अल्लाह तुम्हाला शिक्षा देणार नाही.'' एका उपकार करणाऱ्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची खरी पद्धत हीच आहे की, (१) मनुष्याने  मनापासून त्याचे (उपकारकर्त्याचे) उपकार मानावे. (२) तोंडाने त्याचा स्वीकार करावा आणि (३) उकृतीतून कृतज्ञ होण्याचे प्रमाण द्यावे. याच तिन्ही गोष्टींना एकत्रित केल्याने `शुक्र'   नावाची मानसिकता बनते. या `शुक्र'ची अपेक्षा हीच आहे की मनुष्याने उपकाराला फक्त त्याच्याशीच जोडावे ज्याने ते उपकार केले आहेत. दुसऱ्या कोणालाही कृतज्ञता अभिव्यक्ती आणि  बक्षीस स्वीकार करण्यात मूळ उपकारकर्त्याचा भागीदार बनवू नये. माणसाचे मन आपल्या उपकारकर्त्याविषयी प्रेम आणि कृतज्ञतेने भरलेले असावे. तसेच उपकारकर्त्याच्या विरोधकांविषयी थोडीशीही आसक्ती आणि निष्ठेचे अंश आपल्या मनात ठेवू नये. तिसरा म्हणजे उपकारकर्त्याचा आज्ञापालक आणि वचनबद्ध असणे आवश्यक आहे. त्याने दिलेल्या  बक्षीसांना त्याच्या सांगण्याविरुद्ध (आदेशाविरुद्ध) वापरात आणू नये.
१७६) मूळ अरबी शब्द `शाकीर' आहे याचे भाषांतर `गुणग्राहक' करण्यात आले आहे. `शुक्र' जेव्हा अल्लाहकडून दासाकडे असेल तर अर्थ होतो `सेवावृत्तीचा स्वीकार' किंवा गुणग्राहकता  आणि जेव्हा दासांकडून अल्लाहकडे असेल तर `उपकार मानण्याच्या अर्थाने' घेतले जाते. अल्लाहकडून त्याच्या दासांचा `शुक्र' अदा करण्याचा अर्थ होतो की अल्लाह `नाकद्री' (दुर्लक्ष)  करणारा नाही. जेवढी आणि जशी सेवा दासाने अल्लाहच्या मार्गात केली असेल तर अल्लाहजवळ त्याचा सन्मान होतो आणि कोणीही सेवा केली परंतु त्याला बक्षीस किंवा मोबदला मिळाला नाही असे कधीही होत नाही.
१७७) या आयतमध्ये मुस्लिमांना एक अत्यंत उच्च् श्रेणीची नैतिक शिकवण दिली आहे. दांभिक, यहुदी आणि मूर्तीपूजक लोक मिळून त्या काळी सतत इस्लामच्या मार्गात अडथळे  निर्माण करीत होते. इस्लामचा स्वीकार करणाऱ्यांना त्रास देत असत व त्यांच्यावर आतोनात अत्याचार करीत असत. वाईटातील वाईट डाव ते या इस्लामी आंदोलनाविरुद्ध खेळत होते.  यामुळे मुस्लिम समाजमनात घृणा आणि क्रोध निर्माण होणे स्वाभाविक होते. अल्लाहने मुस्लिमांच्या मनात अशाप्रकारच्या भावनांचे वावटळ उठतांना पाहिले व आदेश दिला, ``अपशब्द  बोलण्यासाठी आपले तोंड उघडणे अल्लाहजवळ शोभनीय कृत्य नाही. नि:संदेह, तुमच्यावर अत्याचार होत आहे आणि पीडित व्यक्ती अत्याचाऱ्याच्या विरोधात आवाज उठवित असेल तर  त्याला तो हक्क आहे. परंतु तरीही श्रेष्ठ आचरण हेच आहे की प्रकट व अप्रकटरित्या तुम्ही भलाई करावी आणि दुराचाऱ्यांना क्षमा करावी. तुम्हाला आपल्या शिष्टाचारात अल्लाहच्या शिष्टाचाराशी जवळीक साधली पाहिजे, कारण अल्लाहचे सान्निध्य तुम्हाला हवे आहे आणि त्याची शान आहे की तो अतिसौम्य आणि सहिष्णु आहे. कठोरतम अपराध्यांनासुद्धा तो  उपजीविका देतो, तसेच मोठमोठ्या अपराधांना क्षमा करतो. म्हणून त्याचे सान्निध्य प्राप्त् करण्यासाठी तुम्हालासुद्धा अत्यंत उदार मनाचे आणि साहसी बनले पाहिजे.
१७८) म्हणजे अधर्मी होण्यात ते जे अल्लाहला मानत नाहीत आणि अल्लाहच्या पैगंबरांनासुद्धा मानत नाहीत, ते लोक जे अल्लाहला मानतात परंतु पैगंबरांना मानत नाहीत आणि ते  लोक जे एखाद्या पैगंबराला मानतात आणि कोणाला मानत नाहीत हे सर्व एकसारखे आहेत. यांच्यापैकी अधर्मी होण्यात कोणीही तसुभर कमी नाही.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget