काँग्रेस : राहूल गांधीच्या राजीनाम्यानंतरची परिस्थिती
जब कश्ती साबित व सालीम थी
साहील के तमन्ना किसको थी
अब ऐसी शिकस्ता कश्ती पर
साहिल की तमन्ना कौन करे
सेना-भाजपा युती तर्फे महाराष्ट्रामध्ये यावेळी 24 मराठा खासदार निवडून आले. यावरून एक गोष्ट सिद्ध होते के महाराष्ट्रातील मराठा समाजाने काँग्रेसची साथ सोडलेली आहे. कर्नाटकमधील प्रमुख समाज वीरशैव, गुजरात मधील प्रमुख समाज पाटीदार, राजस्थानमधील प्रमुख समाज राजपूत यांनी काँग्रेसची साथ सोडलेली आहे. अन्य राज्यांमध्ये अशीच परिस्थिती आहे. जवळ- जवळ प्रत्येक राज्यातील प्रमुख समाजाने काँग्रेसचे साथ सोडली आहे. निष्ठेसाठी प्रसिद्ध मुस्लिम समाजाने मात्र काँग्रेसची अद्यापही साथ सोडलेली नाही. 17 व्या लोकसभेत काँग्रेसचे जे खासदार निवडून आलेत त्यांना निवडून आणण्यात काँग्रेसच्या इतर निष्ठावान मतदारांसोबत मुस्लिम मतदारांचाही सिंहाचा वाटा आहे. लोकसभेतील काँग्रेसची 44 वरून 52 पर्यंत झालेली प्रगती या ऐतिहासिक पक्षाला शोभनीय तर नाहीच उलट लाजिरवाणी आहे. या अपयशाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर तर काँग्रेसची स्थितीच भरटकलेल्या गलबतसारखी झालेली आहे. घर फिरले की घराचे वासे ही फिरतात, या म्हणीप्रमाणे मागच्या आठवड्यात कर्नाटकधील काँग्रेसची झालेली वाताहत बुडत्याचा पाय खोलात ह्या ही म्हणीचे प्रात्यक्षिक असल्यासारखे वाटते. क्रिकेटच्या सामन्यात सुरूवातीच्या षटकामध्ये संघाने केलेल्या चुकांमुळे सामना हाताचा जात असताना कर्णधाराला आपला पराजय जसा उघड्या डोळ्यांनी पहावा लागतो तसाच गांधी परिवाराने मागच्या काही दशकांमध्ये केलेल्या चुकांमुळे पक्ष पराजीत होतांना हताशपणे उघड्या डोळ्यांनी पहाणे एवढेच राहूल गांधी यांच्या हातात राहिलेले आहे.
राहूल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर 50 दिवस उलटून गेले तरी पक्षाला नवीन अध्यक्ष निवडता येऊ नये यातच सारे काही आले. केंद्रीय नेतृत्व नसल्यामुळे कर्नाटकातील आमदारांना पक्ष सोडून जातांना कसलीही भीती वाटली नाही. म्हणून राहूल गांधीच्या राजीनाम्याने सुरू झालेली काँग्रेसच्या पतनाची प्रक्रिया कर्नाटकातील राजकीय संकटापर्यंत अनाहूतपणे येऊन पोहोचलेली आपण पाहिली व ही पुढे मध्यप्रदेश, राजस्थान मार्गे कुठपर्यंत जाईल याचे भाकित शरद पवारांना सुद्धा करणे अवघड जाईल अशी एकंदरित परिस्थिती आहे. येत्या तीन महिन्यात महाराष्ट्रासह हरियाणा व झारखंडमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या तिन्ही राज्यात काँग्रेस, भाजपाला टक्कर देईल अशी अजिबात शक्यता नाही. 90 वर्षाचे कार्यवाहक अध्यक्ष मोतीलाल व्होरांना जर तात्काळ बदलून नव्या अध्यक्षाची निवड केली गेली नाही तर या तिन्ही राज्यातील पराभव अटळ असलयसारखे सध्यातरी वातावरण आहे. नविन अध्यक्षाची निवड देखील सोपी नाही. जुने आणि नवे एस दोन उभे गट काँग्रेसमध्ये ठळकपणे पडलेले दिसतात. मिलिंद देवरा, जोतिरादित्य सिंदीया यांचे राजीनामे व सचिन पायलटांची उघड नाराजी याचा संयुक्त परिणाम अध्यक्ष निवडीवर होईल. कदाचित या प्रक्रियेदरम्यान काँग्रेसमध्ये फुट पडून एका काँग्रेसच्या दोन किंवा त्यापेक्षा अधिक काँग्रेस होतील. एकंदरित स्वातंत्र्यानंतर काँग्रेसला भंग करण्याचे गांधीजींचे स्वप्न स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनी पूर्णत्वाला येईल असा रागरंग दिसून येतोय.
एवढा गृहकलह सुरू असतांना राहूल गांधी विदेशात आहेत. त्यांच्या बाजूने देवरा, ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट सारखे तरूण आहेत तर दुसऱ्या बाजूला निवडणुकीत पक्षाचे पानीपत करणारे, 25 पैकी एकही खासदार निवडून न आणणारे अशोक गहलोत व केवळ आपल्या मुलाला विजयी करून सर्वांना पराजित होताना पाहणारे कमलनाथ मुख्यमंत्री पदावर आहेत, हेच काँग्रेसचे वैशिष्ट्ये आहे. जमीनीवर फारशे काम न करता सत्तेची पदे उपभोगावित यासाठी सर्वच काँग्रेसजन हपापलेले असतात. दक्षिण भारतीय दे-मार चित्रपटांमध्ये चोहीबाजूंनी संकटात सापडलेल्या नाईकेला अंतिम क्षणी नायक येऊन सर्व संकटातून जसे एकाहाती सोडवितो तसेच आजपर्यंत काँग्रेस हायकमांड हेलीकॉप्टर ने येऊन स्थानिक उमेदवाराने जमवलेल्या सभेत भाषण करून त्यांना निवडून आणावे, असा प्रकार यापुढे चालणार नाही हे हायकमांडच्या प्रयत्नानंतर ही सलग दोन वेळा लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवाने सिद्ध झालेले आहे.
गांधी घराण्याव्यतिरिक्त कोणालाही अध्यक्ष म्हणून निवडले तरी राहूल गांधी, सोनिया गांधी यांच्या समक्ष त्याला स्वतंत्रपणे काम करता येणार नाही, तो पक्षाला प्रेरणा देऊ शकणार ही, त्याला सुखाने काम करू दिले जाणार नाही, त्याची अवस्था सिताराम केसरी सारखी झाल्याशिवाय राहणार नाही. याची खात्री असल्याकारणाने कुणीही काँग्रेस अध्यक्ष बनण्याच्या फंद्यात पडणार नाही. हे आजच्या काँग्रेसचे वास्तव आहे. प्रियंका गांधींना ज्या पद्धतीने ऐन लोकसभा निवडणुकांपूर्वी पुरेशी तयारी न करताच मैदानात आणले गेले त्यामुळे पक्षाच्या बंदुकीतील शेवटचा कारतूस ही वाया गेलेला आहे. राहूल गांधीच्या राजीनाम्यानंतर एवढा कालावधी लोटल्यावरही काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या सदस्यांनी राजीनामे दिले नाहीत यावरून पक्षाध्यक्षांचा धाक आपल्या कार्यकर्त्यांवर राहिलेला नाही हे सत्य अधोरेखित होते.
राजीनामापत्र
आपल्या चारपानी राजीनामा पत्रात राहूल गांधींनी ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्या सर्वांचा विचार एका लेखात करणे शक्य नाही. त्यातील बऱ्याच गोष्टी जुन्या आहेत. फक्त एक गोष्ट नवीन आहे ती त्यांच्याच शब्दात अशी की ’’अनेक मुद्यांवर लढतांना बऱ्याचदा मी एकटाच होतो’’ या त्यांच्या भावनेचा जरूर विचार करावा लागेल. काँग्रेसमध्ये इंदिरा गांधीपासून एका नव्या परंपरेला सुरूवात झाली होती ती परंपरा म्हणजे राज्यातील कोणत्याही नेत्याला एका मर्यादेपेक्षा मोठा होऊ द्यायचे नाही. ’इंदिरा इज इंडिया’ या घोषणेमधून वरील परंपरेची सुरूवात झाली होती. त्यांच्या व त्यानंतर प्रचंड बहुमतांनी प्रधानमंत्री झालेल्या राजीव गांधी यांच्या काळातही ही परंपरा चालू होती. राहूल गांधीनींही ती जपली आहे. आपल्याला आवडेल तेच बोलणारे, आपली हांजी-हांजी करणारे लोक तेवढे जवळ करावयाचे व खरे बोलणाऱ्यांना दूर लोटावयाचे हे धोरण आजच्या परिस्थितीला कारणीभूत ठरले आहे. म्हणून राहूल गांधी बऱ्याच मुद्यांवर एकटे पडले आणि एकटे लढले आहेत. आसामचे लोकप्रीय नेते बिस्वकुमार सर्मा यांच्याशी राहूल गांधी इतके बेमुर्वतपणे वागले की ते भाजपामध्ये निघून गेले. सत्तेचा मद भल्या-भल्यांना गर्वीष्ठ करून टाकतो. गांधी परिवारालाही त्याच ’ग’ ची बाधा झाली. राज्यातील काँग्रेसच्या मंत्र्यांना सुद्धा त्यांच्या भेटीसाठी दिल्लीला तीन-तीन दिवस वाट पहावी लागत होती असा ही एक काळ होता. त्यामुळे आज ते एकटे पडलेले आहेत. लोकशाहीमध्ये शेवटी एका घराण्याची मनमानी कोण, का आणि किती दिवस म्हणून सहन करतील? शिवाय, कांही मुद्यांवर राहूल गांधीची भूमिका ही कायम अनिश्चित राहिलेली आहे. जितक्या कठोरपणे त्यांनी राफेलचा विरोध केला तितक्या कठोरपणे इव्हीएमचा केला नाही. अनेक राज्यात मजबूत स्थितीत असणाऱ्या धर्मनिरपेक्ष पक्षाशी राहूल गांधी यांनी युती करण्यात रस दाखविला नाही. आसामममध्ये युडीएफ आणि पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेस ही दोन ठळक उदाहरणे आहेत. धर्मनिरपेक्षतेचा त्याग ही त्यांची सर्वात मोठी चूक होती, त्यांनी कधीच मॉब लिंचिंगचा तीव्र शब्दात विरोध केला नाही. मुस्लिम आरक्षणासंबंधी ठोस भूमिका घेतली नाही. दलितांवरील अत्याचार संबंधाने कठोर भूमिका घेतली नाही. त्यांच्या भाषण करण्याच्या क्षमतेवरही बऱ्याच नैसर्गिक मर्यादा आहेत. त्यांनी कधीही पूर्णवेळ राजकारण केले नाही. एकदातर चक्क बजेट सेशन चालू असतांना त्यांनी ते टाळून विदेशात राहणे पसंद केले. अशा अनेक चुका त्यांनी आपल्या कारकीर्दित केल्या. त्यांच्या या चुकाचा परिणाम हा आहे की ते पक्षात एकटे पडले. शेवटी त्यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे काय होईल हे तूर्तास जरी सांगता येत नसले तरी या देशात कायम एका राष्ट्रीय स्तरावरील धर्मनिरपेक्ष पक्षाची व्हॅकेन्सी खुली राहील यात शंका नाही. पाहूया या व्हॅकेन्सीचा फायदा कोण उचलतो?
- एम.आय.शेख
9764000737
Post a Comment