वो वफरेब खुर्दा शाहीं जो पला हो किरगिसों में
उसे क्या खबर के क्या है रहवे रस्मे शाहबाजी
उसे क्या खबर के क्या है रहवे रस्मे शाहबाजी
1947 किंवा त्यानंतरच्या चार-दोन वर्षात जन्माला आलेल्या मुस्लिमांची एक पीढि उतारवयाला पोहोचलेली आहे. मात्र गेल्या 72 वर्षात या पीढितून सर्वमान्य असे नेतृत्व उभे राहिलेले नाही. त्यानंतर जन्माला आलेल्या व आज तारूण्यात असलेल्या मुस्लिम युवकांमध्ये सुद्धा नेतृत्वगुणांचा स्पष्ट अभाव आढळून येतो.
साधारणपणे मुस्लिम नेतृत्वाची विभागणी तीन गटामध्ये करता येते. 1. मदरशातून तयार झालेले नेतृत्व. 2. सामाजिक चळवळीतून तयार झालेले नेतृत्व आणि 3. विविध राजकीय पक्षांमधून पुढे आलेले नेतृत्व. सच्चर समितीच्या अहवालानुसार 4 टक्केच मुस्लिम तरूण मदरशात शिक्षण घेतात. मात्र याच 4 टक्के तरूणांच्या ताब्यात देशातील सर्व मदरसे आणि मस्जिदीं आहेत. यांचाच मुस्लिम जनमानसावर प्रचंड पगडा आहे. मात्र त्यांनी स्वतःहून स्वतःला मुस्लिम समाजाच्या धार्मिक नेतृत्वापुरते सीमित करून घेतले आहे. सामाजिक चळवळीतून पुढे आलेल्या नेतृत्वाला मुस्लिम समाजाने कधीच पूर्णपणे स्वीकारलेले नाही. त्याचे कारण म्हणजे मुस्लिम समाज हा धर्माधारित नेतृत्वाशिवाय दुसऱ्या कोणाचे नेतृत्व स्वीकारण्यास मानसिकरित्या तयार नसतो. राहता राहिले तीसऱ्या प्रकारचे नेतृत्व, ते म्हणजे राजकीय पक्षातून पुढे आलेले मुस्लिम नेतृत्व, तर त्यांच्याबाबतीत अशी स्थिती आहे की, मुस्लिम त्यांच्याकडे त्याच वेळी जातात ज्यावेळी त्यांच्याकडे काही काम असते. बाकी वेळा ते त्यांच्यापासून सुरक्षित अंतरावर राहण्यातच धन्यता मानतात. मुस्लिम नेतृत्वाची अशी ही
शोकांतिका आहे.
युवा मुस्लिम नेतृत्व
युवा नेतृत्व कुठल्याही समाजाचा पाठीचा कणा असतो. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर या समाजामध्ये युवा नेतृत्व निर्मितीची प्रक्रिया जवळ-जवळ ठप्प पडलेली आहे. म्हणून हा समाज कणाहीन झालेला आहे. मॉबलिंचिंगच्या सत्तरहून अधिक बळी गेलेल्या लोकांपैकी एकानेही विरोध करण्याचा साधा प्रयत्नसुद्धा केलेला नाही. यावरून एक सत्य अधोरेखित होते, ते हे की, नेतृत्व नसल्यामुळे या समाजाचा आत्मविश्वास रसातळाला गेलेला आहे. युवा नेतृत्व विकास हे मुस्लिम समाजातील अनेक दुर्लक्षित विषयांपैकी एक विषय आहे.
फिरकाबंदी
फिरकाबंदी है कहीं और कहीं जाते हैं
क्या जमाने में पनपने की यही बाते हैं
प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांच्यानंतर मुस्लिम समाज अनेक फिरक्यां (गटा) मध्ये विभागला गेला. म्हणून कुठल्याही एका गटातून जरी एखादे सालस नेतृत्व पुढे आले तरी इतर गटांची त्याला साथ मिळत नाही. म्हणून ते नेतृत्व पूर्णपणे खुलू शकत नाही.
युवा नेतृत्व कसे तयार होते?
शरीके हाल जबतक शाने इस्लामी नहीं होती
मुसलमां पैदा होने से मुसलमानी नहीं होती
युवा नेतृत्व निर्मितीमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका संतुलित शिक्षणाची असते. असे शिक्षण जे भौतिक आणि नैतिक दोन्हीही दृष्टीने उच्चतम असते. मुस्लिम समाजातील युवक या बाबतीत दुर्देवी ठरलेले आहेत. मदरशातून पुढे आलेले तरूण स्वतःमध्ये उच्चतम नैतिक मुल्य बाळगून असतात. मात्र भौतिक शिक्षणाच्या बाबतीत ते कमी पडतात. तर उच्च भौतिक शिक्षण घेतलेले मुस्लिम तरूण नैतिक मुल्यांच्या बाबतीत कमी पडतात. या अशा विचित्र कोंडित सापडल्यामुळे मुस्लिम तरूणांमधून आश्वासक असे नेतृत्व निर्माण होऊ शकत नाहीये, ही खरी दुर्देवाची बाब आहे.
शिवाय, स्वातंत्र्यानंतर सातत्याने गरीबीत राहिल्याकारणाने गरीबी सोबत बाय डिफॉल्ट (आपोआप) येणारे अवगुण मुस्लिम युवकाच्या एका मोठ्या समुहामध्ये आल्यामुळे नेतृत्व वगैरे गोष्टीपर्यंत जाण्याची त्यांची वैचारिक क्षमताच नसते. केवळ छोटे-छोटे धंदे करणे किंवा छोटे-छोटे जॉब मिळविणे, इथपर्यंतच त्यांची झेप असते. 2011 च्या जणगणनेनुसार 42.7 टक्के मुस्लिम हे जाहील (अज्ञानी / निरक्षर) तर उरलेल्या पैकी अवघे 7 टक्के पदवीधर आहेत. अशा भीषण जहालतीतून उत्कृष्ट युवा नेतृत्व पुढे येईल, याची आशा करणे व्यर्थ आहे. तसे पाहता गरीबीमुळे समाजातून नेतृत्व निर्माण होत नाही, हा गैरसमज आहे. कन्हैयाकुमार, नरेंद्र मोदी पासून ते नेल्सन मंडेलापर्यंतच्या नेत्यांनी हा समाज खोटा ठरलेला आहे. परंतु, भारतीय मुस्लिमांमध्ये असा अपवाद अजून जन्माला यायचा आहे.
नेतृत्वसाठी आवश्यक गुण
वो जिनके होते हैं खुर्शिद आस्तीनों में
उन्हें कहीं से बुलाओ बडा अंधेरा है
निस्वार्थीपणा : कुठल्याही समाजामध्ये, कुठलाही त्याग करण्याची तयारी असलेला, स्वयंप्रेरित, ध्येयवेडा, लोककल्याणासाठी स्वतःला वाहून घेतलेला निस्वार्थ तरूणवर्ग जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत त्या समाजातून खरे नेतृत्व पुढे येत नाही. स्वातंत्र्यापूर्वी प्रत्येक समाजातून पुढे आलेल्या सालस नेतृत्वाचा अभ्यास केला असता वरील विधानाची सत्यता वाचकांच्या लक्षात येईल. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात चंगळवादी संस्कृती एवढ्या वेगाने फोफावली आहे की, स्वार्थापलिकडे जावून समाज व देशहितासाठी काही मोठे करण्याची क्षमता आज साधारणपणे कोणत्याची समाजाच्या तरूणांमध्ये नाही. विचारधारेला बाजूला सारून काँग्रेसमधून भाजपामध्ये होत असलेल्या घाऊक स्थलांतराने माझे वरील विधान सत्य ठरविलेले आहे. मुस्लिम तरूणही यास अपवाद नाही. नाही म्हणायला निःस्वार्थपणे छोटी-छोटी समाजोपयोगी कामे काही मुस्लिम तरूणांचे गट करीत असतात. परंतु, एवढ्याने नेतृत्व आकारास येवू शकत नाही. कुंडीत लावलेल्या शोभेच्या झाडासारखी ही कामे आहेत.
दूरदृष्टीचा अभाव मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने मुस्लिम युवकांमधून आश्वासक असे नेतृत्व पुढे येत नाहीये. मुस्लिम आरक्षणाच्या पुढे जावून विचार करणारे, मॉबलिंचिंगचा निषेध करण्यापलिकडे काही करता येईल काय? याचा विचार करणारे मुस्लिम तरूण आज दिसत नाहीत, हे नेतृत्व नसल्याची निशाणी आहे. नेत्यांमध्ये आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे विश्लेषण करण्याची क्षमता असावी लागते. ज्या योगे भविष्यात येणाऱ्या संकटाचा त्यांना अचूक अंदाज येतो व ते संकट कसे थोपवावे याची उपाययोजना सुद्धा ते करू शकतात. आपल्याकडे संकट कोसळल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया देण्यापलिकडे मुस्लिम नेतृत्व काही करतांना दिसून येत नाही.
लोकांचे म्हणणे शांत चित्ताने ऐकण्याची क्षमता, जबाबदारी घेण्याची वृत्ती, विपरित परिस्थितीतही निराश न होता लोकांना प्रेरणा देण्याची क्षमता, उदारता, प्रसंगी नुकसान सोसूनही दुसऱ्यांशी न्याय करण्याची उपजत प्रवृत्ती, आपले अधिकार मागे ठेवून दुसऱ्यांच्या अधिकारांना प्राधान्य देण्याची समज, संकट समयी कणखरपणे उभे राहण्याची क्षमता इत्यादी नेतृत्वास आवश्यक असणारे गुण युवकांमध्ये उच्चदर्जाच्या भौतिक व नैतिक शिक्षणाच्या संतुलनातूनच निर्माण होऊ शकतात. नाहीतर भ्रष्ट आणि एकांगी नेतृत्व आकारास येते जे की फक्त स्वतः व स्वतःच्या जाती-धर्मातील लोकांपुरताच विचार करते व त्याचे भयंकर परिणाम देशाला भोगावे लागतात. याच गोष्टीचा अनुभव आपण गेल्या 72 वर्षांपासून घेत आहोत.
तरूण मुस्लिम नेतृत्वाला आपल्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक मुल्यांची जाण तसेच त्या मुल्यांना पुढील पीढिपर्यंत यशस्वीपणे हस्तांतरित करण्याचे भान असायला हवे. नसता पुढच्या शंभर दोनशे वर्षात मुस्लिम समुदाय केवळ नावापुरताच राहील. मुल्यहीन मुस्लिम समाज बाद झालेल्या चलनासारखा असतो. दिसायला देखना परंतु, निरूपयोगी. इतिहासात महानतम असलेले अनेक मानवसमुह उदाहरणार्थ बाबील, बनी इसराईल, रोमन, पर्शियन आजही तग धरून आहेत. पण त्यांच्यातील मुल्य हरवून गेलेली आहेत. म्हणून त्यांना काडीची किमत राहिलेली नाही.
मुस्लिम नेतृत्वाला या सर्व गोष्टींची फक्त जाण असून भागणार नाही तर त्याला बहुसंख्य समाजाच्या मानसिकतेचे सुद्धा अचूक विश्लेषण करता आले पाहिजे व दोन्ही समाजातील साम्यस्थळे शोधून दोहोंतील संबंध दृढ करण्यासाठी आवश्यक ते उपाय योजता आले पाहिजे. ह्या नेतृत्वाला आपल्या समाजाची बलस्थाने आणि त्रुटींचाही चांगला अभ्यास हवा. हाती असलेल्या संसाधनांची ही जाणीव हवी. तामीरे नौ (नौनिर्मिती)चा ध्यास हवा.
नेतृत्व उभारणीतील अडचणी
मुस्लिम समाजाचा खरा प्रश्न अडाणी जनता आणि अशिक्षित तरूण हा आहे. फिरकाबंदीबरोबर ही दोन महत्त्वाची कारणे आहेत, ज्यामुळे मुस्लिम नेतृत्व उभे राहू शकत नाहीये. केवळ नावापुरती धर्मनिरपेक्ष असलेल्या काँग्रेस आणि चार-दोन प्रादेशिक पक्षाच्या गुलामीतच धन्यता मानणारा फार मोठा गट मुस्लिमांमध्ये अस्तित्वात आहे. हा गटही मुस्लिम नेतृत्व उभारणीतील एक अडसर आहे. इस्लाम जेव्हा गरीब होता पण लोकांमध्ये इस्लामी मुल्यासंबंधी व्यापक जागरूकता होती. तेव्हा चिखलातून कमळ फुलावेत तसे गरीबीतूनही चार पवित्र खलीफा (रजि.) व्यतिरिक्त हजरत उस्मान बिन जैद (रजि.), हजरत खालील बिन वलीद (रजि.), हजरत उमरू बिन इलियास (रजि.), हजरत अबु उबैदा बिन जर्रा (रजि.), हजरत सलाउद्दीन अय्युबी (रहे.), मुहम्मद अल फातेह (रहे.) सारखे सालस नेतृत्व मुस्लिमांमधून पुढे आले. सध्या ही प्रक्रियाच बंद पडलेली आहे.
वर्तमान काळातील स्थानिक मुस्लिम राजकीय युवा नेतृत्वावर नजर टाकली असता त्यांच्या सामर्थ्यापेक्षा उणीवाच जास्त दिसून येतात. तर राष्ट्रीय पातळीवर नजर टाकली असता उमर खालीद व शहेला रशीद सारख्या विवादास्पद आणि व्यर्थ तरूणांची नावे डोळयासमोर येतात. राजकारणाशिवाय, समाजकारण, क्रीडा, अर्थ, शिक्षण, आरोग्य, शासन, प्रशासन, कायदा, न्याय इत्यादी जीवनावश्यक क्षेत्रातसुद्धा चमकदार कामगिरी करून भविष्यात नेतृत्व प्रदान करू शकणाऱ्या मुस्लिम तरूणांची नावे अपवादानेच आढळून येतात.
एक सोनेरी पहाट
आ तुझको बतात हूं तकदीरे उमम क्या है
शमसीरो सना अव्वल ताउसो रूबाब आखीर
नेतृत्वाची ही पोकळी भरून काढण्यासाठी मुस्लिम तरूणांची फक्त एक संघटना माझ्या नजरेसमोर आहे. ती म्हणजे एसआयओ. याच संघटनेतून पुढे आलेले अवघ्या 48 व्या वर्षी जमाअत-ए-इस्लामी हिंद सारख्या प्रभावशाली संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्षपदी नुकतेच निवडलेले गेलेले सय्यद सआदतुल्लाह हुसैनी यांचे नेतृत्व, अंधारी रात्र संपल्यानंतर अलगदपणे सोनेरी पहाट उजाडावी, तसे पुढे आलेले आहे. त्यांनी अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या स्ट्रॅटेजिक हॉलमध्ये 21 एप्रिल 2019 रोजी दिलेल्या भाषणाचा गांभीर्याने विचार केला तरी त्यांची दूरदृष्टी आणि नेतृत्व देण्याच्या क्षमतेचा अंदाज येतो. याच संघटनेतून भविष्यात मुस्लिम नेतृत्व पुढे येवू शकेल, एवढीच आशा बाळगतो व थांबतो. शेवटी अल्लाहकडे प्रार्थना करतो की, ’’ऐ अल्लाह! आमच्या तरूणांतून सशक्त नेतृत्व निर्माण होऊन समाज आणि देशाच्या सेवेसाठी पुढे येऊ दे. आमीन.’’
- एम.आय.शेख
9764000737
Post a Comment