Halloween Costume ideas 2015

इस्लामी सुरक्षित सावलीतली स्त्री

इस्लामने प्रत्येक सक्षम स्त्री-पुरूषावर हजयात्रा अनिवार्य केली आहे. याचाच अर्थ हजयात्रा जीवनाचे अंतिम ध्येय आहे. ते पूर्ण करणे सर्वांना बंधनकारक आहे. मात्र जर एखादी मुस्लिम वयस्क व्यक्ती (स्त्री अथवा पुरूष) वाहनात बसू शकत नाहीत, कारण तिच्यात तेवढी ताकद नाही, पण हजयात्रा तर करावयाची आहे. अशा वेळी त्या वयस्क व्यक्तीच्या वतीने तिच्या नातेवाईकाने हजयात्रा केली तर त्या वयस्क व्यक्तीच्या नावाने ’हजयात्रा कर्ज’ अदा होईल.
हजला जाणार्‍या स्त्री-पुरूषांची प्रार्थना ईश्‍वर स्वीकारतो. यामुळे हाजींना (हजला जाणारे) ईश्‍वराची प्रार्थना करण्याची प्रेरणा मिळते. म्हणून हाजींची रवानगी करताना त्यांचे नातेवाईक, आप्तेष्ठ, मित्रमंडळी, परिवारातील, गल्लीतील, गावातील लोक विनंती करतात, ”आमच्या कल्याणासाठीसुद्धा अल्लाहकडे प्रार्थना करा.”
इस्लाम जगात शांतीचा मार्ग सांगणारा धर्म आहे. इस्लाममध्ये दाखल होण्यासाठी कोणाही स्त्री-पुरूषांवर बळजबरी करण्याचा कोणालाही अधिकार नाही, कारण  इस्लाम स्वीकारणे ही सामान्य बाब नाही. इस्लाम स्वीकारल्याने त्या धर्माची सर्व तत्त्वे अंगीकारायला हवीत.
स्त्रीने पुरूषांशी संबंध आल्यास त्यांच्याशी अगदी स्पष्ट आणि ठळक शब्दांत संवाद साधावा. समजा, आपण परपुरूषांशी बोलताना दबक्या आवाजात बोललो, आपल्या बोलण्यात लचक, मिठास असेल तर समोरच्या व्यक्तीच्या मनाच्या घोड्याला लगाम घालणे कठीण होते व त्याचा विचार ना-ना तर्‍हेने, ना-ना मार्गाने थैमान घालतो व त्याच्या डोक्यात वाईट विचार आपोआपच काहूर घालतो.
शृंगाराचे प्रदर्शन आपल्या पतीशिवाय कोणासमोरही करू नका. घरी परपुरूष आला असता त्या वेळी घरातदेखील स्त्रीने परद्यात असावे. हे फक्त इस्लाम धर्मातच आहे असे नाही तर इतर धर्मांतही गोशा पद्धती प्रचलित होती. त्यामुळे स्त्रियांसाठी परदा हा अनिवार्य आहे. तसेच परपुरूषांशी नजरानजर करू नये. आपल्या दृष्टीचेे रक्षण करावे. त्याचबरोबर आपल्या लज्जास्थळाचेही रक्षण करावे. शरीराला तंग असणारे व तोकडे कपडे परिधान करू नयेत. नखशिखांत पोशाख परिधान करावा. जशी पुरूषांना आपले चारित्र्य सांभाळण्याची सूचना केलेली आहे तशी चारित्र्याच्या संरक्षणाची स्त्रियांना ताकीद केलेली आहे. स्त्रीने व्यभिचार आपल्यापासून कोसो (मैल) दूर ठेवावा. व्याभिचारी स्त्री इस्लाम धर्मात अत्यंत अप्रतिष्ठित समजली जाते. रस्त्यावरून चालत असतानादेखील तिने कसे चालावे याच्याही सूचना कुरआन देतो. स्त्रियांनी रस्त्यावरून चालताना रस्त्याच्या एका बाजूने चालावे. समाजात वावरत असताना स्त्रियांनी चारदीचा एक पदर कायम आपल्या शरीरावर लटकवावा, कारण या स्त्रिया श्रद्धावान आहेत व त्यांना कोणीही त्रास देऊ नये. चादरीचा पदर आपल्या शरीरावर लटकावणे म्हणजे ती नीतीवान आहे याचा संकेत त्यातून लोकांना मिळतो आणि आपल्या शीलाचे व नजरेचे रक्षण केवळ त्या संकेतामुळे होते. चौदाशे वर्षापूर्वी इस्लामने स्त्रीच्या चारित्र्याच्या रक्षणासाठी असे संकेत निर्माण केले, याची आज किती मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासते याचे दर्शन होते. आज कोणत्याही लहानातलहान शहरापासून मोठ्यातमोठ्या शहरापर्यंत बघा. त्या ठिकाणी वावरताना मुली, महिला स्कार्फ आपल्या जवळ बाळगतात आणि  तो आपल्या चेहर्‍यावर बांधलेला असतो. याचे कारण शोधले तर हे निदर्शनात येते की धुळीपासून स्वतःच्या चेहर्‍याचे संरक्षण व्हावे, तसेच नाकाद्वारे सूक्ष्म जीवजंतू आपल्या शरीरात जाऊ नयेत ही वरकरणी स्वरूपाची त्यांची उत्तरे असतात. पण त्यामागची खरी कारणीमांसा पाहिली तर त्यांना तो स्कार्प वापरण्यामध्ये सुरक्षितता वाटते व रस्त्यावरील लोकही त्यांना त्रास देत नाहीत.
इस्लाममध्ये स्त्रियांनी चादरीचा पदर आपल्यावर अच्छादून ठेवण्यास सांगितले. ’हिजाब’ करण्याचा आदेश दिला. ’हिजाब’ म्हणजे एक प्रकारची मोठी चादर ज्यामध्ये संपूर्ण शरीर झाकले जाऊ शकते. या चादरीचा वापराचा तात्विक लाभ अशा प्रकारे वर्णन करण्यात आला आहे की यामुळे ती पवित्रख्याली, सदाचारी आणि कुलीन स्त्री वाटते आणि त्यांना छेडण्याची व त्यांच्यावर हात घालण्याची कोणाची हिंमत नाही. ’हिजाब’च्या वापराबरोबरच ’गज्जेबसर’चा आदेश दिला आहे. ’गज्जेबसर’ म्हणजे आपली नजर खाली ठेवणे. बोलताना हळू लचकदार बोलू नये. याचा आधार पुढीलप्रमाणे,
”पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पत्नीनो! तुम्ही सामान्य स्त्रियांप्रमाणे नाहीत. जर तुम्ही अल्लाहचे भय बाळगणारे असाल तर हळू आवाजात बोलत जाऊ नका की विकृत हृदयाचा एखादा माणूस लालसेत पडेल तर स्पष्ट सरळ बोलणे बोला.”
इस्लाम धर्माने स्त्रीला दिलेल्या अधिकारांचा सन्मान करून ते अधिकार तिला मिळवून दिल्यास त्या समस्याच मुळात उद्भवणार नाहीत ज्यांचा संदर्भ देऊन संपूर्ण इस्लामी विधीलाच (शरियत) बदनाम करण्याचा व तिला बदलण्याचा आरडाओरडा करण्यात येतो. इस्लाम धर्माने स्त्रीला अन्याय व अत्याचाराच्या गर्तेतून बाहेर काढले. तिला न्याय दिला, तिला मानवाधिकार दिले, मान-सन्मान दिला आणि समाजात सन्मानाने जगण्याची शिकवण दिली. (इस्लाम सुरक्षित सावलीतली स्त्री या पुस्तकातील सर्व लेखमाला समाप्त झाले. सदर पुस्तक प्रा.ए.जी.पाटील यांनी लिहिले असून, ते आयएमपीटी,मुंबई ने प्रकाशित केले आहे. या पुस्तकातील वापरलेले संदर्भ ग्रंथ - 1) इस्लामी समाज जीवन व्यवस्था आणि हुंडा प्रथा - उमर हयात खान गौरी, 2. स्त्री भ्रृणहत्या कारणे व उपाय- डॉ. रजीउल इस्लाम नदवी, 3. जीवनदर्शन - मुहम्मद युसूफ इस्लाही, 4. इस्लामी कुटुंब - सय्यद जलालुद्दीन उमरी, 5. स्त्री आणि इस्लाम - सय्यद जलालुद्दीन उमरी, 6. इस्लाम आणि स्त्री - मकबूल अहमद फलाही, 7. स्त्री आणि निसर्गनियम - सय्यद अबुल आला मौदूदी, 8. तलाक-समज गैरसमज - गुलाम रसूल देशमुख, 9. इस्लाम आणि मानवाधिकार - सय्यद अबुल आला मौदूदी, 10. इस्लाम आणि लैंगिक समानता - मु.मजहरूद्दीन सिद्दीकी, 11. सुखी कुटुंब - शेख मुहम्मद कारकुन्नु, 12. स्त्री-कुरआनच्या दृष्टिक्षेपात - शमीमा मोहसीन, 13. गोशा (पडदा) - सय्यद अबुल आला मौदूदी, 14. बहुपत्नित्व - सय्यद हामिद अली, 15. दांम्पत्यिक अधिकार - सय्यद अबुल आला मौदूदी, 16. अवैध दहेज व हुंडाप्रथा आणि इस्लाम - गुलाम रसूल देशमुख, 17. ध्येयपथ - जलील अहसन नदवी.).
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget