Halloween Costume ideas 2015

मॉबलिंचिंगवरील उपाय

एक शजर ऐसा मोहब्बत का लगाया जाए
जिसका हमसाये के आंगन में भी साया जाए
जून 2019 रोजी 24 वर्षीय तबरेज अन्सारीची झारखंडमध्ये झुंडीकडून झालेली हत्या ही 18 वी हत्या होती. या हत्येपूर्वी मजलूम अन्सारी, इम्तियाज खान, यांची 18 मार्च 2016 रोजी,  तर लेतहार जिल्ह्यात शेख हलीम, सिराज खान, मुहम्मद सज्जाद, शेख नईम, गौरव वर्मा, विकास वर्मा, गणेश गुप्ता, रामचंद्र देवी यांची 18 मे 2017 रोजी पूर्व सिंगभूम जिल्ह्यात,  तर अलिमोद्दीन अन्सारी याची 27 जून 2017 रोजी रामगड येथे, तर रमेश मिंझ (ख्रिश्चन) याची ऑगस्ट 2017 रोजी गृहवा येथे, तर चिरागुद्दीन, मुर्तूजा अन्सारी यांची 13 जून 2018  रोजी गोड्डा येथे, तर बबलू मुशहर (दलित) याची 6 सप्टेबर 2018 रोजी पलामू येथे, तर वकील खान याची 12 मार्च 2019 रोजी पलामू येथे, तर प्रकाश लकडा (ख्रिश्चन) याची 10  एप्रिल 2019 रोजी गुमला येथे झुंडीद्वारे हत्या करण्यात आल्या होत्या. एवढ्या हत्या पाहता झारखंड ही मॉबलिंचिंगची राजधानी होऊ पाहते की काय अशी रास्त शंका निर्माण होते.
17 व्या लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर नवनिर्वाचित खासदारांसमोर भाषण देण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी राज्यघटनेच्या लिखित प्रतीला नमन करून घोषणा केली होती की,  ’सबका साथ सबका विकास और सबका विश्वास’. त्यांनी वरील शब्दात देशाला आश्वस्त करत आपल्या सरकारची वाटचाल भविष्यात कोणत्या दिशेने होईल हे स्पष्ट केले होते. तरी  परंतू त्यांच्या भाषणानंतर हरियाणा, मध्यप्रदेश आणि बिहारमध्ये मुस्लिमांवर हल्ले सुरूच राहिले. त्यातल्या त्यात मागच्या काही दिवसात गुरूग्राममध्ये मोहम्मद बरकत याच्यवर तर  दिल्लीमध्ये मोहम्मद मोमीन याच्यावर तर कलकत्यामध्ये शाहरूख हलदार याच्यावर प्राणघातक हल्ले करून त्यांना बळजबरीने ’जय श्रीराम’चे नारे देण्यासाठी भाग पाडण्यात आले. तबरेज अन्सारीच्या झुंडीने केलेल्या हत्त्येनंतर, पंतप्रधानांनी नेहमीप्रमाणे साधलेल्या, ’चुप्पी’नंतर, भारतीय मुस्लिम समाज हा अत्यंत व्यथित झालेला आहे. त्याला सुचत नाहीये की  काय करावे व काय करू नये? एकीकडे देशाचे संविधान व दस्तुरखुद्द पंतप्रधान त्यांच्या जीवीत राहण्याच्या मुलभूत अधिकाराची पायमल्ली होणार नाही, याची ग्वाही देत आहेत तर  दुसरीकडे एकानंतर एक मुस्लिमांना मारहाण व त्यांच्या हत्या होत आहेत. अशा परिस्थितीत भांबावलेल्या मुस्लिम समाजातून एक प्रश्न केला जातोय की, या मॉबलिंचिंगवर काय  उपाय आहे का नाही? माझ्या मते या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे. व हा उपाय 30 डिसेंबर 1946 रोजी त्या काळातील अखंड भारताच्या सियाकलकोट शहराच्या गुरदासपूर येथे लाहोर  आयुक्तालयातील जमाअत-एइस्लामीच्या सभेमध्ये सुचविण्यात आलेला होता. जमाअत-ए- इस्लामीचे संस्थापक मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी यांनी तो उपाय सूचविलेला होता. तो  त्या काळात जेवढा ’रिलेव्हंट’ होता आजही तेवढाच रिलेव्हंट आहे. त्यांनी मुस्लिमांच्या एका विशाल जनसमुदायाशी संवाद साधताना जे ऐतिहासिक भाषण केले होते, त्याला दिल्लीच्या  मर्कजी मक्तबा या प्रकाशन संस्थेने पुस्तिकेच्या स्वरूपात प्रकाशित करून वाचकांसमोर आणलेले आहे.
’शहादत-ए-हक’ नावाच्या अवघ्या 36 पानाच्या या पुस्तिकेची किमत फक्त 14 रूपये असून, आजपावेतो या पुस्तिकेच्या लाखो प्रती खपलेल्या आहेत तर लाखो मुस्लिमांच्या विचारांना या पुस्तिकेने सकारात्मक दिशा देण्याचे काम केलेले आहे. मला विश्वास आहे या पुस्तिकेमध्ये जर का गांभीर्याने विचार केला गेला तर मॉबलिंचिंगच नव्हे तर जातीय दंगलीसुद्धा  रोखण्यामध्ये मदत मिळेल. प्रत्येकाने आवर्जुन वाचावी अशी ही पुस्तिका आहे. त्यासाठी फारसे कष्ट घेण्याची गरज नाही. आपल्या जवळच्या जमाअते इस्लामी हिंदच्या कार्यालयात  जावून आपण ही पुस्तिका घेवू शकता. आता हे पाहू की, असा कोणता उपाय आहे जो या पुस्तिकेमध्ये सुचविण्यात आलेला आहे? मुळात मुस्लिम समाज हा कुठल्याही देशाचा,  कुठल्याही वंशाचा किंवा कुठल्याही रंगाचा असा विशिष्ट समाज नाही. तो प्रत्येक देशाच्या, प्रत्येक वंशाच्या आणि प्रत्येक रंगाच्या लोकांचा समाज आहे. या अर्थाने तो एक जागतिक  समाज (ग्लोबल कम्युनिटी) आहे. या समाजाला जगामध्ये उभे करण्यात मागचा ईश्वरीय उद्देश कुरआनमध्ये खालीलप्रमाणे नमूद करण्यात आलेला असल्याचे मौलानांचे विश्लेषण आहे.
1. ’’ आणि अशाच प्रकारे तर आम्ही तुम्हाला उत्तम समाज बनविले आहे. जेणेकरून जगांतील लोकांवर तुम्ही साक्ष व्हा आणि प्रेषित तुमच्यावर साक्षी असतील.’’(संदर्भ : सुरह बकरा  आयत नं. 143).
2. ’’हे श्रद्धावंतांनो, अल्लाहसाठी सत्यावर अढळ राहणारे व न्यायाची ग्वाही देणारे बना. एखाद्या गटाच्या शत्रुत्वाने तुम्हाला इतके प्रक्षोभित करू नये की तुम्ही न्यायापासून विमुख  व्हाल. न्याय करा. हे ईशपरायणतेपासून अधिक निकटवर्ती आहे. अल्लाहचे भय बाळगून कार्य करीत राहा. जे काही तुम्ही करता, अल्लाह त्याची पुरेपूर खबर ठेवणारा आहे.’’ (सुरे  अलमायदा आयत नं. 8).
3. ’’त्या व्यक्तीपेक्षा अधिक अत्याचारी कोण असेल की ज्याने ती साक्ष लपविली जी अल्लाहकडून त्याच्याकडे आली होती आणि अल्लाह अनभिज्ञ नाही.’’ (सुरे अलबकरा आयत नं.  140)
वर नमूद तिन्ही आयातींचा हवाला देऊन मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी यांनी मुस्लिमांवर खरी-खरी साक्ष देण्याची जी ईश्वरीय जबाबदारी टाकण्यात आलेली आहे त्याबद्दल  सविस्तर असे विवेचन केलेले आहे. यामध्ये ’साक्ष’ हा शब्द पुन्हा-पुन्हा आलेला आहे. ही साक्ष कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर असे की, अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी अल्लाहने  जे काही मार्गदर्शन केलेले आहे ते मार्गदर्शन जसेच्या तसे त्या लोकांपर्यंत पोहोचविणे ज्यांना ते माहित नाही. आणि ही साक्ष देणे प्रत्येक पैगंबराचे कर्तव्य राहिलेले आहे. याच कामासाठी प्रेषितांना पाठविण्यात आले होते. यावरून या कामाचे महत्त्व वाचकांच्या लक्षात येईल.
कुरआनमध्ये अशा अनेक लोकसमुहांचा नावानीशी उल्लेख आहे ज्यांनी ही साक्ष दिलेली नाही तेव्हा ते नष्ट झाले आहेत. विशेष करून बनी इसराईल (ज्यू) बद्दल कुरआनमध्ये स्पष्ट  म्हटलेले आहे की, त्यांनी ईश्वरीय मार्गदर्शनाची साक्ष जगासमोर दिली नाही. म्हणून त्यांना दंडित करण्यात आले. या संदर्भात स्वतः कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’’सरतेशेवटी इतकी  पाळी आली की त्यांच्यावर अपमान, अधोगती व दुर्दशा ओढवली. आणि ते अल्लाहच्या कोपाने वेढले गेले. हा परिणाम यामुळेच झाला की, अल्लाहच्या संकेताशी ते द्रोह करू लागले. हे  ह्यामुळेच घडले की त्यांनी अवज्ञा केली आणि शरिअत कायद्याचे वारंवार उल्लंघन केले.’’ (संदर्भ : सुरे बकरा आयत नं.61)
थोडक्यात सांगायचे म्हणजे मुस्लिम समाज हा अल्लाहने त्याच्या प्रेषित (सल्ल.) मार्फत जे मार्गदर्शन जगातील समस्त माणवांसाठी अवतरित केले त्याची साक्ष जगाला पटविण्यासाठी  जन्माला घातलेला आहे. ही ऐतिहासिक जबाबदारी अल्लाहने जागतिक मुस्लिम समाजावर टाकलेली आहे. दुर्दैवाने हा समाज ती जबाबदारी पूर्ण करत नाहीये म्हणून त्याला अशा  प्रकारची प्रताडना सहन करावी लागत आहे जी बनी इस्राईल व इतर विद्रोही समाजांना करावी लागली होती.
पुढे मौलाना म्हणतात, की ही साक्ष मुस्लिमांनी मुस्लिमेत्तरांसमोर दोन प्रकारे ठेवावी.
1. माध्यमांद्वारे तर 2. स्वतःच्या वर्तनाने. मात्र बहुतेक मुस्लिमांची वागणूक ही नेमकी उलट आहे. ते अल्लाहने दिलेल्या मार्गदर्शनाचा लाभ इतरांनाही देत नाहीत व स्वतःही घेत  नाहीत. गाफील मुस्लिम समाज हा इस्लामच्या प्रगतीमध्ये अडथळा बनलेला आहे. मौलाना म्हणतात, बनी इस्राईल हे काही अल्लाहचे शत्रू नव्हते किंवा मुस्लिम अल्लाहचे नातेवाईक  नाहीत की त्यांच्यावर कर्तव्य न करताही दया दाखविली जाईल. मुळात जी साक्ष त्यांना द्यायला हवी ती तर ते देतच नाहीत उलट त्याच्या (इस्लामी मुल्यांच्या) विरूद्ध साक्ष देत  आहेत. अशी कोणती गोष्ट आहे जी इस्लामने करण्यापासून प्रतिबंध केलेला आहे मात्र मुस्लिमांनी केलेली नाही.
भारतीय मुस्लिमांपुरते बोलायचे झाल्यास इस्लामने निषिद्ध केलेल्या संगीतापासून व्याजापर्यंत सगळ्याच गोष्टी बहुसंख्य मुस्लिमांनी स्वतःवर हलाल करून घेतलेल्या आहेत. बहुसंख्य  मुस्लिमांनी कुरआन समजून वाचलेला नाही. त्यामुळे त्यांचे वर्तन कुरआनला अनुसरून नाही. म्हणजेच ते आपल्या वाणी आणि वर्तनाने कुरआनची साक्ष मुस्लिम्मेतरांसमोर देत नाहीत.  म्हणून त्यांना अशा प्रताडनेला सामोरे जावे लागत आहे. एका लेखामध्ये मौलानांनी दिलेल्या भाषणातील सर्वच मुद्यांशी न्याय करता येणे शक्य नाही. या ठिकाणी मी फक्त त्या  पुस्तिकेमधील केंद्रीय विचार आपल्यासमोर ठेवलेला आहे. सविस्तर विवेचन समजून घेण्यासाठी वाचकांना पुनःश्च नम्र विनंती आहे की, त्यांनी सदरची पुस्तिका स्वतः हस्तगत करून  अत्यंत गंभीरपणे वाचावी. असे झाल्यास त्यांच्या वर्तनामध्ये नक्कीच सकारात्मक बदल होईल आणि परिणामी ते सुरक्षित व सुखी जीवन जगू शकतील. शेवटी अल्लाहकडे प्रार्थना  करतो की, ’’हे अल्लाह! आम्हा सर्वांना आपल्या वाणी आणि वर्तनाने इस्लामची साक्ष देण्याची समज दे.’’ आमीन.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget