Halloween Costume ideas 2015

ज़ायराचा विद्रोह नेमका कशाविरूद्ध?

फारच कमी वयात, कमी वेळात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त अभिनेत्री ज़ायरा वसीम हीने सोशल मीडियावर एक खळबळजनक पोस्ट टाकून आपण चित्रपटसृष्टी सोडत असल्याचं जाहिर केलंय. त्यामुळे सर्वत्र चर्चांना जे उधान आलंय त्यावरून वाटतंय की तिच्या या पोस्टमुळे अख्खी चित्रपटसृष्टी हादरली की काय, असा भास होतोय.
वास्तविक पाहता ज़ायराचा विद्रोह नेमका कशाविरूद्ध आहे, हे समजून घेतले पाहिजे. तीच्या पोस्टमध्ये चित्रपटात अभिनय करणे इस्लामनुसार हराम असल्याचा कुठेच उल्लेख नाहिये. तर चित्रपटसृष्टीत वावरतांना एक इस्लामनिष्ठ म्हणून ती स्वतःहून मानत असलेली पैगंबरी मुल्यांना पदोपदी मुरड घालावी लागत होती आणि त्यामुळे तीची घुसमट होत असल्याचं तिच्या पोस्टमधून स्पष्ट होते. ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. त्यासाठी तीची पूर्ण पोस्ट वाचली पाहिजे. त्यात मागील पाच वर्षांपासून तीचा कुरआन व प्रेषित वचन (हदिस) च्या तीने स्वतःहून केलेला अभ्यास, त्यातील नीतीमुल्ये व नितीमत्ता आणि हिंदी चित्रपटसृष्टीच्या विद्यमान ’कास्टिंग काऊच’ व ’मी टू’ सारख्या पॉर्नसुलभ संस्कृतीच्या विसंगतीत तिच्या मनात झालेल्या वैचारिक द्वंद व मन्वंतराचं फलीत म्हणजे तीने घेतलेला हा निर्णय असल्याचं स्पष्ट होते. ती काय कोणत्या मौलवीची मुलगी नाही की, ती मदरश्यात शिकलेली नाही. म्हणून तिच्यावर दबाव येतोय हा आरोप हा पूर्वग्रहदुषित आहे.
मूळात तीने फक्त फिल्म इंडस्ट्री सोडून दिली असती तर कुणाला काही वाटलं नसतं. पण इथल्या नागड्या फिल्मी संस्कृतीविरूद्ध तिने इस्लामी पवित्र नितिमत्तेने प्रभावित होऊन हा निर्णय घेतल्याचे सांगितल्याने काही छुप्या इस्लामद्वेष्ट्यांचा जळफळाट झाला आहे. वास्तविक पाहता इराण, इजिप्त, तुर्कस्तानातही मुस्लिम महिला तिथल्या इस्लामी चित्रपटात काम करतात. इतकंच नव्हे तर चक्क काही इस्लामी संघटनांनी काही शॉर्ट फिल्म बनवल्या आहेत.  तलाक : कुसूर किसका, मूक्ती या हिंदी शॉर्ट मुव्हीज़ जमाअत ए इस्लामी हिंद, महाराष्ट्र प्रदेशने बनवल्या आहेत. तर केरळमधील याच संघटनेने बनवलेला मल्याळी चित्रपट आयलवासी हा चक्क तिथल्या टॉकीज़मध्ये चालला. अनेक इस्लामनिष्ठ संस्थांनी जणू एक समांतर अशी फिल्म इंडस्ट्री बनवली आहे. याला तुम्ही इमानोवूड म्हणू शकता. पण तिथे हिंदी चित्रपटसृष्टीसारखं कास्टींग काऊच, मी टू सारखं लियोनी वातावरण नसते. म्हणून इस्लामवर राग काढण्यापेक्षा इथल्या चित्रपटसृष्टीमध्ये आलेल्या विकृति नष्ट करण्यावर विचार झाला पाहिजे. अन्यथा अशा अनेक ज़ायरा एक एक करून निघून जातील, आणि ही इंडस्ट्री फक्त पॉर्न इंडस्ट्री म्हणूनच उरेल कदाचित!
विनोद खन्ना, कादर खान, भय्यु महाराज या लोकांनीही चंदेरी दुनियेतून सन्यास घेतला होता. त्यामागेही अध्यात्मिक धार्मिकच कारण होते. कादर खाननेही नंतर कुरआनाच्या सीडीज़ तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला होता. पण पुरूषी मानसिकता असलेल्या मनुवाद्यांना फक्त महिलांनीच असं करावं, तसं करावं असले सल्ले देण्याची हौस. ती नेहमी दबावातच निर्णय घेते, तीला अक्कलच नसते अशी पुरोगामीत्वाच्या सोवळ्यात लपलेली छुपी पुरूषप्रधान मानसिकता आता चव्हाट्यावर येतेय. आधी तीचे अकाऊंट हॅक झाल्याची अफवा  उडवली पण नंतर स्वतः तीनेच त्याचे खंडण करून तो लेख तीने स्वतःच लिहिल्याचे स्पष्ट केल्यावर इस्लामद्वेष्टे तोंडघशी पडल्यावर आता अतिरेक्यांच्या दबावाचं नाटक सुरू केलंय.
दबाव टाकून अतिरेक्यांचा काय फायदा होणार आहे? ती काय इस्लामविरोधी चित्रपटात काम करत नव्हती की ज़रीन खान किंवा काश्मिरी आलीया भट सारखी उत्तान दृश्येही करत नव्हती की जेणेकरून मुस्लिम समाजाची बदनामी करत असल्याने तीला अतिरेकी धमकावण्याची शक्यता सांगावी. ती सुरूवातीपासूनच हळूहळू कुरआनाकडे आकर्षित झाल्याचे तिच्या मुलाखतींवरून स्पष्ट होते.
दबावाखालीच तीने असे केले असेल हे पूर्वग्रहदुषित होण्याचे द्योतक आहे. दबावाखाली कुणी आपल्या निर्णयाच्या समर्थनार्थ कुणी कुरआन व प्रेषितांच्या वचनांचे इतके दाखले दिले नसते. पण इस्लामचे पावित्र्य आणि मनुवादी नट्यांचा नागडेपणा उघडं पाडणार्‍या तिच्या या निर्णयामुळे मनुवाद्यांचा हा अपप्रचार देखील तीला अप्रत्यक्ष धमकी तर नाही ना?
मूळ दुखणे हे आहे की, ती चूपचाप निघून गेली असती तर काही इस्लामद्वेष्ट्यांचं इतकं पित्त खवळलं नसतं, पण तीने अख्ख्या चित्रपटसृष्टीतील आंबटशौकिनांचं सोवळं टरटरा फाडल्यामुळेच सर्वत्र जळफळाट होतोय.
आश्‍चर्य याचं वाटतं की, अनेक पुरोगामी बहुजनही ज़ायराचा विरोध करतांना दिसतात.
बहुजनांनो, डॉ. बाबासाहेबांची मिलिंद संस्था आपण चालविण्यास तयार असल्याचं दिलीप कुमारनं सांगितल्यावर ’तुझ्यासारख्या नाच्याला मी माझी संस्था देणार नाही’ असं बाबासाहेबांनी खडसावून सांगितलं आणि चित्रपटसृष्टीतील आधुनिकतेच्या नावावर होणार्‍या अश्‍लीलतेवर सडकून टिका केली. आम्रपाली या नर्तकीनेही नाचगाणं सोडून आपलं संपूर्ण आयुष्य उपासिका म्हणून धम्मकार्याला वाहून घेतलं. छत्रपती शिवरायांनीही मोहिमेवर असतांना सैनिकांना सोबत नाचगाणं करणार्‍या कलावंतींना नेण्यास बंदी घातली होती. त्यामुळे ही नाचण्या बिचण्याची बुधवार पेठेतली संस्कृती आपण मूलनिवासींची नाही. अशी संस्कृती सोडून एखादी मूलनिवासी ज़ायेरा वसीम पैगंबरांच्या समतेशी आपली निष्ठा व्यक्त करून आपलं पुढील आयुष्य प्रेषितांनी सांगितलेल्या समताधिष्ठित व्यवस्थेनुसार घालवणार असेल तर त्याला किमान आपल्या मूलनिवासी पुरोगामींनी तरी विरोध करू नये. नाचगाण्याची संस्कृती मानणार्‍या सनातन्यांचा जळफळाट एक समजू शकतो. म्हणून बहुजनांनो, नाचणं बंद, वाचणं सुरू करा!
आज गरज आहे नवीन पीढीला उपयुक्त अशा नितिमत्तेची शिकवण देणार्‍या चित्रपटांची. हे नीतीमान चित्रपट बनवतांनाही नितीमत्ता बाळगली गेली पाहिजे. नाहितर नीतीमान चित्रपटांच्या पडद्यामागेही बरंच काही अनैतिक असं चालतं, ते नको. आपलं ज्या तत्वांशी इमान राखलं आहे त्या नैतिक तत्वांशी, ग्रंथांशी, ईश्‍वरी मार्गदर्शनाशी जरादेखील तडजोड न करता,  नैतिकतेच्या चाकोरीत फक्त महिलाच नव्हे तर पुरूषांनीही राहून एक सकस अशी निर्मीती करण्याची गरज आहे.
प्रत्येक सकारात्मक क्षेत्रात प्रत्येक समाजाला अनुकूल वातावरण मिळायला पाहिजे, ही एका उदार लोकशाहीची निकड आहे. जसं स्कॉटलँड पोलीसने मुस्लिम महिलांना खाकी रंगाचा स्कार्फ आणि बुरखा नेसण्याची परवानगी दिली आहे. तेंव्हा मोठ्या संख्येने मुस्लिम महिला त्यात सहभागी होत आहेत. इराणमध्ये बुरखा नेसून महिला अनेक खेळ खेळतात आणी आंतरराष्ट्रीय पातळीवर नावालौकिक मिळवतात. तिथे बुरखा नेसून विमानेही उडवतात. अशी अनेक उदाहरणे देता येतील.
सांगायचं तात्पर्य हे की, असं मुस्लिम-फ्रेंडली वातावरण जर प्रत्येक क्षेत्रात निर्माण केलं गेलं तर मुस्लिम महिलाही या क्षेत्रात पुढे येतील. नाहीतर मी टू , मी टू म्हणत इतर मॉडर्न महिलाही या क्षेत्रापासून दूर जातील, हे लक्षात घ्या.
स्त्रीसुलभ, नैतिकतासुलभ इमानसुलभ वातावरण निर्माण झाले तर अशा अनेक ज़ायरा पुन्हा या नवीन नैतिक चित्रपटसृष्टीत, बॉलीवूड नव्हे तर ’मोरॅलीवूड’मध्ये पुन्हा पदार्पण करतील इन्शा अल्लाह इन्शा अल्लाह !

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget