Halloween Costume ideas 2015

भारत आणि मुसलमान, दोन देह एक आत्मा

भारत! एक असा देश आहे ज्याचा इतिहास हजारों वर्षे जुना आहे. मोहम्मद बिन कासिमच्या भारतावरील आक्रमणापूर्वी येथील हिंदू प्रजा आपल्याच हिंदू राजाला वैतागली होती व  आपल्याच देशात असुरक्षित होती. कोणीतरी आपल्याला राजाच्या जाचापासून मुक्ती मिळवून देईल याची वाट ती पाहत होती. मग जेव्हा मोहम्मद बिन कासिमना आपल्या   देशवासियांना मुक्त करण्यासाठी भारतावर हल्ला केला तेव्हा त्याने येथील जनता, मुले, स्त्रिया व वृद्धांना इजा केली नाही, उलट त्या गरीब जनतेसाठी जणू ते मसीहा ठरले. त्यांनी   लढाईत विजय मिळवलाच सोबतयेथील जनतेच्या मुक्तीचे कारण ठरले आणि येथूनच या देशाची प्रगती व मुस्लिमांच्या भव्य अशा इतिहासाला सुरुवात होते.
या देशावर मुस्लिम  राजांनी आठशे वर्षे राज्य केले. इतक्या मोठ्या काळापर्यंत कोणा एका समुदायाचे शासन याची प्रचिती आहे की आम्ही या देशावर खूप प्रेम केले, येथील जनतेला प्रेमाची वागणूक दिली,  या देशातील नयनरम्य ठिकाणांपासून केवळ आनंदच नाही लुटला, तर त्यांना अधिक सुशोभित केले. देशाला धनवान आणि जनतेला खुशहाल केले. अर्थात या देशाला सोन्याची चिमणी  करण्यात आमचा सिंहाचा वाटा. आणि इतके असूनसुद्धा आज आम्ही आमच्याच देशात परके, आम्हीच संशयित, कोठेही आमचाच तिरस्कार का? ज्या समुदायाने या देशाला आज्ञानाच्या  अंधकारातून प्रगतीच्या प्रकाशात आणले आज तोच समुदाय काठावर! या देशाला जगातील सात आश्चर्यांपैकी एक अजुबा ताजमहल आम्ही दिला. तो लाल किल्ला ज्याच्यावरुन सर्वप्रथम भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा पंडित जवाहरलाल नेहरूंनी तिरंगा फडकावून केली व जिथे दरवर्षी १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला आमच्या देशाचे पंतप्रधान तिरंगा ध्वज फडकवितात तो लाल किल्ला आमचा. ज्याच्या बुलंदीवर भारताला गर्व आहे असा कुतुबमिनाराची निर्मिती आम्हीच केली. इंग्रजांविरोधात लढा देणारा नवाब  सिराजुद्दौला पण मुसलमान होता. ज्याची जीवनज्योत संपेपर्यंत ‘आता आम्ही गर्वाने म्हणू शकतो की संपूर्ण भारतावर आमचा राज्य आहे’ असे उदगार ज्याच्या भीतीपोटी इंग्रज काढू  शकले नाहीत, असा स्वातंत्र्यसेनानी टिपू सुलतान पण मुसलमान होता. ते बहाद्दर पठाण खान अब्दुल ग़फ़्फार खान ज्यांनी भारताच्या सरहद्दीवर इंग्रजांशी झुंज दिली व 'सरहद्द  गांधी'च्या उपाधीने ओळखू लागले ते पण मुसलमान होते. जिगरबा़ज सैनिक शहीद अब्दुल हमीद ज्याने पाकिस्तानाचे टँक उडवून स्वत:चे देशासाठी बलिदान दिले तोखील एक  मुसलमान होता. यांच्या व्यतिरिक्त मौलाना आ़जाद, सर सय्यद अहमद खान, हाकिम अजमल खान, मौलाना मोहम्मद अली जौहर, मौलाना शौ़कत अली, अश़फा़कउल्ला खान, हसरत  मुहानी आणि ह़जारों उलेमांनी या देशासाठी आपले प्राण गमाविले ते सर्व मुसलमान होते.
एवढेच नाही तर 'तहरीक ए ख़िला़फत' आमची, रेशमी रुमाल तहरीक आमची, इंकलाब ज़िंदाबाद हा नारा आम्हीच दिला. गांधींना महात्माची उपाधि आम्हीच दिली. ‘सारे जहाँ से अच्छा’  गीत आमचे. एवढेच नव्हे तर देश स्वतंत्र्याच्या लढ़ामध्ये ज्या भाषेने देश व देशातील जनतेला एका डोरमध्ये बांधून प्रत्येक भारतीमध्ये स्फूर्ती व ऊर्जेचा संचार करणारी उर्दू भाषा  आमचीच. इतके असून सुद्धा आजतागात आम्ही आमच्याच देशात परके का?
या देशाचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात आम्हीच पोहोचविले. या देशाला मि़जाईल आम्हीच दिले, भारतीयांना युद्धात तोफ चालविणे आम्हीच शिकविले, सांस्कृतिक जगतात आमचेच  राज्य, ज्याच्या मधुर वाणीने एकेकाळी भारतीयांना पीसे लावले तो मोहम्मद रफी मुसलमान, ज्यांच्या ़ग़जलांच्या सागरात प्रत्येक भारतीयाला बुडण्यात म़जा येते असे मीर आणि
गालिब मुसलमान, क्रिकेटच्या मैदानात ज्या क्रिकेटपटूंनी देशाचे नाव शिखरावर पोहोचविले असे अ़जहरुद्दीन, टाईगर मंसूर अली खान, सय्यद किरमानी, वसीम जा़फर, जाहिर खान,   इरफान पठाण, यूसुफ पठाण, मोहम्मद शमी सर्व मुसलमान. पहिली शिक्षिका फातेमा शेख मुसलमान, टेनिस स्टार सानिया मि़र्जा मुसलमान, पक्ष्यांचे वैज्ञानिक डॉक्टर सलीम अली  मुसलमान, गामा पहिलवान मुसलमान, वैज्ञानिक डॉ. ए पी जे अब्दुल कलाम मुसलमान, शहनाईचे फनकार उस्ताद बिस्मिल्लाह खान मुसलमान, तबलावादक जाकिर हुसैन मुसलमान,   भारताला ज्याने प्रथम: ऑस्कर मिळवून दिले ते संगीतकार ए आर रहमान मुसलमान, भारताचे चार राष्ट्रपती जाकिर हुसैन, मुहम्मद हिदायतुल्लाह, फकरुद्दीन अली अहमद, डॉ. ए पी  जे कलाम मुसलमान. भारतात प्रत्येक क्षेत्रात मुसलमान पुढेच मग भारत आमचा का नाही?
आज भारताची जी जगावर छाप आहे त्यात इतराप्रमाणे आमचा पण सिंहाचा वाटा आहे, भारताच्या वैज्ञानिक, शैक्षणिक, कृषी, व्यपार, सामाजिक, राजनीतिक, क्रीडा इ. सर्वच क्षेत्रांत  भारताच्या विकासात मुसलमान सामील, तरी पण आमचेच देशबांधव आम्हाला परके समजतात. ‘हम ही जब न होंगे तो क्या रंगे मह़िफल’ अर्थात; आमच्याविना तुमचे मन कसे  रमणार? या भारताच्या ओटीत झालेल्या संगोपनाच्या उपकाराची परतफेड करत या देशाला वैभव, संपत्ती, नावलौकिक आम्ही मिळवून दिले, तर मग आमच्यावरच आरोप का की  आम्ही वफादार नाही?
ते आम्हीच होतो जेव्हा बहादूर शाह चित्तौडवर आक्रमण करण्यास निघाला तेव्हा एक हिंदू राणी कर्णवतीने जेव्हा आपल्या मदतीसाठी आपल्या मानलेल्या भावाला- हुमायूँला बोलविले  तेव्हा ह़जारों सैन्याची फौज घेवून तो राणीच्या मदतीला धावला. ते आम्हीच होतो जेव्हा एका स्त्रीच्या अब्रूवर बेतले तेव्हा तिला न्याय मिळवून देण्याकरिता मुस्लिम राजाने आपल्या   निकटवर्ती मुस्लिम इसमास मृत्युदंडाची शिक्षा दिली. शिवाजी महाराज कसे होते त्यांचा चित्र काढून शिवाजी महाराजांचा देखणा चेहरा जगासमोर आणणारा मुसलमान. शिवाजी  महाराजांचे सच्चे वफादार आम्हीच होतो. बाळ ठाकरे साहेबांच्या अखेरच्या दिवसांत त्यांचा जीव वाचविन्यासाठी जो डॉक्टर धडपड करीत होता तो मुसलमान. उत्तर प्रदेशात लहान  बाळांचा जीव वचवीणारा डॉक्टर कफील पण मुसलमान. इतका असून सुद्धा आमचे देशबांधवांच्या मनात आमच्याविषयी द्वेषाची भावना का?
भारताचा स्वर्ग काश्मीर आबाद आमच्यामुळे, चाँदनी चौकची सुंदरता आमच्यामुळे, लखनौची ऩजाकत आमच्यामुळे, दिल्लीची सभ्यता आमच्यामुळे, इतकेच नव्हे तर मुरादाबादची भांडी  आमची, फिरोजाबादची चूड़ी-बांगड़ी आमची, बनारसची साड़ी आमची, अलीगढचे कुलूप आमचे, मालेगांव-भिवंडीचे कापड आमचे, जेव्हा एवढे काही आम्ही या देशाला दिले तर मग का 
भारत आमचा देश नाही?
का स्वतंत्र्यानंतर ७० वर्ष होऊन सुद्धा आमच्या देशप्रेमावर प्रश्नचिन्ह आहे? या देशाच्या मातीत आमचाही रक्त, घाम मिसळलेले आहे. याच्या बंजर जमिनीला कष्टाने आम्ही पण  सुपीक केले. या देशाची सुरक्षा व शांतीसाठी सीमारेषेवर आम्ही सुद्धा अहोरात्र उभे आहोत. मग का आमच्यावर दहशतवादचा आरोप लावला जातो?
हे मान्य आहे आज आमची आपल्याच देशात किंमत शून्यसारखी आहे पण माझ्या देशबांधवांनो, हे लक्षात ठेवा, आम्ही ते शून्य आहोत जे एकत्र आल्यास त्याची किंमत दहा करते,  दहासोबत जोडल्यास त्याला शंभर करते आणि शंभरसोबत जर जोडले गेले तर त्याची किंमत हजार करू शकते. पण माझ्या देशबांधवांनो, तुम्ही जर आम्हाला हटविण्याचा प्रयत्न केला  तर तुमचाही फायदा होणार नाही, कारण जसे शून्य हटविल्यानंतर फक्त एकच उरते, त्याच प्रकारे तुम्ही पण एकटेच पडणार. हा देश आमचा आहे, आमचा प्रिय भारत! आणि आम्ही   याच्यासाठी काय नाही केले, याच्या उन्नतीकरिता आम्ही जीवाचे रान केले. हा देश आमचा आहे, या देशातील प्रत्येक वस्तूवर आमचा पण बरोबरीचा वाटा आहे आणि आम्हाला वगळून  या देशाची कल्पना रंगहीन व अर्थहीन आहे. म्हणूनच असे म्हणणे चुकीचे नाही की,

‘हम ही जब न होंगे तो क्या रंगे मह़िफल’!

-शेख साबेर, टेंभुर्णी, जालना
मोबाइल: ९४२१३२७०३४

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget