Halloween Costume ideas 2015

देशातील बदलते वातावरण आणि मुस्लिम समाज

अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेने जमाअत-ए-इस्लामी हिंदचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद सआदतुल्लाह हुसैनी यांच्या सत्कारार्थ 21 एप्रिल 2019 रोजी  विद्यापीठाच्या ऐतिहासिक अशा ऑस्ट्रेची हॉलमध्ये सत्कार समारंभ आयोजित केला होता. उत्तरादाखल अमीरे जमाअत यांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद या ठिकाणी वाचकांच्या  सेवेत सादर करीत आहोत.

अलिगढ मुस्लिम विद्यापीठ आणि त्याच्या विद्यार्थ्यांवर देशातील सर्व लोकांच्या विशेषतः मुस्लिम समुदायाच्या नजरा कायम टिकलेल्या असतात. या विद्यापीठाची आणि या  विद्यापीठातील विद्यार्थ्यांची भूमिका नेहमी महत्त्वाची राहिलेली आहे. मुस्लिम समाजाच्या प्रत्येक ऐतिहासिक निर्णयामध्ये या विद्यापीठाने आणि येथील विद्यार्थ्यांनी केंद्रीय भूमिका  बजावलेली आहे. आमच्यामधून पुढे आलेले अनेक शक्तीशाली आवाज येथूनच आलेले आहेत. महत्वाची आंदोलने येथूनच सुरू झालेली आहेत. प्रत्येक अडचणीच्या वेळेस मुस्लिमांना  येथूनच मार्गदर्शन मिळालेले आहे.
आज जेव्हा भारतीय मुस्लिम एका ऐतिहासिक कालखंडातून मार्गक्रमण करीत आहेत तेव्हा त्यांच्यासमोर अनेक प्रश्न उभी आहेत. अनेक आव्हाने आ वासून पुढे उभी ठाकलेली आहेत.  त्यांना सामोरे जाण्यासाठी मुस्लिमांची आशा तुमच्यावर टिकलेली आहे. मला आनंद आहे की, या विद्यापीठाची विद्यार्थी संघटना आपल्या ऐतिहासिक भूमिकेबद्दल जागरूक आहे. मला  आशा आहे, अशा नाजूक कालखंडातही ही संघटना आपली भूमिका योग्य पद्धतीने निभावेल. मला माहित आहे, येथील विद्यार्थी आपल्या जबाबदारीचे निर्वहन करण्यासाठी तयार आहेत.  अल्लाह आपल्या ऐतिहासिक भूमिकेला कायम ठेवो. बदलत्या काळातही तुमची भूमिका योग्य प्रकारे निभावण्यासाठी अल्लाह तुमची मदत करो. आमीन.
’देशाचे बदलते वातावरण आणि मुसलमान’ हा आजच्या माझ्या भाषणाचा विषय आहे. आपण सर्व पाहतच आहोत, आपला देश बदलत आहे. कोणत्या-कोणत्या गोष्टी बदलत आहेत,   यासंबंधी अनेक पैलूंनी भाषण करता येईल. तरीसुद्धा सर्वच पैलूंविषयी चर्चा करणे या ठिकाणी शक्य होणार नाही. फक्त दोनतीन महत्त्वाचे पैलू मी तुमच्यासमोर उलगडून दाखविणार  आहे. असे पैलू ज्यांनी आपल्या जीवनावर खोलवर परिणाम केलेला आहे. याच संदर्भात मी काही आवाहने करणार आहे.
मला असे वाटते की, याबद्दल कोणाचे मतभेद नसतील की, सर्वात मोठा बदल मागच्या काही वर्षात जो झालेला आहे आणि ज्याने देशाच्या सामाजिक, राजकीय परिस्थिती आणि लोकांच्या विचारशक्तीला प्रभावित केलेले आहे. तो पैलू आहे आक्रमक जातीयवाद (अग्रेसिव्ह कम्युनॅलिझम). गेल्या काही वर्षांपासून जातीयवादी शक्तींनी वेगाने आपल्या देशात प्रगती  केलेली आहे. देशातील राजकारण आणि सामाजिक परिस्थितीवर या लोकांचा मोठा परिणाम झालेला आहे. यांना मोठ्या प्रमाणात समाजामध्ये स्वीकृतीही मिळालेली आहे. समाजाच्या  मूळ गाभ्यालाच यांनी प्रभावित केलेले आहे.
आक्रमक जातीयवादाचा आविष्कार पहिला मोठा बदल आहे. जो आपल्या देशात ठळकपणे दिसून येत आहे. याने देशाच्या सर्व भागावर प्रभाव टाकलेला आहे. समाजाच्या ठेवणीमध्ये  बदल केलेला आहे. लोकांच्या वैचारिक शक्तीला प्रभावित केलेले आहे. देशासमोरील प्रश्न आणि परिस्थिती यांच्याकडे बघण्याच्या दृष्टीकोणावर सुद्धा परिणाम केलेला आहे. परिणामी  देशामध्ये घृणेचे वातावरण पसरत आहे. सामाजिक विभाजन होत आहे. वेगवेगळ्या गटात समाज विभागला जात आहे. जात आणि पोटजात यांच्यातील पक्षपाताची भावना जी सुप्त  अवस्थेत होती आपल्या देशाच्या घटने आणि घटनात्मक मुल्यांनी ज्या पक्षपाताला डोके वर काढू दिले नव्हते, जातीयवाद्यांच्या वर्चस्वामुळे ते सारे पक्षपात पुन्हा एकदा जागृत होत  आहेत. जर या संकटाचा सामना वेळीच नाही केला गेला तर देशाच्या एकूण रचनेतच बदल घडून येईल. देशातील एकात्मता संकटात येईल. मुलभूत लोकशाही मुल्य संकटात येतील.  मला असे वाटते की, हा पहिला बदल आहे जो समाजामध्ये होत आहे. ज्याची दखल घेणे आवश्यक आहे.
सर्वसाधारणपणे जेव्हा जातीयवादाचा प्रश्न येतो तेव्हा आपण फक्त राजकारणापुरता त्याच्यावर विचार करतो आणि राजकीय पातळीवरच त्याच्याशी सामना करण्याचा प्रयत्न करीत  असतो. मला वाटते ही आपली सर्वात मोठी चूक आहे. जोपर्यंत आपण याला फक्त राजकीय प्रश्न समजू आणि फक्त निवडणुकींच्या वेळी त्याच्याशी दोन हात करण्याचा प्रयत्न करू  तेव्हा खऱ्या अर्थाने आपण या प्रश्नाचा सामना करू शकणार नाही. जातीयवाद वास्तविक पाहता सामाजिक प्रश्न आहे. जातीयवादी आंदोलनाने आपले विचार समाजामध्ये खोलपणे  रूजविलेले आहेत. राजकीय स्तरावर त्याचा फक्त परिणाम दिसून येतो. मुळात याचे उत्पादन समाजामधून होत असते. तुम्हाला जर जातीयवादाशी सामना करावयाचा असेल तर मुळात  तुम्हाला सामाजिक स्तरावर तो करावा लागेल. समाजामध्ये त्याचा जो परिणाम होत आहे, त्याच्यावर लगाम लावावी लागेल.
या प्रश्नाची सोडवणूक अशा पद्धतीनेच करावी लागेल. या संदर्भात मी काही मुद्दे आपल्यासमोर मांडू इच्छितो. सर्वप्रथम आपण याच्याकडे एक सामाजिक समस्या म्हणून पाहूया.  जोपर्यंत आपण याच्याकडे सामाजिक समस्या म्हणून पाहण्याचा प्रयत्न करणार नाही तोपर्यंत आपण सामाजिक स्तरावर या समस्येशी दोन हात करण्यासाठी तयार होऊ शकणार नाही.  माझ्या दृष्टीने हा पहिला प्रश्न आहे ज्याच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
देशात होत असलेला दूसरा बदल हा आर्थिक स्वरूपाचा आहे. मागच्या काही वर्षामध्ये आपल्या देशाने वेगात  प्रगती केलेली आहे. देशातील शहरी भागाचा चेहराच बदलून गेला आहे. मात्र ही समस्येची एक बाजू आहे. समस्येची दूसरी बाजू ही आहे की, गेल्या 20- 25 वर्षात मोठ्या प्रमाणात  आर्थिक विषमता निर्माण झालेली आहे. दोन वर्षापूर्वीच क्रेडिट स्वीसच्या एका अहवालामध्ये म्हटले होते की, आर्थिक विषमतेच्या बाबतीत जगामध्ये दूसऱ्या क्रमांकाचा वाईट देश आपला  देश आहे. ऑक्सफॉमचे अहवाल नियमित प्रकाशित होत  असतात. ते  जरी तुम्ही नियमितपणे वाचत असाल तर तुमच्या लक्षात आलेलेच असेल की, या अहवालातूनही ऑक्सफॉम ने म्हटलेले आहे की, देशात विषमतेची दरी रूंदावत चालली आहे. दरवर्षी  आपल्या देशातील गरीब जनतेची संपत्ती कमी होत आहे आणि श्रीमंत लोकांची संपत्ती वाढत आहे. दोघांमधील अंतर दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. गेल्या पाच वर्षात हे अंतर  अधिकच वाढलेले आहे. संपत्ती मोठ्या प्रमाणात गरीबांच्या हातातून निघून श्रीमंतांच्या हातात एकवटली जात आहे. याचे जबरदस्त वाईट परिणाम आपल्या देशावर पडत आहेत.  एकीकडे आपला देश तीसरी आर्थिक शक्ती म्हणून उदयास येत आहे. तर दूसरीकडे मानवी उन्नतीचा निर्देशांक (ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स) अनुसार आपल्या देशाचा क्रमांक 134 वा  आहे. ही एक विचित्र स्थिती आहे. मानवीय उन्नतीच्या दृष्टीकोणाने पाहिले तर आपला समावेश जगातील वाईट देशांमध्ये होतो. 2008 सालच्या फोबर्सच्या यादीमध्ये जगातील पहिल्या 10 श्रीमंत लोकांच्या यादीत चार भारतीय होते. एवढी मोठी संख्या युरोपातील कुठल्याही देशाची किंवा जपान सारख्या प्रगतीशील देशाचीही नव्हती. मात्र दुसरीकडे जगातील जी सर्वात गरीबातील गरीब लोकसंख्या आहे त्यातील अर्धी लोकसंख्या भारतीय आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात महागडे रहिवाशी घर मुंबईत आहे आणि त्याच शहरात जगातील सर्वात मोठी झोपडपट्टीपण आहे. हा जो विरोधाभास आहे. त्याचा प्रवास काळानुरूप वाईटातून अति वाईटाकडे होत आहे. हा दूसरा बदल आहे जो आपल्या देशात होत आहे.  तिसरा बदल वरील दोन बदलांचा परिणाम आहे ज्याला मी वर्गव्यवस्थेचे नाव देतोय. आपला देश वेगवेगळ्या वर्गातील लोकांच्या समुहाचा देश आहे. हे समूह धर्माच्या नावावर, जातीच्या  नावावर, शहरांच्या नावावर, ग्रामीण क्षेत्रांच्या नावावर, आर्थिक परिस्थितीच्या नावावर अशा अनेक नावावर बनलेला आहे.
फ्रेंच समाजशास्त्री फ्रान्ट्स फिनोने यांनी या संदर्भात एक रोचक असे विवेचन केलेले आहे. अत्याचारींच्या मानसिकतेवर चर्चा करत असताना तो म्हणतो अत्याचारी माणसाची मानसिकता अशी असते की, तो समाजाकडे विभाजित दृष्टीने पाहत असतो आणि प्रत्येक समाज घटकाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. झोन ऑफ बीईंग (अस्तित्वात असलेला समूह) आणि झोन ऑफ नॉन बीईंग (अस्तित्वात नसलेला समूह) अशा दोन विभागात अत्याचारी लोक समाजाची विभागणी करतात. स्वतःच्या समाज घटकाकडे हे अत्याचारी   लोक अस्तित्वात असलेला घटक म्हणून पाहतात आणि त्यांना काही त्रास झाल्यास अशा लोकांना वेदना होतात. त्यांच्या लेखी अस्तित्वात नसलेल्या समाज घटकाला जेव्हा त्रास होतो  तेव्हा त्यांना वेदना होत नाहीत. या घटकातील लोक त्यांना जनावरासारखे वाटतात. याप्रमाणे जनावरांना त्रास झाल्यास त्यांना वेदना होत नाहीत. त्याचप्रमाणे त्यांच्या लेखी अस्तित्वात  नसलेल्या समाजघटकांना त्रास झाल्यास त्यांना त्याच्या वेदना कळत नाहीत. कुरआनमध्येही यासंबंधी म्हटलेले आहे की, ’’सत्य हे आहे की, फिरौनने जमीनीवर अत्याचार केले  आणि  जमिनीवर राहणाऱ्या लोकांची दोन गटामध्ये विभागणी केली. एका गटाला तो अपमानित करत असे.त्या गटामध्ये जन्माला येणाऱ्या मुलांची तो हत्या करत असे आणि जन्माला येणाऱ्या   मुलींना तो जीवंत राहू देत असे. म्हणूनच तो अत्याचारी होता.’’
मित्रांनों! जो काही बदल या ठिकाणी मी नमूद केलेला आहे तो असाच आहे. काही लोकांना वाटते की, त्यांचा समाज हाच फक्त अस्तित्वात असलेला समूह आहे. बाकीच्यांचे काही  अस्तित्वच नाही, ते झोन ऑफ नॉन बीईंग मधले लोक आहेत. कुठल्याशा सुशिक्षित मध्यमवर्गीय लोकांच्या संबंधात काम करणारी सुंदर कपडे घातलेल्या मुली सोबत जर अत्याचार  होत असतील तर त्या घटनेनंतर दिल्लीपासून गल्लीपर्यंत आक्रोश होतो. समाज माध्यम ओरडायला लागतात. माध्यमांमध्ये वादळ येते. मात्र उत्तर प्रदेशातील खेड्यापाड्यात, बिहारच्या  ग्रामीण भागात, कुठल्याशा गरीब दलित मुलीवर अत्याचार होतात, तेव्हा सगळे गप्प असतात. कारण स्पष्ट आहे. आपल्या देशातील सुशिक्षित वर्ग आपल्याच गटाशी संबंधित असलेल्या  सुंदर मध्यमवर्गीय मुलीला आपली मुलगी समजतो. तिच्या अस्तित्वासंबंधी तो संवेदनशील असतो. म्हणून तिला झालेला त्रास ते सहन करू शकत नाहीत. मात्र ग्रामीण भागातील गरीब,   दलित मुलगी ही त्यांच्या गटातील नसल्यामुळे तिच्यावर अत्याचार झाल्यास त्यांना वेदना होत नाहीत. आता तर आतंकवादासारख्या गंभीर विषयालाही झोन ऑफ बीईंग आणि झोन  ऑफ नॉन बीईंग अशा गटांमध्ये विभाजित करण्यात आलेले आहे. आपल्या गटातील आतंकवादी हे प्रिय तर दूसऱ्या गटातील आतंकवादी हे अप्रीय अशी ही मांडणी करण्यात आलेली  आहे. देशाला अशा गटातटात विभाजित करून त्यांच्याकडे पाहणे आणि आपल्या गटांतील लोकांकडे सहानुभूतीने पाहणे, सर्व सहानुभूती आपल्याच गटातील लोकांपर्यंत मर्यादित ठेवणे,  नॉन बीईंग म्हणजे दुसऱ्या गटातील माणसांना माणसं न समजणे ही फार मोठी अनैतिकता आहे. वास्तविक पाहता हे एक राष्ट्रीय संकट आहे. वेळीच याला प्रतिबंध घातला गेला नाही  तर लवकरच ही एक राष्ट्रीय समस्या बनून जाईल.
येणेप्रमाणे देशाची तीन गटात झालेली विभागणी संबंधित विवेचन मी आपल्यासमोर केलेले आहे. आणि ही समस्या आपल्या देशाला कमकुवत बनवत आहे. आणि देशाला वेगाने  भूतकाळात नेत आहे. याच्यावर नियंत्रण मिळवले नाही गेले तर आपल्या सर्व स्वप्नांचा चुराडा झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी क्षमता या गटातटांच्या विभागणीमध्ये आहे. मूळ प्रश्न  असा आहे की, अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायला हवे? मुस्लिम म्हणून आपली जबाबदारी काय आहे? अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या साहसी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांची  जबाबदारी काय आहे?

(सदर भाषणाचा उर्वरित भाग पुढील अंकी.)
(सदर भाषण उर्दू सा. दावतमध्ये प्रकाशित झाले आहे. त्याचा मराठी अनुवाद बशीर शेख, एम.आय. शेख यांनी केला आहे.)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget