Halloween Costume ideas 2015

पावसाच्या थेंबाइतकी का असेना डोळ्यांतली ओल जीवंत रहावी

हल्ली मौसम बदलत नाहीत, मौसमासारखे
फितुरल्या पक्षांची कशी घ्यावी नोंद ?
सारे पहायचे, ऐकायचे की
डोळे उघडून सताड, बंद करून घ्यावे तोंड !

मुके-मुके राहून किमान चालवित रहावी लेखणी... मांडत रहावी जमेल तशी माणूसपणाची कहाणी. माणूसपणाच्या शहाण्या कहाण्या काही आठवड्यांपासून सगळीकडून उगवून वर येतायेत. मॉबलिंचिंगच्या निमित्ताने होणारे मोर्चे-बिर्चे, आंदोलकांच्या प्रामाणिक भूमिका, न्यायमागण्या... गावागावातला सहिष्णू सूर पुन्हा जागा होतोय... उशिरा जागलेल्यांनी आंदोलकांना रस्त्यावर लढणार्‍यांना शुभेच्छा देत, नेतेपणाच्या पदव्या बहाल करण्यात धन्यता मानली आहे. नव्या प्रश्‍नांचा सातत्याने भडीमार आक्रमण करतोय. माहिती तंत्रज्ञानाच्या स्फोटातला भूलभूलैय्या चकवा देतोय. आपण अजून चकव्यात बहुतेक!!
केतकी चितळेच्या धाडसी व्हीडीओवरून सगळ्या चिकित्सा संपवून थोर विचारवंत शांत झालेत. डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येनंतरच वादळ शमलय. जायरा वसीमच्या खर्‍या (?) सीनेमा लाईन त्याग करण्याच्या गोष्टीला ऊधाण आलंय. तबरेेजला चोरच माणून ’हवा’ तेवढाच व्हीडीओ व्हायरल होतोय. पहूलखाँच्या मुलावरच चार्जशिट दाखल केली जातेय. गावागावात गौशाला उभारल्या जाताहेत. सगळाच मीडिया पाऊस पुरासारखा याच बातम्यांनी भिजून ओसंडतोय. आमीर खानच्या अ‍ॅम्बेसिडरपणाने शिवार जलयुक्त होताहेत.
अवेळी उशिरा पडतोय पाऊस भरपूर आणि सलग पेरणी सुरूय मुस्लिम द्वेषाची रितसर पिकं तरारून  येईलवर जहरमय गच्च लगडून. उद्या कदाचित कापली जातील पोरं कशाच्याही नावावर ’मुस्लिम’ असल्याच्या केवळ कारणावरून. त्यांनी गोंधळ बरकरार ठेवलाय. भुलून जाताहेत सर्वजण. तलाकवरच्या भल्या मोठ्या प्रश्‍नचिन्हाला द्यावं उत्तर की खोदत जावा इतिहास धर्म वगैरे किंवा लिंचिंगविरूद्ध ओरडाव जोराने रस्त्यावस्त्यांतून तर बेरोजगारीच्या प्रश्‍नावर भूत डोलू लागते सर्वत्र.
वाचताना जरी अवघड होत असेल काही समजणं तर केवळ दोन मिनीटे डोळे बंद करून दिवसभरातलं काहीही आठवा. एकतर सर्वत्र मुस्लिम प्रश्‍नांसाठीचा भ्रम दिसेल किंवा सरकारी उदात्तीकरणाच्या जाहिराती. 13 टक्के आरक्षणाने अभिनंदनाच्या वर्षावात आनंदित असणारा समाज बहुल तर पाच टक्क्यासाठी टक्केवारीच्या लाळघोटीत अडकलेला मुस्लिमांचा प्रश्‍न. बहुजनीपदराची उब होत समानतेचा पाढा बडबडणार्‍याला कोरस देणारे असे कितीजण? आर्टिकल 15 च्या निमित्ताने मुल्यात्मक चिकित्सा आणि शाब्दीक बडेजावपणा पण प्रत्यक्ष अन्यायाच्या वेळी, झगडण्यासाठी साथीला कोण?
मध्येच पर्यावरण रक्षणासाठीच्या 31 कोटी वृक्षारोपणाचा संकल्प आणि या हिरवाईतही भगव्या जर्सी घालून हारलेली मॅचची रंगीत चिकित्सा.
एवढं कसं काय एकाचवेळी ठरवून घडवलं जातं? आणि सगळ्यातून ’जात’मात्र सुटतासुटत नाही. भाषा, सौंदर्य, कला, साहित्य याही संवेदनाच्या भरवी क्षेत्रामध्ये धर्म-जात मानसिकतेच्या भक्कम जागा तयार झाल्या आहेत.
पावलोपावली, क्षणोक्षणी उन्मादाला सहनशीलतेचा सोज्वळ सनातनी मुखौटा चढवून पेश केलं जातंय. सत्ताधारी पक्षाच्या महिलानेत्या गलीच्छ शब्दांतून मुस्लिमांना धडा शिकवायचे अती हिंदूत्ववादी फंडे सांगते, आणि नाही  होत कसलीच कारवाई. जीवंत आहे लोकशाही, सेपरेट करून जात समुहाला. समांतर अशा अनेक प्रवाहांचे गुपचुप, कधी उघड काम सुरूय ध्रुवीकरण करण्यामध्ये त्यांच्या भूमिका आहेत. फॅसिझम वगैरे समकालीन चेहरा खूप सोज्वळ आहे. प्रत्येकांच्या नेणीवेतून तो ठळक होतोय. निवडणूक पूर्व आणि नंतर अशा सर्वच पक्षांच्या प्रचारांची भाषणबाजी लक्षात घेतली तरी ढोबळपणे काय समोर आहे, हे पटकन् लक्षात येतय.
दुःख जास्त याचं की भौतिक सुखाच्या गोष्टींप्रती वाढलेली श्रद्धा, एकूण माणूसघाणी नवश्रीमंती यातून सामान्य गरीबाची चेष्टाच होत आहे. समभावाच्या पातळीवर आर्थिक प्रबलता, पद, प्रतिष्ठा यांची शिरजोरी वरचढ आहे. सेक्युलॅरीझम सारख्या गोंडस शब्द जातीधर्मनिहाय उच्चभ्रू लोकांपर्यंत मस्त सिमित आहे. आडनावावरूनच केवळ मनुष्यबळ, पाठीशी उभ्या राहणार्‍या सामाजिक जातीसंघ संघटना यांची तुल्यता ओळखली जाते. अगदी वेचून निवडून ठेचायचे तर तुकड्यांनी शोकगीताच्या ओळी गायलाच हव्यात मोठ्या आवाजात एकट्याने. याच्यात समसमजावे आवाज मिसळत राहतीलच. शमिमा अख्तरचे पसायदान गायन ऐकताना, मोहम्मद रफीची जादू अगदी गडद होत जाते. बिस्मीलांची शहनाई किंवा तबल्याचा नाद नदीभरून वाहत राहतो जाणीवांच्या समुद्रापर्यंत.
जायराच्या कथित निर्णयाचे मतमतांतर मांडतानाही विनोदखन्ना ओशोमय आठवतात. नशिल्या केसेसमधून सुटलेली ममता कुलकर्णी साध्वी होण्याचा निर्णय घेते, त्याचं ही हसू येतंय. या सगळ्या उन्मादी वेळखाऊ उपद्रवी चर्चापेक्षा भिंती कोसळून गाडल्या गेलेल्या मजूर कामगारांच्या करून मृत्यूवर रडू यावं... डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा देताघेताना डॉ.कफिल अहमदला सलाम करावं. सगळ्या कचाट्यातून सुटून जावं, धडपडत उभं रहावं. पावसाच्या एका थेंबाइतकी का असेना डोळ्यांतली ओल जीवंत रहावी. ओलाव्याची हिरवळ बहरून संवेदनाचा लळा लगावा.
हर जुर्म पे उठती है, उंगलीयाँ मेरी तरफ
क्या मेरे सिवा शहर में मासूम हैं सारे..??


- साहिल शेख
9923030668
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget