अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या साहसी विद्यार्थ्यांची जबाबदारी काय आहे?
आपण सर्व मुस्लिम आहोत, इस्लामवर आपला विश्वास आहे. आपला याच्यावरही विश्वास आहे की, मानवी जीवनाच्या गुंतागुंतीचे सगळे प्रश्न इस्लामी शिक्षणाच्या माध्यमातूनच सोडविले जाऊ शकतात. त्यामुळे आपली मुलभूत जबाबदारी ही आहे की, इस्लामी मुल्यांचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण शक्ती व हिमतीने करावा. आपल्या प्रयत्नांमध्ये उत्साह आणि धाडस असणे गरजेचे आहे. आपले म्हणणे पूर्ण ताकदीनिशी देशाच्या नागरिकांसमोर मांडायला हवे. त्यांना सांगायला हवे की, तुम्ही-आम्ही सर्व एका ईश्वराचे उपासक आहोत. एकाच शक्तीने तुम्हा-आम्हाला जन्म दिलेला आहे. झोन ऑफ बिईंग आणि झोन ऑफ नॉनबीईंग मधील माणसांची विभागणी ही अनैसर्गिक आहे. तुम्ही सर्व एकाच आई आणि वडिलाची लेकरे आहात. आपसात बहीण, भाऊ आहात. दलित स्त्री सुद्धा माझी बहीण आहे. जंगलात राहणारे आदिवासी सुद्धा माझे भाऊ आहेत. पूर्वोत्तर भारतात राहणारे आणि पश्चिम भारतात राहणारे सुद्धा माझे भाऊ आहेत. प्रत्येक माणूस मग तो कोणत्याही धर्माचा असो आदम (अलै.) आणि हव्वा (अलै.) यांची संतान आहे. त्यांचे दुःख माझे दुःख आहे. त्याची प्रगती माझी प्रगती आहे. तो कमकुवत झाला तर मी कमकुवत झाल्यासारखे आहे. ही संवेदना एका ईश्वराला मानणारे आपल्या मनात ठेवतात व ती जनमाणसापर्यंत पोहोचवू शकतात. देशाच्या सद्याच्या परिस्थितीमध्ये तुमची ही जबाबदारी अनेक पटीने वाढलेली आहे.
सद्याच्या विपरित परिस्थितीमध्ये इस्लामचा संदेश पोहोचविण्याची एक संधी लपलेली आहे. सद्याचे वातावरण हे अनैसर्गिक वातावरण आहे. जातीयवाद ही पूर्णतः अनैसर्गिक गोष्ट आहे. लोकांची गटातटामध्ये विभागणी करणे आणि त्यांच्यात विष पेरणी करणे ही एक अनैसर्गिक अवस्था आहे. सकृतदर्शनी ही स्थिती वेगाने प्रगती करताना दिसते मात्र मानवीय प्रवृत्ती उशीरापर्यंत याला सहन करू शकत नाही. काही दिवसातच मानवी प्रवृत्ती यापासून विटून जाईल. त्यांच्यात या जातीय परिस्थितीबद्दल घृणा निर्माण होईल. तसेच ही आर्थिक विषमता सुद्धा अनैसर्गिक आहे. ही पण फार दिवस मजबूत राहू शकणार नाही. या वर्गांमध्ये माणसाची वर्गवारी होणे अनैसर्गिक आहे. ही पण जास्त दिवस चालू शकणार नाही. अनैसर्गिक प्रवृत्ती जेव्हा फोफावते तेव्हा तर नैसर्गिक धर्माला फोफावण्याची संधी मिळते. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा ज्या काळात जन्म झाला तो काळ असा होता जेव्हा मानवता आत्महत्या करण्यास पूर्णपणे सज्ज होती. जगात सर्वत्र अत्याचार, अन्याय आणि भेदभाव शिखरावर पोहोचलेला होता. जेव्हा अशी परिस्थिती उत्पन्न झाली तेव्हा इस्लामचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची सोय झाली. देशातील सद्याची परिस्थिती सकृतदर्शनी आपल्याला आव्हानात्मक जरी वाटत असली तरी इस्लामचा संदेश पोहोचविण्यासाठी ती अतिशय उपयुक्त आहे.
पाच वर्षापूर्वी देशाच्या जनतेने मोठ्या आशेने या लोकांची निवड केली होती. त्यामुळे सत्ताबदल झाला होता. नवीन सरकार आले होते. परंतु, आज परिस्थिती अशी आहे की, निराशा सगळ्या देशात पसरलेली आहे. या सरकारकडून भ्रष्टाचार नष्ट होईल, अशी आशा निर्माण झाली होती. अन्यायसुद्धा समाप्त होईल अशी आशा लोकांनी केली होती. मात्र झाले भलतेच. अन्याय वाढला. देशाची प्रगती होईल याची खात्री होती. मात्र देशाची प्रगती खुंटलेली आहे. एवढेच नव्हे तर ती रसातळाला जात आहे. जेव्हा मोठ्या आशा आकांक्षा धाराशाही होतात तेव्हा त्यातून येणारी निराशासुद्धा मोठी असते. मग माणसं नवीन वाटा शोधण्यासाठी विवश होऊन जातात. नवीन दृष्टीकोणाची चाचपणी केली जाते. इस्लामचा संदेश पोहोचविण्याची याच्यापेक्षा चांगली संधी दुसरी कोणती असेल?
क्रमशः
Post a Comment