Halloween Costume ideas 2015

मुजफ्फरपूर : ‘गिधाडू’वृत्तीचे बळी

युद्ध, रोगराई किंवा नैसर्गिक आपत्ती संकट कोणतेही असले तरी त्याचा पहिला बळी असतो लहान मुले. उत्तर प्रदेशमधील गोरखपूर असो की बिहारमधील मुजफ्फरपूर चमकी तापामुळे  गरीब घरातील लहान मुले मरण पावत आहेत. अर्थात मृत्यूचे कारण लीची नव्हे तर त्या लोकांची गरीबी आहे. मरणाऱ्या या लहान मुलांचा आकड राज्यात १९०च्या पुढे गेला आहे, तर  सुमारे ५०० बालकांवर उपचार सुरू आहेत. मुलांच्या मृत्यूंबाबत निदर्शने करणाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. वैशाली जिल्हा प्रशासनाने ही कारवाई केली.  मुजफ्फरमधील मुलांच्या मृत्यूच्या तांडवानंतर कार्पोरेट मीडियाकर्मींना आयतेच टीआरपी अपडेट सापडू लागले. त्यामुळे त्यांना माणुसकीची सीमादेखील दिसली नाही. सत्ताधारी नेते तर   त्यांच्याही पुढे गेले आणि तब्बल १७ दिवसांनंतर मुख्यमंत्री मरणासन्न झालेल्या मुलांकडे यायला वेळ मिळाली. तर दुसरीकडे विरोधीपक्षातील नेतेमंडळी त्या मुलांच्या आयाबापांनाच   आम्हाला मत का दिले नव्हते म्हणून कोसू लागली. हे सर्व पाहून केव्हिन कार्टर या छायाचित्रकाराची आठवण येते. त्याने कुपोषणाने मरणासन्न होऊन, उन्हातान्हात निपचित पडलेली एक लहानगी ‘मुलगी’, कधी मरतेय आणि कधी आपण तिचा फडशा पाडतोय, यासाठी टपून बसलेले एक गिधाड, सुदान देशामधील भीषण दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर, असे प्रत्ययकारी   दृश्य कॅमेऱ्यात अतिशय कौशल्याने बंदिस्त केले, त्या फोटोबद्दल त्याला पत्रकारितेतील आंतरराष्ट्रीय सन्मानाचे ‘पुलित्झर’ पारितोषिक मिळाले खरे पण, या सन्मानाचा आनंद काही   त्याला, फार काळ उपभोगता आला नाही. लवकरच, काही महिन्यातच, वैफल्यग्रस्त अवस्थेत त्याने आत्महत्या केल्याची बातमी हां हां म्हणता जगभर वाऱ्यासारखी पसरली आणि सगळे  जग हादरले! कारण जगभरातल्या मोठमोठ्या वृत्तवाहिन्यांवरून (न्यूज चॅनेल्स) त्याने संपादन केलेल्या यशाबद्दल त्याचे उदंड कौतुक सर्वत्र सुरू होते. पण, अशाच एका  दूरचित्रवाहिनीवरील मुलाखतीत कोणीतरी त्याला फोन करून प्रश्न विचारला की, ‘त्या सुदानी मुलीचे पुढे काय झाले?’ ...आणि त्या अचानक विचारल्या गेलेल्या प्रश्नाने केव्हिन कार्टर  समूळ हादरला. चाचरत, गांगरतच तो उत्तरला, ‘फोटो काढून झाल्यावर मला विमान पकडायची घाई असल्याने, मी त्या मुलीचे काय झाले, हे पाहण्यासाठी नाही थांबू शकलो!’ ...आणि  मग, न थांबता, तो प्रश्नकर्ता पुढे केव्हिनला म्हणाला की, ‘मी हे तुला सांगू इच्छितोय की, त्या दिवशी घटनास्थळी एकच ‘गिधाड’ नव्हते. दुसरेही एक ‘गिधाड’ तिथे मौजूद होते आणि  त्यापैकी एकाच्या हातात ‘कॅमेरा’ होता!’ त्या विधानानं, केव्हिन कार्टरला प्रचंड मानसिक धक्का बसला. तो कमालीचा अस्वस्थ झाला आणि पुढे लवकरच वैफल्यग्रस्त अवस्थेत तो  आत्महत्या करता झाला. यशकीर्तीच्या धुंदकुंद अस्मानात उत्तुंग भरारी घेणाऱ्या, हाती कॅमेरा असलेल्या, एका ‘गिधाडा’च्या पंखांची फडफड अचानक थांबली! मुजफ्फरपूरमधील कुपोषणाच्या या थैमानामागच्या सर्व जोखीम घटकांबरोबरच यातल्या सर्वात असुरक्षित कुटुंबांवर लादल्या गेलेल्या अतिरिक्त तणावामुळे या वर्षी अनेक कमजोर मुले या संकटात  ढकलली गेली आहेत. सर्वाधिक कुपोषित असलेल्या बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या तुलनेत कुपोषित मुलांचे महाराष्ट्रातील प्रमाण कमी आहे. मुलांचे मृत्यू आणि कुपोषणाच्या संकटावर उपाय शोधताना समाजातील सर्वात असुरक्षित समूहाबद्दल सहानुभूती असणे गरजेचे आहे. आपण जे काही करतो, जी परिस्थिती पाहतो, हाताळतो. त्यातून काही मिळवण्याच्या अनावर लालसेपूर्वी, प्रथम माणुसकीचा ‘ईश्वरी अंश’ आपल्यात जागवायला हवा. ‘सहसंवेदनेचा दीप’, आपल्या पंचप्राणांतून तडफडून पेटायला हवा. केव्हिन कार्टरने  जर त्या लहान असाहाय्य मुलीला उचलले असते आणि तेथील हाकेच्या अंतरावरील ‘युनो’च्या अन्नऔषध-मदतकेंद्रात दाखल होण्यास तिला मदत केली असती, तर आज ‘केव्हिन कार्टर’  हयात असता आणि ती लहानगीही! आजच्या जगात्त काही ठिकाणी अन्न, वस्त्र ,निवारा यासारख्या मुलभूत गोष्टींसाठी वंचित अशा समाजाचा या सर्व अभावांतून जगण्याचा  केविलवाणा प्रयत्न आहे तर एकीकडे या यंत्रयुगाने आलेली सर्व सुबत्ता उपभोगणारा एक असंवेदनाशील असा वर्ग आहे. जो आत्मरत आहे स्वत:चेच सेल्फी काढ ण्यात मग्न आहे.  एखादी भयंकर विचित्र घटना घडताना प्रत्यक्षदर्शीना तो प्रसंग कॅमेरात टिपायचा असतो. मदत नंतरची गोष्ट झालीय फक्त काहीजण अपवाद असतील. मानवानेच निर्माण केलेली ती  स्थिती दर पावलागणिक ठेचा देत राहिली आहे. तेजाने दुनिया उजळून निघते पण इथे मात्र फुटलेल्या तेजाने सारी दुनिया काळवंडून गेल्याचे दिसले. रक्तपताका भाळी घेऊनच याच  पृथ्वीवर कुठेतरी कुणीतरी आजही दिवस कंठीत आहे आणि त्याच्या मरण्याची वाट पाहाणारी गिधाडे अधाशीपणे नजर लावून बसली आहेत. सरकारी अभिजन मंडळी आपली प्रशासनिक  वा व्यावसायिक जबाबदारी पार पाडताना माणुसकीला साफ पायदळी तुडवत बेमुर्वतखोरपणे निर्णय घेत जातात आणि आपली गिधाडू वृत्ती सिद्ध करतात. 

-शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४,
Email: magdumshah@eshodhan.com

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget