Halloween Costume ideas 2015

उपासना

पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांनी इस्लामच्या प्रगटनाच्या वेळी समाजामधील अनिष्ठ रूढी, परंम्परा, अनेकेश्वरवादी, अंधश्रद्धा, मूर्तिपूजेच्या विरोधात कार्य करीत असताना प्रचंड वाईट  प्रतिक्रिया समाजात व्यक्त होत होत्या आणि त्यावर मात करीत असताना मोठा त्रास पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांना झाला. पण त्यांनी धर्माचे कार्य सोडले नाही. या कार्यात अनेक लोकांनी सहभाग नोंदविला व ते कार्य चालू ठेवले. या कार्यात पुरूषांप्रमाणेच स्त्रियाही सहभागी झाल्या होत्या. शहीददेखील अनेक झाले. अम्मारची आई सुमैय्या (रजि.) इस्लामच्या  कार्यात शहीद होणाऱ्यांत प्रथमस्थानी होत्या. मागील विवरणावरून हे ध्यानी येते की धार्मिक कार्यात पुरूषांच्या बरोबर स्त्रियांचेही योगदान आहे.
कोणत्याही प्राण्याला जिवंत राहण्यासाठी जसे प्राणवायूची गरज असते तसे धर्माच्या कार्यात उपासनेला स्थान आहे. म्हणजे आपण जसे प्राणवायूशिवाय जिवंत राहू शकत नाही तसे  उपासनेशिवाय धर्माची उभारणी होत नाही आणि धर्म टिकावही धरत नाही. धर्म म्हणजे जीवन जगण्याची आचारसंहिता आणि याच आचारसंहितेचे पालन करणे म्हणजे धर्माची ईश्वराची  उपासना करणे होय. प्रामाणिकपणे ईश्वराची केलेली उपासना ही ईश्वराच्या जवळ नेते. ईश्वराची उपासना जर निष्काळजीपणे खंडितपणे, केव्हातरी (सवडीनुसार) केल्यास ईश्वर आणि  भक्त यांच्यातील संबंध निर्बल होतो. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या सर्वच्या सर्व पत्नी ईश्वराची प्रामाणिकपणे उपासना करणाऱ्यांमध्ये उल्लेखनीय आहेत. प्रत्येक स्त्री व पुरूषाने ईश्वराचे  भय बाळगून त्याची आराधना-उपासना केली पाहिजे. उपासनेत नमाजला अनन्यसाधारण महत्व आहे. नमाज अदा करताना काही नियम काटेकोरपणे पाळले जावेत. उदा. नमाज  निश्चित वेळेतच पढली जावी. आपली नमाज अवेळी होणार नाही याची काळजी घ्यावी. मग तो पुरूष असेल अथवा स्त्री. जमाअतसह (सामुदायिक) नमाजमध्ये स्त्रियांनी सामील झालेच  पाहिजे असे बंधन नाही. त्यांनी आपल्या सोयीनुसार घरी नमाज अदा करावी. नमाज सामुदायिक पठणावर जे लाभ होतात, ते एकट्याने नमाज अदा केल्याने होत नाहीत. म्हणून   स्त्रियांना जमाअतसह नमाज अदा करण्यापासून वंचित ठेवलेले नाही म्हणजेच स्त्रिया सामुदायिक नमाजसाठी मस्जिदमध्ये जाऊ शकतात. आज स्त्रियांच्या मस्जिदमध्ये येण्या- जाण्याबाबत प्रचंड संदेह निर्माण झाले आहेत, ते केवळ धार्मिक ज्ञानाच्या अभावाने.
मस्जिदमध्ये जाण्यासाठी जर परिस्थिती अनुकूल असेल व कोणत्याही नैतिक दोषाची शंका नसेल तर स्त्रिया जाऊ शकतात. कोणताही पुरूष मग तो पिता, पती, पुत्र कोणीही असो तो  आपली मुलगी, पत्नी, आई कोणालाही मशिदमध्ये जाण्यास परवानगी मागितली तर तिला मनाई करू शकत नाही म्हणून काही मशिदमध्ये स्त्रियांसाठी काही जागा राखीव ठेवली आहे.  एवढेच नाही तर नमाज संपल्यावर स्त्रियांनी मशिदबाहेर अगोदर पडावे व नंतर पुरूषांनी बाहेर यावे. स्त्रियांना मशिदमध्ये येण्यास काहीही हरकत नाही. हे जरी सत्य असले तरी त्यांनी  (सवलतीसाठी) नमाज घरीच अदा करणे जास्त उत्तम, असेही कथन आहे. एवढेच नाही तर पैगंबरांनी विशेष नामस्मरणाचादेखील उपदेश केला आहे. उदा. दिवसभर काम-धंदा, नोकरी,  कष्ट, मेहनत, कार्य करून रात्री थकवा आलेला असतो, तेव्हा आपण 33 वेळा ’सुबहानल्ला’, 33 वेळा अलहम्दुलिल्लाह व 34 वेळा अल्लाहु अकबर हा जप जपून नामस्मरण करा.   त्याचबरोबर दैनंदिन जीवन जगताना जेव्हा एखादी सुंदर, चांगली, सुरेख, उत्तम वस्तू वा बाब निदर्शनास आली तर मुखातून ’सुबहानल्लाह’ उच्चारून कृतज्ञता व्यक्त करा. अर्थात हे  सर्व निर्माण करणारा ईश्वर यापेक्षा कितीतरी चांगला आहे. तसेच एखादी बाब प्रचंड मोठी, विराट, भव्य, कितीतरी चांगली आहे. तसेच एखादी बाब प्रचंड मोठी, विराट, भव्य, विहंगम  दिसली तर आपण ’अल्लाहु अकबर’ उच्चारून हे सर्व निर्माण करणारा याच्यापेक्षा परमेश्वर मोठा आहे की कृतज्ञता व्यक्त करावी, तीही समस्त स्त्री-पुरूषांनी. ईश्वराच्या या उपासनेने  व्यक्तीच्या बळात व कार्यशक्तीत मोठ्या प्रमाणात वाढ होते व आपल्यामध्ये चांगुलपणा आपोआप निर्माण होतो. या नामस्मरणावर विश्वास ठेवला तर अल्लाह आपले रक्षण करतो,  म्हणून व्यक्तीने मग ईश्वराचे स्तवन कितीही केले तरी ते कमीच आहे.
इस्लाममध्ये उपवासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रोजा म्हणजे केवळ अन्नपाण्याशिवाय विशिष्ठ कालावधीपर्यंत उपाशीपोटी राहणे नाही तर शरीराच्या असंख्य अवयवांचाही रोजा  असतो. उदा. जीभ, डोळे, हात, कान, पाय, नाक अशा अनेक अवयवांचा रोजा असतो. वाईट बोलू नये, कोणाची चहाडी-चुगली करू नये, शिव्या-शाप देऊ नये, हा जिभेचा रोजा आहे.   डोळ्यांनी वाईट कृत्य पाहू नये, तर कानांनी चांगलेच ऐकावे, हाताने परोपकाराचे कार्य करावे, लाचलुचपत घेणे-देणे करू नये. असे अनेक प्रकारचे रोजे आहेत. त्याविषयी आपणास  सविस्तर ज्ञात आहेच. रोजा वर्षाच्या बारापैकी एक पवित्र महिना ’रमजान’मध्ये पकडला जातो. रोजा सर्वांना (स्त्री-पुरूष) अनिवार्य आहे. रोजा केवळ ईश्वराची आराधना म्हणून पकडला  जात नाही तर वर्षातील उर्वरित अकरा महिने (रमजान वगळून) समाजात आपण कसे जगावे याचे प्रशिक्षण आहे. इस्लामने सदाचारी जीवन जगण्यासाठी वर्षातून एकदा एक महिन्याची  रोजारूपी परीक्षा ठेवी आहे. प्रत्येक स्त्री-पुरूष जाणते झाल्यापासून रोजा अनिवार्य आहे. या उपवासात फक्त आणि फक्त गरोदर महिलेस सूट आहे. तसेच एखादी वयस्कर स्त्री असेल  आणि तिच्यात रोजा धरण्याएवढीही ताकद नसेल तर मात्र त्यापासून तिला सूट मिळू शकते. एखादी व्यक्ती (स्त्री किंवा पुरूष) जर ऐन रमजान महिना चालू असताना आजारी पडली व  ती रोजे नाही धरू शकली तर तिने ईद झाल्यानंतर आपले चुकलेले रोजे पुन्हा कधीही करायचे, ही अनिवार्यता आहे. रमजानच्या रोजाप्रमाणेच नफील (अतिरिक्त) रोजे ही धरले जातात.  नफील रोजे हे अनिवार्य नाहीत तर ते अनुयायांच्या मर्जीचे आहेत. ते रमजान वगळता उर्वरित अकरा महिन्यांत केव्हाही केले जाऊ शकतात. हे रोजेदेखील रमजानच्या रोजाप्रमाणेच  पवित्र असतात.

इस्लाममध्ये दानधर्म
अल्लाहच्या मार्गात खर्च करण्यास महत्व दिले आहे. पवित्र कुरआनमध्ये नमाज व रोजानंतर अल्लाहच्या मार्गातील खर्च-जकात (अडीच टक्के) याला महत्व देण्यात आले आहे. जकात  हे इस्लाममधील कायदेशीर तत्व आहे. ज्याप्रमाणे नमाज पढत असताना अनुयायाचे मन, मनगट, मस्तक, मनका, मान, हृदय, तसेच शरीराचे सर्व अवयव अंगप्रत्यांग ईश्वरासमोर  नतमस्तक आहे. त्यांच्यावर ईश्वराचाच अधिकार आहे. कारण ईश्वराने आपणास ते बहाल केले आहे. तसेच आपल्याजवळ असणारी संपत्ती, पैसा, सोने, मौल्यवान वस्तू याचीही  निर्मिती अल्लाहनेच केली आहे. त्यामुळे आपल्याकडे असणाऱ्या मालमत्तेवरील अडीच टक्के रक्कम दानधर्माच्या कार्यात (जकात) खर्च केलीच पाहिजे. त्यामुळे ही मालमत्ता आपली  नाही ती ईश्वराची आहे असा तो अनुयायी समजतो. अल्लाहच्या मार्गात खर्च करणाऱ्या अनुयायांना महान मोबदल्याचा वायदा केला गेला आहे. म्हटले आहे, ’’निःसंशय दानधर्म करणारे  पुरूष आणि दानधर्म करणाऱ्या स्त्रिया आणि अशा अनेक बाबींचा विचार करून विभिन्न पैलूने अल्लाहच्या मार्गात खर्च करण्याची प्रेरणा दिल्याचे हदीसमध्ये जाणवते.
इस्लाम सांगतो की आपल्याजवळ जे आहे त्यातील उदरनिर्वाहासाठी खर्च करून जे शिल्लक राहते ते गरीबांना वाटा. जे तुम्ही इतरांना वाटाल तेच तुमच्या नावावर शिल्लक राहणार  आहे. याचा दाखला आपणास पुढील प्रसंगातून मिळतो.
माननीय आएशा (रजि.) म्हणतात, ’’आम्ही एकदा बकरी कापली आणि वाटून टाकली.’’ पैगंबरांनी विचारणा केली, ’’त्यापैकी काही शिल्लक आहे का?’’ ’’केवळ फरा उरलेला आहे.’’  माननीय आएशा (रजि.) म्हणाल्या. पैगंबर म्हणाले, ’’असे म्हणा, फरा सोडून सर्वकाही उरले आहे.’’
याचा मतितार्थ, आपल्याजवळील असणारे आपल्या गरजा भागवून उरलेले इतरांसाठी द्या. आपण जे स्वतःसाठी शिल्लक राखून ठेवतो ते आपल्यासाठी राहत नाही तर आपण जे  इतरांसाठी खर्च केले आहे. इतरांना वाटले आहे; तेच आपल्यासाठी पुण्यकर्मात शिल्लक राहते. व्यक्ती जे दानधर्म करते तेच त्याच्यासाठी राहते आणि ते पुण्य वाया जात नाही. वाया  जाते ते जे आपण खाऊन-पिऊन संपवतो. ज्याप्रमाणे श्रीमंत दानधर्म करतात, त्यांच्यासारखे दानधर्म आपण करू शकत नाही ही भावना गरिबांची असते. त्यावेळी त्यांना उद्देशून पैगंबर  उपदेश करतात,
’’दान लहानात लहान वस्तुचेसुद्धा होऊ शकते. यामुळे शक्य आहे की गरजूची खरी गरज पूर्ण होत नसेल, पण प्रसंगी त्याला आधार मिळू शकतो.’’
माननीय आएशा (रजि.) यांनी सांगितले, पैगंबर मुहम्मद (स.) म्हणतात, ’’खजुराचा एक तुकडा का असेना, तो देऊन नरकापासून आपले संरक्षण करा. पोट भरलेल्या माणसाच्या ज्याप्रमाणे तो उपयोगी पडतो त्याप्रमाणे उपाशी माणसालासुद्धा उपयोगी पडतो.’’
दान किती लहान आणि किती मोठे याला किंमत नाही, तर दान देऊन दुसऱ्याची गरज भागविण्याचा विचार किंमतीचा. आपल्या नरकयातना थांबवण्यासाठी किंवा नरकापासून दूर   राहण्यासाठी दानधर्म महत्त्वाचा. दानधर्म न करणे ही एक प्रकारची विकृती आहे. समजा, आपण उपाशी असताना जेवण करणे ही ’प्रवृत्ती’, तर आपण पोटभर खाल्लेले असतानाही  पुन्हा खाणे ही ’विकृती’ आहे आणि आपण उपाशी असताना आपल्या भाकरीतील आर्धी भाकरी दुसऱ्याला देणे ही ’संस्कृती’ आहे. म्हणजेच जे आपण खातो ते संपून जाते आणि जे  आपण देतो ते आपल्यामागे शिल्लक राहते. स्त्रियांना उद्देशून पैगंबर सांगतात, ’’याचकाला दारातून रिकाम्या हाताने पाठवू नका.’’ घरात काहीही नसेल तर करपलेले अन्न का असेना  त्याला द्या. दानधर्म केल्याने अल्लाहकडून त्याचा दुप्पट मोबदला मिळतो. आपण आपल्या कमाईतील रक्कम जशी बाहेरच्या व्यक्तीवर खर्च करतो तशी घरातील व्यक्तीवर खर्च  केल्यानेही पुण्यप्राप्ती होते. पैगंबर एकेठिकाणी म्हणतात (माननीय अबू हुरैरा (रजि.) यांचे कथन),
’’ हे मुस्लिम स्त्रियांनो, तुमच्यापैकी कोणत्याही शेजारणीने आपल्या शेजारणीला तुच्छ समजू नये, जरी शेळीची खुर का असेना. (कोणत्याही परिस्थितीत भेट म्हणून द्या.)’’
तात्पर्य असे की प्रत्येक मुस्लिम स्त्रीने आपल्या शक्तीनुरूप आपल्या शेजारणीला मदत केलीच पहिजे. इस्लामने दानधर्म करणे हे धार्मिक कार्य संबोधले आहे. दानमर्ध करून आपण  आपल्या स्वतःसाठी स्वर्गाची दारे खुली करून घेऊ शकतो आणि आपल्या आयुष्यातील दानधर्मातून स्वर्गात प्रवेश करू शकतो. जी स्त्री पाचवेळा नमाज पढते, ईश्वराची आराधननाम  स्मरण करते, आपल्या पतीची आज्ञा पाळते ती स्वर्गाच्या ज्या द्वारातून जाऊ इच्छील तिला प्रवेश मिळेल. इस्लाम ज्या स्तंभावर उभारलेला आहे त्यापैकी एक आधारस्तंभ म्हणजे  हज होय. ’हज’ विशिष्ट दिवसांत काबागृहाला जाऊन विशिष्ट विधी अदा करण्याचे नाव आहे. हजबरोबरच (हज्जच्या वेळेव्यतिरिक्त) ’उमरा’मध्येही जवळजवळ हजसारखेच विधी अदा  करण्यात येतात. हज आणि उमरा याची प्रचंड मोठी महानता आहे. हजयात्रा इस्लामच्या जीवनातील सर्वात शेवटचे व सर्वात उच्च असे धार्मिक कार्य संबोधले आहे. प्रत्येक मुस्लिम  स्त्री-पुरूषाच्या जीवनाचे हजयात्रा एक अत्यंत पवित्र ध्येय समजले आहे. हजची यात्रा म्हणजे जिहाद (धर्मयुद्ध) होय. यावरून माननीय आएशा (रजि.) यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांना  विचारले,’’ आम्हीसुद्धा तुम्हा सर्वांबरोबर धर्मयुद्धात सामील होऊ शकतो का?’’ पैगंबरांनी सांगितले, ’’तुम्हा स्त्रियांसाठी सर्वात चांगला व सुंदर जिहाद ’हज्जे-मबरूर’ (स्वीकृत हज) आहे.’’  इस्लामने इतर समाजव्यवस्थेप्रमाणे अथवा धर्मव्यवस्थेप्रमाणे स्त्री-पुरूष असा मतभेद करून दोघांसाठी वेगवेगळी आचारसंहिता बनविली नाही. प्रत्येक क्षेत्रात पुरूषांबरोबर स्त्रियांना मान- सन्मान दिला व जीवन जगण्याची एकच आचारसंहिता बनविली. हजयात्रा जेवढी पुरूषांच्या जीवनात महत्त्वाची सांगितली तेवढीच स्त्रियांनादेखील महत्त्वाची आहे. हजयात्रा अल्लाहच्या  काबागृहाची यात्रा स्त्रियांसाठी सर्वांत सुंदर जिहाद आहे. पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांनी जेव्हा अंतिम हजयात्रा (हज्जतुलविदाअ) केली, तेव्हा त्यांच्याबरोबर दहा हजार सोबतीही होते.  एवढेच नव्हेतर त्या महिला सोबतींमध्ये आजारी, गर्भवती व मुलेबाळे असणाऱ्या महिलांचाही समावेश होता. जी स्त्री आपल्या लहान मुलाची हजयात्रा करवून घेईल, तेव्हा त्याचे पुण्य  नक्कीच तिच्या पदरात पडणार आहे. हजच्या बाबतीत स्त्रियांना सवलती देणे आणि त्यांच्या अडचणी सोडविणे याचा आदेश दिला आहे. हजयात्रा स्वतःही करता येते व ती मजबूरी  असेल तर दुसऱ्याकडूनही करवून घेता येते. माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (रजि.) यांनी सांगितले, जुहैना टोळीची एक स्त्री पैगंबर मुहम्मद (स.) यांना म्हणाली, ’’माझ्या आईने हजला जाण्यास नवस केला होता, परंतु हजयात्रा करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला, तर तिच्या वतीने मी हजयात्रा करू शकते का?’’ यावर पैगंबरानी सांगितले, ’’तिच्यातर्फे तुम्ही हजयात्रा करू शकता. जर तुमच्या आईवर कर्ज असते तर तुम्ही ते अदा केले नसते का? अल्लाहचेसुद्धा कर्ज अदा करा. अल्लाहचा हा जादा अधिकार आहे. त्याचे कर्ज अदा केले जावे.’’- (’इस्लामी सुरक्षित सावलीतली स्त्री’ इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्ट, मुंबईने प्रकाशित केले आहे. त्यातील हे लेख. ज्या वाचकांना लेखकाशी भेटण्याची इच्छा आहे त्यांनी 8030273038 या दूरध्वनीवर संपर्क साधावा.)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget