Halloween Costume ideas 2015

मीडियाचा इस्लामोफोबिया

ब्रिटीश प्रसारमाध्यमे मुस्लिम समुदायाविषयी नकारात्मक बातम्या देऊन मुस्लिमांची प्रतिमाच नकारात्मक करत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘मुस्लिम काऊन्सिल ऑफ ब्रिटन’  (एमसीबी) या संस्थेच्या ‘सेंटर फॉर मीडिया मॉनिटरींग’ विभागाने ब्रिटीश माध्यमांच्या वार्तांकनावर नुकत्याच केलेल्या संशोधनातून समोर आले आहे. ब्रिटीश माध्यमांच्या अशा  वार्तांकनामुळे ‘इस्लामोफोबिया’ वाढत असल्याचेही या संशोधनात म्हटले आहे. बहुतांश ब्रिटीश प्रसारमाध्यमे इस्लाम आणि मुस्लिम समुदायाविषयी नकारात्मक आणि दिशाभूल करणारे  वृत्त प्रसारित करत असतात. त्यामुळे इस्लामफोबिया म्हणजेच मुस्लिमांविषयी भीती किंवा आकस तयार होण्यास यामुळे मदत होत असल्याचे या संशोधनात सांगण्यात आले आहे.  तीन तुकड्यात हे संशोधन प्रकाशित केले जाणार असून त्यातील हा पहिला अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. यात ब्रिटीश प्रसारमाध्यमांनी मुस्लिम समुदायाविषयी केलेल्या  वार्तांकनाविषयी काही तथ्ये मांडण्यात आली आहेत. ऑक्टोबर २०१८ पासून ब्रिटनमधील वृत्रपत्र आणि वृत्तवाहिन्यांवरच्या ११,००० लेख आणि कार्यक्रमांचा अभ्यास करुन हा अहवाल  मांडण्यात आला आहे. ज्या पद्धतीने ब्रिटीश माध्यमांनी इस्लाम किंवा मुस्लिमांविषयी वार्तांकन केले आहे ते गंभीर असल्याचे संशोधकाने म्हटले आहे. वृत्तवाहिन्यांवरच्या डिबेट शोमधून  (चर्चासत्रांतून) काही उजव्या विचारसरणीचे नेते आणि प्रवक्ते इस्लाम आणि मुस्लिमांविषयी पूर्वग्रह पसरवत असल्याचे मतही यात व्यक्त करण्यात आले आहे. संशोधनानुसार, या  कालावधीत प्रिंट मीडियामध्ये प्रकाशित झालेल्या ५९ टक्के बातम्या आणि लेखांमध्ये मुस्लिम समुदायाचे नकारात्मक वर्तन अधोरेखित करण्यात आले आहे. तर एकतृतीयांशपेक्षा अधिक  लेखांमध्ये चुकीची माहिती देण्यात आली आहे किंवा सरसकट संपूर्ण समुदायाविषयी नकारात्मकता तयार करण्यात आली आहे. एकट्या ‘मेल ऑन संडे’ या वृत्तपत्रातील ७८ टक्के   बातम्या या ब्रिटनमध्ये राहणाऱ्या मुसलमानांविषयी नकारात्मकता दाखवणाऱ्या होत्या. वृत्तवाहिन्यांमध्ये ‘स्काय न्यूज’मध्ये सर्वाधिक दिशाभूल करणारे वार्तांकन करण्यात आले आहे.  या वाहिनीवर प्रसारित झालेले १४ टक्के व्हिडीओ हे अतिशय पक्षपाती होते. प्रादेशिक वृत्तवाहिन्यांमध्ये मुस्लिमांविषयी तुलनेने सकारात्मक वार्तांकन केले जाते. विशेषत: ‘आय  टीव्ही’च्या प्रदेशिक वाहिन्यांवर मुस्लिमांविषयी पक्षपाती असेल असे कोणतेही प्रसारण केले जात नाही. ‘सेंटर फॉर मीडिया मॉनिटरींग’ला आशा आहे की, मुस्लिम आणि इस्लामवर  वार्तांकनांची ही उदाहरणे पत्रकारांसाठी महत्त्वाची ठरतील’, असे या अहवालाचे सह-लेखक पैâसल हनीफ यांना वाटते. माध्यमांद्वारे करण्यात आलेल्या वार्तांकनाचा परिणाम तेथील  नागरिकांवर झाल्याचे दिसून येते. ‘होप नॉट हेट’ या मोहिमेचे सदस्य यूगोव्ह पोल यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार ६० टक्के लोकांना इस्लाम पाश्चात्य संस्कृतीला धोका असल्याचे वाटते,  तर ५० टक्क्यांहून अधिक लोकांच्या मते इस्लाम ब्रिटिशांच्या जीवनाला धोका आहे. ‘मुस्लिम काऊन्सिल ऑफ ब्रिटन’चे मिकदाद वर्सी आपला हा अहवाल सादर करताना म्हणतात की  मुस्लिमांबद्दलचे नकारात्मक वार्तांकन ते थांबवू इच्छित नाहीत, मात्र आपण केलेल्या वार्तांकनाचा कल कोणता आहे हे समजून घेणे पत्रकारांचे काम आहे. पत्रकारांनी फक्त दहशतवाद   आणि अतिरेक्यांवर लक्ष केंद्रित न करता मुस्लिमांबाबतचे सकारात्मक आणि सत्य घटनांचे प्रसारण त्यांनी करावे. आपण लिहिलेले नकारात्कम लेख योग्य आणि सत्यघटनांवर  आधारित असावेत. त्यांचा सर्वसाधारणपणे मुस्लिम समाजावर वाईट परिणाम होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. वर्सी यांनी ब्रिटीश प्रसारमाध्यमांमध्ये मुस्लिमांच्या चांगल्या  प्रतिमांच्या प्रचारात यशस्वी झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांच्या देखरेखीसाठी मुस्लिम काऊन्सिलद्वारे मुस्लिम मीडिया मॉनेटरिंगची स्थापना केली. ‘ब्रॉडकास्टिंग कोड’मुळे ब्रिटीश  टेलिव्हिजनवर मुस्लिमांच्या नकारात्मक प्रतिमा सादर करण्याचे प्रमाण तेथील वृत्तपत्रांपेक्षा तुलनेने कमी असल्याचे आढळून येते. त्यामुळे स्थानिक दूरदर्शन प्रसारणांमध्ये इस्लाम  आणि मुस्लिमांविषयी सकारात्मक वार्तांकन आणि कथा दर्शविल्या जातात. मुस्लिमांविषयी बातम्या प्रसारित करताना बुरखा घातलेली स्त्रीचे चित्र देणे अनेक वृत्तपत्रांच्या संपादकांना  योग्य वाटते. मात्र आपल्या वार्तांकनाद्वारे मुस्लिम वाचक कसे आकर्षित होतील याकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे, असा सल्लाही या अहवालाद्वारे देण्यात आलेला आहे. इस्लाम आणि  मुस्लिमांविषयीच्या प्रसारमाध्यमांची भूमिका ‘इस्लामोफोबिया’ खतपाणी घालते, हे सेन्सॉरशिप नसून पारदर्शकता आहे. या मीडियातील इस्लामोफोबियाच्या रोगाची सुरूवात यूरोपातून  संपूर्ण जगभर पसरली आहे. भारतदेखील त्यास अपवाद नाही. ‘अमेरिकन मुस्लिम पॉल : २०१९’ या अहवालाच्या लेखिका आणि ‘इन्स्टिट्यूट फॉर सोशल पॉलिसी अ‍ॅण्ड अन्डरस्टँडिंग  (आयएसपीयू) च्या संशोधन संचारिका दलिया मॉगाहेद यांनी म्हटले आहे की सुमारे ५० टक्के अमेरिकनांना त्यांच्या वास्तविक जीवनात मुस्लिम माहीतच नाहीत आणि उर्वरित पन्नास  टक्क्यांना मीडियावर अवलंबून राहावे लागते. मात्र इस्लाम आणि मुस्लिमांबद्दलचे अमेरिकन मीडियाचे ८० वार्तांकन नकारात्मक असल्याचे आढळून येते. हे सर्व मोडून काढून जागतिक  पातळीवर सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा विडा मॉगाहेद आणि मिकदाद वर्सी यांच्यासारख्या लोकांनी उचलण्याची आवश्यकता आहे.

-शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४,
Email: magdumshah@eshodhan.com

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget