ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी आपल्या एका कवितेत व्यक्त केलेल्या या भावना आज प्रकर्षाने आठवतात, याचं कारण आज महागाई गगनाला भिडली आहे, याचं सोयरसुतक कुणालाच नाही असं दिसतंय. सुरत, गोवाहाटी, मार्गे गोवा ते मुंबई असा प्रवास करत तीस हजार कोटी रुपये खर्चून महाराष्ट्रातील सत्ताकारणाचं राजकारण जे आणि जसं रंगलं, त्या कोट्यवधी रुपयांच्या उधळणीत सामान्य माणसाला दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या महागाई, बेरोजगारी या सारख्या समस्यांकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही,असं दिसतंय, त्यामुळे प्रत्येकाच्या मनात "सांगा कसं जगायचं?" हा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. अर्थात सर्वसामान्य जनतेची अवस्था पाहील्यावर ही जनता कण्हत कण्हत आणि आपलं रड'गाणं' गातच जगत आहे हे वास्तव आहे. मायबाप सरकार तर कसं जगायचं ते तुम्हीच ठरवा असंच सांगत आहे हे ही स्पष्टपणे दिसून येत आहे, त्यामुळे वीस तीस वर्षांपूर्वी मंगेश पाडगावकरांच्या या काव्यपंक्ती आजही तितक्याच तंतोतंत लागू पडतात असे चित्र दिसत आहे.
अन्न, वस्त्र आणि निवारा या आपल्या देशातील नागरिकांच्या मुलभूत गरजा असून त्या सरकारने अग्रक्रमाने सोडवल्या पाहिजेत.मात्र या मुलभूत गरजा अजूनही आपल्या मायबाप सरकारला सोडवता आलेल्या नाहीत. या देशातील अनेक कुटुंबांना एक वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. इतकंच नव्हे तर अनेक शहरांमध्ये फेरफटका मारला तर फूटपाथवर राहून जीवन जगणांऱ्यांची संख्या किती मोठी आहे, हे दिसून येते, यापैकी अनेकांना लज्जा रक्षणासाठी धड वस्त्रें ही मिळत नाहीत, यांचाच अर्थ अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आजही या देशातील सरकार पुर्णपणे भागवू शकत नाही. दोन वेळच्या पोटाची खळगी भरण्यासाठी सर्वसामान्य माणसाला मोठी कसरत करावी लागते.ही बाब निश्चितच गंभीर आहे,मात्र याची दखल घ्यायला कुणालाच वेळ नाही असे दिसते.
या देशातील वाढत्या लोकसंख्येबरोबरच समस्या ही वाढत आहेत.आज असंख्य समस्यांना तोंड देत देत सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. येणाऱ्या प्रत्येक दिवशी नवनवीन समस्या निर्माण होत आहेत,त्यातच महागाई गगनाला भिडल्या आहे.महागाईचा वणवा भडकला आहे, हा वणवा विझविण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केलेल्या दिसत नाहीत. त्यामुळे या वणव्यात सामान्य माणूस भरडला जात आहे. त्याची आर्थिक व मानसिक घुसमट होत आहे. बाजारात वाढलेल्या बेसुमार दरवाढीने तो भांबावून गेला आहे, त्याचे आर्थिक नियोजन पुर्णपणे कोलमडून पडले आहे.असेल त्या भावाने जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना त्याची अक्षरशः कुतरओढ होते आहे. दोन वेळच्या पोटाची खळगी भरण्यासाठी तो प्रसंगी निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य खरेदी करतो आहे. दैनंदिन जीवनातील त्यांचे हे हाल दररोजचेच झाले आहे. श्रीमंतांना जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती किती ही प्रमाणात वाढल्या तरी त्याचा परिणाम त्यांच्या रहाणीमानावर होत नाही, मात्र सर्वसामान्य माणूस पुरता खचून, पिचून व गांगरून जातो आहे. रोजच्या घरगुती गॅस सिलिंडरचा दर एक हजार रुपयांच्या वर गेला आहे, त्यामुळे गॅसच्या ऐवजी चूल पेटवावी काय असा विचार ते करु लागले आहेत, त्यातही सरपण व जळावू लाकडाच्या किंमतीत ही वाढ झाली आहे.काहीही झाले तरी रोजचा स्वयंपाक करताना डोळ्यासमोर महागाईचा महाकाय राक्षस उभा रहातोच. या महागाईच्या राक्षसाला गाडायचा असेल तर मायबाप सरकारनेच कंबर कसली पाहिजे, पण मायबाप सरकार महागाईच्या विरोधात कोणतेही पाऊल उचलताना दिसत नाही. पेट्रोल, डिझेल, राकेल, गॅस यांसह जीवनावश्यक वस्तूंचे दर खाली करण्याचं आश्वासन देऊन हे सरकार सत्तेवर आले आहे मात्र सत्तेवर आलेल्या दिवसांपासून महागाईच्या आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीच्या दरम्यान नरेंद्र मोदी सह रामदेवबाबाची भाषणे पहा म्हणजे ही मंडळी महागाईच्या विरोधात किती पोटतिडकीने बोलत होती हे लक्षात येईल, मात्र महागाईच्या या उधळलेल्या वारूला नरेंद्र मोदींचे सरकार आवर घालू शकलेले नाही,उलट इंधनासह जीवनावश्यक वस्तूंचे दर महिन्याला वाढवून सामान्य माणसाला पुरते जेरीस आणूं पहात आहेत.
प्रचंड वेगाने वाढत असलेल्या महागाई बरोबरच गेली दोन वर्षे कोरोना सारख्या महामारीला तोंड द्यावे लागल्याने सर्वसामान्य माणूस हतबल झाला आहे. एकीकडे कोरोनाच्या महाभयंकर संकटाला तोंड देता देता मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्य माणसाला दुसरीकडे आपल्या रोजीरोटीला मुकावे लागले आहे.अनेकांना दैनंदिन जीवनात कसं जगायचं हा प्रश्न भेडसावत आहे. कोरोनाने रोजीरोटी तर हिरावून नेलीच, शिवाय असंख्य लोक बेरोजगार झाले. नोकरी नसल्याने कुटुंबाचा गाडा हाकायचा कसा,असा प्रश्न अनेकांना भेडसावू लागला.मुलांच्या शिक्षणाचा तर गेल्या दोन वर्षांत अक्षरशः खेळखंडोबा झाला आहे, कोरोनामुळे शाळा बंद होत्या, त्यामुळे मुलांच्या शिक्षणाची हेळसांड झाली. त्यांच्या ज्ञानोपासनेत भयंकर अडचणी निर्माण झाल्या. शिक्षणाअभावी ही पीढी बरबाद होईल अशी भीतीही निर्माण झाली. त्यातच आरोग्याचा प्रश्न ही जटील झाला. औषधांच्या किंमतीत बेसुमार वाढ झाली. खाजगी व सरकारी दवाखान्यात वैद्यकीय उपचार घेणे अनेकांना परवडणारे राहिले नाही. एकुण वैद्यकीय उपचार महाग झाले आहेत. त्यामुळे अनेकजणांना वैद्यकीय उपचाराऐवजी स्वतः चे प्राण गमवावे लागले आहेत.ही या देशातील शोकांतिका आहे.
गगनाला भिडणारी महागाई, आणि वेगाने वाढत जाणारी बेरोजगारी या प्रमुख समस्यांवरील सरकारने कोणतीही उपाययोजना केलेली दिसून येत नाही. याबरोबरच आरोग्य, शिक्षण,बालमजुरी, वीजेचा प्रश्न, पाण्याची समस्या, पर्यावरण आणि प्रदूषण असे अनेक प्रश्न आज ऐरणीवर आले आहेत पण मामबाप सरकार या विषयावर मूग गिळून गप्प बसले आहे. "सांगा कसं जगायचं?....कण्हत कण्हत की गाणं म्हणत..." या प्रश्नाचे उत्तर "तुम्हीच ठरवा!" असं मायबाप सरकार सांगते आहे असे वाटते.
सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या सर्वच गोष्टी महाग झाल्या आहेत. तूरडाळ, हरभरा डाळ, खाद्य तेल, भाज्या, दूध, कडधान्ये यांसह सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत.त्यातच पेट्रोल, डिझेल, राॅकेल, गॅस सिलिंडर यांच्या दरवाढीने सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे.
गॅस सिलेंडर च्या बाबतीत सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे.गोरगरीब जनतेला गॅस सिलेंडर वर सरकारतर्फे अनुदान दिले जात होते,केंद्रात मोदी सरकार आल्यावर ही सबसिडी थेट ग्राहकांच्या बॅंक खात्यात जमा केली जात होती,पण गेल्या दोन वर्षांपासून ही सबसिडी देण्याचेही मोदी सरकारने बंद केले आहे.विशेष म्हणजे सरकारतर्फे याविषयी कसलेही स्पष्टीकरण दिलेले नाही.मात्र याबाबत सर्वच थरांवर आलबेल आहे, विरोधी पक्षांसह कोणीच याबाबत एक ब्र ही काढत नाहीत. नशिबाला दोष देत जनता सुध्दा मूग गिळून गप्प बसली आहे. अक्षरशः या महागाईच्या वरवंट्याखाली जनता भरडली जात आहे. गरीब बिचारी जनता अनेक समस्यांना तोंड देत कशी तरी आला दिवस ढकलत आहे. महागाईच्या या आगीचे चटके आता जनतेला सहन होत नाहीत, अर्थात जनतेच्या प्रश्नांशी कुणालाच देणेघेणे नाही असे चित्र दिसत आहे. त्यामुळे राहून राहून ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकरांच्या "सा़ंगा कसं जगायचं" या काव्यपंक्ती आठवल्या शिवाय रहात नाही. मात्र सत्तेच्या धुंदीत असणारे राज्यकर्ते हजारों कोटी रुपयांची खैरात करीत खुर्चीचा खेळ मांडतात आणि "काय ती झाडी, काय ते जंगाल, आणि काय ते हाटेल... सगळं ओके हाय" असं म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधींना ज्या जनतेनं आपल्याला निवडून देऊन तूमचं सगळं ओके केलय, त्या जनतेच्या दैनंदिन जीवनात "सगळं ओके हाय" अशी परिस्थिती कधी निर्माण होणार, की "मुकी बिचारी कुणीही हाका" अशीच जनतेची अवस्था राहणार?
प्रचंड गतीने वाढत चाललेल्या महागाईच्या राक्षसांशी जनता एकांड्या शिलेदारासारखी कडवी झुंज देत आहे,मात्र महागाईच्या राक्षसाला नेस्तनाबूत करण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न सरकार कडून होत नाहीत, हे वास्तव आहे. या गगनाला भिडलेल्या महागाईच्या राक्षसाला कसे तोंड द्यायचे ते तूम्हीच ठरवा असे सरकारला सांगायचे आहे काय, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. येणाऱ्या नजीकच्या सणासुदीच्या काळात हा महागाईचा वारू आणखी उधळणार आहे, हे लक्षात घेऊन मायबाप सरकारने या उधळलेल्या महागाईच्या वारूला काबूत आणण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत, अन्यथा या देशात अराजक माजले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सांगा कसं जगायचं? या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन आता सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत.
- सुनीलकुमार सरनाईक
भ्रमणध्वनी : 9420351352
(लेखक भारतसरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने व आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून ‘करवीर काशी’चे संपादक आहेत.)
Post a Comment