Halloween Costume ideas 2015

लोकशाहीत सर्वांचा व्यवस्थेवर विश्वास हवा

एम.आय. शेख
9764000737

हिंदू का हुवा ना मुसलमान का हुवा
नुकसान तो सारे हिंदुस्तान का हुवा
आपली लोकसभेची पहिली निवडणूक 1952 साली झाली. त्यावेळेस मौलाना अबुल कलाम आझाद यांनी रामपूर उत्तरप्रदेश मधून निवडणूक लढविली होती. त्यांच्या प्रचार सभेत बोलतांना 18 जानेवारी 1952 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की, ”मी काँग्रेसला जातीय आणि असामाजिक तत्त्वापासून मुक्त ठेवीन.” दुर्देवाने असे होऊ शकले नाही. स्वतःच्या त्यांच्याच काळात सांप्रदायिक तत्त्वांनी अयोध्येच्या बाबरी मस्जिदमध्ये एका रात्री गुपचुप पणे मुर्त्या नेऊन ठेवून दिल्या. त्याचे निमित्त करून काँग्रेसच्या सरकारने मस्जिदीला टाळे ठोकून दिले.
    त्यांचेच नातू राजीव गांधी यांनी 1986 साली ते टाळे उघडून येथे पूजेची परवानगी दिली. पुढे नरसिम्हाराव यांच्या सुवर्ण काळात 6 डिसेंबर 1992 रोजी दिवसा सूर्यप्रकाशात बाबरी मस्जिद शहीद केली गेली व त्यानंतर देशव्यापी दंगे झाले.  मात्र दंगलखोरांना शिक्षा झाली नाही. 1990 च्या दशकात देशभरात अनेक ठिकाणी विस्फोट करण्यात आले. त्यातही बहुतेक निर्दोष मुस्लिम तरूणांना अटक करण्यात आली. आश्चर्य म्हणजे हे अटक सत्र काँग्रेसशासित राज्यात उदाहरणार्थ महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात झाले.
    काँग्रेसने एकीकडे टाडा आणि पोटा हटविला तर दूसरीकडे गुपचुपपने युएपीए कायदा आणला. त्यात संशयावरून शेकडो निर्दोष मुस्लिम तरूणांना अक्षरशः वर्षोनवर्षे तुरूंगात सडवले गेले. त्यानंतर त्यांची निर्दोष मुक्तता झाली. हे सर्व यामुळे शक्य झाले की काँग्रेसमध्ये अगदी सुरूवातीच्या काळापासून जातीयवादी तत्त्वांचा भरणा होता. मात्र युपीए 1 व 2 च्या काळामध्ये त्यांच्यात एवढी दृढता आली की मुस्लिमांना काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन प्रादेशिक पक्षांची कास धरावी लागली.
    काँग्रेसने कधीच मुस्लिमांचे लागूलचालन केले नाही व मुस्लिमांनीही कधीच काँग्रेसकडून आपल्या लांगूलचालनाची अपेक्षा केली नाही. देशातील मुस्लिम गरीब जरूर आहेत पण मूर्ख नाहीत. त्यांना माहित आहे की, 85 टक्के मतदारांना वार्यावर सोडून कोणताही पक्ष 15 टक्के मतदारांचे लांगूलचालन करू शकणार नाही. देशातील इतर समाज आपला विकास कोणता पक्ष करू शकेल? याचा विचार करून मत देतो. मुस्लिम समाजाला मात्र अजूनही सुविधा उपलब्ध नाही. तो सुरक्षा आणि न्याय याचा विचार करून मतदान करतो. काँग्रेसने मुस्लिमांची किती सुरक्षा केली? याची कहाणी पुन्हा कधी तरी सांगेन, सध्या न्याय एवढ्याच विषयावर विचार करू.
    स्वातंत्र्य लढ्यापासूनच मुस्लिमांचा कल काँग्रेसकडे होता. स्वातंत्र्यानंतरही तो तसाच कायम राहिला. मुस्लिम अगोदरच भावनाप्रधान असतात. त्यात मौलाना अबुल कलाम आझाद आणि दारूल उलूम देवबंद यांच्या काँग्रेस प्रेमामुळे देशभरातील मुस्लिम काँग्रेसबरोबरच जोडले गेले. ज्याप्रमाणे शरद पवारांनी 2014 साली भाजपला न मागता पाठिंबा दिला अगदी त्याचप्रमाणे मुस्लिमांनी काँग्रेसला न मागताच सातत्याने पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. हा पाठिंबा कसा एकतर्फी होता या संबंधी खाजाभाई यांची एक मनोरंजक गोष्ट सांगितली जाते.
    एकदा भोळेभाळे खाजाभाई बसमध्ये प्रवास करीत होते. त्यांच्या बाजूला एक इसम बसलेला होता. दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. तेवढ्यात कंडक्टर आला. तेव्हा खाजाभाईंनी पैसे काढण्यासाठी खिशाकडे हात नेला. शेजारी बसलेल्या इसमाने मध्येच त्यांचा हात पकडला आणि आग्रहाने स्वतःबरोबर त्यांचेही तिकीट काढले. गाव आल्यानंतर निरोप घेऊन खाजाभाई उतरले आणि रिक्षात बसून घरी आले. रिक्षावाल्याला भाड्याचे पैसे देण्यासाठी खिशात हात घातला तर खिसा कापलेला आढळला. खाजाभाईंच्या लक्षात आले की सहप्रवाशाने तिकीट काढून पाकिट मारले होते.
    काही दिवसांनी तोच इसम खाजाभाईंना बाजारात भेटला. खाजाभाईंनी पकडताच तो गळ्याला पडून रडू लागला. म्हणाला, मी तुम्हालाच शोधत होतो. तुमचा खिसा कापल्यानंतर माझी मुलगी मेली. खाजाभाईंना दया आली. त्यांनी क्षमा केली. थोड्या वेळाने सामान घेऊन पैसे देण्यासाठी खाजाभाईंनी खिशात हात घातला तर पुन्हा पाकिट गायब. खाजाभाई चांगलेच भडकले. यावेळेस त्या इसमाने गळाभेट घेऊन खिसा कापला होता.
    काही दिवसांनी खाजाभाई मोटरसायकलहून जात होते. तितक्यात त्यांना तोच इसम दिसला. खाजाभाईंनी त्याला पकडला. काही बोलण्याच्या हात त्याने खाजाभाईंना चहाचे आमंत्रण दिले. खाजाभाईंनीही मोटरसायकल साईडला घेतली व त्याच्याबरोबर हॉटेलमध्ये गेले. त्याने दोन कप चहा मागवला व आपली करूण कहाणी विशद केली. त्याने सांगितले की, खाजाभाईंचे खिसे कापल्यानंतर त्याची कशी गृहदशा सुरू झाली. त्याने आजपावेतो मारलेले सगळे पैसे अगदी मोजून परत दिले. तेवढ्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. त्याने कॉल घेतला व वाईट बातमी असल्यासारखा चेहरा केला. चहाच्या बिलाचे पैसेही खाजाभाईंच्या हाती ठेवले व घाई-घाईने त्यांचा निरोप घेऊन निघून गेला. इकडे खाजाभाई खुश होते की, सगळे पैसे परत मिळाले वर फुकटचा चहाही मिळाला. त्यांनी चहा घेतला काऊंटरवर जावून बिल दिले व बाहेर येवून पाहतात तर काय, मोटारसायकल गायब. यावेळेस त्या इसमाने खाजाभाईंना विश्वासात घेवून मोटारसायकल चोरली होती.
    ज्या प्रमाणे खाजाभाईंचा विश्वासाचा त्या पाकिटमाराने कायम अनादर केला. अगदी त्याच पद्धतीने काँग्रेसने मुस्लिमांच्या विश्वासाचा कायम अनादर केला. सतत मिळत असलेल्या पाठिंब्याला काँग्रेसने मुस्लिमांची विवशता समजण्याची चूक केली. काँग्रेसच्या धोरणात आजही तीळमात्र फरक पडलेला नाही. काँग्रेसने कधीच मुस्लिमांच्या सुरक्षेची काळजी केली नाही. त्यांना न्याय मिळेल, यासाठी प्रयत्न केलेले नाहीत. काँग्रेसने कायम मुस्लिमांना गृहित धरले. काँग्रेसचे भांडवलच होते बहुजन आणि मुस्लिम. मुस्लिमांना त्यांनी भूलथापा मारून आपलेसे केले. तर बहुजनांना थोडेफार आरक्षण व छोट्या-छोट्या सोयी देऊन आपलेसे केले. काँग्रेसच्या या धोरणामुळे सवर्ण समाजातील एक मोठा गट काँग्रेसपासून तुटून हळूहळू भाजपाकडे वळला.
    काँग्रेसला पक्का विश्वास होता की, कधी काळी दोन खासदार असलेला पक्ष भाजपा, आपल्याला कधीच पराभूत करू शकणार नाही. म्हणून मांजर जसे डोळे मिटून निर्धास्तपणे दूध पिते काँग्रेजणांनी निर्धास्तपणे डोळे मिटून भ्रष्टाचार सुरू केला. शेवटी 2014 उजाडले आणि काँग्रेसचा अविश्वसनीय असा पराभव झाला. 

    व्यवस्थेमध्ये विश्वास
    भारतीय मुस्लिमांनी फाळणीचे पाप केलेले नाही. ना कधी फाळणीचे समर्थन केले. उलट फाळणीमुळे सर्वाधिक नुकसान भारतात राहणार्या मुस्लिमांचे होईल याची पूर्वकल्पना मुस्लिमांना होती. म्हणूनच मौलाना आझाद व दारूल उलूम देवबंद सारख्या विद्यापीठाने फाळणीचा विरोधच केला होता. मात्र इतक्या ताकदीनिशी यात दुष्प्रचार केला गेला की, आज 70 वर्षानंतरही बहुसंख्य हिंदू बांधव मुस्लिमांनाच विभाजनाचा दोषी मानतात. जसवंत सिंग यांनी ’जिन्ना भारत आणि पाकिस्तान फाळणी’ हे पुस्तक प्रकाशित केल्यामुळे आता कुठे हिंदू समाजातील बुद्धिजीवी वर्गाला हे मान्य करणे भाग पडले की, फाळणीसाठी भारतात राहिलेले मुस्लिम कोणत्याच दृष्टीने जबाबदार नव्हते.
    या न केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा मुस्लिमांना दिली गेली व वि.दा. सावरकारांच्या पितृभू व पुण्यभूचा सिद्धांतही हिंदू बांधवांच्या डोक्यात पक्का भिनविला गेला. म्हणूनच संधी मिळेल तेव्हा देशासाठी त्याग करूनही मुस्लिमांवर कायम अविश्वास दाखविला गेला. पावलोपावली भेदभाव केला गेला व आजही केला जातो. याची शेकडो उदाहरणे उघड्या डोळ्यांनी आपण आपल्या अवतीभोवती पाहू शकतो.
    शासन व प्रशासन वेळ पाहून रंग बदलत गेले. कधी त्यांनी मुस्लिमांवर दया दाखविली तर कधी जातीय भावनेतून त्यांना त्रास दिला. मात्र एक संस्था भारतात अशीही होती आणि आहे की जी, ठामपणे मुस्लिमांच्या बाबतीत न्याय भूमिका घेत राहिली. ती संस्था म्हणजे भारतीय न्याय व्यवस्था.
    गेल्या 70 वर्षामध्ये न्यायव्यवस्थेने मुस्लिमांना सातत्याने न्याय देण्याचे काम केलेले आहे. 16 मार्चला असाच एक निकाल आलेला आहे. छत्तीगडच्या रामगड जिल्ह्यातील जलदगती न्यायालयाचे न्या. ओमप्रकाश यांनी अलिमुद्दीन अन्सारी याच्या खुनाच्या खटल्यात 11 तरूणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 29 जून 2017 रोजी रामगडच्या दांड नावाच्या गावामध्ये अलिमुद्दीन अन्सारी आपल्या ओम्नी कारमधून गोमांस नेत असल्याच्या संशयावरून या लोकांनी त्याची हत्या केली होती व त्याची कार जाळून टाकली होती. याप्रकरणी स्थानिक गोरक्षा समितीच्या छोटू वर्मा, छोटू राणा, दीपक मिश्रा, संतोष सिंह, भाजपा जिल्हा मीडिया प्रमुख नित्यानंद मोहतो, विक्की साव, सिकंदर राम, रोहित ठाकूर, विक्रम प्रसाद, राजू कुमार आणि कपिल ठाकूर या 18 ते 25 वर्ष वयोगटातील तरूणांना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे.
    या घटनेपेक्षाही जुन्या घटनांचे खटले प्रलंबित असतांना अलिमुद्दीन अन्सारी केसमध्ये मिळालेल्या जलद न्यायाचे इतरांप्रमाणे मी ही स्वागत करतो. कारण या निकालाने भयभीत मुस्लिम समाजाचा व्यवस्थेमध्ये विश्वास बहाल होण्यास मदत होईल व भडक माथ्याच्या हिंदू तरूणांच्याही लक्षात येईल की, जातीयवादी लोक फक्त चिथावणी देतात, त्यांची मुलं विदेशात शिकतात, इथल्या मध्यमवर्गीय पोरांना परिस्थितीला सामोरे जावे लागते. स्वतःचा खटला स्वतः चालवावा लागतो. स्वतःला तुरूगांत जावे लागते, सगळे आयुष्य उध्वस्त होते.
    काही लोकांचा असा विचार आहे की, या 11 युवकांना शिक्षा झाल्याने या प्रकरणात न्याय मिळाला. माझा विचार मात्र थोडासा वेगळा आहे. या घटनेत अलिमुद्दीन नावाचा तरूण हाकनाक मारला गेला. त्यामुळे त्याची पत्नी विधवा झाली व मुलं अनाथ झाली. मारूती व्हॅन जळून खाक झाली हे राष्ट्रीय नुकसान झाले. या घटनेचा तपास करतांना व खटला चालविताना पोलिसांचा व कोर्टाचा बहुमुल्य वेळ वाया गेला. हे राष्ट्रीय नुकसान झाले. 11 तरूणांना अगदी उमेदीच्या काळात शिक्षा झाली. त्यामुळे त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे अपरिमित नुकसान झाले. बरे! हे सर्व नुकसान कुठल्या चांगल्या उद्देशाने, उदाहरणार्थ शत्रू राष्ट्राबरोबर झालेल्या युद्धात झाले असते तर सहनही केले असते. परंतु, जो देश आंतरराष्ट्रीय महासत्ता होण्याचे स्वप्न पाहतो, चीनशी स्पर्धा करण्याचे प्रयत्न करतो, त्या देशातील नागरिक जर जातीय भावनेतून एकमेकांचे मुडदे पाडत असतील व तुरूंगात जात असतील तर त्या देशातील नागरिकांचे महासत्ता होण्याचे स्वप्न फक्त दिवास्वप्न होऊन जाईल, यात निदान माझ्या मनात तरी शंका नाही. ज्याप्रमाणे दाढ आतून सडल्याने उन्मळून पडते. तसेच देशातील नागरिक आपआपसात मारून एकमेकांचे मुडदे पाडत असतील, द्वेष भावनेने जगत असतील,समाज आतूनच सडून गेला असेल तर तो देश महासत्ता कसा होईल? याबद्दल प्रत्येक नागरिकाने आत्मपरीक्षण करावयास हवे.
    अवघे जग प्रगतीसाठी प्रयत्नशील असतांना आपण जाती-धर्माच्या नावावर भांडत बसू, हिंदू-मुस्लिम, दलित-सवर्ण दंगे करत बसू, बसेस फोडत असू, रेल्वे जाळत असू, एकमेकांची घरे-दुकाने उध्वस्त करीत असू तर आपल्याला बाहेरील शत्रूंची गरज ती काय? कोणतेही वर्ष जात नाही जेव्हा दंगली होत नाहीत. यावर्षीची सुरूवातच भीमा-कोरेगाव दंगलीने झाली.
    मित्रांनो! जरा शांतपणे विचार करा 15 ऑगस्ट 1947 ते आतापावेतो ज्या दंगली झाल्या व त्यात जे राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान झाले ते झाले नसते तर आज आपण कुठे राहिलो असतो? दंगलीमध्ये पेटवून दिलेल्या बसेस हिंदूच्या असतात का मुस्लिमांच्या असतात? मित्रांनो! त्या भारताच्या असतात. सरकारला परत नवीन बसेस घ्याव्याच लागतात. त्यासाठी आपल्याकडूनच कर गोळा करावा लागतो. म्हणजे येवून जावून नुकसान पुन्हा आपलेच. आपण जातीय विकाराच्या एवढ्या आधीन झालेलो आहोत की, त्यासमोर आपल्याला आपले राष्ट्रहितही दिसत नाही. फक्त अलिमुद्दीन प्रकरणात झालेले नुकसान कोटीपेक्षा जास्त असेल तर 70 वर्षात झालेले नुकसान मोजता सुद्धा येणार नाही एवढे प्रचंड असेल. याबद्दल दुमत असता कामा नये. 

    भाजप आणि काँग्रेसची जातीय निती

    कधी जातीय कारणासाठी, कधी आरक्षणासाठी, कधी शेतकर्यांसाठी, कधी विद्यार्थ्यांसाठी जमाव विध्वंसक होत असतो व राष्ट्रीय नुकसान करीत असतो. यासाठी भाजप आणि काँग्रेस या दोहोंचे राजकारण जबाबदार आहे. त्यातही भाजप जास्त जबाबदार आहे. भाजपने आपल्या क्षुद्र राजकीय लाभासाठी जातीय आधारावर द्वेषमुलक राजकारण करून देशात हिंदू-मुस्लिम आणि दलित-सवर्णांमध्ये मानसिक विभाजन करून ठेवलेले आहे.
    मित्रांनो ! जरा कल्पना करा, अमेरिकेत जसे रिपब्लिकन्स आणि डेमोक्रेट असे दोन धर्मनिरपेक्ष राजकीय पर्याय तेथील जनतेस उपलब्ध आहेत. तसेच जर भारतामध्ये काँग्रेस आणि भाजपा असे दोन धर्मनिरपेक्ष राजकीय पर्याय उपलब्ध असते तर देशाचे वर्तमान आणि भविष्य किती उज्ज्वल झाले असते? दोघांनाही सुशासन देण्यासाठी स्पर्धा करावी लागली असती. जनतेला उत्तमोत्तम शासन मिळाले असते. देशाची प्रगती झाली असती. मात्र भाजपने सदैव राष्ट्रवादाचा मुलामा लावून जातीयवादी विचारांची पेरणी केल्याने लोकांची माथी भडकत आलेली आहेत. आपले राजकारण मंदिर आणि मस्जिदसारख्या अनुत्पादक विषयांभोवती घुटमळू लागलेले आहे. आता तर काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनीही गुजरात विधानसभेच्या निवडणुकांपासून मंदिर प्रदक्षिणा सुरू केलेल्या आहेत. मंदिर-मस्जिद विवाद सोडून जर विकास केंद्रित धर्मनिरपेक्ष राजकारण भाजपने सुरू केले तर निश्चितच दोन समर्थ पर्याय भारतीय जनतेस उपलब्ध होतील व देशाची महासत्तेच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू होईल.
    एकदा का जातीय राजकारणाचे वीष जनतेच्या मनामध्ये बिंबविले गेले की, राजकारण्यांचे फावते. पुढचे काम लोकांतील जातीयवादी मंडळी आपोआप करतात. एकमेकांशी भांडतात, हाणामार्या करतात, तुरूंगात जातात. मग त्यांना गोरक्षेसारखा मुद्दा असायलाच हवा असेही काही नसते. कारण पुण्याच्या मोहसीन शेख पासून दिल्लीच्या जुनेद शेख पर्यंतच्या हत्यांच्या घटना ह्या त्यांचे धडधडीत उदाहरण आहेत. या लोकांनी किंवा जेएनयूच्या नजीबने कोणते मांस नेले होते? कोणतेच नाही. केवळ जातीय राजकारणाच्या समुद्रमंथनातून निघालेल्या विषाने यांचा बळी घेतलेला आहे, हे सर्व थांबने गरजेचे आहे.
    कोणत्याही लोकशाही देशातील वातावरण तेथील अल्पसंख्यांक व गरीबांच्यासाठी किती अनुकूल आहे, यावरून त्या देशाची पत ठरत असते. या देशातील मुस्लिमांनी न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवून आतापर्यंतचा आपला प्रवास सुरू ठेवलेला आहे. सामान्य माणसांचे आशास्थान कोर्टच असते. भारतीय न्यायव्यवस्थेने दलितांना, मुस्लिमांना, शोषितांना, महिलांना निर्विवादपणे न्याय देण्याचे काम केलेले आहे. मात्र न्या.लोया यांचे प्रकरण तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या चार ज्येष्ठ न्यायधिशांच्या नाराजीचे प्रकरण ज्या प्रमाणे दाबण्यात आले त्यावरून असे वाटत आहे की, लोकशाहीच्या या तिसर्या स्तंभाला ठरवून कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. चौथे स्तंभाने (मीडिया) अगोदर स्वतःच्या मर्जीने गुडघे टेकलेले आहेत.
    एकंदरित ज्यांचे-ज्यांचे या देशावर खरेखुरे प्रेम आहे. त्यांनी यथासंभव मिळेल त्या व्यासपीठावरून सनदशीरमार्गाने आपल्या प्रिय भारत देशाला भाजप आणि काँग्रेसच्या जातीयवादी राजकारणाच्या विळख्यातून सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक झालेले आहे. भारतीय म्हणून आपली ही सर्वात मोठी जबाबदारी आहे.
    है अंधेरा बहोत, अब सूरज निकलना चाहिए
    जिस तरह भी हो ये मौसम बदलना चाहिए.   
    जय हिंद!

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget