- बशीर शेख
केंद्र सरकारने लोकसभेत ट्रिपल तलाक बिल मंजूर करताच आपापल्या घरात शांतपणे शरियतच्या मार्गदर्शनाखाली जीवन जगत असलेल्या मुस्लिम महिलांचे पित्त खवळले. या संतापाला वाट करून देण्यासाठी लाखोंच्या संख्येने देशभरात कधी नव्हे त्या मुस्लिम महिला रस्त्यावर आल्या आणि येत आहेत. लहान- लहान मुलांना कडेवर घेऊन त्या मोर्चात सहभागी होत आहेत. एक तर मार्चचे कडक ऊन त्यात काळ्या बुरख्यामुळे वाढणारी उष्णता याची परवा न करता या महिला शरियत से हमे प्यार है, फिर सरकार को क्यूं इन्कार है? म्हणत देशभरात रस्त्यावर आलेल्या आहेत. ’वापस लो तीन तलाक बिल वापस लो, शरियत हमारी पहेचान है, इस्लामी शरियत हमारा गर्व है’ राष्ट्रपती के भाषण की हम निंदा करते हैं, हुकूमत अपना काम करे, इस्लाम को ना बदनाम करे’ शरियत में मुदाखिलत हम बर्दाश्त नहीं करेंगे अशा विविध घोषवाक्याचे फलक व घोषणा देत महिला लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरल्या आहेत. मात्र या शरियतपसंद, चारित्र्यसंपन्न, परदानशीन महिलांबाबत दोन चांगले शब्द बोलण्याचे भाग्य केंद्र व राज्य सरकारला लाभत नाही. त्यामुळे यांच्या मनात आणि जिभेत मुस्लिम समाज आणि इस्लामच्या उच्च नैतिक व्यवस्थेविषयी किती कटू भावना आहे यावरून दिसून येते. कितीही मोठे संकट आले तरी कधीच परदानशीन मुस्लिम महिला रस्त्यावर येत नाहीत. हा आतापावेतोचा स्वतंत्र भारताचा इतिहास आहे. परंतु, विडंबना पहा ज्या महिलांच्या संरक्षणाचा दावा करीत केंद्र सरकारने जे बिल लोकसभेत पारित करून घेतले त्याच्या विरोधात त्याच महिला लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरत आहेत. ही एक अभूतपूर्व अशी स्थिती आहे. एका गावात नाही एका प्रदेशात नाही तर देशभरात हे मोर्चे निघत आहेत.
या ठिकाणी या मोर्चांची तुलना निर्भया कांडानंतर निघालेल्या महिलांच्या मोर्चाशी करता येईल. ते मोर्चे जरी अनेक शहरातून निघाले होते तरी प्रामुख्याने ते मोर्चे दिल्ली केंद्रीत होते. मात्र मुस्लिम महिलांच्या मोर्चांचा आकार आणि सातत्य हे निर्भया कांडानंतर निघालेल्या मोर्चांपेक्षा कितीतरी पटीने मोठे आहे. मुस्लिम महिलांच्या दृष्टीने हा त्यांच्या वैवाहिक जीवन मरणाचा प्रश्न आहे. मात्र राष्ट्रीय वाहिन्यांमध्ये जेवढे महत्व श्रीदेवीच्या मृत्यूला मिळाले तेवढे सुद्धा या मोर्चांना मिळालेले नाही.
या मोर्चांवर प्रतिक्रिया देण्यास केंद्र किंवा राज्य सरकारांनी चक्क दुर्लक्ष केलेले आहे. मात्र कोंबडा झाकून ठेवला तरी सूर्य निघाल्याशिवाय राहत नाही. तसेच सरकारनी किती जरी दुर्लक्ष केले तरी सरकारला या मोर्चांकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. महिला शक्ती ही सुप्त शक्ती असते. मात्र जेव्हा-जेव्हा ती खवळते तेव्हा-तेव्हा इतिहास बदलून जातो. लाखोंच्या संख्येने निघालेल्या या मोर्चांना जास्त महत्व न देण्याची माध्यमांची विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमांची व सरकारची निती पाहून म्हणावेसे वाटते की एवढा द्वेष कशासाठी?
फाळणीला बहुसंख्य मुस्लिमांनी विरोध केलेला होता. फाळणी झाल्यावरही बहुसंख्य मुस्लिम भारतात राहिले. मुस्लिमांच्या भारत निष्ठेचा हा धडधडीत पुरावा आहे. मात्र पाकिस्तानला न जाता भारतात राहण्याच्या त्यांच्या निर्णयाचा सातत्याने अनादर केला गेला. पाकिस्तान निर्मितीची शिक्षा पाकिस्तान्यांना तर दिली नाही मात्र जे स्वतःचे नागरिक आहेत त्यांना मात्र पावलो पावली विनाकारण शिक्षा दिली गेली. स्वातंत्र्यानंतर एकही वर्ष असा गेला नाही जेव्हा दंगली झाल्या नाहीत. प्रत्येक क्षेत्रात मुस्लिमांशी भेदभाव केला गेला. एवढे असतांनासुद्धा मुस्लिमांची राष्ट्रनिष्ठा इतकी मजबूत आहे की त्यांनी चक्क या अन्यायाकडे दुर्लक्ष केले. मात्र जेव्हा सरकारची मजल शरियतमध्ये हस्तक्षेप करण्यापर्यंत झाली तेव्हा मात्र पुरूष तर पुरूष स्त्रियासुद्धा रस्त्यावर उतरल्या. सरकारला आणि मीडियाला याची दखल घ्यावीच लागेल. न्यायालयानेही याची दखल घ्यावी, अशी आम मुस्लिम जनांची अपेक्षा आहे.
Post a Comment