Halloween Costume ideas 2015

हिंदू-मुस्लिम आणि भागवत

-राम पुनियानी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातील एकमात्र अशी संस्था आहे जी स्वतःला सांस्कृतिक संस्था म्हणवते. मात्र केंद्रीय सरकारचे निती निर्देशही निर्धारित करते. हिंदू राष्ट्राच्या आपल्या अजेंड्याला पुढे रेटत संघ आज देशाचे सर्वात मोठे संघटन बनलेले आहे. त्याचे प्रमुख सरसंघचालक संघावर पूर्ण नियंत्रण ठेवतातच. शिवाय, अप्रक्षरित्या भाजप, विहिंप, बजरंग दल, अभाविप आणि तत्सम शेकडो संघटनाही त्यांच्या मुठीत आहेत. ही संस्था देशाच्या वेगळ्या-वेगळ्या भागामध्ये सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रामध्ये सक्रीय आहे.
सरसंघचालक वेळोवेळी आपल्या वक्तव्यातून आणि भाषणातून आपल्या प्रभावाखाली असणार्‍या संस्थांचे निती निर्देश निर्धारित करत असतात. 24 फेब्रुवारी 2018 रोजी आग्रामध्ये आयोजित, ” राष्ट्रोदय समागम” मध्ये बोलताना मोहन भागवत यांनी हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेसंंबंधी अनेक गोष्टींचा खुलासा केला. त्यांचे म्हणणे जरी विचित्र वाटत असले तरी खोलवर विचार करता आपल्याला या गोष्टीची जाणीव होईल की यामागचा त्यांचा एकमात्र उद्देश हिंदू राष्ट्राच्या त्यांच्या उद्देशाला पुढे रेटणे आहे.
भागवत म्हणाले की, ” सर्व हिंदूनी एक व्हायला हवे. जाती आधारित आपसातील संघर्ष किंवा विवाद बंद व्हायला हवेत. हिंदूस्थान हिंदूंचा देश आहे. या देशाशिवाय ते दुसरीकडे कुठेही जावू शकत नाहीत.” ज्याला ते जाती आधारित संघर्ष म्हणत आहेत. मुळात तो सामाजिक न्यायासाठी केला जाणारा संघर्ष आहे. हिंदू धर्माच्या जाती आधारित रचनेच्या विरोधात शेकडो वर्षांपासून अनेक आंदोलने झालेली आहेत. गौतम बुद्धांना आपण या आंदोलनाचा आद्यपुरूष म्हणू शकतो. त्यांच्यानंतर कबीर, तुकाराम महाराज, नामदेव महाराज यासारख्या संतांनी जाती प्रथेच्या विरूद्ध वेळोवेळी संघर्ष केलेला आहे. भागवत ज्याला जाती संघर्ष म्हणत आहेत त्यामध्ये ज्योतिबा फुले यांचे आंदोलनही सामील आहे. ज्याचा उद्देश अस्पृश्यांना शिक्षित करणे होता. डॉ. आंबेडकरांनी सुद्धा याच संघर्षाला पुढची दिशा दिली आणि जातीगत समानतेच्या आंदोलनाला एक नवी धार दिली.
स्वातंत्र्यपूर्वी हिंदू महासभा आणि रा.स्व.संघ स्वातंत्र्य आंदोलनाच्या सोबत सुरू असलेल्या समाजसुधार आंदोलनामुळे व्यथित झाले होते. म्हणूनच त्यांनी हिंदूंना एक होण्याचे आवाहन केले होते. जातीच्या प्रश्नावर हिंदूत्ववादी संस्था यथास्थितीवादी आहेत. याउलट आंबेडकर जाती उन्मुलनाच्या मताचे होते. आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले आणि भारतीय घटनेचा मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून आपल्या देशाला समानतेवर आधारित घटना दिली. शिवाय, त्यामध्ये सामाजिकरित्या मागासलेल्या वर्गांसाठी सकारात्मक कारवाई करण्यासंबंधीच्या तरतुदी केल्या. जेणेकरून समाजसुधारणा ह्या केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात जमीनीवर लागू झाल्या.
हिंदू राष्ट्रवादी राजनीति, वंचित वर्गांच्या विकासासाठी सकारात्मक कामाच्या कायम विरोधी राहिलेली आहे. ते या गटाला आरक्षण देण्यास तयार नाहीत. सरकारी नोकर्‍यांमध्ये योग्यतेला प्रोत्साहन देण्याच्या नावाखाली त्यांनी आरक्षणाचा विरोध करतांना, ” युथ फॉर इक्वॅलिटी” सारख्या संस्था गठित केलेल्या आहेत. सामाजिक न्यायाची स्थापना करण्यासाठी इच्छुक लोक सुद्धा देशातील असमानतेवर आधारित रचनेला संपुष्टात आणून समानतेवर आधारित रचनेची स्थापना करू इच्छितात. या दृष्टीकोनातून पाहिल्यास भागवत आणि सामाजिक न्यायाच्या पुरस्कर्त्यांचा अजेंडा एकच आहे, असा भास होतो. परंतु, सत्य हे आहे की, संघ आणि त्याच्याशी संबंधित सर्व संस्था यांचा एक छुपा अजेंडा आहे. ज्या-ज्या वेळेस हे लोक घटनेमध्ये अमुलाग्र बदल करण्याची भाषा बोलतात, त्या-त्या वेळेस तो स्पष्ट होतो. शिवाय, ज्या-ज्या वेळेस हे लोक संघाचे शिर्षचिंतक गोळवलकर व मनुस्मृतीची प्रशंसा करणारे गीत गातात. तेव्हा त्यांचा छुपा अजेंडा स्पष्ट होतो. स्पष्ट सांगायचे तर संघ परिवाराला भारतीय घटना अजिबात पसंत नाही.
भागवत जेव्हा हे म्हणत असतात की, हिंदुंना राहण्यासाठी हिंदुस्थानाव्यतिरिक्त कोणताही देश नाही. तेव्हा त्यांचा म्हणण्याचा उद्देश काय आहे? हे समजून येत नाही. त्यांना हे माहित नाही का? चांगल्या संधी मिळविण्यासाठी आज लोक जगातील कोणत्याही देशात जातात आणि स्थायीक होतात. भारतीय हिंदू सुद्धा यास अपवाद नाहीत. मोठ्या संख्येने हिंदू अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या पुढारलेल्या देशात नुसतेच स्थायीक होत आहेत असे नाही तर तेथील नागरिकही होत आहेत. मग संघ प्रमुखांचे हे कथन की हिंदुंकडे हिंदुस्थानाव्यतिरिक्त राहण्यासाठी पृथ्वीवर कोणताही अन्य देश नाही. हे तथ्यात्मक स्वरूपात चुकीचे ठरते. याच प्रमाणे त्यांचे हे म्हणणेही की, हिंदुस्थान फक्त हिंदुचा देश आहे हे ही खरे नाही. या देशाचा नागरिक कोण आहे व कोण नाही हे भारताची घटना निर्धारित करीत असते. भारत कोणाचा देश आहे, हे सुद्धा घटनेनेच स्पष्ट केलेले आहे. भारतीय स्वतंत्रता आंदोलनात सर्व जातीधर्म आणि वर्गाच्या लोकांनी सहभाग नोंदविलेला होता. भारत प्राचीन काळापासून वांशिक आणि धार्मिक विविधतेने नटलेला देश आहे. भारताच्या उत्तरेमध्ये शक, हून आणि मुसलमान आक्रमणकारी आले मात्र इथे आल्यावर त्यांनी याच देशाला आपले घर मानले. दक्षिण भारतात समुद्र मार्गाने यहुदी, मुसलमान आणि ख्रिश्चन आले व येथेच स्थायीक झाले. सत्य तर हे आहे की, हिंदू शब्द मुळात भौगोलिक आहे. हा शब्द अनेक शतकानंतर धार्मिक बनला.
भारतात विभिन्न धर्माचे लोक राहतात. म्हणून हे म्हणणे हिंदुस्थानात राहणारे सर्व लोक हिंदू आहेत, सत्य नाही. भागवतांचा हा दावाही चुकीचा आहे की, हिंदू मुलतः सहिष्णु आहेत आणि विविधतेचा सन्मान करणारे आहेत. हिंदूत्वाचे चिंतक सावरकरांनी हिंदू या शब्दाची व्याख्या करताना म्हटले होते की, केवळ तेच हिंदू आहेत ज्यांची मातृभूमी आणि पुण्यभूमी दोन्ही भारतात आहेत. या व्याख्येवरून स्पष्ट होते की, मुसलमान आणि ख्रिश्चन हिंदू होवूच शकत नाही. शीख, बौद्ध आणि जैन धर्मातील अनेक लोक स्वतःला हिंदू म्हणवून घेणे पसंत करीत नाहीत. भागवत या अर्थाने खरे बोलत आहेत की, गांधी सारखे हिंदू लोक अन्य धर्मांचा सन्मान करतात आणि धार्मिक विविधतेचा खुल्या मनाने स्वीकार करतात. परंतु, संघछाप हिंदूना कदापि सहिष्णु म्हणता येणार नाही. संघाचा अजेंडा पंथवाद आणि संकीर्णतेवर आधारित आहे. ते समान आर्थिक आणि सामाजिक विकास तसेच लैंगिक न्यायाबाबत कधीच बोलत नाहीत. त्यांची सर्व शक्ती जोडणार्‍या नाही तर तोडणार्‍या मुद्दयांवर आधारित असते. असे मुद्दे जे लोकांना असहिष्णु बनवतात. कोणीही म्हणू शकणार नाही की गोरक्षा, राममंदिर, लव जिहाद, घरवापसी, वंदे मातरम् इत्यादी मुद्दे जे संघ परिवारातर्फे वेळोवेळी उचलले जातात. विविधतेला प्रोत्साहन देतात किंवा कमीत कमी विविधतेला स्वीकार करतात.
संघ परिवाराचे सदस्य जे काही म्हणत आलेले आहेत किंवा करत आलेले आहेत, ते थेट भारतीय घटनेच्या आत्म्याच्या विरूद्ध आहे. त्यांचे हे कथनही घोर अनुचित आणि असंवैधानिक आहे की, सगळ्या भारतीयांनी भारत मातेला आपली माता मान्य करायला हवे. संविधान म्हणतो की, ” भारत अर्थात इंडिया राज्यांचा संघ असेल” यात भारत माता कोठून आली? आणि ही बाब इतर धर्मावलंबियांना जे काही कारणामुळे भारत माता की जय म्हणू इच्छित नाही त्यांना कसे काय विवश करता येईल की त्यांनी ही घोषणा द्यावी? ही गोष्ट योग्य आणि संवैधानिक आहे काय? मुसलमानांनाही हिंदू म्हणणे एक भितीदायक बाब आहे. सुरूवातीला त्यांना हिंदू म्हणवले जाईल. मग पुन्हा हे म्हटले जाईल की त्यांनी सर्व हिंदू धर्मग्रंथांचा सन्मान करावा आणि भगवान राम आणि गायीचीही पूजा करावी. ही एक निसरडी वाट आहे. भागवत हे राणाप्रताप आणि अकबर सोबत झालेल्या युद्धालाही भारतीय स्वाधिनता संग्रामाचा एक भाग मानतात. राणाप्रताप आपल्या मनसबदारीसाठी लढत होते. इंग्रजांच्या विरूद्ध नव्हे. जर आपण भागवत यांचे म्हणणे मान्य केले तर मग प्रत्येक मुस्लिम राजाबरोबर झालेले युद्ध नाईलाजाने भारतीय स्वातंत्र्याची लढाई होती, असेच म्हणावे लागेल. भागवतांना या सर्व गोष्टींची जाणीव आहे. त्यांना हे ही माहित आहे की, राणाप्रताप बरोबर अकबरच्या झालेल्या युद्धामध्ये अकबरच्या सेनेचे नेतृत्व राजा मानसिंह यांच्या हाती होते. तरी सुद्धा भागवत जाणून बुजून असे विपर्यस्त भाष्य करतात. (इंग्रजीतून हिंदी भाषांत अमरिश हरदेनिया आणि मराठी भाषांतर एम.आय. शेख, बशीर शेख यांनी केले.)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget