Halloween Costume ideas 2015

‘देशातील पहिली मुलींची शाळा’ म्हणून पुण्यातील `भिडे वाडा' सरकारने `ऐतिहासिक वास्तू' म्हणून जतन करावा!

– सुनीलकुमार सरनाईक

महात्मा फुलेंची शाळा सुरु होण्यापूर्वीच शाळेला विरोध सुरु झाला. विरोध जसाजसा वाढत गेला गोविंदरावांनी फुलेंनी अंगावरील कपड्यानिशी ज्योतिरावांना घराबाहेर काढले. अंगावरील कपडे अन् सोबतीला पत्नी यापलीकडे ज्योतिरावांकडे काहीच नव्हते. अशा बिकट प्रसंगी ज्योतिरावांच्या मदतीला धावून येणारा त्यांचा बालपणीचा जिवलग मित्र म्हणजे उस्मान शेख. शेख यांनी ज्योतिरावांना आपले गंजपेठेतील राहते घर दिले. इतकेच काय तर संसारासाठी लागतील म्हणून भांडीकुंडी अन् कपडेही दिले. सर्व प्रकारची मदत देऊ केली. ज्यामुळे ज्योतिरावांची शाळा उस्मान शेखच्या घरात भरू लागली. वर्ग वाढू लागले तर उस्मानने आपल्या बहिणीला सांगून सावित्रीबाईची मदत केली. सावित्रीबाईच्या सोबतीला शिक्षिका म्हणून काम करणारी पहिली स्त्री फातिमा शेख होती. फातिमा शेख सुशिक्षित होती, शिकवायचे कसे याचे प्रशिक्षण सावित्रीबार्इंकडून घेऊन ती शिक्षिका म्हणून काम करू लागली.

``विद्येविना मती गेली, मती विना नीति गेली,
नीतिविना गती गेली, गती विना वित गेले,
वित्ताविना शुद्र खचले, इतके सारे अनर्थ एक अविद्येने केले!''
१९ व्या शतकातील पहिले बंडखोर समाजसुधारक, महात्मा ज्योतीराव फुले यांनी शिक्षणासंबंधीचे मांडलेले हे विचार म्हणजे आजच्या काळात ही प्रत्येकांने अंगीकारावा असा मूलमंत्र आहे! मानवी स्वातंत्र्याकडे आणि समतेकडे नेणारा विचार सांगून महात्मा फुले थांबले नाहीत तर त्यांनी प्रत्यक्ष कृतीद्वारे स्त्री शिक्षणासाठी व अस्पृश्यता निवारणासाठी अहोरात्र कष्ट उपसले. त्यांच्याबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या पत्नी क्रांतिज्योती सावित्रीबार्इंनी स्त्री शिक्षणासाठी प्रसंगी मानहानी स्वीकारली पण घेतला वसा टाकला नाही. त्यांनी १८५१ मध्ये मुलींसाठी या देशातील पहिली शाळा सुरु केली. स्त्री शिक्षणाचा पाया सावित्रीबार्इंनी व महात्मा ज्योतिराव फुल्यांनी घातला. स्त्री शिक्षणाची सुरूवात करताना त्यांना अतोनात कष्ट सोसावे लागले, दु:ख वाट्याला आले, अपमान गिळावे लागले.
भारतात त्या काळात प्रचंड निरक्षरता होती, स्त्री या जर शिकल्या सवरल्या तर त्या संसार करणार नाहीत, त्या बिघडतील, स्त्रियांनी शिकू नये ही त्या देवाचीच इच्छा आहे, अशा प्रकारच्या तत्कालीन समाजात अंध: समजुती होत्या. पुरुषी अहंकार बळावल्यामुळे स्त्री शिक्षणाला समाजातील एक फार मोठा वर्ग सातत्याने प्रखर विरोध करीत होता. अशा प्रतिकुल परिस्थितीमध्ये अत्यंत धाडसाने व मनोनिग्रहाने फुले दाम्पत्यांनी पुण्यातील भिडे वाड्यात या देशातील पहिली मुलींची शाळा सुरु केली. त्यासाठी सावित्रीबार्इंनी अत्यंत हालअपेष्टा सोसल्या व मानहानीच्या प्रसंगांना तोंड दिले. तत्कालीन समाजाने सावित्रीबार्इंना अक्षरश: शेणाचे गोळे मारले, अपमानकारक टोमणे मारले व प्रत्यक्ष दगडधोंडे मारुन त्यांच्या कार्याला प्रचंड विरोध केला, मात्र समाजाकडून होणारा कडवा विरोध झेलत व शिव्याशाप ऐकत सावित्रीबार्इंनी स्त्रीशिक्षणाचे घेतलेले व्रत सोडले नाही. तत्कालीन समाजात स्त्रीने घराच्या उंबऱ्याच्या बाहेर येणे निषिद्ध मानले जात होते. अशा वेळी सामान्य घरातली एक स्त्री उंबऱ्याबाहेर पडून स्त्री शिक्षणाचा वसा घेऊन चालत आहे, हे चित्र अगदीच आगळेवेगळे होते, ते तत्कालीन समाजाला न पटणारे व न बघवणारे होते, त्यामुळे शाळेत जातांना त्यांच्यावर काही टोळभैरवांनी व गुंड प्रवृत्तीच्या समाज कार्यकत्र्यांनी मुद्दाम चिखल व शेणाचा मारा करुन त्यांना मुलींच्या शिक्षणाच्या घेतलेल्या व्रतापासून परावृत्त करण्याचा निकराने प्रयत्न केला होता. त्यांच्यावर भलतेसलते आरोप करुन त्यांना खजिल करण्याचाही प्रयत्न केला. पण अशा वेळी सावित्रीबाई त्यांना नम्रपणे उत्तर देत की, ``मी माझ्या भगिनींना शिक्षण देण्याचे पवित्र कार्य हाती घेतले आहे, ते मी कदापीही सोडणार नाही, तुम्ही जे माझ्यावर भलतेसलते आरोप करता, माझ्यावर शेण व चिखल तसेच दगडधोंडे टाकीत आहात ते मला फुलांप्रमाणे वाटतात!''
वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी ज्योतिरावांनी या ऐतिहासिक कार्याला सुरुवात केली. या कार्यात त्यांना शब्दश: सावलीप्रमाणे खंबीर साथ देणारी त्यांची पत्नी सावित्रीबाई होती अवघ्या १८ वर्षाची. मुलींची शाळा सुरु केल्याबद्दल आप्तनातलगांनी त्या दोघांना वाळीत टाकले, त्यांच्या घरीही कोणी येईना. एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष ज्योतिरावांच्या वडिलांनी या दोघांना घरातून बाहेर काढले; त्यामुळे शाळेसाठी जागा कोणीही देईना, भाड्याने जागा घ्यावी म्हंटले तर खिशात पैशाची वानवा होती. ज्योतिरावांची जिद्द वाखाणण्याजोगी होती, हे पाहून पुण्यातील भिडे नावाचे सदगृहस्थ की, जे ज्योतिरावांचे स्नेही होते, त्यांनी आपला वाडा या कार्यासाठी उपलब्ध करुन दिला. भिडे यांचे धारिष्ट्य खरोखरच वाखाणण्याजोगे होते. ज्योतिरावांच्या शिक्षणप्रसाराच्या कार्यात भिडे व त्यांच्या कुटुंबियाचे सहकार्य आणि मदत मोलाची आहे. त्यांच्यामुळेच फुले दाम्पत्यांना पुण्यासारख्या सनातनी विचाराच्या कर्मठ शहरात शिक्षणप्रसाराचे कार्य करता आले, हे आपणास विसरुन चालणार नाही.
याच भिडे वाड्यात ज्योतिराव व सावित्रीबार्इंनी मुलींची पहिली शाळा ३ जुलै १८५१ रोजी सुरु केली, पुढे चांगला प्रतिसाद मिळतो आहे हे लक्षात आल्यावर १७ सप्टेंबर १८५१ व १५ मार्च १८५२ मध्ये दोन शाळा चालू गेल्याचा उल्लेख आढळतो, तसेच या शाळेत अनुक्रमे ४८, ५१, ३३ इतक्या मुली शिकत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या शाळांची प्रथम वार्षिक परीक्षा दि. १७ पेâब्रुवारी १८५६ रोजी झाल्याची नोंद आळढते. या परीक्षा बघायला पुण्यातील नागरिकांनी अभूतपूर्व अशी गर्दी केल्याचीही नोंद आहे.
समाजसुधारणा, शिक्षणप्रसार व सुधारणावादी विचारांचे प्रबोधन या गोष्टी एका सामान्य समाजात जन्माला आलेल्या ज्योतिरावांनी व सावित्रीबार्इंनी केले आहे. अर्थात टिळक-आगरकर-कर्वे-गोखले या पुण्यातील समाजसुधारकांचा त्या वेळी जन्मही झालेला नव्हता. महाराष्ट्राच्या सामाजिक प्रबोधनाची भूमी नांगरुन मशागत करण्याचे महत्त्वाचे काम फुले दाम्पत्यांनी केले, ही गोष्ट भूषणावह आहे. तद्वतच भिडे कुटुंबियांनी फुले दाम्पत्यांना आपला वाडा मुलींच्या शाळेसाठी उपलब्ध करुन देणे हे त्या वेळच्या परिस्थितीचा अभ्यास केला तर किती महत्त्वपूर्ण आहे हे लक्षात येईल. या सर्वच गोष्टींना ऐतिहासिक मुल्य आहे. या देशातील स्त्री-शुद्रादीसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडे करणाऱ्या महात्मा फुले व सावित्रीबार्इंनी ज्या भिडे वाड्यात स्त्री शिक्षणाची पहिली मुहूर्तमेढ रोवली, तो `भिडे वाडा' फडणवीस सरकारने `ऐतिहासिक वास्तू' म्हणून जतन करायला हवा! आणि फुले दाम्पत्यांबरोबरच भिडे यांच्या त्यागालाही अभिवादन करायला हवे असे सुचवावेसे वाटते!
(लेखक आचार्य बाळशास्त्री जांभेकर `दर्पण' पत्रकार पुरस्कारांने सन्मानित असून लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत.)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget