सरफराज अ. रजाक शेख
एड. गाजीउद्दीन रिसर्च सेंटर, सोलापूर
8624050403
इतिहास हा साधनांच्या आधारे लिहिला जातो. इतिहासाला कथन करणारी साधने जितकी अत्यल्प असतात, तितका तो इतिहास आधारहीन असतो. जिथे साधने कमी असतात तिथे तर्क आणि ढोबळ अनुमानांच्या आधारे कल्पना करण्या शिवाय पर्याय नसतो. साधनांची विपुलता असली की इतिहास साधार होतो. पण त्यासोबत साधनांच्या विपुलतेने इतिहासावर अभिनिवेष व पुर्वाग्रह लादणार्यांना विकृतीकरणाची संधीही प्राप्त होते. साधनांची निवड करताना त्याची वर्गवारी करुन स्वतःच्या हिताला बाधा पोहचणार नाही, अशी साधने प्रकाशात आणली जातात. साधने विपुल असली की, हा पर्याय उपलब्ध होतो. पण साधने अत्यल्प असली की आहे त्या साधनांवरच सर्वांना अवलंबून रहावे लागते.
सल्तनतकालीन साधनांची उपलब्धता मोठी आहे. घराण्यांचा इतिहास, सुलतानांचा इतिहास, समाजाचा इतिहास, ठराविक प्रदेशाचा इतिहास, देशोदशी भटकंती करणार्या इब्ने बतुता सारख्या प्रवाशांची वर्णने, सुफी कवी जयसींनी लिहिलेले पद्मावत नावाचे काव्य, अमीर खुसरोंनी लिहिलेली दिबलरानीची प्रेमकथा, दरबारी व सामाजिक कवींचे शाहनामे, रुबाई, शायरी, शिजरा (वंशावळी) अशा हजारोंच्या संख्येत असणार्या ग्रंथांनी इतिहासाच्या अभ्यासात मोठी धांदल माजवली आहे. त्यामुळे एकच इतिहास अनेक अंगाने समोर आला. जसे आधुनिक इतिहासकार स्वतःचे हितसंबंध जपत तसे मध्यकालीन अनेक इतिहासकार स्वतःच्या हितरक्षणाची काळजी घेत असत. अशा राजदरबारी इतिहासकारांचा अपवाद वगळता निरपेक्ष हेतूने अभ्यासक म्हणून इतिहास मांडणार्यांची संख्या कमी नाही. यासंदर्भात अल्-बरुनीपासून जियाउद्दीन बरनी पर्यंत अनेकांचा उल्लेख करता येईल. पण या विद्वानांनी निर्माण करुन ठेवलेल्या साधनांची माहिती समाजापर्यंत एकतर कुणी पोहचविली नाही किंवा पोहचली असेलच तर ती खूप त्रोटक स्वरुपात. त्यामुळेच या इतिहासकारांची, मध्ययुगीन मुस्लीम विद्वानांची माहिती समोर येणे अत्यंत गरजेचे बनले आहे.
ज्यांनी इतिहासाची साधने मोडली,संपवली त्यांनी मांडला इतिहास - इतिहासाची साधने आणि त्याचा अर्थ लावण्याची पध्दती, त्यांची झालेली भाषांतरे व वापरेलेले निवडक संदर्भ हे इतिहासाच्या विकृतीकरणाला अधोरेखित करतात. एखादी घटना आपल्याला हवी त्या पध्दतीने मांडण्यासाठी आधुनिक इतिहासकार बरीच कसरत करतात. खिलजीकालीन घटना मांडायची असल्यास तुघलककालीन इतिहासकाराचे संदर्भ वापरतात. तुघलक कालीन इतिहास मांडायचा असल्यास लोदी कालीन इतिहासकारांचे संदर्भ वापरतात. समकालीन संदर्भ म्हणून उत्तरकालीन इतिहासाचे ग्रंथ पुरावे म्हणून सादर केले जातात. भाषांतर करताना वाक्याचा अर्थ बदलणारे अनेक शब्द क्रम चुकवून वापरतात. वाक्ये मध्येच तोडून त्याच्या पुर्वीचे आणि मागचे त्याला निराधार ठरवणारी विधाने वगळली जातात. महाराष्ट्रात मध्ययुगीन कालखंडाचे इतिहास लेखन अशाच विकृत विचारांनी बरबटलेले आहे. इतिहासाच्या साधनांमधील क्लीष्टता समजून घेण्याचा प्रयत्न फारसा या इतिहासकारांनी केलेला नाही. साधने समजून घेताना विज्ञानाचा आधार घेणे त्यांनी कटाक्षाने टाळले आहे. हे सारे प्रयत्न इतिहास लेखन वर्तमान राजकीय गरजेला पुर्ण करणारे व सोयीपुरते व्हावे यासाठी करण्यात आले आहेत. त्यातून इतिहास लिहणार्या इतिहासकारांविषयी आणि त्यांनी ज्यांचा इतिहास लिहला त्या इतिहासपुरुषांची प्रचंड बदनामी झाली आहे.
इतिहास संपवू पाहणारे पुर्वाग्रह
इतिहासाच्या साधनांची चर्चा वा.सी. बेंद्रे यांनी त्यांच्या अनेक ग्रंथात मोठ्या प्रमाणात केली आहे. अ.रा. कुलकर्णी, सेतू माधव पगडी, ग.ह. खरे यांनी देखील साधनचर्चा करण्याचा मोठा प्रयास केला आहे. साधनांची चर्चा करण्याची या इतिहासकाराची पध्दत आधुनिक आहे. मात्र बेंद्रे वगळता इतिहासावर अभिनिवेष लादण्याचा यांचा आग्रह मात्र पुरातन आहे. विशिष्ट वर्गाच्या इतिहास विकृतीकरणाच्या परंपरेचे प्रतिनिधित्त्व करणारा आहे. बेंद्रेंनी साधनांच्या चर्चेत चिकित्सेचा मार्ग स्विकारला आहे. तर पगडी वगैरेंनी इतिहासाच्या साधनात द्वेषाची पेरणी कशी करता येईल याचेच प्रयत्न पुन्हा - पुन्हा केले आहेत.
तसे पाहता, महाराष्ट्रातील
इतिहास संशोधक
मुलतः शिवकालीन
इतिहासाच्या पुनः
मांडणीला लक्ष्य समजूनच संशोधनाच्या क्षेत्रात उतरले. त्यातही एका विशिष्ट वर्गानेच जमातवादी धारणेतून हे काम अंगिकारले. त्यामुळे त्यांच्या या कार्यामागे सांस्कृतिक आणि वर्तमान राजकीय प्रेरणा होत्या. अभिनिवेष आणि पुर्वाग्रह देखील होते. श्रध्दा देखील तीव्र होत्या. त्याकारणानेच शिवकाळाचा इतिहास आधिक उठावदार, ठाशीव आणि धर्माधिष्ठीत करण्याचा आटोकाट प्रयत्न शिवकालीन इतिहासाच्या संशोधकांनी केला. त्यामुळे शिवकाळापुर्वीचा इतिहास अंधारयुगाची गाथा असल्यासारखा रेखाटण्यात आलाय. अशा लिखाणातून इतिहासाविषयीचे गैरसमज प्रचंड प्रमाणात निर्माण झाले आहेत. आपसूकच मुसलमान राज्यकर्त्यांमधला राजकीय विरोध राक्षसी कंपूचा विरोध म्हणून चितारला गेला. अल्लाउद्दीनच्या देवगिरीवरील स्वारीची अतिरंजित कथा, दक्षिणेतून यादव साम्राज्याचे पतन, त्यांच्या धर्मभ्रष्टतेमुळे कसे झाले? दक्षिणेत प्रादेशिक शाह्यांची स्थापना ही राक्षसी आपत्ती कशी होती? हा काळ हिंदूंच्या धार्मिक तेजोभंगाचा काळ कसा होता? हे महाराष्ट्रीयनांच्या मनावर बिंबवण्यातच इतिहासकारांनी धन्यता मानली. पु. ग. सहस्त्रबुध्दे यांनी केलेले विधान याबाबत प्रातिनिधीक मानता येईल, ते म्हणतात, “ तेराव्या शतकाच्या अखेरीपासून सुरु झालेली मुस्लीमांची आक्रमणे, त्यानंतर काही काळ चाललेली दिल्लीच्या सुलतानांची सत्ता आणि त्यानंतर स्थापन झालेली बहामनी सत्ता ही महाराष्ट्रावर आलेली अस्मानी प्रलायपत्तीच होती. मराठ्यांची राजसत्ता तर मुस्लीमांनी नष्ट केलेलीच होती, पण त्याबरोबरच मराठ्यांचा हिंदू धर्म, त्यांच्या प्राचीन परंपरा, हा सर्व महाराष्ट्र समाज आणि या लोकांचे स्वत्त्व यांचा संपूर्ण नाश करण्याची प्रतिज्ञाच बहामनी सुलतानांनी केली होती.” 1
सहस्त्रबुध्दे व त्यांचे वैचारिक समानधर्म असणार्या इतिहासकारांनी इलियट आणि डाउसन या धुर्त कावेबाज इंग्रज इतिहासकारांनी सल्तनतकालीन मुस्लीम इतिहासकारांच्या ग्रंथाची चुकीच्या पध्दतीने केलेली भाषांतरे प्रमाण मानली. त्याची सत्यासत्यता, ग्राह्यग्राह्यता पडताळून पाहण्याचे कष्ट फारसे कुणी घेतले नाहीत. आपल्या सांस्कृतीक राजकीय प्रेरणांना त्यामूळे बळकटी मिळते म्हणून महाराष्ट्रीयन इतिहासकारांनी त्या सरसकट स्विकारल्या. ग.ह. खरे, म.श्री. माटेंसारखा सन्मान्य अपवाद वगळला तर त्यांच्या समिक्षेची फारशी गरज कुणाला वाटली नाही. खरे आणि माटे यांनी मुळ साधनांचा तौलनिक अभ्यास केला आहे. पण समग्र मांडणीचा अभाव असल्याने तोही मर्यादीतच आहे. त्यामुळे सल्तनतकालीन इतिहासाची साधने अद्याप महाराष्ट्रीयन इतिहासलेखनात उपेक्षितच आहेत.
आपण खोटाच इतिहास शिकत आलोय
इतिहासलेखन सोयीचे व्हावे म्हणून साधने दुर्लक्षित करण्याची जुनी पध्दत सातत्याने अवलंबली गेली. इंग्रज इतिहासकार सोयीच्या साधनांचे भाषांतर करत. कधी - कधी अर्धवट भाषांतर करुन इतिहासात गैरसमज पेरत. हिच पध्दत उजव्या इतिहासकारांनी अवलंबली आहे. साधने भाषांतरीत करणारा एक मोठा वर्ग विसाव्या शतकाच्या मध्यापासून महाराष्ट्रात कार्यरत होता. त्या वर्गाने साधनांची भाषांतरे करताना अनेक कागदपत्रे गिळंकृत केली. काही साधनांची मोडतोड केली. साधनांना स्वतःच्या चौकटीत बंदीस्त करण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. त्याची वैज्ञानिक चिकित्सा करण्याचा मार्ग त्यांनी पत्करला नाही. साधनांची बुध्दीप्रामाण्यवादी चिकित्सा नाकारुन त्यावर आग्रह लादण्यात आले. त्यातून हिंदूच्या तेजोभंगाचा आणि मुसलमानांच्या राक्षसी आक्रमणाचा कथित इतिहास आकाराला आला. मुसलमान राजवटींची सुरुवात असणार्या सल्तनतकाळाविषयी अनेक मिथक जन्माला घालण्यात आले. या साधनांची वैज्ञानिक चिकित्सा नाकारुन उभारलेली मिथकांची इमारत अत्यंत ठिसूळ आहे. तर्काच्या आणि चिकित्सेच्या कसोटीपुढे तिचा निभाव लागणे शक्य नाही. उदाहरणादाखल एक नमुना पहा.
सल्तनतकालीन इतिहासाच्या साधनांची चर्चा करताना म.श्री. माटे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणतात, “ आता प्रश्न असा उत्पन्न होतो की, साडेतीनशे वर्षे हिंदू धर्माचा उच्छेद करण्याच्या कामात महाराष्ट्रातील सल्तनती यशस्वी झाल्या असत्या तर महाराष्ट्र भूमींवर हिंदू शिल्लक तरी कसे राहिले ? हिंदू शिल्लक राहिले एवढेच नव्हे तर प्रचंड बहुसंख्येने अस्तीत्वात राहिले आहेत. “वारकरी” पंथासारखे हिंदू धर्मातील पंथ भरभराटील आले, आपले “वारी” सारखे आचार प्रगटपणे पाळत राहिले. मराठी भाषेत धार्मिक - स्वरुपाचे प्रचंड वाङ्मय उत्पन्न झाले, हा चमत्कार कसा काय झाला ? या प्रश्नांचा तटस्थपणे विचार करणे आवश्यक आहे. त्यासाठी मराठी (व इंग्रज) इतिहासकारांनी विश्वसनीय समजून आधारभूत मानलेल्या मुसलमान तवारीखकारांच्या लिखाणाची फेरतपासणी केली पाहिजे. या लेखकांचे हेतू त्यांच्या प्रेरणा यांचा शोध घेतला पाहिजे. तरच सल्तनतीच्या धोरणांची यथातथ्य कल्पना येईल. दिसते ते असे की अतिशयोक्ती या अलंकाराचा वापर केला कि, विधाने अर्थहिन होतात याचे भान तवारिखकारांनी ठेवलेले नाही. साधी सैन्यबळाची गोष्ट घेतली तरी हेच दिसते. प्रत्येक युध्दात त्यांनी दोन्ही बाजूंनी हजारोंच्या संख्येने सैन्य उभी केली आहेत. इतके लढवय्ये दरवेळी पाठविण्याइतकी एकुण लोकसंख्या तरी होती का? हा प्रश्न पडतो. काफरांच्या उच्छेदाची तीच कथा आहे. तबातबा आणि फेरिश्ता काहीही म्हणोत. काफरांचा उच्छेद झाला नाही हेच खरे ” 2 म.श्री. माटे यांनी इतिहासलेखनाविषयी उपस्थित केलेले हे प्रश्न उद्बोधक आहेत. तरीही माटे असो वा खरे दोघांनीही समिक्षेच्या पलिकडे जाउन सल्तनतकालीन इतिहासाची पुनःमांडणी केली नाही अथवा मध्ययुगीन मुसलमान विद्वानांच्या इतिहासग्रंथाची माहिती समोर आणली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात अपवाद वगळता आजपर्यंत खोट्या इतिहासाचीच पारायणं क्रमिक पुस्तकांतून आणि इतिहासाच्या ग्रंथातून होत आली आहेत हे उघड आहे. जर इतिहासलेखनातला खोटोरडेपणा खंडीत करायचा असेल तर इतिहासाच्या साधनांना समोर आणावे लागेल.
Post a Comment