सध्या दलितांप्रमाणेच मुस्लिमांनाही अत्याचाराचे लक्ष्य बनविले जात आहे. याचे कारण मुस्लिमांनी भारतात येऊन ब्राह्मण व क्षत्रियांवर राज्य केले हे नसून याचे खरे कारण म्हणजे मुस्लिम शासकांनी भारतातील वर्णव्यवस्था भंग केली होती. (भंग एवढ्यासाठी की त्यांनी वर्णव्यवस्था नष्ट केली नाही.) आणि ती मुस्लिम शासनकाळापासून भंगावस्थेतच चालत आलेली आहे. वर्णव्यवस्था भंग करण्यासाठी मुस्लिम शासकांनी कोणतेही आंदोलन सुरू केलेले नव्हते. त्यांनी फक्त शिक्षणाचे सार्वत्रिकरण केले होते. म्हणजे जे शिक्षण फक्त ब्राह्मणांपर्यंत मर्यादित होते ते सार्वजनिक झाले होते. तो हिंदू भारताच्या इतिहासातील सर्वांत क्रांतिकारी कार्य ठरले होते. जे युगायुगांपासून शिक्षणापासून वंचित होते ते आता लिहू-वाचू शकत होते. या परिवर्तनामुळे ब्राह्मणवादाला आव्हान उभे ठाकले. आता हळूहळू डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावात बदल करून त्यांचेही ब्राह्मणीकरण करण्याचे कार्य सध्या सत्ताधारी भाजपद्वारे सुरू आहे. त्यांच्या नावात ‘रामजी’चा उल्लेख करून त्यांच्या अनुयायांना भटकविण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या षङ्यंत्रामागे फक्त आणि फक्त वर्णव्यवस्था आहे ज्यात ज्ञानक्षेत्रात ब्राह्मण अधिकारी आणि ब्राह्मणेतर अधिकारहीन आहेत. मुस्लिम शासकांनी याच वर्णव्यवस्थेला भंग केले आणि अधिकारी आणि अधिकारहीन हा भेद संपुष्टात आणला. ही काही क्षुल्लक गोष्ट नाही. यामुळे मोठे परिवर्तन घडले होते. म्हणूनच रा.स्व. संघ मुस्लिम समाजाचा आज मोठ्या प्रमाणात द्वेष करीत आहे. मुस्लिम शासकांच्या या कृतीमुळे ज्या जातींना संघाने कोमामध्ये ठेवले होते आणि निरंतर कोमातच ठेवू इच्छित होते त्या अचानक जागृत होऊन हिंदू परिघामधून बाहेर पडल्या. प्रतिष्ठा, सन्मान व मुक्तीसाठी मुस्लिम धर्मही स्वीकारला. त्यांनी हजारो नव्हे तर लाखोंच्या संख्येने धर्मपरिवर्तन केले आणि सुशिक्षित होऊन त्यांनी आपल्या भावी पिढ्यांचे भविष्य सावरले. आता संविधानाच्या माध्यमातून कायद्यांमध्ये परिवर्तन करून, विविध समाजांच्या वैयक्तिक कायद्यांमध्ये हस्तक्षेप करून त्यांना त्रास दिला जात आहे. ‘तीन तलाक कायदा’ आणि ‘अॅट्रॉसिटी कायद्यात बदल’ हे दोन्ही उदाहरणे सर्वश्रुत आहेत. अशा प्रकारे राष्ट्रवाद वा फॅसिस्टवादाला लोकशाहीचा मुख्य प्रवाह बनविले जात आहे. त्यांच्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला मानवतावाद, समतावाद आणि सामाजिक न्याय धोकादायक शब्द आहेत. हे शब्द त्यांना भयभीत करतात. देशातील राजकारणात सर्वांत चर्चित ‘पॉलिटिकल आयकॉन’ बदलत राहिले आहेत. सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशातील सर्वांत चर्चित ‘पॉलिटिकल आयकॉन’ बनले आहेत. भाजप, काँग्रेस, समाजवादी इत्यादींचा इ.सन २०१९ सालच्या लोकसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून स्वत:ला डॉ. आंबेडकरांचे सच्चे अनुयायी सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. हिंदुत्वाचे राजकारण करताना त्यात दलितांचा समावेश भाजपसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘‘हिंदूराष्ट्राचे भूत कायमचे गाडून टाकण्यासाठी भारतात हिंदू व मुस्लिमांचा एक पक्ष वा गट तयार करणे फारसे कठीण काम नाही. हिंदू समाजात ज्या लहानसहान जाती आहेत त्यांची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समस्या बहुसंख्य मुस्लिमांसारखीच आहे आणि त्या एकाच उद्देशासाठी मुस्लिमांच्या बरोबरीने एक मोठे आंदोलन उभे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तयार होतील. त्या कधीही युगायुगांपासून त्यांना मावी अधिकारांपासून वंचित केलेल्या उच्चवर्णीय हिंदूंच्या बरोबर जाणे पसंत करणार नाहीत.’’ (डॉ. बाबासाहेब राइटिंग्ज अॅण्ड स्पीचेस, खंड-८, पृ.३५८-५९) दलित-अल्पसंख्यक एकतेचे सूत्र डॉ. आंबेडकरांनी ३१ डिसेंबर १९३० रोजी अल्पसंख्यक उपसमितीच्या बैठकीत जाहीरपणे सांगितले आहे. ते म्हणतात, ‘‘दलितांप्रमाणेच अन्य अल्पसंख्यक वर्गांना भीती आहे की भारतातील भावी संविधानाद्वारे या देशातील सत्ता बहुसंख्यकांच्या हातात सोपविण्यात येईल. ते दुसरेतिसरे कोणी नसून रुढिवादी हिंदू असतील. जोपर्यत ते आपल्या रुढी, कट्टरता आणि पूर्वग्रह सोडणार नाहीत तोपर्यंत अल्पसंख्यकांसाठी न्याय, समता व विवेकावर आधारित समाज एक दिवा स्वप्न ठरेल. म्हणून अशी व्यवस्था अवलंबण्यात यावी ज्यामुळे अल्पसंख्यकांच्या हितांचे रक्षण होईल आणि त्यांच्याशी पक्षपात होणार नाही. त्यासाठी अल्पसंख्यकांना विधायिका व कार्यपालिकेत प्रतिनिधित्व देण्यात यावे. देशातील सार्वजनिक क्षेत्रात प्रतिनिधित्व मिळावे. अल्पसंख्यकांवर अन्याय होणार नाही यासाठी बहुसंख्यकांना असा कायदा करण्यापासून रोखण्यात यावे ज्यायोगे अल्पसंख्यकांशी पक्षपात होईल.’’ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण वाङ्मय, खंड-५,पृ.४३-४४) यावरून हेच सिद्ध होते की संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले दलित-मुस्लिम एकतेचे सूत्रावर आज या क्षणाला दोन्ही समाजांतील लोकांनी विचार करण्याची अत्यंत आवश्यकता आहे अन्यथा डॉ. आंबेडकरांनी अगोदरच धोक्याचा इशारा दिलेला आहे त्यानुसार त्यांना परिणाम भोगावे लागतील.
Post a Comment