सरफराज अ. रजाक शेख
एड. गाजीउद्दीन रिसर्च सेंटर, सोलापूर
8624050403
ज्या राज्यात एखादी व्यक्तीसुध्दा अन्याय करत असेल ते राज्य न्यायकारी असू शकत नाही (भाग 2)
जियाउद्दीन बरनीने त्याच्या ग्रंथात सत्यावलोकन आणि सल्लागार मंडळाच्या महत्वाविषयी विस्ताराने लिखाण केले आहे. बरनी एकचालकानुवर्ती, लहरी, हुकुमशाही राजवटीचे स्वरुप बदलण्याची आकांक्षा बाळगून होता. हे त्याच्या लिखाणातील काही मुद्यांवरुन स्पष्ट होते. ज्या राज्यात एखादी व्यक्तीसुध्दा अन्याय करत असेल ते राज्य न्यायकारी असू शकत नाही.
“अभिमान बाळगणे आणि इतरांपासून स्वतंत्र राहणे, दहशतीचे प्रदर्शन करणे, दासतेच्या (इश्वराचा दास) गुणाविरुध्द आहेत. उपर्युक्त गोष्टींचा अधिकार अल्लाहला आहे. काही विद्वानांनी मुसलमान बादशहांसाठी उपर्युक्त गुण योग्य ठरवले आहेत. कारण तो न्याय करतो आणि वैभवातून न्याय उच्चशिखराला प्राप्त करतो. कोणताही अवज्ञाकारी व्यक्ती सुध्दा दीनदुबळ्यांवर अन्याय करु शकत नाही.” ह्यानंतर बरनीने न्याय हे कोणत्याही राजवटीचे मुख्य स्तंभ असल्याचे म्हटलेले आहे. बरनीने राज्य काही स्तंभावर उभे असल्याचे मत मांडले आहे. त्यातील न्यायसंस्था हे एक स्तंभ असल्याची संकल्पना त्याने मांडली आहे. न्यायकारी बादशहाची राजवट यशस्वी राजवट असते असे त्याचे मत आहे. “बादशहाचा अनिवार्य गुण न्याय आहे. जर बादशहात स्वाभाविक रुपात न्यायाचे गुण विद्यमान असतील. तर प्रेषितांच्या गुणांशिवाय कोणतेच गुण त्याच्याव्यतिरिक्त श्रेष्ठ नाही. बादशाहमध्ये जर न्यायाचे गुण विद्यमान असतील तर इतर सर्व गुणांमध्ये त्याला प्रधान्य देणे गरजेचे आहे. ”
अत्याचाराचे समुळोच्छेदन करण्यासाठी बादशाहने सतर्क असावे. बादशाही आपल्या कुटुंबाकडे आहे म्हणून राजपरिवारातील व्यक्तींनी देखील अत्याचार करु नयेत हे सांगताना बरनी म्हणतो,“(अत्याचाराचे समुळोच्छेदन) हे गुण बादशाहची संतती, स्नेही, दास, मित्र, वली (प्रांताचे आधिकारी), काजी तथा आमिल (कर्मचारी) यांच्यात असणे अनिवार्य आहे. ह्यामुळे शासनप्रबंधात सहाय्यता होते. जोपर्यंत बादशाहचे सर्व वली,काजी, आमिल तथा आज्ञा प्रदान करणारे न्यायकारी असणार नाहीत. तोपर्यंत सर्वसाधारण व्यक्तींच्या व्यवहारात न्यायाची प्रस्थापना होत नाही तथा अत्याचाराचे अंत होत नाही. बादशाह त्याचवेळी न्यायकारी असू शकतो. ज्यावेळी त्याच्या राज्यातील अत्याचार संपेल आणि अत्याचारींचा विनाश होईल. जर बादशहाच्या राज्यात एक जरी व्यक्ती अत्याचार करत असेल तर न्याय त्याच्या राज्यात स्थापित होऊ शकत नाही.”
न्यायाचा प्रसार
न्यायाचा प्रसारासंबधी बरनी म्हणतो,“बादशाहचे वली,काजी,अमीर तथा अमील ह्यांच्यामध्ये न्यायाचे प्रसार ह्याप्रकारे व्हावे की, त्याच्या राज्यात कष्ट तथा उपद्रव कमी व्हावेत आणि आकाशातून आशिर्वादाची निरंतर वर्षा होत रहावी. बादशहामध्ये स्वाभाविक रुपात न्याय विद्यमान रहावे. तो स्वाभाविक रुपात अत्याधिक न्याय करत असावा. त्याच्या राज्यातील खास आणि आम (व्यक्तींवर) अत्याचार होऊ नये.” न्यायाच्या प्रसाराचे महत्त्व विषद केल्यानंतर जियाउद्दीन बरनी ने अॅरिस्टॉटल आणि सिकंदर चे संवाद नोंदवले आहेत. सिकंदरला अरस्तू (रिस्टॉटल) म्हटले की, “न्याय तथा अत्याचार विरोधाभासी गुण आहेत. जे एका स्थानावर एकाच ठिकाणी एकत्र राहू शकत नाहीत.काही बादशहा आणि शासकांच्या ठिकाणी दोन्ही गुण एकत्र पाहायला मिळतात. ह्याचे कारण काय आहे? अरस्तूने उत्तर दिले, ‘जर कोण्या बादशाहमध्ये स्वाभाविक रुपात न्याय दिसत असेल तर तो कोणत्याही परिस्थितीत अत्याचार करत नाही”. न्याय आणि समानता, जनतेप्रती कटिबध्दता ह्याविषयी बरनीचे विचार, त्याच्यातील निरपेक्षतेला अधोरेखीत करतात. त्यामुळे धार्मिक भेदाभेद, वांशिक दुराभिमानाविषयीचे त्याच्या नावावर खपवले जाणारे उतारे त्याचेच आहेत का? हा प्रश्न पुन्हा- पुन्हा समोर येतो. एस. के. पारुथी हे देखील प्रक्षेपाचा मुद्दा मांडताना “बरनीच्या लुप्त अंशाचे जिर्णोध्दार करताना एक परिच्छेद लिहिले गेले.” असल्याचे मत मांडतात.
बादशहाच्या कार्यात संतुलन असणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्याने मांडलेल्या मताच्या मुळाशी देखील समतेची मुल्यं दडलेली आहेत. बादशाही कार्यात संतुलनाचा मुद्दा मांडताना तो म्हणतो, “ तुम्हाला ज्ञात असावे की, राज्य-व्यवस्था संबधी उत्तम कार्य दोन प्रकारचे आहेत. सर्वसाधारणांचे (लोकांचे) हक्क अदा करणे, प्रजेच्या प्रती कृपा करणे, दया, न्याय तथा त्यांची सहाय्यता करणे.” दुसर्या प्रकारचे कार्य स्पष्ट करताना त्याने राज्यासाठी ज्या - ज्या व्यक्तींचे योगदान राहिले आहे. त्या - त्या व्यक्तींना योग्य मोबदला दिला जावा.”
प्रशासन, सैन्य, राजकारभार
बरनीच्या सिध्दातांत काही ठिकाणी त्याच्या वर झालेल्या अन्यायाचे पडसाद उमटले आहेत. बरनीला आयुष्यभर राजकीय लाभांपासून दूर रहावे लागले. मोहम्मद तुघलकाने काही काळ त्याला राजाश्रय प्रदान केला. त्याविषयी स्वतः बरनीने त्याच्या ग्रंथात माहिती दिली आहे. त्यामूळे बरनी अन्यायाच्या विरोधात मोठ्या रोषाने बोलत राहतो. न्यायाचे तत्व मांडताना बरनीने समान न्यायाची संकल्पना मोठ्या आवेषात पुढे रेटली आहे. प्रशसनासंबंधी त्याने अनेक ठिकाणी कर्मचार्यांच्या कर्तव्यावर भाष्य केले आहे. अधिकारी योग्य नसले की प्रशासनावर विघातक परिणाम होतात. त्यामुळे अधिकार्यांची योग्यता तपासून त्यांना प्रशासनात नियुक्ती दिली पाहिजे, बरनीचे हे मत समर्थनीय आहे. बादशहा व अधिकार्यांना रयेतेच्या संदर्भात निर्णय घेताना कोणती काळजी घ्यावी हे सांगताना तो म्हणतो, “जर एखादी गोष्ट सर्वसंमतीने निश्चित करण्यात आली असेल, ती वासनेच्या विरोधात नसेल आणि त्यातून अभिमान (वृथा अंहकार किंवा गर्वभावना) उत्पन्न होत असेल तर त्यापासून दूर राहिले पाहिजे. वासनेच्या अधिन राहून कार्य केल्याने हानी होते.” बरनीच्या प्रशासकीय कर्मचार्यांच्या नियुक्ती संदर्भातील विचार समजण्यासाठी उदाहरणादाखल बरीदांच्या नियुक्तीसंदर्भात त्याने केलेले नियम पाहता येतील. मध्ययुगीन डाक व्यवस्थेला अत्यंत महत्त्व होते. अर्थव्यवस्था,लष्कर, महसूली कर गोळा करणे यानंतर डाक व्यवस्थेला महत्त्व दिले जायचे. या खात्यात काम करणार्या कर्मचार्यास बरीद म्हटले जायचे. बरीद दोन प्रकारचे असायचे, राज्यात त्याच्या नियुक्ती संदर्भात बरनी म्हणतो, “ जनतेची स्थितीगती, त्यांच्यावरील संकटे, त्यांच्यातील रोषभावना ह्यांची माहिती बादशाहला असणे अत्यंत गरजेचे आहे. ” बरीदांच्या नियुक्ती संदर्भात धार्मिक आधारावरुन बरीदांच्या नियुक्तीसंदर्भात कुणी रोखत असेल तर त्याविषयी काय करावे यासंदर्भात म्हणतो, “ जर कुणी मुर्ख तुम्हाला हे सांगत असेल, कुरआनमध्ये हे लिहले आहे की, लोकांनी एक दुसर्यांच्या प्रकरणात लक्ष देऊ नये तर तुम्ही त्याला हे उत्तर दिले पाहिजे की, हा नियम, लोकांनी एकदुसर्याच्या प्रकरणात लक्ष न घालण्यासंदर्भात आहे. मात्र बादशाहला प्रजेची चांगली, वाईट स्थिती, आज्ञाकारीता तथा अवज्ञाकारीता यांसदर्भात चौकशी करत राहिले पाहिजे.” बरीदांच्या नियुक्तीचे महत्त्व विदीत करुन बरीदांच्या नियुक्तीच्या वेळी लक्षात घ्यावयाच्या अटींसंदर्भात तो म्हणतो, “सर्वात आवश्यक अट बरीदचे गुण आहेत. बरीद खरं बोलणारा असावा. इमानदार, शुध्दवंशीय, विश्वास योग्य तथा आदर सन्मान करणारा असावा. त्याच्या सत्यतेमुळे बादशाह असे कार्य करु शकेल की ज्यातून प्रजेचे हित साधले जाईल.” बरिदांच्या नियुक्तीबद्दल बरनीने ज्या पुर्वअटी सांगितल्या त्याच पुर्वअटी त्याने अन्य कर्मचार्यांच्या नियुक्तीबद्दल मांडल्या आहेत.
बरनीच्या ग्रंथातून मध्ययुगीन
अर्थव्यवस्थेचे आकलन
मध्ययुगीन भारताच्या इतिहासात राज्यकर्त्यांच्या अर्थव्यवस्थेला खूप महत्त्व होते. जवळपास सर्व राजकीय घडामोडी अर्थकारणाशी निगडीत होत्या. राजस्व प्रदेशावरील आधिकाराचे तंटे देखील अर्थकारणाशी निगडीत होते. सुलतानांच्या काळात प्रभावी अर्थकारणासाठी महसूली व्यवस्थेत अनेक बदल घडवण्यात आले. अल्लाउद्दीन खिलजीकृत मुल्यनिर्धारणा असेल कींवा मोहम्मद तुघलक कृत निश्चलनीकरणाचा निर्णय ह्या बाबी एका परिवर्तनाला अधोरेखीत करणार्या होत्या. मात्र डी.डी.कोसाम्बी यांनी सरसकट निष्कर्ष काढून भारतीय सामंतशाहीत सुलतानांमुळे कोणतेच बदल झाले नसल्याचा आरोप केला आहे. महान इतिससंशोधक मोहम्मद हबीब यांनी मात्र सल्तनकाळातील अर्थव्यवस्थेला एका परिवर्तनाच्या रुपात अधोरेखीत केले आहे. त्यांनी अनेक महत्त्वपुर्ण बदल शोधले आहेत. अल्लाउद्दीन खिलजीच्या मुल्यनिर्धारणाच्या कृतीला मध्ययुगीन आर्थिक इतिहासात वेगळे महत्त्व प्राप्त आहे. दुष्काळ पडल्यानंतर अन्नधान्याची टंचाई निर्माण होणे स्वाभाविक असते. अशा काळात अन्नधान्याच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ होते. पण अल्लाउद्दीन खिलजीने बाजारातील मुल्यं नियंत्रीत रहावीत यासाठी शासकीय गोदामातील धान्य बाजारात आणले होते. बाजारातील मूल्य नियंत्रीत राहिल्याशिवाय प्रजा सुखात जगू शकत नाही. हि त्याची धारणा होती. त्यामूळेच त्याने न्यायावर आधारीत समान मूल्य असणारी बाजार प्रणाली अस्तीत्वात आणली होती. ह्या बाजार प्रणालीला “दारुल अद्ल” म्हटले जायचे. (यासंदर्भात अधिक विश्लेषण मी माझ्या “अल्लाउद्दीन खिलजी - प्रचलित दृष्टीकोन आणि इतिहासातील संदर्भ” या पुस्तकात केले आहे.) (क्रमशः)
Post a Comment